-डॉ. हमीद दाभोलकर
प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत ज्या वेळेस मनामनात प्रश्न निर्माण होतील, तेव्हा भोंदूबाबा आणि समाजशोषकांचे ‘पानिपत’ झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठीच अंधश्रद्धा निर्मूलन समिती प्रश्न विचारणारी संस्कृती रुजविण्याचे ध्येय घेऊन पुढे जात आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी परभणी येथे व्यक्त केले. ते अंनिसच्या परभणी जिल्हा शाखेतर्फे शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलनात तरुणांची भूमिका’ या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जि. प. सदस्य करुणाताई कुंडगीर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, प्राचार्य विठ्ठल घुले उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. रवींद्र मानवतकर यांनी भूषविले. पुढे बोलताना दाभोलकर म्हणाले की, एखाद्या प्रश्नावर मतभिन्नता असेल, तर वादविवादाच्या माध्यमातून मिटविता येते; मात्र ज्यांची विचारशक्ती संपते, ते शस्त्राची भाषा बोलून खून करतात. अंनिसचा अंधश्रद्धेविरुद्धचा लढा भोंदूबाबा विरुद्धचा तर आहेच; पण त्यांना साथ देणारी धर्मसत्ता आणि छुपी राजसत्ता यांच्याविरुद्धही आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध देवाधर्माला नाही; पण देव-धर्माच्या नावाखाली समाजाचं शोषण करणाऱ्यांना आहे. धर्म व जातीच्या नावावर पोळ्या भाजणारे समाजाला अंधश्रद्धेत आणि अज्ञानातच ठेवतात. त्यामुळे त्यांचे फावते. लोकांत जागृती झाली, तर निश्चितपणे भोंदू बाबांचे पितळ उघडे पडेल, या भीतीपोटीच ते जागृती करणाऱ्यांना संपविण्याचे काम करतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचे काम हाती घेतल्यावर सनातन्यांना मोठी चपराक बसून त्यांची दुकानदारी बंद होणार होती. त्यामुळेच त्यांनी डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचा खून केला. अंनिसचा विचार कोणाविरोधी किंवा नकारात्मक नाही, तर तो सकारात्मक आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले. पुढे बोलताना दाभोलकर म्हणाले की, प्रदूषणमुक्त समाज व पर्यावरण निर्माण करण्यासाठी अंनिसने पहिल्यापासून लढा दिला; पण विरोधाला तोंड द्यावे लागले. आता देशातील मोठ्या शहरात पर्यावरण आणीबाणी आहे, याचे कारण वाढते प्रदूषणच आहे आणि याची जाणीव आता समाजाला होऊ लागली आहे. आम्ही दरवर्षी ३१ डिसेंबर हा ‘जागतिक दारूविरोधी दिन’ म्हणून साजरा करतो आणि ३१ डिसेंबरला ‘दारू नको, दूध प्या’ हा उपक्रम राबवतो. दारूमुळे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. त्यामुळे व्यसनमुक्त तरुण व समाज निर्माण करणे हाही अंनिसच्या कामाचा एक भाग आहे. यावेळी बोलताना माधव बावगे म्हणाले की, महाराष्ट्राला प्रबोधनाचा इतिहास आहे. सनातनी तो संपवण्याचा प्रयत्न करू इच्छितात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजाला झालेला अंधश्रद्धेचा रोग दूर करण्यासाठी जीवनभर कार्य केले.
विचाराने विचाराचा प्रतिसाद न करू शकणाऱ्या शक्तींनी त्यांचा खून केला; पण माणसाला संपवून विचार संपत नसतात, हे काळाच्या ओघात पुन्हा सिद्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले. प्रारंभी ललिता शिरसाठ यांनी स्वागतगीत गायले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल घुले यांनी केले. अंनिसच्या कार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या ज्ञानोबा मुंढे, आनंद शिंदे, आसाराम लोमटे, अॅड. माधुरी क्षीरसागर, यज्ञकुमार करेवार, प्रल्हाद मोरे, नरवाडे, प्रसन्ना भावसार यांचा डॉ. हमीद दाभोलकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ना. श्री. मुंढे, सुहास पंडित, कीर्तीकुमार बुरांडे, रंगनाथ चोपडे, डॉ. सुरेश खापरे, सखाराम बीडकर,
दि. फ. लोंढे, मुंजाजी कांबळे, ओमप्रकाश गायकवाड, मोडक आदी उपस्थित होते.