अनेक दलितेतर सामाजिक/राजकीय कार्यकर्ते, विचारवंत यांच्या विचारांवर, कामावर, साहित्यावर डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा आणि व्यक्तित्वाचा प्रभाव कसा पडला, त्यानुसार त्यांनी कशी वाटचाल केली, याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांना लिहिण्यासाठी विनंती केली. त्याला प्रसिद्ध विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, साहित्यिक व अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले, डाव्या चळवळीतील कार्यकर्ते कॉ. कुमार शिराळकर, कार्यकर्ते, विचारवंत किशोर बेडकीहाळ, सामाजिक कार्यकर्त्या रझिया पटेल यांनी प्रतिसाद दिला. या विभागात त्यांची ही मनोगते आम्ही देत आहोत.
डॉ.आ.ह.साळुंखे हे परिवर्तनवादी चळवळीतील महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत आहेत. चार्वाकापासून सुरू झालेलं त्यांचं चिंतन जैन, बौद्ध आणि शेवटी फुले-शाहू-आंबेडकर इथंपर्यंत पोचलं. गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि विचारांचा प्रभाव त्यांच्यावर कसा पडला, हे त्यांच्याच शब्दांत देत आहोत. –संपादक
माझं लहानपण एका अगदी छोट्या खेड्यात गेलं; त्यामुळं मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाहणं, त्यांचं भाषण ऐकणं किंवा त्यांच्या संपर्कात राहणं, हा अनुभव काही मिळालेला नाही. अर्थात, शाळेच्या अभ्यासक्रमातून अल्प प्रमाणात का होईना, त्यांचं चरित्र आणि कार्य हे समजलेलं होतं. माझी आई वारकरी असल्यामुळं माझ्यावर लहानपणीच काही प्रमाणात का होईना जातीपातींच्या पलीकडे जाण्याचे संस्कार झाले होते. माझ्या आईच्या काही जिवलग मैत्रिणी अस्पृश्य म्हटल्या गेलेल्या आणि अगदी मुस्लिम समाजातील देखील होत्या. त्यामुळं, अनेकदा काही व्यक्तींच्या मनात डॉ. बाबासाहेबांबद्दल काही कारणानं जशी अढी आढळते, तशी माझ्या मनात कधी निर्माण झाल्याचं मला आठवत नाही. तरीही अगदी महाविद्यालयीन जीवनापर्यंत डॉ. बाबासाहेबांचे विचार जाणून घेण्याची फार मोठी संधी मात्र मिळालेली नव्हती. महाविद्यालयात असताना चार्वाक, जैन आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा बराच अभ्यास करायला मिळाला. नास्तिक म्हटली गेलेली ही तत्त्वज्ञानं वर्णव्यवस्थेच्या विरोधात उभी होती. विद्यार्थी दशेत या तत्त्वज्ञानांचं एक आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं होतं. पुढे मी पीएच.डी.साठी ‘चार्वाक दर्शन’ हा विषय निवडला आणि माझ्या पुढच्या आयुष्यभरच्या वाटचालीची दिशा ‘चार्वाक दर्शना’च्या अभ्यासातून निश्चित झाली. त्या अभ्यासातून मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांकडे आकृष्ट झालो. मला हे प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे की, आधी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार आणि मग चार्वाकांचा विचार, असा माझा वैचारिक प्रवास झालेला नाही. चार्वाकाकडून फुले, शाहू, आंबेडकरांकडं असा प्रवास सुरू झाला आणि मग मात्र सुमारे 40 वर्षांहून अधिक काळ मी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांशी अखंडपणे संलग्न राहिलो आहे.
यामध्ये एक विशेष घटना म्हणजे चार्वाकाचा अभ्यास करत असलो, तरी मन बुद्धांकडेही ओढलेलं होतं. बाबासाहेबांनी भारतीय समाजाला नव्यानं बुद्धांचा विचार दिल्यामुळं बुद्धांबरोबरच डॉ.बाबासाहेबांविषयीही मनात नितांत आदर निर्माण झाला. स्वाभाविकच, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न सतत करू लागलो. त्यांचं साहित्य मोठ्या प्रमाणात वाचू लागलो. त्यांच्याविषयीचं विविध प्रकारचं साहित्य वाचू लागलो. परिवर्तनाच्या अनेक चळवळींना डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातून मोठी ऊर्जा आणि प्रेरणा मिळालेली आहे, हे सतत जाणवत गेलं. चळवळीतील अनेक कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. त्यांची व्याख्यानं ऐकता आली. त्यांच्याशी चर्चा करता आली. डॉ.बाबासाहेबांविषयीचं एक-एक गीत ऐकताना रोमांचित होऊन जावं, हा अनुभव घेतला. डॉ.बाबासाहेबांचे विचार घेऊन धडपडणार्या असंख्य लोकांच्या प्रतिभा प्रचंड प्रमाणात फुलून आल्याचं अनुभवलं. असंख्य लोकांनी पशुतुल्य अवस्थेतून उन्नत बनण्यापर्यंतचा प्रवास केल्याचं पाहिलं. आपल्या समाजात आपल्या डोळ्यांसमोर एक क्रांती घडत असल्याचं स्पष्टपणानं जाणवत गेलं. आपण डॉ.बाबासाहेबांच्या चरित्रापासून मिळणार्या या प्रेरणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवल्या पाहिजेत, असं वाटलं. त्यामुळं डॉ.बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी अनेक दृष्टींनी प्रयत्न केले. त्यांच्या एका ग्रंथाचा एक भाग मी मराठीत भाषांतरितही केला आहे. तो प्रकाशित होण्याची मी वाट पाहत आहे.
डॉ.बाबासाहेबांचा व्यासंग माझ्या मनाला भारावून टाकणारा आहे. मी थोडाबहुत व्यासंग करत असताना मला ज्या लोकांच्या व्यासंगाची प्रेरणा मिळाली, त्या लोकांमध्ये डॉ.बाबासाहेबांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा त्यांनी जो आग्रह धरला, तो आमच्या आजच्या भारतीय समाजाला तारणारा आहे असं म्हटलं, तरी चालेल. आज आपल्या समाजात जे विविध प्रकारचे तणाव निर्माण होत आहेत, ते आपल्या समाजाच्या भवितव्याविषयी चिंता निर्माण करणारे आहेत. या काळात डॉ.बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हा आपल्या समाजाला एकत्र ठेवणारा फार मोठा ठेवा आहे. समाजाच्या विविध स्तरांतील लोकांना जोडण्याचे काम करावेच लागेल आणि ते करताना आपल्याला आपल्या संविधानाचे भक्कम अधिष्ठान आहे.
डॉ.बाबासाहेबांशी माझं अतिशय जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी भारतीय समाजाला बुद्धांचा नव्यानं परिचय करून दिला. त्यांचा ‘दि बुद्ध अँड हिज धम्म’ हा ग्रंथ पिढ्या-पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. डॉ.बाबासाहेबांचे बुद्धांकडे घेऊन जाण्याचे उपकार व्यक्तिश: माझ्या दृष्टीनं अविस्मरणीय आहेत. हृदयात सदैव जपून ठेवण्यासारखे आहेत.
अखेरीस एक गोष्ट. डॉ.बाबासाहेब हे आपल्या समाजातील कोणत्याही एका वर्गापुरते मर्यादित नाहीत, हे मी अभ्यासाअंती ठामपणे सांगू शकतो. डॉ.बाबासाहेब हा सर्व भारतीयांचा उज्ज्वल असा समाईक वारसा आहे.
शब्दांकन : प्रशांत पोतदार