Categories
अभिवादन

दाभोलकर मरते नहीं, वो हमेशा जिते है।

उत्तम कांबळे यांचे मनोगत
ऑगस्ट - २०१६

महाराष्ट्रामध्ये ऐंशी आणि नव्वदीचं दशक अस्वस्थ दशक होतं. त्याकाळात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अनेक उघड आणि अदृश्य हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या अस्वस्थतेतून चळवळी जन्माला येत होत्या. दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, स्त्रीवादी, स्त्रीमुक्तीच्या, शहरी स्त्रियांच्या, ग्रामीण स्त्रियांच्या, वेश्या, देवदासी, मुस्लिम, ख्रिस्ती अशा विविध समाजघटकांमधून पुढे आलेल्या चळवळी, ‘एक गाव – एक पाणवठा’ यासारख्या चळवळी, कुष्ठरोगी, भिकारी, हमाल, माथाडी, असंघटित कामगार, विद्यार्थी अशा विविध समाजघटकांच्या स्वतंत्र चळवळी, असं ते चळवळींचं दशक होतं. म्हणून मी त्याला अस्वस्थ दशक म्हणतो.

या दशकानं प्रश्न मांडणारी मैदानं खुली करून दिली आणि प्रश्न पडणारे, उपस्थित करणारे कार्यकर्तेही. याच दशकात ‘अंधश्रद्धा’ हा शब्द नसलेली एक चळवळ सुरू झाली, ती म्हणजे देवदासी प्रथेविरोधातील. सांगली, कोल्हापूर, बेळगाव, विजापूर या भागात ही चळवळ वाढली. पुणे-मुंबईसारख्या शहरांमधून तिला मनुष्यबळापासून आर्थिक पाठबळापर्यंत बरीच मदत मिळत होती. मी स्वत: नैसर्गिकपणे देवदासी आणि भटक्यांच्या चळवळीत ओढला गेलो होतो. आमच्या त्या चळवळीत ना मनुष्यबळ होतं, ना साधनसामग्री. आमच्याकडे साधनं होती ती फक्त प्रबोधनाची. म्हणून आम्ही प्रबोधनाच्या चळवळीकडे ओढले गेलो. त्यावेळी आमचं ठोस असं संघटन नव्हतं, पदाधिकारी नव्हते. विठ्ठल बन्ने, राजन गवस, उदय कुलकर्णी, भीमराव गस्ती आणि मी असा आमचा ग्रुप होता. गावोगाव जाऊन आम्ही देवदासींना भेटत होतो. भाषणं देत होतो. जट का उगवते, अंगात का येतं याचं विज्ञान त्यांना समजावून सांगत होतो. त्यामुळे सहाजिकच देवदासी प्रथेसोबत भुताटकी करणारे, बुवावाजी करणारे, चमत्कार करणारे यांच्यासोबतही कामाला सुरुवात झाली. पण त्या कामाचा फारसा परिणाम दिसत नव्हता. प्रभाव पडत नव्हता. माध्यमात चर्चा होत नव्हती. पुढे बाबा आढाव विषमता निर्मूलनांतर्गत या कामात सहभाग घेऊ लागले आणि आम्हाला बळ मिळालं. ते मोर्चात यायचे, भाषणं द्यायचे. आम्ही जे करीत होतो त्याला समकालीन पुरोगामी संघटनांनी पाठिंबा द्यायला सुरुवात केली. त्यात महिला संघटना होत्या, विद्यापीठातले प्राध्यापक होते, रिक्षावाले होते, वेश्या होत्या. हे त्या काळातील चळवळींचं वैशिष्ट्य होतं. चळवळींचे स्वत:चे स्वतंत्र तंबू असले, तरी किमान मूलभूत मुद्द्यांवर सर्वजण एकत्र येत होते. एकमेकांच्या हाकेला साथ देत होते.

देवदासी प्रथा जिथून जन्माला आली, त्या सौंदत्तीच्या डोंगरावरच्या जत्रेत आम्ही जात असू. पहिली एक-दोन वर्षे मी पत्रकार म्हणून गेलो. तिथे मुली कशा सोडल्या जातात, त्यांचं पुढे काय होतं यावर लिहीत होतो. त्याला बाबा आढावांची साथ मिळाली. देवदासी प्रथेविरोधात पहिला मोर्चा निघाला. त्यातली घोषणा होती ‘- बिड बॅड रो अप्पा बिड बॅड रो… देवरगे मक्कळु बिड बॅड रो… सोडू नका अप्पा सोडू नका, देवाला मुली सोडू नका..’ दोन वर्षांनंतर सौंदत्तीच्या त्या डोंगरावर मला डॉ. नरेंद्र दाभोलकर पहिल्यांदा भेटले. देवदासी प्रथेविरोधात तिथे एक शिबिर भरलं होतं. त्यात स्त्रीमुक्तीसाठी लढणारे, पुरोगामी विचारांचा पुरस्कार करणारे असे अनेक सामाजिक कार्यकर्ते जमले होते. बाबा होते, अनिल अवचट होते. त्यात डॉक्टरही होते. तोपर्यंत त्यांची वेगळी ओळख झालेली नव्हती. पण त्यांचा शर्ट-पॅण्ट-चष्मा हा पेहेराव, तासन्तास चालणारी चर्चा आणि बोट उंचावून प्रश्न विचारणं या रुपात दाभोलकर मला पहिल्यांदा भेटले. पुढे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला सुरुवात झाली आणि दाभोलकर त्याचे नेते बनले.

बघता बघता अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचं काम देशव्यापी झालं. कधी नव्हे, तेवढे नवनवीन अंधश्रद्धांचे प्रश्न पुढे येऊ लागले. चळवळीनं पहिलं आव्हान देवांचे देव मानले जाणार्‍या सत्य साईबाबाबांना दिलं. त्यातून चळवळीची चर्चा फक्त देशच नाही, तर देशाबाहेर पोचली. चळवळीला अनेक कार्यकर्ते जोडले गेले आणि तेवढेच हितचिंतकही. ठिकठिकाणहून चमत्काराच्या कथा पुढे येऊ लागल्या. कुठे डोळ्यातून खडे काढणारी बाई तर कुठे डोळ्यात पाणी घालून उपचार करणारा बाबा. प्रत्येक ठिकाणी डॉक्टर धावून जात होते. खरं तर त्यावेळी आमच्यापुढे प्रश्न होता की, या चळवळीला ‘फॉलोअर्स’ कोण असणार याचा. पण प्रत्यक्षात उलटच घडलं. सर्व वयोगट, सर्व जाती-धर्माचे लोक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीकडे ओढले गेले. मी ‘अंनिस’चं काम करतो हे कार्यकर्ते प्रतिष्ठेचं लक्षण समजत होते. ‘अंनिस’च्या कामाला सामाजिक, वैचारिक प्रतिष्ठा मिळाली होती. या चळवळीत आलं तर पद नाही, पैसा नाही; उलट घरापासून गावापर्यंत दुश्मनच जास्त! पण त्यातून मिळणारी सामाजिक, वैचारिक प्रतिष्ठा दाभोलकरांनी कार्यकर्त्यांमध्ये रुजवली. त्यांनी कार्यकर्त्यांपुढे सुंदर समाजाचं स्वप्न निर्माण केलं. सुंदर समाजाचं ते स्वप्न साकार करण्यासाठी, त्यात बाधा येणारी अंधश्रद्धा नको, हे कार्यकर्त्यांना पटवून दिलं. गावातील बुवाची बुवाबाजी संपवणं हे आपलं ध्येय नाही तर विज्ञाननिष्ठ, भेदभावमुक्त, राज्यघटना मानणारा, ‘डिकास्ट’ झालेला समाज निर्माण करणं हे स्वप्न त्यांनी सर्वांना दिलं. ते सगळ्यांचं स्वप्न बनलं आणि त्यामुळे अंधश्रद्धेविरोधातल्या लढ्यात सहभागी होणार्‍यांची संख्या वाढली. विज्ञाननिष्ठ समाज हे व्यापक ध्येय दाभोलकरांनी दिलं. या व्यापक स्वप्नासाठी अज्ञान झुगारणं म्हणजे अंधश्रद्धा मागे सारणे, हा घटनात्मक संदर्भ रुजवला. हे स्वप्न साकार करण्याचा उजेड तेव्हाच दिसेल, जेव्हा अंधार संपवण्याची जबाबदारी आपण घेऊ, हे उगडून दाखवलं. त्यामुळे अनेक नवीन तरुण कार्यकर्ते त्यांना जोडले गेले. त्यांचा अजेंडा मोठा होता. राज्यघटनेतील मूल्यांचा अनुसार ते दारिद्र्य निर्मूलन! म्हणूनच ही चळवळ महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्येही पोेचली.

दाभोलकरांची लढाई दोन पातळ्यांवर होती. पहिली म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये विज्ञाननिष्ठा निर्माण करणे आणि त्यांना चालना देणारी ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ देणं. रोज बुवा येत नाही, रोज भानामती होत नाही. चळवळ जागृत ठेवण्यासाठी कार्यकर्ता सक्रिय ठेवणं गरजेचं असतं; अन्यथा परिणाम दिसले नाहीत, सातत्य राहिलं नाही तर कार्यकर्त्यांना नैराश्य येतं. दाभोलकरांनी ‘अंनिस’मध्ये ते होऊ दिलं नाही. इथे नवनवीन कार्यकर्त्यांचा ओढा सुरूच राहिला. स्वयंप्रेरणेने कार्यकर्ते जोडले गेले. स्वत:च्या घरांपासून, गावांमधून, प्रस्थापित समाजाविरोधात संघर्ष करून, मिळेल ते खाऊन कार्यकर्ते तयार झाले. त्यांच्यासाठी दाभोलकरांनी रस्त्यावरच्या लढाईसोबतच प्रबोधनाचं कार्यही सुरू केलं. संतांना प्रबोधनाच्या चळवळीत आणलं. संत तुकाराम, कबीर, गाडगे महाराज, जनाबाई यांना अध्यात्माच्या चौकटीतून बाहेर काढून प्रबोधनाच्या चळवळीकडे वळवलं. त्यांचे अनुयायी चळवळीचे कार्यकर्ते बनले. गाडगे महाराज, तुकारामांचे विचार सांगणे म्हणजे ‘अंनिस’चा प्रचार करणे हा त्यांचा निर्णय योग्य ठरला. या संतांच्या विचारांमधून महाराष्ट्राच्या भूमीत एकेकाळी रुजलेली; पण कालांतरानं मागे पडलेली प्रबोधनाची चळवळ दाभोलकरांनी जिवंत केली. अंधश्रद्धेविरोधात विवेकवादाबद्दल संतांचे साहित्य संकलित करून गावोगावी पोचविले. युद्धाने बदललेल्या समाजापेक्षा प्रबोधनाने समाजात झालेले बदल दीर्घकाळ टिकणारे असतात, महत्त्वाचे ठरतात, हे दाभोलकरांनी त्यांच्या कामातून सिद्ध करून दिलं. या प्रबोधनासाठी त्यांनी स्वत: प्रचंड अभ्यास केला. हिंदू, बौद्ध सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला.

कार्यकर्त्यांना आकर्षित करणारं असं कोणतं मॅग्नेट दाभोलकरांकडे होतं? याचा मी विचार करतो, तर त्याचं उत्तर दाभोलकरांनी कार्यकर्त्यांपुढे ठेवलेल्या सुंदर समाजाच्या स्वप्नात सापडतं. विज्ञाननिष्ठ, लोकशाहीवर आधारलेला सुंदर समाज निर्माण करणं हे स्वप्न त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं. म्हणून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते त्यांना जोडले गेले. एकेका बाबाच्या विरोधात ‘अंनिस’ भांडाफोड करीत होती, बुवाबाज तुरुंगात जात होते. लोकांना लुबाडणार्‍यांचे चमत्कार उघडे पडत होते. हे सर्व कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांसाठी अंधाराचा एकेक कोपरा संपवून उजेडाच्या दिशेने घेऊन जाणारे ठरत होते. त्यांच्या कामाला यश मिळवून देणारे ठरत होते. सुंदर समाजाच्या त्यांच्या स्वप्नपूर्तीकडे त्यांना घेऊन जाणारे ठरत होते.

दाभोलकर भाषण देत नसत, ते प्रबोधन करीत असत. त्यांचं बोलणं सुरू झालं की तीन-तीन तास लोक खिळून राहत. आपल्या देशात लोकशाही पद्धतीनं चळवळी उभ्या राहात नाहीत. त्या व्यक्तिकेंद्री राहतात. पण दाभोलकरांची चळवळ याला अपवाद होती. ती चळवळ विचारांवर आधारलेली होती. कोणताही फाटका माणूस कुठेही दाभोलकरांशी वाद घालताना दिसे. दाभोलकर प्रत्येकाच्या प्रत्येक मताचा आदर करीत. ‘अरे आपण दाभोलकरांशी बोलू’ हे ब्रीदच बनलं होतं. अशा गावागावातल्या कार्यकर्त्यांशी दाभोलकर जोडलेले होते. त्यासाठी त्यांनी त्यांचं जगणं प्रचंड साधं ठेवलं. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कुठेही जा, लोक सांगतात, दाभोलकर इथे आले होते, इथेच झोपले. चहा मागितला नाही की अंघोळीला पाणी.

कार्यकर्त्यांचं एवढं मोठं बळ दाभोलकरांनी कसं मिळवलं असावं, सुंदर समाजाचं स्वप्न त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये कसं पेरलं असावं, याचा समाजशास्त्रीय अभ्यास होणं गरजेचं आहे. जिथे काहीच नाही, ना पद, ना प्रतिष्ठा, उलट प्रसंगी मार खाऊन, इतरांसोबत वैर पत्करून चिरकाळ टिकून राहणारे कार्यकर्ते दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीमध्ये कसे निर्माण केले, हा संशोधनाचा विषय आहे.

समविचारी संस्था आणि संघटनांसोबत त्यांनी कायमच समन्वयाची भूमिका घेतली. सनातनी सोडले तर दाभोलकरांना कुणीच शत्रू नव्हते. चळवळ मोठी होण्यासाठी त्यांनी विचारांचे अधिष्ठान दिले. त्याला प्रॅक्टीकल्सची जोड दिली. म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन ही केवळ बुवाबाजीविरोधातील चळवळ न राहता, मुख्य बदलांसोबत जोडली गेली. धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समता ही मूल्ये रुजवणारी चळवळ बनली. दाभोलकर शनि शिंगणापूरला पोचले ते याच मुद्द्यांवरून.

शनि शिंगणापूरबाबत पुरोगाम्यांमध्ये दोन मत प्रवाह होते. मी सुद्धा विरोधी मतांमध्ये होतो. ज्या देवाधर्मानं समाजातील महिलांची वाट लावली, जी देवळं बाईच्या शोषणाचे, गुलामगिरीचे साधन ठरली, त्या देवाकडे प्रवेशासाठी महिलांनी आग्रही राहाच का, हा आमचा आक्षेप होता. आम्ही तो अनेकदा दाभोलकरांकडे मांडला. ते कधीही चिडले नाहीत. त्यांच्यासाठी तो लोकशाहीचा मुद्दा होता. देव आहे की नाही हा निर्णय त्या बाईचा आहे; पण बाई म्हणून तिला तिथे जाण्यापासून रोखणे गैर आहे, असा त्यांचा मुद्दा होता. समान दर्शनाचा लढा त्यांच्यासाठी बाईच्या आत्मसन्मानाचा होता. पण त्याबाबत आक्षेप घेणार्‍यांशी दाभोलकरांचा संघर्ष झाला नाही. ते त्यांचे मित्रच राहिले.

आपली चळवळ विशिष्ट घटकात अडकू नये, प्रवाही राहावी, यासाठी दाभोलकर आग्रही होते. त्यांनी महाराष्ट्रभर राज्यघटनेचा जागर केला. डॉक्टर लागू, निळू फुले या पुरोगामी कलावंतांना सोबत घेऊन देव रिटायर करूया या भूमिकेवर चर्चा घेतली. देवालाच तपासण्याच्या कार्यक्रमामुळे समाजाला झिणझिण्या आल्या. चळवळीत येणार्‍या; पण आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणार्‍या कार्यकर्त्यांचा विचार दाभोलकरांनी केला. त्यांच्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी उभा केला. अनेक कार्यकर्त्यांच्या मानधनाची सोय त्यातून झाली. कार्यकर्ता टिकवायचा कसा, जगवायचा कसा, याचा यशस्वी प्रयोग दाभोलकरांनी केला. सामाजिक कार्यकर्त्याला टिकवणं, जगवणं ही समाजाची जबाबदारी आहे, हा विचार त्यांनी पेरला. लोकसहभागातून साधनांची बँक उभी केली, पुस्तकं विकून निधी जमा केला. कार्यक्रम करून पैसे उभे केले. चळवळी स्वावलंबी व्हाव्यात, कार्यकर्त्याला किंवा चळवळींना कुणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले.

दाभोलकरांनी केलेलं आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे संविधान साक्षरता. आपल्या देशात लोकांना प्यायला पाणी मिळतं; पण पाण्याची साक्षरता नाही. पैसा मिळतो, पण पैशाची साक्षरता नाही. संस्कृती आहे, पण सांस्कृतिक साक्षरता नाही. आपण संविधानाची पूजा करतो, पण संविधानाबाबत साक्षरता नाही. माणूस घडवण्यासाठी संविधानाची साक्षरता महत्त्वाची. दाभोलकरांनी ती आरंभली.

माझ्या जडणघडणीत दाभोलकरांचा महत्त्वाचा सहभाग आहे. माझ्या सामाजिक सहभागाची सुरुवात बुवाबाजीला विरोध करण्यातून झाली. अशा प्रकारचे काम करीत असताना प्रत्येक पायरीवर मदत लागते, खांदे लागतात. दाभोलकरांनी मला ते दिले. माझं 80 टक्के लिखाण अंधश्रद्धेला विरोध करणारं होतं. त्यासाठीचे संदर्भ आणि त्यानंतरचा पाठिंबा दोन्ही दाभोलकरांनी पुरवले. त्यांनी मला एक प्रोजेक्ट दिला. महाराष्ट्रातील गावागावांमधील प्रथा-परंपरा संकलित करण्याचा. त्यावरचे माझे कॉलम प्रसिद्ध झाले. – ‘प्रथा अशी न्यारी’ आणि ‘अनिष्ट प्रथा’ – ‘अंनिस’नं त्याचं पुस्तक प्रकाशित केलं. पहिल्या महिन्यातच ते संपलं. नाशिकला 1992 ला कुंभमेळा होता. ‘अंनिस’चं काम त्यावेळी फार तेजीत आलं नव्हतं. मी त्यावेळी ‘कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा’ हे सदर लिहायला घेतलं. विरोधाला सुरुवात झाली. कुणाची मदत नव्हती. त्यावेळी दाभोलकर धावून आले. कुंभमेळ्यात ‘अंनिस’तर्फे प्रबोधनाचा स्टॉल लावला. कुसुमाग्रजांनी त्यांची कविता दिली. भालचंद्र फडके सोबत आले. ते पुस्तक प्रकाशित झाल्यावर धमक्या जास्तच वाढल्या. ‘तुमचं घर जाळून टाकू, बायकोवर बलात्कार करू!’ दाभोलकर त्यावेळीही मदतीला आले. मला बळ देण्यासाठी पुण्यामुंबईला माझ्या भाषणांचे कार्यक्रम त्यांनी ठेवले. अडचणीत मिळणारी साथ लाखमोलाची असते. दाभोलकरांनी ती मला दिली. माझा आत्मविश्वास वाढवला. पुढे त्या पुस्तकाला पुरस्कार मिळाला. पण त्याची सुरुवात दाभोलकरांनी केली. धर्मचिकित्सा केल्याबद्दल त्यांनी आगरकर पुरस्कार सुरू केला. तो पहिला पुरस्कार अनिष्ट प्रथेविरोधात आवाज उठवल्याबद्दल मला जाहीर केला. भरगच्च कार्यक्रमात मला दिला. माझी उमेद वाढवली. ‘तुझा रस्ता बरोबर आहे,’ याची खात्री मला त्या पुरस्कारानं दिली. प्रवाहाच्या विरोधात जात असताना अशा प्रकाराची साथ महत्त्वाची ठरते.

‘अंनिस’ची चळवळ अधिक व्यापक करावी, जीवनाच्या सर्व प्रवाहांना स्पर्श करणारी असावी, हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी ‘अंनिस’ साहित्य संमेलन घ्यायचं ठरवलं. पुण्यात ते पहिलं संमेलन घेतलं. त्याचा पहिला अध्यक्ष मला केलं. नाशिकमध्ये ‘जातपंचायत मूठमाती परिषद’ घेतली. त्याचा आयोजक मला केलं. त्या आंदोलनाला उचित नाव सापडत नव्हतं त्यांना. खूप चर्चा केली आम्ही त्यावर. शेवटी ‘जातपंचायत मूठमाती परिषद’ हे नाव मला सुचलं. ते खूप खूष झाले त्यावर. माझं खूप कौतुक केलं.

मला स्वत:ला दाभोलकरांचा कार्यकर्ता म्हणवून घेण्याचा आनंद वाटतो आणि अभिमानही. त्यांनी माझं वैयक्तिक आणि सार्वजनिक दोन्ही विश्व व्यापून टाकलं. ते म्हणायचे, ‘उत्तमराव एक विनंती आहे.’ मी म्हणायचो, विनंती कसली करता, आदेश द्या.’ हळूहळू त्या आदेशानं माझं सर्व जगणं व्यापलं. ‘शुगर चेक केली का? चालायला जाताय ना? जेवण केलंत का?’

दाभोलकरांची आणि माझी शेवटची भेट दुसर्‍या ‘जातपंचायत मूठमाती परिषदे’च्या निमित्तानं झाली. नाशिकनंतर लातूरला ती परिषद होती. तिचा उद्घाटक मी होतो. त्यांचा खून झाला, त्याच्या आदल्या रात्रीही आम्ही बोललो. जातपंचायतींचं पुढे काय करायचं, हाच विषय. जात हीदेखील एक अंधश्रद्धा आहे, ते म्हणायचे. ‘अंनिस’ची चळवळ अधिक व्यापक करणं, जातपंचायतींना मूठमाती देणं म्हणजे त्यांच्यासाठी जातिअंताची लढाई होती. ‘डिकास्ट’ होणं होतं.

जात ही अंधश्रद्धा आहे, हे त्यांचं विधान मी भाषणात खोडून काढलं. म्हटलं, जात ही अंश्रधद्धा नाही, तो समाज व्यवस्थेचा ‘डीएनए’ आहे. त्यावर त्यांनी समजावलं, तू खूप तात्त्विक बोलतो. कार्यकर्त्यांच्या आणि समाजाच्या प्रबोधनासाठी सोपं करून सांगावं लागतं. त्यांना पचेल, पटेल असं प्रबोधनाचं, आश्वासक द्यावं लागतं. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीची ती त्यांची स्क्रीप्ट होती. त्यांनी अनेक शब्द ‘कॉईन’ केले. चळवळी जन्माला घातल्या. कार्यक्रमासाठी भेटलो की रात्र-रात्र आम्ही त्यावर बोलत असू. माझी व्यवस्था हॉटेलमध्ये करीत; पण त्यांचा मुक्काम कार्यकर्त्यांसोबत हॉलमध्ये. प्रत्येक कार्यक्रमाचं मानधन देत. पाचशे रुपयांपासून पाच हजारांपर्यंत. म्हणत, मुलांना कपडे घे, तुला पुस्तकं घे. कोणती पुस्तकं, हेही तेच सुचवत. आज दाभोलकरांनी सुचवलेली अनेक पुस्तकं माझ्या अभ्यासिकेत आहेत.

माझी ऊर्जेची गरज दाभोलकरांनी भागवली. मी ‘मायनॉरिटी’मध्ये होतो. दाभोलकरांमुळे मी ‘मेजॉरिटी’मध्ये आलो. मी मायनर होतो, दाभोलकरांमुळे ‘मेजर’ झालो. माझे विचार, बुद्धी, प्रतिष्ठा सारं त्यांनी वाढवलं. त्यांच्या खुनानंतर ‘उजेडावर घाला’ हा अग्रलेख मी लिहिला. जागेत न बसणारा होता तो. म्हटलं, अपवाद करून छापा.

दाभोलकरांनंतर काय?

दाभोलकरांच्या पश्चात ही चळवळ अधिक जोमानं चालू राहील, हे गावोगावच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी छेडलेला जातपंचायतींविरोधातला विषय ज्या पद्धतीनं पुढे गेला, त्याचे वेगवेगळे पैलू पुढे आले, त्याचं आश्चर्य दाभोलकरांच्या विरोधकांनाही वाटल्याशिवाय राहिलं नसेल. कारण दाभोलकरांनी विचारांवर आधारलेली चळवळ उभी केली. व्यक्तीकेंद्री नाही. तरुण मुलं त्यांना जोडली गेली. म्हणून तरुण मुलं त्यांचे विचार, त्यांची चळवळ पुढे नेत आहेत. गावागावातले कार्यकर्ते आणि त्यांचं कुटुंब ते चालवत आहेत, हे अत्यंत अपवादात्मक आहे. दाभोलकरांची चळवळ चालवणं, विचार पुढे नेणं म्हणजे रोज एका संकटाचा सामना करणं. ही निर्भयता, ही ताकद दाभोलकरांनी दिली. आता ‘मिशन’मध्ये त्याचं रुपांतर झालं आहे. हजारो हात त्याचा भाग बनले आहेत.

समकालीन परिस्थितीत जगावर घाला घालणारा मूलतत्त्ववाद वाढतो आहे. जगाच्या पाठीवर जमिनीचा एकही तुकडा राहिलेला नाही, जिथे मूलतत्त्ववाद उगवला नाही की पोचला नाही. दररोज नवनवीन साधनं, नवनवीन हत्यारं घेऊन तो फोफावतो आहे. अखिल मानवतावादाला तो संपवायला निघाला आहे. कधी त्याचं नाव ‘इसीस’ आहे, कधी सनातन. सामान्य माणूस आणि मूलतत्त्ववाद यांच्यातलं अंतर संपत चाललं आहे. अशा परिस्थितीत दाभोलकरांचे विचार आणि त्यांनी सुरू केलेल्या चळवळी यांची कधी नव्हे, इतकी गरज निर्माण झाली आहे. विषारी मूलतत्त्ववादाला रोखून मानवतावादाची पेरणी करण्याची ताकद त्यातच आहे.

गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी मरत नसतात. दाभोलकर मरते नहीं, वो हमेशा जिते है। माझ्या आयुष्यातले काही फाटकेतुटके दिवस त्यांच्या सानिध्यात गेले म्हणूनच माझं जीवन सफल झालं, असं मी मानतो.

उत्तम कांबळे

शब्दांकन : दीप्ती राऊत