इचलकरंजी येथील अंनिसचे क्रियाशील कार्यकर्ते संजय कोले यांच्या वडिलांचे अलिकडेच वार्धक्यामुळे वयाच्या 88 व्या वर्षी दु:खद निधन झाले. या मानसिक धक्क्यातून सावरून संजय कोले यांनी कोणतेही धार्मिक कर्मकांड न करता वडिलांच्या मृतदेहाचे दान करण्याचा विचार आपल्या परिवारास बोलून दाखवला. त्याचे महत्व समजावून सांगितले, नातलगानीही याला त्वरीत संमती दिली. तात्काळ मेडिकल सोपस्कर पूर्ण करून घेऊन मृतदेह सांगली येथील भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजला सुपूर्द करण्यात आला तसेच यापुढे ही जाऊन कथित धर्मशास्त्रानुसार परंपरेनुसार तिसर्या दिवशी केले जाणारे रक्षाविसर्जन किंवा माती सावरणे असे कोणतेही कर्मकांड केले गेले नाही. त्याऐवजी अब्दुललाट येथील अनाथाश्रमातील गरजू, वंचित मुलांना जेवण देण्यात आले. या अनाथ मुलांच्या प्रशालेच्या आवारात दिवंगत शंकरराव कोले यांच्या स्मरणार्थ एक झाड लावण्यात आले. या झाडामध्येच आपल्या वडिलांची प्रतिमा पाहून त्याची जोपासना करण्याची जबाबदारी संजय कोले व परिवारांनी घेतली व इचलकरंजीतील लिंगायत समाजामधील पहिले देहदान करण्याचा धाडसी निर्णय घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला.
याबाबत बोलताना संजय कोले म्हणाले की, डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या सहवासातून मिळालेला विवेकाचा विचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेली कृतिशीलता यामुळे आपण हे करू शकलो. केवळ परंपरा म्हणून निरर्थक कर्मकांड चालीरीती करण्यासाठी संमती आणि श्रमाचा, वेळेचे अपव्यय करण्याऐवजी अधिक चांगल्या आणि गरजेच्या गोष्टींसाठी त्यांचा उपयोग करणे हाच आज खरा धर्म आहे. आणि तो मी पाळतो आहे. याचे समाधान मला मिळाले असेही ते म्हणाले. यापूर्वी 2004 साली संजय कोले यांच्या मातोश्रींचे निधन झाले. तेव्हाही त्यांचे नेत्रदान करून दोन अंधव्यक्तींच्या जीवनात प्रकाश किरण दाखवला आहे. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त वृद्धाश्रमाला आर्थिक मदत, वृद्धांना जेवण, लिंगायत स्मशानभुमीत वृक्षारोपण असे कार्यक्रम आजही राबवण्यात येतात. आज समाजामध्ये आईवडिलांची जे जिवंत असताना वाताहत करण्याचा कृतघ्नपणा आणि त्यांच्या मृत्यूनंतर मात्र मोठा खर्च करून विविध विधी करून आपली एकप्रमारे मोठेपणा मिरवण्याचा दांभिकपणा अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. अशावेळी संजय कोले यांनी आपल्या कृतीतून समाजाला मोठा आदर्श घालून दिला आहे.
-सुनील स्वामी, इचलकरंजी