महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्यवर्षपूर्ती अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील कार्यकर्तेत्यांच्या कुटुंबासह हजर होते. तसेच परराज्यातील विविध सामाजिक चळवळींचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांच्यातील काही प्रतिनिधींचा अधिक परिचय, कामाचे स्वरूप, त्यांच्या चळवळींचे आणि संघटनांची ध्येय-उद्दिष्ट्ये, कामातील वेगळेपण याची जास्त माहिती आपणा सर्वांना व्हावी ह्या हेतुने अशा परराज्यातील कार्यकर्ते-प्रतिनिधींची मुलाखत घेण्याचे ठरले.
बिहारमधील पटना येथून कार्यरत असणारे भंते बुद्धप्रकाश हे अधिवेशनाला उपस्थित होते. बुद्धप्रकाश हे बिहार सरकारच्या सायन्स फॉर सोसायटी आणि अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य म्हणून काही काळ ते कार्यरत होते. सध्या ते ‘अंधविश्वास भगाओ-देश बचाओ’ ह्या अभियानात सक्रीय आहेत. त्याबाबत ते काही विज्ञाननियम हातचलाखी आणि युक्त्या-सराव, रसायनांचा वापर याद्वारे शाळा-महाविद्यालयातून चमत्कार प्रात्यक्षिके करून दाखवितात. त्यांना सविस्तर विचारले असता, त्यांनी सहज बोलण्यातून त्यांचा जीवनप्रवास कथन केला. तो असा-
भंते बुद्ध प्रकाश यांचे शिक्षण 11 वी पर्यंत झाले आहे. तत्पूर्वीचा जीवनाचा भाग त्यांनी सांगण्यास नकार दिला. फक्त मी पूर्वी हिंदू होतो. नंतर बौद्ध धर्म स्वीकारला.
मात्र नंतर त्यांच्या असे लक्षात आले की, प्रत्येक धर्मात अजूनही अनेक अंधविश्वासाच्या आणि निरर्थक कर्मकांडांच्या बाबी घडत असतात. त्यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे. म्हणून त्यांनी “अंधविश्वास भगाओ-देश बचाओ” असे अभियान निश्चित करून काम सुरू केले. मात्र त्यासाठी त्यांना त्यांच्या सहकार्यांकडून खूप काही सहकार्य मिळाले नाही. म्हणून ते एकटे अशा प्रकारचे सप्रयोग-प्रबोधनाच्या व्याख्यानाचे कार्यक्रम विविध ठिकाणी सादर करतात. त्यातून मिळणार्या कमी-अधिक आर्थिक मदतीवर खर्च भागवितात. 15 ते 20 इच्छुकांना त्यांनी प्रशिक्षित करण्याचा प्रयत्नही केला. मात्र अद्याप ते प्रशिक्षित कार्यकर्तेविशेष प्रभावी ठरू शकले नाहीत. मात्र मागील 15 वर्षांपासून ते स्वत: हे काम करीत विविध राज्यातून फिरत आहेत. लोकांना ह्याबाबत(अंधविश्वासाबाबत) विशेष ज्ञान देण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसा अनुभव त्यांना आला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रम घेताना नेहमीप्रमाणे विरोध होतोच. पण तरीही ते कौशल्याने जमवून घेतात. धर्माला विरोध नसून त्यातील निरर्थक कर्मकांडाला विरोध आहे असे ते वारंवार निक्षून सांगतात.
शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर महाराष्ट्र अंनिसच्या समाजकार्याची माहिती विविध वाहिन्या, वृत्तपत्रे, मासिके यातून पहायला-वाचायला मिळाली. डॉक्टरांच्या खुनाचे दु:खही झाले. मात्र कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक आहे असे भंते बुद्ध प्रकाश म्हणाले.
अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न एकट्याने केला. तेव्हा ते ते भोंदूबुवा पळून गेले. मात्र कायदेशीर कारवाई होऊ शकली नाही. कारण बिहारमध्ये, महाराष्ट्रात या संदर्भात जो कायदा झाला, तसा अद्याप झालेला नाही. त्याबाबत त्यांनी स्वत: अनेक वेळा सरकार दरबारी, राज्यकर्त्यांना लेखी निवेदने दिल्याचेही त्यांनी सांगितले.
भूत-भानामती, डाकीण मानणे, जादूटोणा-टोटका, मंत्रतंत्र, बोगस डॉक्टर याबाबत बुद्ध प्रकाश नेहमीच आवाज उठवितात, जनजागृती करतात, तुरूंगातील कैद्यांसाठीही कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी अभिप्राय-अभिनंदन पत्रांचे दाखले देऊन, सांगितले. त्यांच्या ह्या समाजकार्याच्या-प्रबोधनाच्या कामाची वृत्तपत्रे, माध्यमे यांनीही चांगली दखल घेतल्याचे वृत्तपत्रीय कात्रणांंतून लक्षात आले. चमत्काराचा दावा करणार्यांचे आव्हानही ते स्वीकारतात. मात्र तरीही त्यांना पाहिजे तेवढे विविध प्रकारचे सहकार्य मिळत नाही. असे असले तरी अगदी धाडसाने समाजात फिरून अतिशय संवेदनशील अशा समाज समस्येवर जवळजवळ एक हाती उपक्रम-अभियान भंते बुद्ध प्रकाश राबवितात. शक्य तेवढे प्रबोधन तळमळीने करतात असे त्यांच्याकडील साहित्य, कात्रणे, प्रमाणपत्रे, फोटो, व्हिडीओ यावरून दिसून आले. महाराष्ट्र अंनिसकडून त्यांच्या ह्या समाजकार्याला शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन देऊन आणि त्यांच्या पुढील कार्यास सदिच्छा व्यक्त करून, त्यांना धन्यवाद दिले.