Categories
कव्हर स्टोरी

दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमागे एकच सूत्र

ऑक्टोबर – २०१५

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या दोघांच्या पाठोपाठ कर्नाटकातील प्रख्यात लेखक व विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या झाली. योजनाबद्ध रीतीने या तिघांना जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. कोणत्याही सुसंस्कृत नागरिकाची झोप उडविणार्‍या या तीन घटना आहेत. या तिघांनी हिंदू धर्मातील जळमटे काढण्याला वाहून घेतले होते. धार्मिक अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींवर अहिंसक प्रहार केला होता. मात्र, त्यांचे हे काम, भारतातील काही अतिरेकी डोक्यांना पटले नव्हते. हिंदू धर्माचे व तत्त्वज्ञानाचे मर्मच न समजलेल्या काही शक्ती गेली कित्येक वर्षे हिंदू धर्माला झुंडशाहीचे रूप देण्याची धडपड करत आहेत. यातील काही सशस्त्र झाल्या आहेत. अशाच शक्तींनी या तिघांची हत्या केली असावी, असा संशय घेण्यास जागा आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येनंतर या शक्तींवर संशयाची सुई रोखली गेली होती, पण पुरावा काहीच हाती आला नव्हता व आजही नाही. मात्र, कलबुर्गी यांच्या हत्येनंतर बजरंग दलाच्या एका नेत्याकडून दिली गेलेली प्रतिक्रिया पाहता हा संशय गडद होतो. असा संशय राहणे हे पोलिस दलाचे अपयश आहे. संशय आहे, पण सिद्ध काहीच करता आलेले नाही हे सत्य प्रत्यक्ष हत्येइतकतेच भयावह ठरते. विचार पटत नाहीत, सुधारणांचा आग्रह धरला जातो म्हणून सहज हत्या होत असेल आणि सूत्रधारांचे धागेदोरे मिळत नसतील तर समंजस नागरिकांची झोप उडणारच. मध्य आशियातील अशा परंपरा हिंदू धर्मात इथे रुजविण्याचा उद्योग काही अल्पबुद्धीच्या लोकांनी चालविला आहे. त्याला वेळीच चाप लावणे आवश्यक होते. पण ते काम ना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने केले, ना भाजपने. यामुळे संशयाचे तण वाढत गेले. आरोप-प्रत्यारोपांतून वैचारिक सहिष्णुता बाद झाली.

वैचारिक सहिष्णुता हा हिंदुस्थानचा प्राचीन विशेष आहे. जगणे अशक्य होईल तेव्हाच प्रतिकारासाठी हिंसेचा आश्रय घेण्याची परंपरा इथे आहे. हिंदू धर्माचे स्वरूपच वेगळे आहे व ते फार थोड्यांच्या खर्‍या अर्थाने लक्षात आले. पाश्चात्त्य संकल्पनांच्या आहारी जाऊन हिंदूंना वेगवेगळ्या जोखडांमध्ये बसविण्याचा उद्योग गेल्या शतकापासून सुरू झाला. यातून विपरीत प्रकारचा संघर्ष डाव्या व उजव्या विचारधारांमध्ये सुरू झाला. या दोन्ही विचारधारा मूळ हिंदू तत्त्वज्ञानापासून दूर होत्या. तरीही या संघर्षाला हिंसेचे स्वरूप आले नव्हते. वाचिक वा वैचारिक हिंसा असली तरी एकमेकांना संपविण्याचे असहिष्णू डाव कोणी टाकत नव्हते. मतांबद्दल तिरस्कार असला तरी व्यक्तीबद्दल नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती बदलली. मूळ विचार समजून घेण्याची बौद्धिक कुवत फार थोड्यांमध्ये राहिली. झुंडशाहीला मतपेटीतून मान्यता मिळत गेली. पुढे वैचारिक काम हा टवाळीचा विषय झाला. त्यातच अन्य धर्मीयांतील तसेच आपल्या गटातील अतिरेकी घटनांकडे कानाडोळा वा त्यांचे छुपे समर्थन करण्याचे उद्योग सुरू झाल्यावर त्याचा प्रतिवाद म्हणून हिंसक प्रतिक्रिया देण्याचा घातकी खेळ सुरू झाला. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागील सूत्र हे आहे.