Categories
अघोरी प्रथा

नरबळीने गुप्तधन मिळते या अंधश्रद्धेपोटी चंद्रपूर जिल्ह्यात युग मेश्रामचा बळी

ऑक्टोबर - २०१८

21 ऑगस्ट 2018 रोजी दोनवर्षीय युग अशोक मेश्राम आपल्या चार वर्षांच्या भावासोबत घरापासून केवळ 100 फूट अंतरावर असलेल्या रेतीच्या ढिगार्‍यावर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता. त्याला युगच्या घरासमोरच राहत असलेल्या प्रमोद बनकर (वय 43) व सुनील बनकर (वय 35) या आरोपींनी खेळत असताना उचलून नेऊन गावातीलच एका निर्जन झोपडीत बंद करून ठेवले होते. ही घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील खंडाळा गावात घडली. 23 ऑगस्टच्या रात्री त्यांनी त्या झोपडीत इतर चार सहकार्‍यांना सोबत घेऊन अघोरी पूजा केली व युगचा बळी घेतला. त्यांना त्याचा मृतदेह नदीत फेकायचा होता. मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे त्यांचा हा बेत फसला. शेवटी चार दिवस मृतदेह त्या झोपडीतच ठेवावा लागला. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी संधी साधून 27 ऑगस्टला प्रमोद बनकरच्या घरामागेच असलेल्या तणसाच्या ढिगार्‍यामध्ये लपवून ठेवला. 29 ऑगस्ट रोजी सकाळी या ढिगार्‍याजवळ अनेक कोंबड्या टोचे मारत असल्याचे पाहून संशय आल्याने तपास करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. आरोपींना एका मोठ्या मांत्रिकाने एक वर्षापूर्वी सांगितले की, नरबळी दिल्यास तुम्ही मालामाल व्हाल. त्यानुसार ज्याच्या डोक्यावर तीन भोवरे आहेत, अशा मुलाचा ते शोध घेत होते. या शोधातच त्यांना युगच्या डोक्यावर तीन भोवरे आढळून आले. त्यांनी वर्षभर त्याच्यावर पाळत ठेवली होती. मध्यंतरी त्यांनी एकदा युगच्या अपहरणाचा प्रयत्नही केला असल्याचे कळते; मात्र तो फसला. शेवटी आरोपींनी संधी साधून 22 ऑगस्टला दुपारी 3.30 च्या दरम्यान चिमुकल्या युगचे अपहरण करून गुप्तधनाच्या लोभापायी त्याचा बळी घेतला. या नरबळी हत्याकांडामध्ये कजलीवाला मांत्रिक धनपाल बालाजी तळमळे, पायाळू मांत्रिक गजानन नामदेव दहीकर, सुनील श्रीराम बनकर हे तीन मांत्रिक व त्यांना सहकार्य करणारे प्रमोद शामराव बनकर, रवींद्र बळीराम सतीबावणे, मनोहर बळीराम सतीबावणे या सहाही आरोपींना भा.दं.वि. 201, 302, 363 व जादूटोणाविरोधी कायदा कलम 4 नुसार अटक करण्यात आली.

चंद्रपूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांचे मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी, पोलिस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे नरबळी हत्याकंड उघडकीस आले.

या तपासकार्यामध्ये क्राईम ब्रँचचे मुठेकर, नागभिडचे चिडे, कुळसंगे, खेडीकर व खंडाळावासी नागरिकांनीही मोलाचे सहकार्य केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते पी. एम. जाधव, उद्धव डांगे, विलास निंबोरकर, पुडके, दूधबावरे, डॉ. कुंभारे यांनी खंडाळा गावी जाऊन युगचे आजी-आजोबा, आई-वडील व आत्या यांचे सांत्वन केले. याप्रसंगी या सर्वांनी व उपस्थित असलेले सरपंच राखडे व तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष राजेश डेंगे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा अशी मा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे सांगितले.