महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि भारतीय संविधानाचे समर्थक समस्त समविचारींच्या सहभागाने आजच्या या धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी राज्यस्तरावरील संकल्प परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित असणारे स्वामी अग्निवेशजी आणि उपस्थित सर्व मान्यवर वक्ते व अंनिसचे; तसेच सर्व समविचारी संघटनांचे कार्यकर्ते यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो.
‘धार्मिक दहशतवाद व असहिष्णुताविरोधी संकल्प परिषद’ अशा विषयाला घेऊन पुण्यामध्ये संकल्प परिषद घ्यावी, अशी वेळ ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये व देशावर आणली आहे, त्या सगळ्या प्रवृत्ती आणि कटकारस्थाने करणार्या सगळ्या व्यवस्थांचा पहिल्यांदा मी आपल्या या परिषदेच्या वतीने निषेध करतो. या देशाला एक जाज्वल्य समाजसुधारणेची आणि परिवर्तनाचा विचार संघर्ष करून प्रस्थापित करण्याची परंपरा मिळालेली आहे. ज्यांना आपण फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारा म्हणतो आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचे प्रतिबिंब शेवटी आपल्या भारतीय संविधानामध्ये आपण व्यक्त केलेले आहे, महामानवांनी यासाठी जे योगदान दिले आहे, पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे आज सत्तर वर्षे ज्या अधिष्ठानाच्या आधारावर आपला देश उभा करण्याचा, संवर्धित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याला ज्या-ज्या लोकांकडून सुरुंग लावला जात आहे, ज्या-ज्या लोकांकडून त्याला नाकारून त्याची प्रतिष्ठा, त्याचं मूल्य, त्याचं महत्त्व नाकारून ‘धर्माधिष्ठित राष्ट्र – जातीधिष्ठित समाज’ यांचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या सगळ्यांच्या विरोधात आपण आपलं म्हणणं नेमकेपणाने व ठामपणाने, अधिकच संघटितपणे याच्या पुढच्या काळात व्यक्त करावे म्हणून ही ’संकल्प परिषद’!
अंधश्रध्दा निर्मूलनाच्या आघाडीवर गेली तीस वर्षे महाराष्ट्रामध्ये जे काम उभं राहिलं, त्यासाठी ज्यांचा पुढाकार राहिला, त्या शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं अध्वर्युपण; आणि ज्यातनं त्यांच्या बलिदानानंतर, गेली पाच वर्षे या सगळ्या असहिष्णू आणि धार्मिक कट्टरतावाद स्वीकारून, त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये उन्मादी वातावरण, त्या आधारावर हिंसेचा पुरस्कार करणार्या ज्या-ज्या व्यवस्था कारणीभूत आहेत आणि त्यातील बर्याच जणांचं पितळ उघडं पडतंय, अशा सनातनी – तालिबानी प्रवृत्तीच्या सगळ्या लोकांना इशारा दिला पाहिजे की, हा देश तुमच्या धर्माधिष्ठित राष्ट्रनिर्मितीच्या आणि जातीधिष्ठित समाजउभारणीच्या संकल्पाला बांधील नाही. या देशातील जनता ही अनेक पिढ्यान्पिढ्या येथे सहिष्णुतेने जगत आहे आणि ती पुढच्या काळात देखील तशीच राहणार आहे. याकरिता आम्हाला भारतीय संविधानातनं समग्र अधिष्ठान मिळालेलं आहे. त्या अधिष्ठानाला जो कोणी काळिमा फासत असेल, जो कोणी त्याला आव्हान देत असेल, त्याच्या विरोधात या समाजातील एक संघटित शक्ती, एक युवा शक्ती, एक सज्जन शक्ती कार्यरत आहे! त्याचा बिगुल या परिषदेच्या निमित्ताने वाजवावा, या हेतूने या कळकळीने आणि तळमळीने आज या परिषदेच्या निमित्ताने आपण चर्चा व संवाद उपस्थित केलेला आहे; पण हा केवळ एका परिषदेपुरता करावयाचा विषय नाही. त्यातून त्याला परिपूर्णता साध्य होणार नाही. त्याची सुरुवात या सगळ्या संवैधानिक व्यवस्थेत, त्याचं भरण – पोषण करण्याची सुरुवात आणि एक संघटित आवाज व्यक्त करण्यासाठी सुरुवात या परिषदेच्या निमित्ताने व्यक्त केली जावी, या हेतूने आपण या परिषदेचे आयोजन करीत आहोत.
खरं म्हणजे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या सगळ्या गोष्टी करण्यामागचा हेतू हा केवळ श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या बंधनांमध्ये, मर्यादांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाची चर्चा न ठेवता पुढे वैज्ञानिक दृष्टिकोनाने एकूण व्यापक परिवर्तनामध्ये कशा प्रकारे समाजधारणा करू शकू व समाज उभारणीला पूरक ठरू शकू, हे दाखवण्याचा वस्तुपाठ गेली तीस वर्षे चळवळीने उभा केला आहे. जे बघून आता देशा – परदेशातून देखील विचारणा होतेय की, हे तुम्ही कसे करू शकला?
मला असे वाटते, पुढच्या काळात संवैधानिक देश उभारणीमध्ये देखील आपल्याला या स्वरुपाचा सकारात्मक हस्तक्षेप आणि त्यासाठीचा संघटित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आज होतं काय, श्रद्धा केवळ धार्मिकच असते, अशा स्वरुपाचा एक गाढ विश्वास समाजामध्ये आहे आणि त्या श्रद्धेबद्दल कुठलाही किंतु – परंतु उपस्थित केला, तर आपल्या भावना दुखावल्या जातात, अशा प्रकारचा एक जोरदार कांगावा करण्याचा प्रयत्न सतत समाजातल्या काही समूहांकडून केला जातो. खरं म्हणजे एकूणच मानवजातीच्या इतिहासाचा आढावा घेतला, तर प्रश्न विचारणं, तपासणं, चिकित्सा करणं यातूनच आजपर्यंतच्या मानवी इतिहासाची वाटचाल झालेली आहे. आज ‘आधुनिक मानव’ म्हणून आपण आपली ओळख निर्माण करू शकलो आहोत. अशी माणूस म्हणून जगण्याची क्रिया असणारी, प्रश्न विचारणारी, तपासणीची, चिकित्सेची, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करण्याची सवय ही काही लोकांच्या श्रद्धा दुखावल्या गेल्याच्या कांगाव्यानं बाजूला पडली, मागे पडली. त्यातनं धार्मिक श्रद्धेचे हितसंबंध तयार झाले. सण, वार, उत्सवाच्या, परंपरांच्या नावाखाली अलंबने तयार केली गेली. सततच समूहा – समूहांचा आणि व्यक्तींचा, प्रामुख्याने तरुणाईच्या धार्मिक श्रद्धेेचा उन्माद चेतवत ठेवणं, उत्तेजित करत राहणं यासारख्या अनेक क्लृप्त्या, प्रयुक्त्या या लोकांकडनं केल्या गेल्या; म्हणजे आपल्याकडं या सगळ्यामुळं हितसंबंध असणारी एक मोठी व्यवस्था तयार झालेली आहे. हे हितसंबंध इतके तगडे झालेले आहेत की, या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या, प्रशासनाच्या धोरणामध्ये देखील ते प्रभाव टाकतात. त्यातनं सर्वसामान्य माणसांना आपल्या सुरक्षित, शांततामय व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनात विकसित होण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण मिळावं, याबद्दलची जी जबाबदारी कल्याणकारी सरकारची असते, ती त्यांना पार पाडू न देता कल्याणकारी सरकारांना गतानुगतिक, पारंपरिक विचारांच्या मागे उभे करण्यासाठी दबाव आणून बेजबाबदार सरकार बनविले जाते. संतांचा वारसा ‘भेदाभेद अमंगळ’ असे सांगतो, ते सर्व दूर ठेवून आपल्याकडे प्रत्येक जातीनिहाय, धर्मनिहाय मोठ्या प्रमाणात संघटित झुंडशाहीकडून थोपताना गेल्या दोन दशकांमध्ये दिसत आहे. त्याच्यातनं देशाचं जे वेगळेपण आहे, विविधतेतून एकतेचं जे वैशिष्ट्य आहे, ते आपण टाकून देऊ की काय, अशी संभ्रमावस्था केली गेली आहे. आज देशदेखील जातीय अस्मितेनं, भाषिक अस्मितेनं विलयाला जाऊन तुकडे होईल की काय, अशी एक मोठी भीती आपल्यापुढे उभी राहिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या असुरक्षिततेच्या वातावरणामध्ये अगतिक झालेला सर्वसामान्य माणूस कसा जगू शकेल? स्वतःच्या भौतिक गरजांची कशी परिपूर्ती करू शकेल, हे आव्हान त्याच्यापुढे आहे. या परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी सक्रिय हस्तक्षेप करण्याचे उत्तरदायित्व संस्था, संघटना, पक्ष यांच्याकडे आहे. याचं दीर्घकालीन उत्तर शोधण्याऐवजी, आपल्याकडचे राजकारणी व धोरणकर्ते तात्कालीक उत्तरामध्ये अडकतात, तेवढ्यापुरते समाधान करण्याचा प्रयत्न करतात. त्यातनं प्रश्न सुटण्याऐवजी, लोकांना समाधान आणि सुरक्षितता मिळण्याऐवजी प्रश्नाची व्यामिश्रता वाढविण्याचा मुद्दामहून प्रयत्न होतो. त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे काश्मीर प्रश्न सांगता येईल; तसेच हिंदू – मुस्लिम संबंधात, दलित – मराठाबद्दलची जी काही आपल्याकडे स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, त्यावरून पाहता येईल. आपल्याला अतिशय साक्षेपी पद्धतीने त्याच्याकडे बघून त्याच्यावर विचार करावयास पाहिजे. मग श्रद्धेचा बाजार मांडणार्या व्यवस्थेमध्ये श्रद्धेचा माल कच्चा माल म्हणून वापरायचा कशासाठी, तर सत्तेचं राजकारण करण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी, मतपेट्या मिळवण्यासाठी, एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी. असा प्रयत्न आपल्याकडे गेली दोन-तीन दशकांपासून करणार्या अशा काही संस्था, संघटना, पक्ष आजही कार्यरत आहेत. आज शीर्षस्थस्थानी, सत्तास्थानी पोचलेल्या आहेत. यामुळे या देशाच्या एकात्मतेला अधिक धोका निर्माण झाला आहे. एका बाजूला आपल्यापुढे आव्हान आहे, संवैधानिक मूल्य व्यवस्था समजून घेणे.
पुरोगामींच्यामध्ये देखील आपल्याला असं बघायला मिळतं की, एका बाजूला आपण संविधान समर्थक आहोत, फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा मानणारे आहोत, असं म्हणायचं, आणि दुसर्या बाजूला हिंसक कृतीच्या नाही; पण हिंसक विचारांच्या बाजूचं समर्थन करायचं! असं दुधारी अस्त्र आपल्याला वापरता येणार नाही. आपल्याला देखील याबद्दलची अहिंसेची भूमिका अतिशय स्पष्टपणे आणि प्रांजळपणे स्वीकारावी लागेल आणि त्यापद्धतीने आपल्या कार्यक्रमांची धोरणं देखील आखावी लागतील. धार्मिकतेवर आधारित दहशतवाद असो, हिंसेचा पुरस्कार असो, कट – कारस्थानाची रचना असो, संविधानाला आव्हान देण्याची भाषा असो किंवा त्यासाठी करावयाच्या हिंसाचाराची – कट कारस्थानाची तयारी असो, याला फक्त नामोहरम केलं पाहिजे, कायद्याचा बडगा दाखवून जसं दमन केलं पाहिजे, तसं दुसर्या बाजूला अतिडाव्यांचे आणि त्यांच्या माध्यमातून व्यक्त केलेला नक्षलवाद असो, यादेखील हिंसेचा निषेध, धिक्कार केला पाहिजे, असं मला नम्रपणे सांगावसं वाटतं. त्यामुळे कुठल्याही स्वरुपाचा हिंसेचा पुरस्कार आम्ही करत नाही, करणार नाही, करण्याची इच्छा नाही, हे आपल्याला स्पष्टपणे सांगायला पाहिजे, ज्यांना-ज्यांना असं वाटतं की, या देशाचा कारभार विचारांवर चालला पाहिजे! संवैधानिक लोकशाही काय आहे? तिची मूल्यं आणि धोरणं आपल्याला कशी पुढे न्यायची आहेत, याच्याबद्दल पुरोगामी वर्तुळातदेखील अंतर्गत चर्चा वाढविण्याची गरज आहे, असं मला वाटतं. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याची गरज ओळखून 2007, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वर्षापासूनच ‘संविधान बांधिलकी महोत्सवा’ला सुरुवात केली. गेल्या एक दशकामध्ये याच्यामधनं महाराष्ट्रामध्ये जागरुकता आलेली आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रजत जयंतीच्या निमित्ताने संविधानाचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन झालेले आहे. बाबासाहेब दलित समाजातले आणि म्हणून त्यांनी निर्माण केलेलं संविधान हे आपलं नाही, असं मानणार्यांचा दलितेतर बहुसंख्य वर्ग होता. त्याच्या मनातील ती अढी घालवण्याचा एक जोरदार प्रयत्न चालवला व केला तर त्याच्या मनातील अढी जाऊन संविधान हे आपल्या सर्वांचं आहे, देशाचं आहे, सगळ्यांसाठी आहे, याबद्दल त्यांना आश्वस्त करता येईल. जोपर्यंत आपण त्यांना आश्वस्त करत नाही, तोपर्यंत संविधानाच्या मागे देशातल्या अभिजन समाजासोबत बहुजन समाज, दलित समाज, मागास समाज, अल्पसंख्याक समाज, वंचित समाज उभा राहणार नाही. त्यामुळे संविधान; जे आपल्याला न्याय देतं, आपल्याला आर्थिक, सामाजिक न्याय देतं, आपल्याला माणूस म्हणून जगण्याची प्रतिष्ठा देतं, त्याच्याविषयी देखील मोठ्या पातळीवरची आक्रमक प्रबोधनाची मोहीम येणार्या नजीकच्या काळात आपल्याला चालवावी लागेल. 26 नोव्हेंबरच्या संविधान स्वीकृती दिनापासून ते 26 जानेवारी संविधान अंमलबजावणी प्रारंभदिन यामधील दोन महिन्यांच्या काळात महाराष्ट्रातून तरी, आपण समविचारी संस्था संघटनांनी या मोहिमेसंबंधी विचार करावा, असे मी सर्वांना आवाहन करतो.
त्यामुळे एका बाजूला संविधान समजून घेणे आणि त्याचे प्रबोधन आक्रमकपणे लोकांपर्यंत पोचवणे, ही जशी गरज आहे, तशी दुसर्या बाजूला दहशतवादाचं मूळ जिथं आहे, हिंसेची प्रवृत्ती आणि तिला प्रवृत्त करणारी जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थाद्वारा निर्मित केल्या जाणार्या अफवांपासून, ज्या हिंसेच्या पूर्वतयारीची आखणी – तयारी – जामानिमा केला जातो, तिथपर्यंतच्या सर्व गोष्टींपर्यंत आपण नागरिक म्हणून सजग असणे, संवेदनशील असणे, अफवांचं साम्राज्य ज्या घटकांपासून निर्माण केलं जातं आणि पसरवलं जातं (आधुनिक काळात सोशल मीडियाद्वारा अफवा पसरवणं अधिक सोपं झालं आहे) त्या सगळ्याला आपण बळी पडणार नाही, आपल्यासोबतचा समूह बळी पडणार नाही. याच्यासाठी सजग – तत्पर अशी यंत्रणा – व्यवस्था आपण देखील उभी करणं आवश्यक आहे.
या परिषदेच्या निमित्ताने ‘धार्मिक दहशतवाद’ काय आहे? तो निर्माण कसा होतो? त्याचं तुष्टीकरण कसं केलं जातं? त्याचं संवर्धन कसं केलं जातं? हे एका बाजूला आपल्याला समजून घ्यायचं आहे. यासाठी दोन परिसंवादांच्या चर्चासत्रांमधून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य आपले मान्यवर वक्ते करतील. त्यासोबत निर्माण होणारी असहिष्णुता ही आपल्याला कशी शमविली पाहिजे, त्यासाठी काय केले म्हणजे आपल्याला सौहार्द पुढे नेता येईल? संवर्धित करता येईल आणि पुढच्या पिढीमध्ये संस्कारित होऊन संवर्धित करता येईल? याच्यासाठी जी पायाभरणी करणे आवश्यक आहे, हे देखील आपल्याला सकारात्मकतेने पुढे घेऊन जाणे शक्य होणार आहे. हे करत असताना मला आवश्यक वाटतं, या म्हणजे एका बाजूला संविधानामधील आशयमूल्य समजून घेणं, संविधानाच्या आधारावर मिळालेले भारतीय नागरिकत्व आणि त्याच्याबद्दलचा आपला स्तर विकसित करणं, प्रामुख्याने नवीन होऊ घातलेल्या भारतीय नागरिक तरुण-तरुणींमध्ये, ‘भारतीय नागरिकत्व’ आणि ‘विश्वनागरिकत्व’ या दोनच नागरिकत्वांची म्हणून ओळख ठेवणं, स्त्री-पुरुष म्हणून आपली ओळख ठेवणं यापर्यंत आकलन येण्याची गरज आहे. यात लिंग, जात, प्रदेश, प्रांत, भाषा या चेतविल्या जाणार्या सर्व अस्मितेच्या मुद्द्यांच्या मायाजालामध्ये व त्या प्रवृत्तींमध्ये अडकून पडणार नाही, अशा स्वरुपाची एक जागरुकता आणि सक्षमता माणूस म्हणून आपल्याला निर्माण करायला पाहिजे. या देशाला ‘महासत्ता’ बनविण्याचं स्वप्न आपल्याकडं आखलं जात आहे आणि हे स्वप्न ज्यांनी दिलं, त्यांनी कदाचित आपल्याकडे जे अधिष्ठान आहे, शक्तिस्थान आहे, याचा विचार आधी केलेला असेल, तो म्हणजे देशाच्या या 2020 च्या दशकामध्ये जगातल्या एकूण लोकसंख्येमधला युवा, लोकसंख्येचा चोपन्न टक्के भाग आपल्या एकट्या भारतामध्ये असणार आहे. म्हणजे काम करणारे हात जास्त असणार आहेत, ‘वर्किंग फोर्स’ जास्त असणार आहे; पण जी आव्हाने आपल्यापुढे उभी आहेत, ती ही की, त्या कार्यक्षम असणार्या युवांच्या हाताला एका बाजूला काम देणं, त्यांच्यामध्ये कौशल्य वर्धित करणं आणि दुसर्या बाजूला त्यांच्या डोक्यामध्ये संवैधानिक नागरिकत्वाच्या मूल्यआशयांना संस्कारित करणं आणि क्षमता विकास करणं, अशी आव्हाने परिवर्तनवादी संस्थांपुढे, संवर्धक लोकांपुढे उभी आहेत, असे मला वाटते व जोपर्यंत आपण हे करू शकत नाही, तोपर्यंत या जगामधलं आपल्या देशाचं विविधतेतील एकता हे जे वैशिष्ट्य, वेगळेपण आहे, ते आपण अबाधित ठेवू शकणार नाही. त्यामुळे यासाठीचा एक मोठा वारसा जो समाजसुधारकांकडून मिळालेला आहे, तो पुढच्या काळात वृध्दिंगत केला पाहिजे. तो कालसुसंगतपणे आपण हाती घेतला पाहिजे. हे सगळं याठिकाणी विचारात घ्यावं, याबद्दलचा आपल्याला काही संकल्प घेऊन पुढच्या काळात वाटचाल करता यावी, या हेतूने एका बाजूला सनातनी – तालिबानी हिंसक प्रवृत्ती प्रबळ झाल्या. त्यांना पाठीशी घातले गेल्यामुळेच अशी शंका घेण्यासारखी स्थिती आहे. याचे संवैधानिक व्यवस्थेच्या माध्यमातून दमन करण्याचं, त्यांच्यावर कायदेशीर उपाय करून त्याचा समूळ नाश – नायनाट करायच्या ऐवजी त्याला पाठीशी घातल्याची स्थिती आज बघायला मिळतेय, याबाबतचा एका बाजूला निषेध करणे, या भावनिकतेमध्ये न जाता त्या विरोधात आपल्याला समाज उभारणीचा संकल्प कसा घेता येईल, याचा विचार करणे, या हेतूने या परिषदेचं आयोजन आहे, असं मी म्हणू शकेन.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीच्या राजकारणात नाही, भविष्यातही नसेल; पण परिवर्तनाचा, धर्मनिरपेक्षतेचा, लोकशाही राज्याच्या संवैधानिक मूल्यांचा जो आशय विचार आहे, त्याच्यासाठी या देशातील मानसिकतेची जमीन भुसभुशीत करणे, ती सकस करणे, यामध्ये चिकित्सा देणारी मानसिकता देणे, हे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते. त्याच हेतूने आणि त्याच प्रामाणिक प्रयत्नाने या परिषदेचं आयोजन केलंय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या सगळ्या परिस्थितीची एका अर्थाने बळीदेखील ठरली आहे. गेली पंचवीस वर्षे डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात असताना व त्यानंतरच्या काळात पाच वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पुष्कळ त्रास सहन केलाय. या सर्व धार्मिक दहशतवादी प्रवृत्तींविरुद्ध समर्थपणे सामोरी देखील गेलेली आहे; पण असं सामोरं जात असताना केवळ त्याबद्दलचं सामोरं जाणं, दाखवलं जाणं किंवा आपण प्रतीकात्मक स्वरुपात आपली अभिव्यक्ती ठेवणं ही भविष्याच्या दृष्टीने परवडणारे नाही. त्यामुळे आपल्याला देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिकच सघन आणि संघटितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. याबद्दलचा चर्चा, संवाद व्हावा आणि समविचारी समसंवादी लोकांनी एकत्र येऊन सामायिक कृती आराखडा तयार व्हावा, अशा प्रामाणिक हेतूने या परिषदेचं आयोजन केलंय. जशी पुण्यामध्ये ही परिषद आयोजित केली आहे, तशा महाराष्ट्रात नागपूर आणि इतर वेगवेगळ्या भागातपण या प्रकारच्या परिषदा आयोजित करण्याचे आमचे हेतू आहेत. महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राबाहेर देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या-ज्या भागातील अशा संविधान संवर्धन, समर्थक संस्था संघटनांनी इच्छा व्यक्त केलेली आहे, तेथे-तेथे या परिषदांचे आयोजन करण्याचा मानस आहे. पुण्यामध्ये सुरू झालेल्या या परिषदेतील संवादाचा संकल्प आपण दिल्लीपर्यंत देशाच्या राजधानीपर्यंत पुढच्या काळात घेऊन जाऊया. आपल्या या देशाच्या उभारणीमध्ये संवैधानिक मूल्यव्यवस्थेचा आवाज अधिक बलदंड करूया, असे आवाहन करतो आणि थांबतो.