Categories
अभिवादन उपक्रम

निवृत्त मुख्याध्यापक विलास भांदिर्गे यांनी 100 वर्गणीदार करून वाहिली दाभोलकरांना आदरांजली

ऑक्टोबर - २०१८

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला नुकतीच पाच वर्षे झाली. खुन्याच्या मास्टरमाईंडपर्यंत पोचण्याचा प्रयत्न तपासयंत्रणा करायला तयार नाहीत. अशा वेळी कार्यकर्ते आपल्या भावना विवेकाने व्यक्त करत आहेत, त्यातील एक विलास भांदिर्गे, माजी मुख्याध्यापक, ते सातारा जिल्ह्यातील तारळ्याचे! त्यांनी ठरवले, आपण; एका महिन्यात एकशे एक वर्गणीदार नोंदवून डॉक्टरांना आदरांजली वाहायची. त्यांचा वाढदिवस 6 सप्टेंबरला. सेवानिवृत्त होऊन आठ वर्षे झाली. त्यापूर्वी संकल्प पूर्ण झाला पाहिजे.

एका हातात फोल्डिंगची छत्री आणि दुसर्‍या हातात बॅग; त्यात पावतीपुस्तक, डबा, वॉटरबॅग आणि जुने ‘अंनिवा’चे अंक; सोबतीला डायबेटीस! त्यामुळे वेळेवर गोळी आणि काहीतरी खाल्ले पाहिजे हे बंधन! धो-धो पावसात एस.टी., रिक्षा, तर कधी पायी फिरून त्यांनी शाळा-कॉलेजेस गाठली, डॉक्टरांना भेटले, नातेवाईक-मित्र यांना आवाहन केले. ‘मी नुकताच प्राचार्यपदाचा चार्ज घेतलाय, नंतर पाहू’ इथपासून ते ‘सर बरे झाले आलात,’ ‘डॉक्टर मोठा माणूस होता,’ ‘तुम्ही आमच्याबरोबर जेवण करा’ अशा विविध प्रतिक्रियांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी 20 ऑगस्टपूर्वीच आपला संकल्प पूर्ण केला. आपला मोबाईल नं. 7057041282 हा वर्गणीदारांना देऊन तुम्हीही वाचक वाढवा, असे आवाहन करायला ते विसरले नाहीत. अशाच जिद्दी कार्यकर्त्यांच्या बळावर अंनिस उभी आहे.