1 नोव्हेंबर हा डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा जयंतीदिन. हे औचित्य साधून दि. 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर अशी राज्यव्यापी युवा संकल्प परिषद नागपूर येथे पार पडली. अंनिस आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर यांनी यांचे संयोजन केले. “नात्यातील सुरेल संवादासाठी जोडीदाराची विवेकी निवड” असे या परिषदेचे सूत्र होते.
या परिषदेचे उद्घाटन सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्ष म्हणून अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष मा. प्रा. जोगेंद्र कवाडे आणि आयबीएन लोकमतचे मुख्य संपादक महेश म्हात्रे उपस्थित होते. नागपूर जिल्हा अंनिस अध्यक्ष संजय शेंडे यांनी प्रास्ताविकात या परिषदेचा हेतू विषद केला. परिषदेचे उद्घाटक नागराज मंजुळे यांनी आपल्या मनोगतात, “आंतरजातीय-धर्माचा विवाह हा जातीय दंगलीवर उपाय असल्याचे प्रतिपादन केले. प्रेमात पडण्याची भाषा फार सुंदर आहे. आंतरजातीय विवाह ही काळाची गरज आहे. यासाठी विवेकी मनाने योग्य जोडीदार निवडून आयुष्य सुंदर बनवावे. तसेच अंनिसने हे उचललेले कृतिशील पाऊल राष्ट्रनिर्मितीचा एक भाग आहे. या अंनिसच्या उपक्रमात आपण सातत्याने आपले योगदान देऊ” असे सांगितले.
‘आयबीएन’ चे मुख्य संपादक महेश म्हात्रे यांनी, ‘खाऊजा’ धोरणाने भारतीय जनमानसावर बोलण्याचे, वागण्याचे झालेले दुष्परिणाम सांगितले. आपल्या मनोगतात त्यांनी ‘कामजीवन’ याविषयाला स्पर्श करत हळुवारपणे स्पष्ट मांडणी केली. दुष्यंतकुमार यांच्या कविता सादर करून उद्घाटनाच्या सत्रात काव्यमय रंग भरला.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष मा. प्रा. जोगेंद्रजी कवाडे यांनी सद्यस्थितीवर हल्लाबोल करत वातावरणात जोष भरला. आपल्या ‘कवाडे’ शैलीत मिश्किलपणे त्यांनी परिषदेला जमलेल्या विद्यार्थी तरूण-तरुणींना ‘मोकळ्या हाताने जाऊ नका’ असा सल्ला दिला.
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ यासंबंधी मार्गदर्शन केले. समाजबदलासाठी कृतीशील हस्तक्षेप करावा लागतो. विवेकाच्या मूल्यावर आधुनिक समाजाचा पाया रचावा लागतो. जात, धर्म, पंथ या माणसे विभागणार्या गोष्टीपासून राष्ट्राचे नुकसान होते. ‘अंनिस’ची ही मोहीम राष्ट्र उभारणीचा कृतिशील पाया आहे असे प्रतिपादन केले.
पुढच्या सत्रात कृष्णात कोरे (राज्य कार्यवाह, युवा सहभाग) यांनी, ‘जोडीदाराची विवेकी निवड-जाण आणि भान’ या विषयावर सुरेख मांडणी केली. ते म्हणाले की, जोडीदाराची विवेकी निवड करताना आपणाला ‘जाण आणि भान’ दोन्ही असणे आवश्यक आहे. आकर्षण व प्रेम यांतील फरक वेळीच ओळखा. रंग, रूप, गंध या गुणांपेक्षा व्यसनमुक्त, प्रामाणिक, तत्त्वनिष्ठ, विवेकी या मूल्यांना अधिक महत्त्व द्या. ‘जात’ ही एक अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धा वेळीच रोखल्या तरच समाजमन विवेकी वाटेवर वाटचाल करते. महाराष्ट्र अंनिसच्या या उपक्रमात विद्यार्थी-विद्यार्थीनी कृतिशील सहभाग नोंदवून संतसुधारकांच्या विचारांची ही चळवळ जनमानसात अधिक खोलवर नेण्यासाठी पुढे यावे. राष्ट्रबांधणीच्या या उपक्रमात सर्व तरुण-तरुणींनी कृतिशील सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
भोजनानंतर गटचर्चा व त्याचे सादरीकरण झाले. या गटचर्चेसाठी पुढील विषय होते. 1) जोडीदारांचे आरोग्य आणि व्यसन 2) जोडीदाराच्या पत्रिकेतील 36 गुणी कुंडली की मानवी गुणांची कुंडली? 3) जोडीदाराच्या निवडीमधील जात-धर्माचा अडसर 4) जोडीदाराबाबत आकर्षण का प्रेम? 5) सहजीवनाची सुरूवात (विवाह पद्धती).
या गटचर्चेतून अनेक चांगले मुद्दे समोर आले. कर्मकांड व त्यांचे एकूणच दुष्परिणाम, आरोग्याविषयी घ्यावयाच्या दक्षता, जात व धर्माचा अडसर ओलांडून स्वच्छ नजरेतून प्रेम करणे, प्रेमापासून विवाहापर्यंतचे टप्पे विवेकी आचारविचारांवर आधारित असावेत, पारंपरिक व खर्चिक विवाहाला पर्याय म्हणून सत्यशोधकी विवाह पद्धतीला प्राधान्य द्यावे, असे मुद्दे चर्चेतून पुढे आले.
गटचर्चा व सादरीकरणाचे अध्यक्षीय भाषण गजेंद्र सुरकार यांनी केले तर; गटचर्चेसाठी निरीक्षक म्हणून अनुक्रमे गजेंद्र सुरकार, कुणाल शिरसाठे, संध्या सातपुते, कृष्णात कोरे, माधव बावगे त्यांनी काम पाहिले.
चहापानानंतर ‘आम्ही केली जोडीदाराची निवड’ या विषयावर अनुभवकथन झाले. रजिया सुलतान यांनी आपल्या अनुभवकथनात एकाच दिवशी तीन पद्धतीने विवाह झाल्याचे सांगितले. सकाळी 9 वाजता मंदिरात, 11 वाजता कोर्टात आणि सायंकाळी ‘कबूल है… कबूल है…’. आयुष्यात बराच संघर्ष करावा लागला. मुलामुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांना समुपदेशनाची जास्त गरज आहे, असे त्या म्हणाल्या. अनिषा सिंग यांनी ‘दोन समविचारी व्यक्ती एकत्र येऊ इच्छित असतील तर त्यांना कोणी थांबवू शकत नाही. जोडीदाराबाबत आदर व्यक्त करावा. मानवता हे सर्वोच्च मूल्य आहे,’ असे प्रतिपादन केले. जगजित सिंग यांनी जात ही मानवाने बनविलेली व्यवस्था आहे. परिवर्तन करायचे तर आंतरजातीय-आंतरधर्मीय हे शब्द सोडून खपपशी र्कीारप असा शब्द उपयोजावा, असे मनोगत मांडले. नलिनी बनसोड यांनी पारंपारिक विवाह पद्धतीपेक्षा ‘कोर्ट मॅरेज’ करण्याचे आवाहन केले. संविधानाला जागून रजिस्टर विवाह करावा. मैत्रीचा सन्मान करावा. आम्ही स्वतः आंतरजातीय विवाह केलाच; पण दोन वर्षात दोन विवाह त्यांच्या घरात लावून दिले. असा अनुभव त्यांनी कथन केला. पूनम व सतीश चव्हाण यांनी आमचा निर्णय योग्य होता. हा निर्णय घेण्यापासून लग्न होईपर्यंत अंनिसचे लाभलेले सहकार्य यांचा उल्लेख करून जोडीदार विवेकीच निवडावा, असे आवाहन केले.
दुसर्या दिवशी सकाळी ‘प्रेम कल्पनेतून वास्तवाकडे’ या विषयावर कुणाल शिरसाठे यांनी मांडणी केली. ‘जोडीदार निवडीच्या वाटेवरून जाताना’ या विषयावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर पुन्हा अनुभवकथन झाले.
परिसंवाद : परिसंवादात बोलताना सामाजिक कार्यकर्ते मा. जेमिनी कडू यांनी परंपरागत विवाह पद्धतींना पर्याय देण्यामागची भूमिका विषद केली. मनोगतात त्या म्हणाल्या, जानेवारी 2015 ते 1 नोव्हेंबर अखेर त्यांनी स्वतः 17 आंतरजातीय विवाह लावले आहेत. पारंपरिक विवाहात अनेक किळसवाण्या प्रथा असतात. आजकाल विवाहात प्रदर्शन भरपूर असते. यातून आत्मकेंद्री भावना तयार होते. ही मानसिकता समाजघातक आहे. अन्नाची नासाडी होते. हुंडाविरोधी कायदा असूनही वेगवेगळ्या पद्धतीने वधूची मागणी केली जाते. ही मानसिकता मतभेद निर्माण करते. म्हणूनच या मानसिकतेला गाडून कमी खर्चात भरपूर आनंद देणारी विवाहपद्धती अवलंबायला हवी. असे आंतरजातीय-धर्मीय विवाह झाले तर वेळ, पैसा वाचेल व हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा पुन्हा फोफावणार नाहीत.
भारतीय जनवादी महिला संघटनेच्या मा. किरण मोघे यांनी जोडीदाराची विवेकी निवड व समाजमान्यता या विषयावर सखोल मते मांडली. जोडीदार निवडण्याच्या घटनात्मक अधिकाराची अधोगतीसाठी कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे. 1) पितृत्वव्यवस्था 2) जातिव्यवस्था. पितृत्वव्यवस्थेत कोणतेही स्वातंत्र्य नाही. स्त्रीकडे मालमत्ता म्हणूनच बघतात. कन्यादानाची अनिष्ट प्रथा कुटुंबव्यवस्था चालते. तर जातिव्यवस्था जातीतील शुद्धता टिकवण्यासाठी, जाती निर्मूलन होऊ नये यासाठी स्त्रीवर बंधने लादते; प्रसंगी हिंसेचा वापर करते. अशावेळी जोडप्यांना संघर्ष करावा लागतो. पारंपरिक व्यवस्थेच्या विरोधात उभे राहावे लागेल. जोडीदार निवडीचा; तसेच लग्न न करण्याचे स्वातंत्र्य असायलाच हवे.
मा. सुभाष वारे यांनी ‘जोडीदाराची विवेकी निवड आणि संवैधानिक मूल्य संदर्भ’ या विषयावर मार्गदर्शन केले. मुलांमुलींना निवडीचे स्वातंत्र्य हवे. संविधानातील कलम 51 नुसार भारतीय नागरिक म्हणून शोधक बृद्धी, सुधारणावादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे हे कर्तव्य आहे. हे करण्यासाठी लग्न जुळवताना पत्रिका पाहून गुण जुळवण्याची पद्धती नाकारली पाहिजे. आजचा पुरुष हा व्यवस्थेने बनवलेल्या प्रतिमेचा बळी आहे. संसार हा स्त्री-पुरुष दोघांचा असतो. ही सकारात्मक भावना निर्माण व्हायला हवी. संविधानाची मूल्ये ही प्रत्यक्ष जीवनात कृतिशीलपणे अंगीकारायला हवीत. सकारात्मक बंड करून जगण्याचा अर्थ सांगूया, पालकांशी संवाद साधूया, सुखाच्या शोधात सुखाच्या गावी जाऊया असे आवाहन त्यांनी केले.
या परिसंवादाचे सूत्रसंचालन प्रा. बबन कानकिरड यांनी केले. विजय राजमोण यांनी आभार मानले.
भोजनानंतर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांवरील लेखांचे संकलन असणार्या ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ या पुस्तकाचे सुप्रसिद्ध विचारवंत मा. डॉ. यशवंत मनोहर यांच्या हस्ते झाले.

अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी मनोगतात रोज महाराष्ट्रातून तरुणांचे फोन येतात. दाभोलकरांबद्दल तरूणाईला अधिक जाणून घ्यायचे आहे. त्यांना दाभोलकरांच्या विचार-आचारांचा भाग व्हायचे आहे. त्या तरुणाईला दाभोलकर समजून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. समाजबदलासाठी विधायक आणि कृतिशील हस्तक्षेप करणार्या कार्यकर्त्यांचा जेव्हा खून होतो, तेव्हा समाज त्याकडे कसा बघतो, समाजाची संवेदनशीलता कशी बोलकी होते, ते समाजमन काय अपेक्षा व्यक्त करणे, याचा उल्लेख हा पुस्तकाच्या संकलनामध्ये आहे, असे प्रतिपादन केले.
विचारवंत यशवंत मनोहर यांनी हा ग्रंथ म्हणजे एक आक्रोश आहे. महाराष्ट्रातील, भारतातील परिवर्तनवादी लोकांचा आक्रोश पुस्तकातल्या पानापानावर आहे. हे लेखक प्रातिनिधिक म्हणून बाकीच्या परिवर्तनवादी लोकांच्यावतीने बोलत आहेत. संताप विद्रोह व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रातील, भारतातील परिवर्तनवादी समाज देशातील राज्यकर्त्यांना, राज्यधुरिणांना प्रश्न विचारतो आहे. लोकांच्या मनातील विद्रोहाचे हे पुस्तक रूप आहे. विद्रोहाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा या पुस्तकाच्या निमित्ताने ओलांडला जातोय, याची नोंद घ्यावी, असे मनोगत व्यक्त केले.
‘हम होंगे कामयाब’ या गीताने परिषदेचा समारोप झाला.
-कृष्णात कोरे
संपर्क : 8600230660