शिफू सनकृतीसारखे तथाकथित अध्यात्मवादी; पण प्रत्यक्षात भूलभुलैय्या पंथ जगभर विखुरले आहेत. अशा काही पंथांचा थोडक्यात परिचय.
ओम शिनरिको
जपानमध्ये उगवलेला हा हिंसक पंथ होय. ओम शिनरिको म्हणजे ‘सर्वोच्च सत्य.’ (Supreme Truth) हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मातील विचारांची खिचडी या पंथात आहे. त्याचा प्रमुख शोभो असहारा हा स्वत:ला ख्रिस्ताचा अवतार मानत होता.
या पंथाकडे विद्यापीठातील तरुण आकर्षित केले जात. या पंथाचे दहा हजार अनुयायी जगभर पसरले होते. ते तरुणाईला त्यांच्या पंथाची भुरळ घालत. तिसरे महायुद्ध होईल व त्यात सगळे जग नष्ट होईल; मात्र या पंथाचे लोक वाचतील, अशी घोषणा या पंथाने केली होती. या पंथात हिंसक कृत्ये, पळवून नेणे, हल्ला करणे, ठार मारणे, अशी कृत्ये केली जात. प्रसंगी जैविक आणि रासायनिक मृत्यू साधनांचा वापर केला जाई.
जपानमधील टोकियो रुबवेमध्ये ‘सरीन नर्व्ह’ गॅसचा वापर या पंथाच्या लोकांनी केला. त्यात 13 लोक मृत्युमुखी पडले आणि हजारो लोक जखमी झाले.
अशा हिंसक कृत्याबद्दल या पंथातील प्रमुख शिष्य योशीहारा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
पिपल्स टेंपल कल्ट
जिम्स जोन्स हा ख्रिश्चन धर्मवेडा या पंथाचा संस्थापक. जातवर्चस्वाचा विरोधक म्हणून त्याच्याकडे अनेक आफ्रिकन-अमेरिकन आकर्षित झाले. प्रसारमाध्यमात जोन्सवर, आर्थिक भ्रष्टाचार, आपल्या शिष्यावर शारीरिक जुलूम आणि मुलांच्यावर अन्याय, असे आरोप करण्यात आले. टीकेचा जोर वाढत चालल्याने जोन्सने आपल्या शिष्यांसहीत दक्षिण अमेरिकेतील गियाना येथे पलायन केले. तेथे एका जंगलात जोन्सटाऊन या नावाने त्याचा मठ प्रसिद्धीस आला. त्याने आपल्या पंथाला ‘पिपल्स टेंपल’ असे नाव दिले.
‘जोन्स टाऊन’मधील शिष्यगणावर जुलूम अत्याचार होतात, हे कळाल्यावर अमेरिकन सरकारने आपल्या रायन नामक प्रतिनिधीला तिकडे पाठविले. त्याने केलेल्या चौकशीत धार्मिकतेच्या नावाखाली अन्याय, अत्याचार शिष्यगणांवर होत असल्याचे दिसून आले. जोन्सच्या लक्षात आले की, रायन हा आपल्या विरोधात रिपोर्ट देणार. त्याने त्याच्यावर चाकूहल्ला केला. पण त्या हल्ल्यात रायन निसटला; पण तो व त्याचे साथीदार विमानतळावर पोचताच त्यांच्यावर नियोजनूपर्वक हल्ला करून त्यांना ठार करण्यात आले.
क्रूरतेचा कळस पुढेच आहे. जोन्सने सर्व शिष्यांना सक्तीने विष पाजून ठार मारले. त्यांची संख्या होती 909; त्यात 1/3 मुलं होती.
हेवन्स गेट : सांघिक आत्महत्या
स्वर्गात जाण्याचा मार्ग अवलंबणारा हेवन्स गेट हा विचित्र कल्ट होता. मार्शल अॅपलव्हाइट हा या कल्टचा प्रमुख. हेल-बॉप या धूमकेतुच्या शेपटीत एक उडती तबकडी आहे. या तबकडीद्वारे स्वर्गीय देवदूत हेवन्स हेल कल्टच्या अनुयायांना स्वर्गात घेऊन जाणार अशी या कल्ट प्रमुखाची खात्री होती.
स्वर्गात जाण्याच्या स्वप्नाच्या प्रभावाखाली या कल्टमधील 39 लोकांनी सामुदायिक आत्महत्या केली. त्यात अॅपलव्हाईटही होता.
ऑर्डर ऑफ दि सोलर टेंपल
हा कल्ट जगात राजसत्तेऐवजी धर्मसत्तेचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे स्वप्न बाळगून होता. दुसरा ख्रिस्त जगात येईल जो इस्लाम व ख्रिश्चन धर्माच्या सर्व शाखा यांना एकत्र आणेल, अशी घोषणा या पंथाद्वारे केली होती.
डाय मँब्रो हा या पंथाचा प्रमुख. या पंथाला हिंसा वर्ज्य नव्हती. अनेक हत्या आणि सांघिक हत्या या पंथातील सत्ताधार्यांनी घडवून आणल्या. एका लहान मुलाने ख्रिस्ताचा विरोधक म्हणून जन्म घेतलाय या समजुतीने डाय मँब्रोने त्याला ठार मारले. स्वित्झर्लंडमध्ये या पंथातील पंधरा जणांनी विष पिऊन आत्महत्या केली, तर 30 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. या पंथाच्या 16 लोकांनी फ्रान्सजवळील पर्वतात आत्महत्या केल्या.
अशा प्रकारचे विविध पंथांचे पीक आपल्या देशातही कमी नाही. अध्यात्म किंवा स्पिरिच्युयलिझम या गोंडस नावाखाली यांचे काळे धंदे चालत असतात. इथलं जीवन व्यर्थ आहे. तुम्हाला स्वर्ग व आत्म्याचे परमात्म्याशी मिलन हवे असेल, तर आम्ही सांगतो ते करा. म्हणजे विष प्या, नागडे व्हा, स्वैराचार करा, अध्यात्मावर टीका करणार्यांना गोळ्या घाला, पंथप्रमुख हे देवाचे अवतार आहेत, असा प्रचार करा इत्यादी इत्यादी.
हे पंथ म्हणजे समाजातील विषारी बांडगुळे होत. राजसत्तेने यांची दखल घेऊन त्यांची मुळं खणून काढावीत व धर्म विकृतीला आळा घालावा, अशी अपेक्षा करूया.
– प्रा. प. रा. आर्डे