Categories
व्यक्तिविशेष

ब्रूनो, गॅलिलिओ ते दाभोलकर

ऑगस्ट - २०१८

गेल्या एप्रिलमध्ये ‘फाल्कन 9’ हे नासाने सोडलेले रॉकेट अंतराळात झेपावले. या रॉकेटमधून प्रक्षेपित उपग्रह सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहांबाबतची माहिती मिळवणार आहे. खगोल वैज्ञानिकांचा असा अंदाज आहे की, सूर्याप्रमाणेच इतर तार्‍यांच्या कक्षेत पृथ्वीसारखेच ग्रह फिरत आहेत. आतापर्यंत अशा 3700 सूर्यमालाबाह्य ग्रहांचे अस्तित्व खगोल अभ्यासकांना माहीत झालं आहे. वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार अशा ग्रहावर जीवसृष्टीही असू शकेल. खगोलविज्ञानात मांडलेल्या अवकाशातील तारकाविश्वात अनेक पृथ्वी असाव्यात, या विधानाला कोणीही हल्लीचा सुजाण पृथ्वीवासीय नागरिक आक्षेप घेत नाही; पण पाचशे वर्षांपूर्वी, ब्रूनो नावाच्या एका अवलियाने विश्वात पृथ्वीप्रमाणेच अनंत पृथ्वी आहेत, असे विधान केले म्हणून त्याला ख्रिस्ती धर्मपीठाने जिवंत जाळण्याची शिक्षा दिली.

पंधराव्या-सोळाव्या शतकात युरोप अंधारयुगातून बाहेर पडत होता. प्रबोधनाचे आणि विचारस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. ब्रूनो याच काळातील निर्भय आणि मुक्त वैचारिक मांडणी करणारा विचारवंत. ब्रूनो कॅथालिक धर्माचा अनुयायी; पण कॅथालिक धर्मग्रंथातील अनेक विधानांबद्दल तो शंका व्यक्त करीत होता. हे विश्व अमर्याद आहे आणि त्यात अनेक सूर्यमाला आहेत, या त्याच्या विधानांनी कॅथालिक धर्मपीठ बिथरले. धर्मपीठाला ब्रूनो पाखंडी वाटला. त्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा खटला भरला. सहा वर्षांनी इ.स. 1600 मध्ये धर्मपीठाने त्याला दोषी ठरवून जिवंत जाळण्याची शिक्षा फर्मावली आणि ती अमलातही आणली. या शिक्षेचे वाचन करीत असलेल्या ज्यूरीकडे पाहून ब्रूनो म्हणाला, “You may be more afraid to bring that sentence against me than I am to accept it.” एखाद्याला ठरवून खोटं ठरावायचं, अशी कृत्ये करणारे स्वत:च भ्याड असतात, असं ब्रूनो म्हणाला. ब्रूनोच्या या विधानाची आठवण झाली, याचं कारण म्हणजे त्याच्याप्रमाणेच सत्यशोधक, निर्भय व विज्ञाननिष्ठ नरेंद्र दाभोलकरांचा लपून गोळी मारून सनातनी धर्मांधांनी केलेला खून. जगातून कर्मठ, हेकट, दुराग्रही धर्मव्यवस्था झुगारली जात असताना भारतात ब्रूनोच्या काळासारखी परिस्थिती येऊ पाहत आहे काय?

भेदरट; पण धूर्त धर्मवादी सनातन्यांचा विश्वाकडे पाहण्याचा खास असा दृष्टिकोन आहे. या दृष्टिकोनाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाशी पाचशे वर्षांपासून संघर्ष होत आलाय. या दोन्ही दृष्टिकोनातील फरक समजून घेतल्याशिवाय धर्म आणि विज्ञान परस्परांच्या विरोधात का उभे ठाकते, याचं कारण आपल्याला कळणार नाही. ब्रूनोनंतर अवघ्या वीस वर्षांनी जेथे ब्रूनोचा खटला चालू होता, त्याच हॉलमध्ये ख्रिस्ती धर्मपीठाने गॅलिलिओवरील खटल्याची सुनावणी केली. सन 1609 मध्ये गॅलिलिओने आपली दूर्बिण आकाशाकडे रोखली आणि विश्वाबद्दलच्या नव्या वादाला तोंड फुटले.

ख्रिस्ती धर्मपीठाचा बायबल हा पवित्र ग्रंथ. प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ असतो आणि त्या धर्माचा एक प्रेषित पण असतो. प्रेषित म्हणजे पृथ्वीवरील देवाचा प्रतिनिधी. त्याने सांगितलेली वचने म्हणजे देवाच्या आज्ञा. ही वचने धर्मग्रंथात समाविष्ट असतात. प्रेषिताची वचने हे अंतिम सत्य. या सत्याविरोधात जो बोलेल, तो धर्मद्रोही म्हणजेच पाखंडी; पण अशा बंदिस्त ज्ञानव्यवस्थेविरोधात प्रबोधनकाळात अधूनमधून आव्हानाचे ध्वनी उमटत होते. यातलाच एक आवाज होता गॅलिलिओचा.

गॅलिलिओचे एक प्रसिद्ध वचन आहे – ‘ज्या देवाने आपणाला बुद्धी दिली, तो त्या बुद्धीचा वापर तुम्ही करू नका अशी आज्ञा का करेल?’ तर्कबुद्धीचा वापर करून सृष्टीतील घडामोडींचा कार्यकारणसंबंध तपासायला हवा आणि या तपासात धर्मवचनांविरोधी पुरावे मिळाले, तर अशी वचने नाकारायला हवीत. गॅलिलिओला दूर्बिणीतून चंद्रावर डोंगर व खळगे दिसू लागले. शुक्र, चंद्रासारखा लहान-मोठा होत असल्याचे; म्हणजेच त्याला कला होतात, हे दूर्बिण दाखवू लागली. गुरूभोवती चार चंद्र (उपग्रह) फिरत असल्याचे त्याला आढळले. एवढेच नव्हे, तर नुसत्या डोळ्यांनी अवकाशात जेथे काहीच दिसत नाही, तेथे गॅलिलिओला नवे तारे दिसू लागले. ही सगळी निरीक्षणे बायबलमधील विश्वाच्या वर्णनाला खोटी ठरवीत होती.

ग्रीक काळात अ‍ॅरिस्टॉटल नावाचा तत्त्वज्ञ होऊन गेला. त्याने पदार्थांच्या गतीबद्दल आणि विश्वातील घडामोडींबद्दल बरंच काही लिहून ठेवलं होतं. या अ‍ॅरिस्टॉटलची वचने ख्रिस्ती धर्मपीठाने स्वीकारली होती. ‘एक हलका आणि दुसरा जड पदार्थ वरून खाली एकाच उंचीवरून सोडला, तर जड पदार्थ जमिनीवर लवकर पोचेल,’ हे अ‍ॅरिस्टॉटलचे विधान. पिसाच्या मनोर्‍यावरून तो प्रख्यात प्रयोग करून गॅलिलिओने असे दोन गोळे एकाच वेळी जमिनीवर पोचतात, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. अशा प्रयोगाद्वारे आणि दूर्बिणीतून केलेल्या निरीक्षणाद्वारे गॅलिलिओला, कोपर्निकसने मांडलेला सूर्यकेंद्री सिद्धांत पटू लागला. ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ या गॅलिलिओच्या विधानाने धर्मपीठ बिथरले. विश्वाचा केंद्रबिंदू म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीवरील माणूस. माणूस हा देवाचा लाडका; पण गॅलिलिओने पृथ्वी फिरते असे सांगून मानवाचे श्रेष्ठत्वच निकालात काढले. म्हणजे हाही ब्रूनोप्रमाणेच पाखंडी आहे तर…! ब्रूनोने पृथ्वीसारखे अनेक गोल या विश्वात आहेत, असे सांगून तिचे श्रेष्ठत्व व एकमेवद्वितीयता यांना तडा दिला होताच.

पोपच्या न्यायासनासमोर गॅलिलिओवरचा खटला चालू झाला आणि त्यालाही दोषी ठरविण्यात आले. पृथ्वी फिरते, हे विधान गॅलिलिओने मागे घेऊन धर्मपीठाची माफी मागावी, असा हुकूम झाला. वृद्ध गॅलिलिओने तसं म्हटल्यावर त्याला सोडून देण्यात आले; पण मृत्यूपर्यंत धर्मपीठाने त्याला नजरकैदेत ठेवले.

विद्या, कला आणि विविध ज्ञानक्षेत्रात युरोपात नवविचारांचे वारे वाहू लागले असतानाच धर्मपीठाचे आक्रमणही चालू होते; मात्र लोकमताला धर्माचा अन्यायी हटवादीपणा अमान्य होत असल्याचे जाणवू लागताच ख्रिस्ती धर्म मवाळ होऊ लागला. विज्ञानाच्या विरोधाची धर्मपीठाची भूमिका बदलू लागली. या पार्श्वभूमीवर न्यूटनला धर्मपीठाने विरोध केला नाही. न्यूटनने ग्रहगोल, सूर्य, चंद्र यांच्या गतीचे नियम गणिताद्वारे सिद्ध केले. न्यूटन स्वत: धार्मिक होता; पण निसर्गाच्या घडामोडी विशिष्ट नियमांनी चालतात आणि त्यात देव हस्तक्षेप करीत नाही, असा विचार त्याच्या संशोधनाद्वारे प्रस्थापित झाला.

गॅलिलिओ आणि न्यूटन यांच्या संशोधनातून विश्वाकडे बघण्याचा एक क्रांतिकारी दृष्टिकोन मानवाला प्राप्त झाला. निसर्गातील घटना मानवी बुद्धिसामर्थ्याने समजून घेता येतात. त्यासाठी निरीक्षण, गृहीत, प्रयोग आणि निष्कर्ष या पायरीने घटनांचे आकलन होते. हीच ती विज्ञानाची पद्धत. विज्ञानाच्या पद्धतीने सृष्टीचा कार्यकारणभाव जाणता येतो. प्रत्येक घटनेला कारण असते आणि मानवी बुद्धीने विज्ञानाची पद्धती वापरून ते समजू शकते, हाच वैज्ञानिक दृष्टिकोन.

सृष्टीतील घडामोडींकडे पाहण्याचा धर्माचा खास दृष्टिकोन आहे. धार्मिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यातील भिन्नता नीट समजून घ्यायला हवी.

धार्मिक दृष्टिकोनात प्रेषित किंवा पवित्र धर्मग्रंथ सुप्रिम असतात. यालाच अधिकारवाद असं म्हणता येईल. अधिकारी प्रेषिताला किंवा त्याच्या प्रतिनिधीला तुम्ही आव्हान देऊ शकत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन अधिकारवाद नाकारतो. या अर्थाने विज्ञान नम्र आणि लोकशाही भूमिका स्वीकारते. तुम्ही विज्ञानाच्या पद्धतीने काढलेल्या निष्कर्षांबाबत चूक होण्याची शक्यता असू शकते आणि याबाबत चिकित्सा करण्याचा दुसर्‍यांचा अधिकार मान्य केला जातो. शंकांना वाव; पण शंकानिरसनासाठी तर्क आणि प्रयोग म्हणजेच तपासण्याची विज्ञानाची पद्धत विज्ञानदृष्टीत मान्य केली जाते. स्केप्टिसिझम हे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ब्रूनो आणि गॅलिलिओ स्केप्टिक म्हणजेच चिकित्सक किंवा संशयवादी होते. म्हणून धर्मपीठाने त्यांना पाखंडी ठरविले; मात्र न्यूटनच्या गतिशास्त्रात आइनस्टाईनने दोष दाखविला व त्याला पुरावाही मिळाला म्हणून विज्ञानक्षेत्राने आइनस्टाईनला गोळी मारली नाही.

धार्मिक दृष्टिकोनातून प्रत्येक घटनेमागे भावशक्ती कार्यरत असते. एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग का झाला, याचे कारण म्हणजे देवाचा कोप. भूकंप का होतो? कारण देव रागावतो. सूर्याला ग्रहण का लागते? कारण त्याला राक्षस गिळतो. विविध देवदेवता, अतिंद्रिय शक्ती सैतान, पिशाच्च म्हणजेच तथाकथित अदृश्य भावशक्तींना धर्माचे पाठबळ असते. देवकल्पनेचा परमोच्च विकास म्हणजे सर्वशक्तिमान देव. त्याने लाडक्या मानवाला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे आणि त्याच्यासाठीच सृष्टीची रचना केली आहे. हा भावशक्तीचा खेळ विज्ञानदृष्टीला मान्य नाही.

कुष्ठरोग किंवा कॉलरा जंतूमुळे होतो हा विज्ञानाचा कार्यकारणभाव. तो समजला की, कुष्ठरोगाचे किंवा कॉलर्‍याचे जंतूवर नियंत्रण आणता येते. देवाचा कोप म्हणून कित्येक कुष्ठरोगी वेदना भोगून मेले असतील; पण बाबा आमटेंनी हा देवाचा तथाकथित कोप उलटविला आणि कुष्ठरूग्णांसाठी आनंदनवन निर्माण केले. म्हणून मानवमुक्तीचा खरा मार्ग म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन.

सतराव्या शतकापासून युरोप खंडातील समाजाने धर्म आपल्या घरात आणि चर्चमध्ये ठेवला आणि निसर्गातील घटनांचा कार्यकारणभाव वैज्ञानिक पद्धतीने शोधून समृद्ध असं भौतिक विश्व साकार केलं. खगोल, भूगोल, शरीर, मन, जल, वायू यांच्यामधील कार्यकारणभाव शोधण्यासाठी जणू स्पर्धाच सुरू झाली. निसर्गनियम हाताशी आल्यावर त्यातून यंत्र-तंत्र, साधने निर्माण केली गेली. पदार्थांचे गुणधर्म समजून घेऊन नवे पदार्थ बनविले, ऊर्जा साधने निर्माण केली. औद्योगिक क्रांतीने अवघा युरोप संपन्न झाला.

हा लेख लिहिण्यापूर्वी मी मार्टीन गार्डनर या विवेकवादी विचारवंताचे आत्मचरित्र वाचत होतो. मार्टीन गार्डनर हा मूळ धार्मिक वृत्तीचा; पण संशयवादी म्हणजे स्केप्टिक वृत्तीमुळे त्याला बायबलमधील घटनांबाबत संशय वाटू लागला. बायबलमधील जुन्या करारात देवदूत (Jehovah) हा क्रोधिष्ट आणि दुष्ट, जुलमी वाटतो. त्याने नोव्हा आणि त्याचे कुटुंबीय सोडून इतर सर्व माणसे आणि प्राण्यांना पाण्यात बुडवून मारले. त्याने एका बाईला ती आज्ञाभंग करते म्हणून क्षाराचा खांब बनवून टाकले. अशा कोपिष्ट स्वभावात देवत्व कसे? गार्डनर लिहितो, ‘अशा स्वरुपाच्या देवाकडे अमेरिकन लोकांनी पाठ फिरवित चर्चमध्ये जाणे सोडून दिलं आहे. ते खर्‍या नैतिक देवाचा शोध घेऊ लागले आहेत.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करून युरोप-अमेरिकेतील समाजाने दारिद्य्र, दुष्काळ, सामाजिक विषमता आदी प्रश्नांवर मात केली आहे. मी ज्या ऑस्टीन शहरातील दुमजली घरात लेकीकडे राहिलोय, त्या घराची स्वच्छता करण्यासाठी येणारी बाई (आपल्याकडील मोलकरीण) स्वत:च्या कारमधून कामाला येते. अमेरिकेत कधीही वीज जात नाही, पुरामुळे गावे उद्ध्वस्त होत नाहीत. 24 तास गरम-गार पाण्याची व्यवस्था प्रत्येक घरात असते. रस्त्यावर कुठेही खड्डा दिसत नाही.

वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व जाणून भारत स्वतंत्र झाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची घोषणा केली. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली धार्मिक उन्मादाला आवर घालणारी, व्यक्तिस्वातंत्र्याचा हक्क देणारी, विज्ञानप्रणित समाज निर्माण करण्यासाठीची राज्यघटना साकार केली. पुढे इंदिरा गांधींनी प्रत्येक भारतीय नागरिकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करावा म्हणून शिक्षणात दहावा गाभा घटक आणला. सार्वजनिक शांतता आणि आरोग्य यांना बाधा करणार्‍या धार्मिक गोष्टींवर बंधने आणली. धर्म घरात ठेवा, सार्वजनिक सामाजिक जीवनात आणि भौतिक साधनांच्या विकासात धर्माची आडकाठी नको म्हणून भारत हे ‘सेक्युलर’ राष्ट्र म्हणून घोषित केले. दारिद्य्र, नैसर्गिक आपत्ती, आरोग्यव्यवस्था, म्हणजेच सर्वांसाठी अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण यांच्या परिपूर्तीसाठी विज्ञानदृष्टीने दाखविलेला मार्गच योग्य आहे, हे नेहरूंना पटले होते. पंडित नेहरूंच्या प्रसिद्ध अशा वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबतच्या विधानांचा डॉ. दाभोलकर नेहमी आपल्या भाषणात उल्लेख करीत – “The Scientific temper is a way of life, a process of thinking, a method of action. It is the spirit of a free man.”

1950 पासून 1990 पर्यंत भारतीय लोकशाहीची वाटचाल वैज्ञानिक दृष्टिकोनाधारे भारतीय समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने चालू होती; पण हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडून प्रकाशाच्या दिशेने सुरू असलेल्या या मार्गाला पुन्हा अंधारवाटेने नेण्याचा एक मोठ्ठा कट सध्या भारतात आक्रमक होऊ लागला आहे. या कटातून धर्माच्या नावाखाली समाजमनाला अंधविश्वासाकडे ललकारण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून छुपे धार्मिक अतिरेकी, धर्मचिकित्सक आणि विज्ञानवादी विचारवंत यांच्या हत्या करू लागले आहेत. डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खून या धार्मिक कटाचाच एक भाग आहे.

कन्नड साहित्यिक प्रा. भगवान, नाट्यक्षेत्रातील कलाकार गिरीश कर्नाड, महाराष्ट्रातील विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना धमक्या सुरू झाल्यात. सोळाव्या शतकातील युरोपमध्ये ब्रूनो-गॅलिलिओंना संपविण्याचा धार्मिक कट आणि भारतात विचारवंतांना संपविण्याची कारस्थाने यांच्यात खूपच साम्य आहे. भारताची धार्मिक अराजकाच्या दिशेने सुरू झालेली ही अंधारयुगाची वाटचाल थोपविता येईल काय? भारतीय समाजाला अंधविश्वासाकडे घेऊन जाणार्‍या काही गंभीर घटनांकडे नजर टाकू या.

नुकतीच घडलेली घटना. महाराष्ट्रातील एका तथाकथित धर्मरक्षकाने ‘तुम्हाला मुलगा हवा असेल, तर माझ्या शेतातील आंबे खा,’ असे विधान करून सबंध जेनेटिक्स विज्ञानाची वाट लावली. एवढ्यावरच हे महाभाग थांबले नाहीत, तर ‘या देशातील पहिला कायदेपंडित मनु होय,’ असे विधान करून त्याने भारतीय राज्यघटनेला आव्हान दिले. सेक्युलर राष्ट्राचे, धार्मिक वर्चस्वाखालील धर्मराष्ट्र बनविण्याची ही वाटचाल आहे. मनुने समाजव्यवस्थेसाठी जी ‘मनुस्मृती’ लिहिली, तिचे आंबेडकरांनी का दहन केले, हे या महाभागाला कोणीतरी सांगायला हवे. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ हा ग्रंथ त्यांना भेट म्हणून द्यायला हवा.

धर्म, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सध्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाट लावण्याची कारस्थाने वाढताना दिसतात. जातिभेदाला मूठमाती द्यावी, असे विज्ञानदृष्टी सांगते; पण विविध राजकीय पक्ष आपापल्या जातीच्या टोळ्यांचे सामर्थ्य वाढवून समाजाची शकले करताना दिसत आहेत. गोवधबंदीच्या नावाखाली धार्मिक विद्वेष पसरविला जात आहे. निरपराधांना ठार मारले जात आहे. भटक्या समाजातील पंचरुपी टोळ्या, त्या-त्या समाजातील निरपराध स्त्रिया आणि आंतरजातीय विवाह करणार्‍या युवक-युवतींचे जिणे नकोसे करून सोडत आहेत. राज्यकर्तेचमत्कार करणार्‍या बुवा-बाबांना आपल्या शेजारी मानाचे स्थान देऊ लागलेत. ‘सत्य हाच परमेश्वर’ असं म्हणणार्‍या महात्मा गांधींच्या खुन्याचे उदात्तीकरण चालू आहे. हे असंच चालू राहिले, तर भविष्यात विचारवंतांच्या खुनी अतिरेक्यांचे पुतळेही उभारले जातील.

धर्म मानवनिर्मित आहे. ‘देव-दानवा नरे निर्मिले, हे मत लोका कळवू या’ असं केशवसूत म्हणाले. ‘न मी हिंदू, न मी एक पंथाचा। मी नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,’ हे घोषित करण्यासाठी केशवसुतांनी ‘तुतारी’ कविता लिहिली. आजचे राज्यकर्ते, भेदाभेदाची, अंधश्रद्धेची गर्जना करणारी तुतारी फुंका, असं कवींना आव्हान करतील.

हिंदुत्व ब्रिगेडला राजाश्रय मिळाल्यामुळे धर्माच्या नावाखाली सांस्कृतिक दुराभिमानातून ‘भगव्या विज्ञाना’चा प्रसार सुरू झाला आहे. मुंबईत नुकत्याच भरलेल्या सायन्स काँग्रेसमध्ये त्याची झलक दिसून आली. सर्व आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान आमच्या धर्मग्रंथात; आणि विशेषत: वेदात होतं, असा हिंदू ब्रिगेडचा दावा आहे. गणपतीला हत्तीचे तोंड जोडणारी प्लॅस्टिक सर्जरी पूर्वजांना माहीत होती, असे वक्तव्य केले गेले. विमानविद्या पूर्वजांना अवगत होती, असाही दावा करण्यात आला. एवढंच नव्हे, तर आइनस्टाईनचा सापेक्षतावाद आणि न्यूटनचे नियम याचा उल्लेख वेदात आहे, अशी विधाने हिंदू ब्रिगेडचे समर्थक राजकीय बुजुर्गांनी केली. योगाने कॅन्सर आणि हृदयविकार बरा होतो, असा प्रचार बाबा रामदेव करतात. हे सर्व फसवं ‘भगवं विज्ञान’ वैज्ञानिक दृष्टिकोनाला मारक ठरणारे आणि जागतिक समुदायात भारताची नाचक्की करणारे आहे.

पण हे तर काहीच नाही. एका गंभीर अशा धोक्याची भयसूचक घंटा गुजरातमधील जामनगर येथून वाजू लागली आहे. तेथे एका बाईंनी ‘गर्भसंस्कार केंद्र’ चालू केले आहे. एका जोडप्याकडून 50 हजार रुपये घेऊन हवी तशी संतती देणार्‍या या केंद्राला ‘आरोग्य भारती’ या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे पाठबळ आहे. गायनाकॉलॉजीचे आधुनिक सिद्धविज्ञान धाब्यावर बसवून समागमाची ज्योतिषाच्या आधारे वेळ ठरविणे, संगीत आणि मंत्रोच्चाराचा उपयोग करणे, आयुर्वेदानुसार आहार-विहार ठरविणे अशा उपचारांचा अवलंब करून सुप्रजेची निर्मिती असं हे भ्रामक विज्ञान आहे. आई-वडील कोणीही असो; निपजणारे मूल गोरे, तेजस्वी आणि निळ्या डोळ्याचे सुंदरच निपजेल अशी मांडणी या गर्भसंस्कार केंद्रात केली जाते.

22 मे 2017 च्या ‘टेलिग्राफ इंडिया’मध्ये ‘डींळश्रश्र लेीप’ या शीर्षकाखाली एक लेख प्रसिद्ध झालाय. तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. या लेखात गर्भसंस्काराच्या नावाखाली हिंदुत्ववादी संघटनेला नेमके काय साधायचं आहे, याचं भयंकर वर्णन दिलंय. काही विचारवंतांच्या मते हा प्रकार म्हणजे जातीय दुराभिमानाला खतपाणी घालणारा, नाझी जर्मनीचे अनुकरण करणारा अवैज्ञानिक प्रयोग आहे. हिटलरच्या जर्मनीतील ‘लेबेन्सबॉर्न’ प्रयोगाशी या गर्भसंस्कार केंद्राची तुलना करता येईल. जर्मन पॅरामिलिटरी नाझी टोळीचा प्रमुख हेनरिच हिमलर याला निळ्या डोळ्याच्या शुद्ध आर्यन जातीच्या प्रजानिर्मितीत रस होता. दुसर्‍या महायुद्धापूर्वी पोल्ट्री फार्म चालवणार्‍या हिमलरला शुद्ध पांढर्‍या रंगाची चिकन पैदा करण्याच्या कल्पनेने झपाटले होते. हाच प्रयोग त्याला जर्मन माणसावर करून शुद्ध आर्य वंश वाढवायचा होता. जामनगरच्या गर्भसंस्कार केंद्रात असंच काहीतरी करून शुद्ध आर्यप्रजा वाढवायचा विचार आहे काय, असा प्रश्न ‘टेलिग्राफ’ने उपस्थित केला आहे.

पंडित नेहरूंना जात, धर्म, लिंग, भेद संपवून मानवतेचा महान प्रयोग साकार करण्यासाठी भारतात राज्यघटनेद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन राबवायचा होता. नेहरू-गांधींचा मानवतावाद नाकारून हिंदुत्व ब्रिगेडला एक धर्म आणि एक जात यांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारे राष्ट्र निर्माण करावयाचे आहे. त्यासाठी त्यांना भारतीय राज्यघटना सुद्धा बदलायची आहे. सहिष्णु हिंदू धर्माला जुलमी सत्तेचे रूप देण्याचा हा प्रयत्न म्हणजे ब्रूनो आणि गॅलिलिओ यांना छळणार्‍या कॅथालिक धर्माचीच पुनरावृत्ती आहे.

पण ब्रूनो आणि गॅलिलिओ यांना छळणार्‍या कॅथालिक ख्रिस्ती धर्माचे वर्चस्व युरोपीय जनतेने नाकारले. राजसत्तेपेक्षाही धर्मसत्ता बलवान होऊ न देता धर्मसत्तेला राजसत्तेपासून दूर केले; परिणामी तेथील जनता ब्रूनो-गॅलिलिओ-न्यूटन प्रणीत विज्ञान स्वीकारू लागली. धर्माचे सर्वांगीण सामाजिक वर्चस्व कमी झाले. तेच भारतातही घडू शकेल.

हिंदू ब्रिगेड, हिटलरच्या नाझी राजवटीतील एस.एस. म्हणजे ‘पॅरामिलिटरी फौजे’चे रूप घेत विचारवंतांच्या हत्या करीत सुटली आहे. कॅथालिक ख्रिस्ती जुलमी धर्माचीच ही पुनरावृत्ती आहे. ब्रूनो-गॅलिलिओ ते दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी असा तिचा ऐतिहासिक प्रवास सुरू आहे; पण सर्व काळी सर्व लोकांना फसविता येत नाही. इतिहास याला साक्षी आहे. गॅलिलिओवर खटला भरणार्‍या रोमच्या धर्मपीठाने गॅलिलिओला शिक्षा करून आम्ही चुकलो, अशी जाहीर कबुली दिली आहे. खगोल विज्ञानातील सूर्यकेंद्री सिद्धांतच खरा आहे, हेही धर्मपीठाने मान्य केले. हिंदू ब्रिगेडची वैज्ञानिक दृष्टिकोनविरोधी जुलमी सत्ता भारतीय समाज नक्कीच झुगारून देईल. त्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा विचार पेटता ठेवून महाराष्ट्र अंनिस संपूर्ण देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा सूर्य प्रकाशात ठेवण्याचे कार्य जोमाने करील, यात शंका नाही. प्रश्न आहे तो सामान्य लोकांना सजग करण्याचा आणि धर्मांधांना उघडे पाडण्याचा. ब्रूनो-गॅलिलिओ-महात्मा गांधी ते दाभोलकर यांचा वारसा निर्भयपणे पुढे नेऊया!

. रा. आर्डे

ऑस्टीन (अमेरिका)