Categories
भांडाफोड

पवनी येथील ढोंगी मौलानाचा अंनिसने केला भांडाफोड

मार्च - २०१७

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराकडे तोंडी तक्रार मिळाली की, ‘पवनी येथे भाई तलाव वॉर्डात, मशिदीला लागून असलेल्या ठिकाणी, मौलाना बाबा या नावाने प्रसिद्ध असणारी व्यक्ती दर शनिवारी स्वत:च्या अंगात दैवीशक्ती असल्याचा दावा करते, चमत्कार दाखवते व रोगमुक्त करण्याचे आश्वासन देते. हा बाबा जादूटोणा, करणी, भूतबाधा दूर करण्यासाठी मंत्रतंत्र करून राख, धागा, पाणी, तावीज देतो, मूलबाळ होण्यासाठी चमत्कारिक उपचार करतो. तसेच जादूटोणा, करणी केल्याच्या नावावर समाजात व आपसात भांडणे निर्माण करून आर्थिक फसवणूक करून दहशत निर्माण करतो. त्यामुळे समाजात जादूटोण्याच्या संशयावरून पवनी येथे हत्या होण्याचे नाकारता येत नाही.’ अशी गंभीर तोंडी तक्रार समितीकडे मिळाली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मिळालेल्या माहितीनुसार मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी प्रधान सचिव सौ. अश्विनी दिलीपराव भिवगडे आणि प्रशांत बालकदास रामटेके यांना शनिवार, दि. 14 जानेवारी 2017 या मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी दीड वाजता बाबाच्या दरबारात पाठवले. त्या ठिकाणी बाबा आसन मांडून बसले होते. लांब दाढी होती. त्यांच्या समोर अनेक भक्त होते. अनेकांना बाबाने मंत्रतंत्र करून काळे-लाल धागे बनवून दिले व जादूटोणा केला आहे, असे सांगितले. प्रत्येकाकडून रुपये 20-25 प्रमाणे रक्कम घेतली. जादूटोणा-करणी दूर करण्यासाठी काळे धागे व बाटलीमध्ये मंत्र घातलेले पाणी दिले; तसेच भूतबाधा दूर होण्यासाठी त्यांनी विधी सांगितले. त्यानंतर सौ. अश्विनी भिवगडे यांना स्वत: बाबाने विचारले, ‘कसे येणे झाले?’ तेव्हा भिवगडे यांनी बाबाला सांगितले की, ‘माझी तब्येत बरोबर राहत नाही. रात्र-रात्र झोप येत नाही, वाईट-वाईट स्वप्ने पडतात, मासिक पाळीचा त्रास होतो.’ त्यावर बाबाने एक बाटली पाणी, काळा धागा व मंत्रतंत्र केलेला एक तावीज दिला; तसेच घरी लावण्यासाठी अगरबत्ती दिली. बाटलीतील पाण्यामध्ये राख घालून दिली आणि ते पाणी प्यावे, असे सांगितले. बाबाने सौ. भिवगडे यांच्या दोन्ही डोळ्यांमध्ये काहीतरी द्रव पदार्थ घातला; त्यामुळे डोळ्यात अश्रू आले, डोळे लाल-लाल झाले. डोळ्याला दोन दिवस त्रासलोक हे सुद्धा शोधतात

झाला. अशाप्रकारे शारीरिक इजा केली. ‘रात्री हे मंतरलेले पाणी प्यायचे, घरात अगरबत्ती लावायची, तुझ्यामागे जादूटोणा केलेला आहे, तो बरा करून देईन,’ अशी हमखास गॅरंटी दिली. ‘तुझी तब्येत जास्त बिघडल्यास तू दरबारात केव्हाही येशील,’ असे सांगितले व रुपये 20/- नगदी घेतले. दिनांक 21 जानेवारी 2017 रोजी दरबारात येण्यास सांगितले. अशाप्रकारे अनेक भोळ्या-भाबड्या लोकांची देवा-धर्माच्या नावाखाली बाबा फसवणूक करीत आहे, चमत्काराचा खोटा दावा करीत आहे, हे लक्षात आले. त्यामुळे दिनांक 21 जानेवारी 2017 रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह प्रशांत रामटेके, सौ. अश्विनी भिवगडे, कन्हैया नागपुरे यांनी पवनी पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी पोलीस निरीक्षक हजर नव्हते. ड्युटीवर असलेल्या पोलीस अंमलदाराला माहिती सांगण्यात आली. त्यांनी ‘साहेबांची वाट बघावी लागेल,’ असे सांगितले. त्यामुळे सदर घटना अत्यंत हानिकारक व महत्त्वाची असल्यामुळे घटनेसंदर्भात भंडारा येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक विनोद वाकडे यांना फोनवरून लोणारे यांनी विनंती केली की, पोलीस निरीक्षक गीते सरांना घटनेची माहिती सांगावी. वाकडे सर यांनी तत्काळ गीते सरांना संपर्क करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार लगेचच सहकार्य मिळाले. पोलीस अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते असे आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो. बाबाचा दरबार सुरू होता. बाबाच्या दरबारात तीन महिला, दोन पुरुष हजर होते. बाबाने एका महिलेला लाल रंगाचा धागा मंत्रून दिला व जादूटोणा, करणी केल्याने तिच्यामागे असलेला गिरागोटा दूर होईल, असे सांगितले. त्याचवेळी बाबाला विचारले की, ‘बाबा जगात जादूटोणा, करणी करता येते काय?’ बाबा म्हणाला, ‘बाहर बाधा लगता है, वो दिखता नहीं, इसलिए यह तागा बनाकर देता हूँ, इससे बाहर बाधा नहीं लगता.’ त्याचवेळी सौ. भिवगडे यांच्या मासिक पाळीबाबत व तब्येतीबद्दल प्रश्न विचारला; तेव्हा बाबा म्हणाला, ‘मैने तागा बना के दिया था उससे आराम हो जाना चाहिए था और मासिक पाळी का प्रॉब्लेम बंद होना चाहिए था।’ त्यावेळी लोणारे यांनी बाबाला आपला परिचय दिला व सांगितले की,

‘या जगात जादूटोणा, करणी व भूतबाधा होत नाही. आपण याचा प्रचार-प्रसार करून मानसिक दबाव देऊन आर्थिक प्राप्ती करून फसवणूक करीत आहात. जादूटोणा, करणीच्या नावाने दहशत पसरवीत आहात. चमत्काराच्या नावाने शरीराला इजा करीत आहात, हा गुन्हा आहे.’ यावर बाबा म्हणाला, ‘मेरे अंग में कोई दैवी शक्ती नहीं है, मैं कोई चमत्कार नहीं करता, मुझे कोई मंत्रतंत्र नहीं आता, इसके बाद यह सब नहीं करुँगा।’ त्यावेळी सोबत असलेल्या पवनी पोलीस स्टेशन येथील अधिकार्‍यांनी दरबाराचा पंचनामा करून, धागे, गंडेदोरे जमा केले. उपस्थित भक्तांची नाव नोंदणी करून व पवनी पोलीस स्टेशन येथे बाबाला आणण्यात आले. बाबाला पोलीस स्टेशनला आणताच दोनशेपेक्षा अधिक संख्येने, मुस्लिम समुदायाने पोलीस ठाण्यावर जमाव केला. त्यात नगरसेवक व समाजसेवक मोठ्या ताकदीने उपस्थित होते.

सर्व उपस्थित लोक व पोलीस यांच्यासमक्ष सौ. अश्विनी भिवगडे यांना ‘गळ्याला मंगळसूत्र का बांधले? गळ्याला मंगळसूत्र बांधणे म्हणजे अंधश्रद्धा आहे, हे तोडून का फेकत नाही?’ यासह अनेक प्रश्न समाजसेवक व नगरसेवकांनी उपस्थित करून महिला कार्यकर्त्यांच्या चारित्र्यांवर संशय घेतला. एका भोंदूबाबासाठी त्याने स्त्रीत्वाचा अपमान केला. महिलांना राज्यघटनेने समान अधिकार दिले आहेत, महिलेची बेईज्जती करणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असताना व हा सर्व प्रकार पोलीस ठाणेदार गीते यांच्या डोळ्यासमक्ष घडत असून देखील त्यांनी अजूनपर्यंत कुणावरही कारवाई केलेली नाही.

भंडारा जिल्ह्यात सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दावेझरी येथे अशाच ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून ढोक परिवाराच्या पती-पत्नीची हत्या झाली आणि तसाच प्रकार येथे होण्याचे नाकारता येत नाही. त्याकरिता पोलीस विभागाने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध उच्चाटन कायदा 2013 नुसार बाबावर कारवाई करण्यात यावी व महिला कार्यकर्त्यांवर ताशेरे ओढून अपमानित करणार्‍या आणि सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणार्‍या व्यक्तींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

विष्णुदास लोणारे, भंडारा

संपर्क : 9226903733