रस्त्यावरती जगतो आम्ही
रस्त्यावरती मरतो,
रस्त्यावरती जगण्यासाठी
नाटकही करतो….
महाराष्ट्रातील दलित, शोषित, कष्टकरी चळवळीत सक्रिय असलेल्या; पण काही वर्षांपूर्वी दिवंगत झालेल्या नाटककार, दिग्दर्शक, मुक्त पत्रकार क्रांती बांदेकर यांच्या एका सडक नाटकातील गाण्याच्या या वरील ओळी आहेत.
भारताला सडक नाटक (स्ट्रीट प्ले-पथनाट्य) चळवळीचा मोठा इतिहास आहे. भारतात आणि जगातील अन्य देशांत सडक नाटकाची सुरुवात ही कामगार, कष्टकरी चळवळीतून झाली. सर्वसामान्य जनतेमध्ये; त्यांच्या समस्या, प्रश्नांवर जनजागृती, वर्गजागृती व लोकप्रबोधन करण्यासाठी झाली. मुंबईमध्ये 1930-1940 च्या दरम्यान कामगार हक्क चळवळीच्या प्रारंभीच्या काळात गिरणी कामगारांच्या चाळी – वस्त्यांमध्ये तत्कालीन कामगार चळवळीतील कार्यकर्ते, कलावंत एखाद्या आंदोलनाच्या विषयावर गाणी, छोटेसे कथानक असलेले स्क्रिप्ट लिहायचे व त्याचे नाट्यमय सादरीकरण करायचे. कधी कामगार मेळ्यांमध्ये, सभेमध्ये वा काही वेळेस गिरणीच्या गेटवर कामगार कामावरून सुटताना ही रस्त्यावरची नाटके व्हावयाची. याबाबत अलीकडेच पटना येथे ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ (इप्टा) चे 75 वे राष्ट्रीय संमेलन झाले. त्या संमेलनात ‘इप्टा’चे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिध्द नाट्य-सिनेदिग्दर्शक एम. एस. सथ्यु म्हणाले की, ‘स्ट्रीट प्ले’ची सुरुवात ही अलिकडची नाही, तर 1940 – 1950 च्या काळात लाल बावटा कलापथकातर्फे गिरण्यांच्या गेटवर होणार्या नाटकांपासून आहे. ज्यामध्ये कॉ. अण्णा भाऊ साठे, अमर शेख, गव्हाणकर यांसारखे कलाकार काम करायचे. ही नाटके त्यावेळच्या राजकीय विषयांवर असायची.

जगात आणि आपल्या देशातही कला-साहित्य-संस्कृतीवरही सतत उच्च जात-वर्गीयांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे त्या जात-वर्गातून येणार्या बहुसंख्य लेखक-कलावंतांनी आपल्या कलाकृतीमधून त्या उच्च जात-वर्गीयांच्याच संस्कृतीचे गोडवे गाण्याचे व भाटगिरीचे काम केले आहे. त्यांनी कधीही आपल्या साहित्य कलाकृतींमधून समाजातील शोषित, तळागाळातील जात-वर्ग समूहाचे जगणे, दु:ख, वेदना मांडल्या नाहीत. जेव्हा जगभर कष्टकर्यांच्या चळवळी, लढे उभे राहू लागले, तेव्हा त्या चळवळीशी वैचारिक बांधिलकी मानणारे व त्या शोषित वा मध्यम वर्गातील लेखक, कलावंत आपलं रोजचं जगणं, आपला जीवनसंघर्ष आपली गाणी, कविता, कथा, नाटके यावर वर्गीयांचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे त्याची चित्रे यातून मांडू लागले. रशियात कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय असलेला खाण कामगाराचा मुलगा कॉ. मॅक्झीम गॉर्की सारखा क्रांतिकारक लेखक आपल्या साहित्यातून उच्चभ्रू साहित्यिकांना, ‘संस्कृतीच्या मिरासदारांनो, तुम्ही कोणाच्या बाजूने आहात?’ असे सवाल करू लागला.
असेच सवाल करीत अमेरिकेतील काळ्यांच्या चळवळीतून पॉल रॉबसन सारखा गायक पुढे आला, ज्याचे गाणे ‘वुई शाल ओव्हरकम- हम होंगे कामयाब’ हे गाणे जगभर गाजले. लॅटिन अमेरिकेतून पाब्लो नेरुदासारखा मानवतेची गाणी, कविता लिहिणारा कवी उदयाला आला आणि साम्राज्यवादाच्या विरोधातील संघर्षात अग्रभागी राहिला. जर्मनीत मार्क्सवादाने प्रेरित होऊन कामगारांसाठी नाटके, गाणी, कविता लिहिणारा आणि हिटलरच्या फॅसिझमविरोधात जीव धोक्यात घालून स्पष्ट भूमिका घेणारा बट्रोल्ट ब्रेख्त सारखा सुप्रसिद्ध नाटककार, कवी पुढे आला, ज्याने नाटकाला निखळ मनोरंजनाच्या बाहेर काढून नाट्यतंत्रात स्वत:ची ‘ब्रेख्तीयन’ शैली निर्माण केली. प्रेक्षकांना केवळ नाटकात गुंगवून न ठेवता त्यांना वास्तवाची जाणीव करून देत विचारप्रवृत्त करण्याचे नाट्यतंत्र त्याने विकसित केले. सामाजिक-राजकीय समस्यांवर भाष्य करणारी कथानके असलेली अनेक नाटके त्यांनी कामगार कार्यकर्त्यांना सोबत घेत जर्मनीतील कामगार वस्त्या – कारखान्यांच्या परिसरात केली. त्याने नाटकात कष्टकर्यांना भावेल, अशी गाणी आणि संगीत यांचा मेळ घातला. अशा प्रकारच्या नाटकांना ‘अॅजीट-प्रॉप थिएटर’ असे म्हणत असत. ही सडक नाटके जनआंदोलन – चळवळीशी संबंधित असायची.
भारतात 1950-60-70 च्या दशकापर्यंत ‘इप्टा’ या पुरोगामी नाट्यकला संस्थेने भारतीय रंगभूमीवर स्वत:चा वेगळा असा ठसा उमटवला. नाटकाच्या माध्यमातून समकालीन राजकीय-सामाजिक प्रश्नांवर प्रहार केले. सामाजिक-राजकीय बांधिलकी मानणारे बलराज सहानी, दीना पाठक, ए. के. हंगलपासून संजीवकुमार, शबाना आझमी, फारूक शेख, राज बब्बर ते अंजन श्रीवास्तव पर्यंतचे अनेक कलावंत नाट्य-सिनेसृष्टीत पुढे आले. परंतु ‘इप्टा’च्या नाटकांना कमानी रंगमंचाची आणि वाढत्या खर्चाचीही मर्यादा पडू लागली. ज्या कामगार-कष्टकर्यांच्या चळवळीच्या जोरावर नाटकाचे प्रयोग व्हावयाचे, ती कामगार चळवळ हळूहळू कमजोर होऊ लागल्याने प्रयोगांची संख्या घटू लागली. महागाईमुळे खर्चिक प्रयोग परवडनासे झाले आणि ‘इप्टा’मध्येही धंदेवाईक अपप्रवृत्ती शिरल्या व जनचळवळीशी ‘इप्टा’चा संवाद कमी होत गेला.
या पार्श्वभूमीवर 1960-1970च्या दशकात देशातील राजकीय-सामाजिक परिस्थितीतही मोठे बदल होत गेले. देशातील दहा राज्यांत काँग्रेस पराभूत झाली. नव्या पिढीच्या राजकीय-सामाजिक संघटना उदयास आल्या. महाराष्ट्रात युक्रांद, दलित पँथर, मागोवा, दलित युवक आघाडीसारख्यो तरुणांच्या गटचळवळी निर्माण झाल्या. बंगाल-आंध्रसारख्या ठिकाणी नक्षलवादी चळवळ उभी राहिली. सांस्कृतिक क्षेत्रातही लिटल मॅगेझीन, दलित साहित्य, नाट्यक्षेत्रात प्रायोगिक, समांतर रंगभूमी, बंगालमध्ये जात्रा, बिनकमानी रंगमंचावरील प्रयोग सुरू झाले. त्याचवेळेस बादल सरकारसारख्या डाव्या विचारांच्या प्रगतिशील नाटककारास वाटू लागले की, प्रेक्षकांनी नाटकापर्यंत येण्यापेक्षा आपल्यासारख्या बांधिलकी मानणार्या लोकांनी, कलावंतांनी कामगार-शेतकर्यांच्या घरासमोर, कारखान्यासमोर, अंगणात नाटक नेले पाहिजे आणि मग नेपथ्य, ध्वनी-प्रकाश, कपडेपट याचा थाटमाट न मांडता, आहे त्या वेशात, कमी वाद्यांचा वापर करीत आपल्या देहबोलीचा व आवाजाचा योग्य वापर करीत ही सडक नाटके होऊ लागली. काही ठिकाणी विरोधी विचारांच्या लोकांकडून व शासनाकडून अशा प्रयोगांवर हल्लेही होऊ लागले; परंतु या हल्ल्यांना आणि दहशतीला तोंड देत ही सडक नाटकाची चळवळ बंगालबाहेर देशभर पसरत गेली. 1975-76 च्या कालखंडात देशभर आणीबाणी जाहीर झाल्यानंतर जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आली; परंतु त्या काळातही बादल सरकारांच्या नाटकाचे प्रयोग छुप्या पद्धतीने चालूच होते. मुंबई-पुण्यात अमोल पालेकर, डॉ. हेमू अधिकारी, कमलाकर नाडकर्णी आदींनी आणीबाणी आणि त्यानंतरच्या काळात ‘जुलूस’च्या मराठी रूपांतर नाटकाचे अनेक प्रयोग नाट्यगृहाबाहेर, मोकळ्या जागेत इमारतींच्या गच्चीवर केले.
भारतातील सडक नाटक चळवळीला खरा वेग आला, तो आणीबाणी उठल्यावर 1977 साली. नवे राजकीय वातावरण निर्माण झाले त्या काळात. मुंबईतील के. सी. कॉलेज या उच्चभ्रू महाविद्यालयातील लतेश शहा या तरुणाने काही विद्यार्थी कलाकार घेऊन आणीबाणीवर भाष्य करणारे पहिले सडक नाटक केले. मुंबईच्या रेल्वे स्टेशन व कॉलेजबाहेर त्याचे प्रयोग केले; पण त्या नाटककाराला स्वत:चा राजकीय दृष्टिकोन नसल्याने केवळ फॉर्मच्या प्रेमात पडून तत्कालीन परिस्थितीवर केलेले ते उत्स्फूर्त सडक नाटक होते. त्यानंतर मुंबईतील आमच्यासारखे एस.एफ. आय. विद्यार्थी संघटनेतील कार्यकर्ते आणि एक मध्यमवयीन कॉ. म. ना. वळंजू यांनी एकत्र येऊन मुंबईतील ‘जागर’ नावाचा पहिला सडक नाटक ग्रुप स्थापन केला. पहिले नाटक साखर टंचाई व काळाबाजारावर ‘साखरेचा खेळ’ हे केले. नंतर फी वाढीच्या; तसेच तत्कालीन राजकारणावर भाष्य करणारी अनेक सडक नाटके आम्ही महाराष्ट्रातील मुंबई-पुण्यासह विविध शहरात तर केलीच; पण अगदी दिल्लीच्या बोट क्लबच्या मैदानावरही केली. यातील जवळजवळ सर्व सडक नाटके आम्ही एखाद्या विषयावर चर्चा करून सामूहिक पद्धतीने लिहिली होती. समांतर रंगभूमीवरील क्रांती बांदेकर, अनिल सावंत; तसेच काही झोपडपट्टीतील कार्यकर्ते यांचा सक्रिय सहभाग यात असे. आम्ही सडक नाटकांत लोकगीतांच्या चालींचा आणि चळवळीच्या गाण्याचा चांगला वापर करून घेत असू. ‘जागर’तर्फे आवाज, अभिनयाची शिबिरेही घेत असू. काही कलाकार ‘आविष्कार’सारख्या नाट्यसंस्थेतून नाट्यप्रशिक्षणही घेत असत. सडकनाट्य करायचे आहे म्हणून आम्ही अभिनय, संगीत, आवाज याबाबत कधीच तडजोड केली नाही. याच काळात ‘जागर’नंतर ‘विद्यार्थी प्रगती संघटने’शी संबंधित सनोबर केशवार, आश्विन तांबट, प्रकाश बेर्डे व शाहीर विलास घोगरे यांनी ‘आव्हान’ नावाचा सडक नाटक ग्रुप स्थापन केला. त्यातर्फे त्यांनी विद्यार्थी, झोपडपट्टी, कामगार व राजकीय समस्यांवर विडंबन करणारी अनेक सडक नाटके केली. त्यांच्याकडे विलास घोगरेसारखा राजकीय जाण असणारा शाहीर कलावंत होता. त्यामुळे ‘आव्हान’कडे अनेक नवे कलावंत, कार्यकर्ते आकर्षित झाले. शाहीर संभाजी भगतसारखा कलावंतही नंतर ‘आव्हान’मधून घडला. 1980 च्या दरम्यान ‘जागर’मधून बाहेर पडलेल्यांनी ‘सर्वहारा सांस्कृतिक मंच’ नावाचा सडक नाटकाचा ग्रुप स्थापन करून मुंबईच्या कामगार विभागात अनेक सडक नाटके केली. थोडक्यात, मुंबईत वरील तीन सडक नाटकांचे ग्रुप सक्रिय होते.
हाच तो कालखंड होता म्हणजे 1978 साली कॉ. सफदर हाश्मीच्या पुढाकाराने दिल्लीत जननाट्य मंचने (ज.न.म.) कामगारांच्या प्रश्नावर ‘मशीन’ नावाचे पहिले सडकनाट्य केले. ज्या नाटकाचे सादरीकरण ‘जनम’च्या कलाकारांनी अनोख्या पद्धतीने केल्याने ते सडक नाटक खूपच गाजले. या नाटकाचा भारतातील अनेक भाषांत अनुवाद झाला व भारताबाहेरील अनेक संस्थांनी त्याचे विविध प्रयोगही केले. त्यानंतर ‘जनम’ने ‘औरत’ हे स्त्रियांच्या प्रश्नांवरील सडक नाटक केले. ग्रामीण कष्टकर्यांवरील ‘गावसे शहर तक’, शैक्षणिक-बेरोजगारीवरील ‘राजा का बजा बाजा’, जातीय दंग्यांवरील ‘हत्यारे’, पंजाब-खलिस्तान समस्येवरील ‘अपहरण भाईचारेका’ कामगारांच्या हक्कांवर गदा आणणार्या कायद्याविरोधातील ‘काला कानून’ अशी सडकनाटके ‘जनम’ने देशभर जम्मू-काश्मीर ते केरळ अशा विविध राज्यांतून दौरे काढत सादर केली. हिंदी भाषिक राज्यात सडक नाटक चळवळ रुजविण्यात ‘जनम’ आणि सफदर हाश्मी मंचाचा सिंहाचा वाटा राहिला. अनेक संस्थांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत सडक नाटक ग्रुप स्थापन केले. दिल्लीत शमसुल इस्लाम यांच्या ‘निशांत नाट्य मंच’ची स्थापना झाली. कर्नाटकमध्ये सुप्रसिध्द नाटककार प्रसन्ना यांनी ‘समुदाय’ नावाने सडक नाटक चळवळ राज्यभर सुरू केली व मोठा जथ्थाही काढला होता. पंजाबमध्ये गुरुशरणसिंग यांनीही अनेक सडक नाटके केली. साक्षरता अभियान चळवळीने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, विज्ञानप्रसारावर अनेक सडक नाटके भारतभरात केली. साक्षरता अभियानासाठी कॉ. सफदर हाश्मी यांनी लिहिलेले,
पढना लिखना सिखो … ओ मेहनत करनेवालो
पढना लिखना सिखो … ओ भूखसे मरनेवालो
हे गाणे त्याकाळी खूप गाजले होते. त्याचा मराठी अनुवाद डॉ. माया पंडित यांनी केला आहे.
सडक नाटकाचे वैशिष्ट्यं हे आहे की, ते सतत जनचळवळीसोबत जैवसंबंध असलेले प्रस्थापितांविरोधातील राजकीय भूमिका असलेले रोखठोक नाटक राहिले आहे. दिल्लीत लाल झेंड्याखाली कंत्राटी कामगारांच्या चाललेल्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी जन नाट्य मंचने ‘चक्का जाम’ हे सडक नाटक केले होते, ज्या नाटकामुळे हजारो कामगारांना लढ्याची प्रेरणा मिळत होती. नंतर त्याच नाटकात बदल करून कॉ. सफदर हाश्मीने ‘हल्ला बोल’ नावाचे नाटक लिहिले आणि याच नाटकाचा प्रयोग दिल्लीजवळील साहेबाबाद येथील डॉ. आंबेडकर चौकात कामगारांसमोर होत असताना मालकांच्या आणि काँग्रेसच्या गुंडांनी गोळीबार केला, त्यात ‘सिटू’चा कार्यकर्ता कॉ. रामबहादूर हा ठार झाला व कॉ. सफदर हाश्मीला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात 2 जानेवारी 1989 ला त्याचा मृत्यू झाला. आज काही स्वयंसेवी संस्था (एन. जी.ओ.) एड्सपासून पर्यावरणासारख्या कुठल्याही विषयावर सरकारी प्रचारासाठी पैसे घेऊन सडक नाटके करीत असतात. अशा नाटकांचा आणि सडक नाटक चळवळीचा दुरान्वयेही संबंध नाही. कारण त्यांना कोणतीही राजकीय भूमिका नाही. सडक नाटक करणे म्हणजे प्रस्थापितांविरोधात ठाम राजकीय भूमिका घेऊन संघर्ष करणे आणि जशी कॉ. सफदरने आपल्या प्राणांची बाजी लावली, तशी प्रसंगी आपल्या प्राणांची बाजी लावणे आहे. कॉ. सफदरच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या गाण्यात शायर म्हणतो…..
इन्कलाबका जो भी अलख जगायेगा
हर सफदर नुक्कडपे मारा जायेगा
… धनवानोंके अपने–अपने गुंडे है
… सबके हाथमें लोहेवाले डंडे है
अपने हक की जो भी बात उठायेगा
हर सफदर नुक्कडपे मारा जायेगा….
लेखक संपर्क ः 9819996029