शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी यांच्या निर्घृण खुनाला अनुक्रमे अडीच वर्षे, एक वर्ष आणि सहा महिने पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही त्यांचे मारेकरी व सूत्रधार मोकाट आहेत. तपासाची गती अतिशय मंद आहे. त्यामुळे कार्यकर्तेआणि विवेकी सामान्य माणूस सतत अस्वस्थ आहे. तपास लवकर लागावा आणि सत्य काय आहे ते लोकांसमोर यावे यासाठी समितीने आजवर सनदशीर मार्गाने धरणे, निषेध, मोर्चे, आंदोलने केली आहेत. मात्र त्याचा विशेष परिणाम झालेला दिसून आला नाही. देशाच्या पंतप्रधानांनी यात लक्ष घालावे म्हणून भेटीसाठी वेळ मागण्यात आली. मात्र अडीच वर्षांनंतरही एका थोर विचारवंतांच्या खुनाच्या तपासाबाबत केवळ म्हणणे ऐकण्यापुरतीही वेळ माननीय पंतप्रधानांकडे उपलब्ध नाही, ही अतिशय खेदजनक बाब आहे. म्हणून शुक्रवार, दि.12 फेबु्रवारी 2016 रोजी स.11 ते दुपारी 2 या वेळात ‘महाराष्ट्र अंनिस’सह देशातील विविध राज्यातून आलेल्या विविध परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी या संघटनांच्या प्रतिनिधींनी तिघां विवेकी व परिवर्तनवादी विचारवंतांच्या निर्घृण खुनाबाबत आणि अद्याप काहीही ठोस तपास न झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. समाज सुधारण्यासाठी शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ.पानसरे, प्रा.कलबुर्गी यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची सखोल माहिती काही प्रतिनिधींनी दिली. विज्ञाननिष्ठ समाजनिर्मिती बरोबरच सर्व प्रकारची सामाजिक विषमता दूर करण्यासाठी तिघांनीही आपले जीवन पणाला लागले. मात्र त्यांचा शेवट निर्घृण खुनात व्हावा आणि तरीही मारेकरी-सूत्रधार सापडू नयेत, हे येथील राजकीय व्यवस्थेबरोबरच सामाजिक व्यवस्थेचेही अपयश असल्याचे मत कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा संमत होऊन अंमलात आला. असाच कायदा देशापातळीवर व्हावा, कर्नाटक सरकारनेही त्यादिशेने पाऊल उचलले आहे. तसेच जातपंचायतींच्या माध्यमातून जातीमधील शोषणाची कीड ठेचली जावी म्हणून जातपंचायतीच्या अघोरी व अन्याय पद्धतीने दिल्या जाणार्या न्यायनिवाड्याला लगाम बसावा म्हणूनही कायदा व्हावा, अशी मागणीही ‘महाराष्ट्र अंनिस’च्या वतीने लेखी निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे करण्यात आली.
या धरणे आंदोलनात विविध राज्यातील परिवर्तनवादी संघटना व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी स्वयंप्रेरणेने सहभागी झालेले होते. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे – पंजाब, हरियाना राज्यातून ‘तर्कशील’चे भुरासिंग, हरचंद बिंदर आदी आठ कार्यकर्ते, गांधी स्मारक निधीचे संचालक रामचंद्र राठी, प्रभात सा.‘धनक’चे आसिफ इक्बाल, पुणे येथील ‘मासूम’ संस्थेच्या डॉ.मनीषा गुप्ते व डॉ.रमेश अवस्थी ए.आय.एस.एफ.चे राजू झा, ‘समता’च्या स्नेहलता शुक्ल, शिक्षण संघाचे महावीर शुक्ल, सी.पी.आय.चे अतुल अंजान, आम जनता मोर्चाचे उमेश यादव, ‘क्रांती’च्या श्वेता सी.पी.आय.(एम.) चे पोल्यूट ब्युरो मेंबर हनान मुल्ला, युवा संवाद अभियानाचे अशोक भारत, यू.पी.कामगार संघाचे राधेशाम यादव, मार्क्सवादी कम्युनिस्य पक्षाचे विद्यमान खासदार निलोत्पल बसू, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी एस.एस.रेड्डी आदींनी पाठिंबा व प्रत्यक्ष सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी ‘महाराष्ट्र अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह राज्य प्रधान सचिव माधव बावगे, राज्य सेक्रेटरी डॉ.हमीद दाभोलकर, डॉ.ठकसेन गोराणे, गजेंद्र सुरकार व राष्ट्रीय अनुसंधान विभागाचे कार्यवाह डॉ.सुदेश घोडेराव दोन दिवस अगोदरच दिल्लीत दाखल झाले होते. या काळात त्यांनी सर्व प्रकारच्या प्रसार माध्यमांची प्रत्यक्ष भेट घेऊन ‘महाराष्ट्र अंनिस’ची कार्यपद्धती, खुनाच्या तपासाबाबत होत असलेला विलंब, देशपातळीवर कायदा करण्याची मागणी व धरणे आंदोलनाचा उद्देश समजावून सांगितला. अनेक राजकीय पक्षांचे मान्यवर, पदाधिकारी, परिवर्तनवादी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याही भेटीगाठी घेतल्या. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी शबनम हश्मी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. स्वत:च्याच कामाचा भाग म्हणून हे सर्वजण समरस होऊन कार्यरत होते. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघाताई पानसरे यांनी जाणीवपूर्वक उपस्थिती लावून, पोटतिडकीने मागणी मांडली. पत्रकार परिषदेत अविनाश पाटील, डॉ.हमीद दाभोलकर व मेघाताई पानसरे यांनी खुनाचा तपास गतिमान व्हावा, कायदा संमती, याबाबत आपली मते पुन्हा नमूद केली.
-डॉ. टी. आर. गोराणे