Categories
उपक्रम व्यसन

भोर येथे ‘चला, व्यसनाला बदनाम करूया’ उपक्रम

जानेवारी - २०१९

अस्सल मद्यपि लोकांपैकी 10 टक्के लोक जीवनात दारूचा पहिला घोट नववर्षानिमित्त मित्रांबरोबर पार्टीत मजा म्हणून घेतात, असे दिसून आले आहे. तसे होऊ नये म्हणून तरुणाईचे समुपदेशन करणारी कृतिशील मोहीम ‘चला, व्यसनाला बदनाम करू या’ ‘द दुधाचा – दारूचा नव्हे.’ 31 डिसेंबर 2018 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भोर शाखेने जिजामाता इंग्लिश मीडिअम ज्युनिअर कॉलेज व अनंतराव थोपटे महाविद्यालय ज्युनिअर कॉलेज व राष्ट्रीय सेवा योजना विभाग येथे राबविली. यामध्ये सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी झालेल्या व्याख्यानात पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे यांनी शासनाला दारूपासून 1992 मध्ये रु.250 कोटी टॅक्स मिळाला होता, तर सन 2012 मध्ये रु. 2000 कोटी सरकारकडे जमा झाले होते. जेव्हा सरकारला 1 रु. टॅक्स मिळतो, तेव्हा मद्यग्राहकाच्या खिशातून 3 रुपये गेलेले असतात. म्हणजेच 20 वर्षांत दारूड्यांकडून 36 पट टॅक्स सरकारला मिळाला. त्याचा अर्थ मद्यपिंच्या संख्येत सतत प्रचंड वाढ होत आहे. एक मद्यपि समाजातील 100 ते 150 लोकांना त्रास देतो, असे दिसून आले आहे. त्यामध्ये दारू पिऊन भांडणे, पत्नीला मारणे, चोर्‍या करणे, गुन्हेगारी-खून करणे, मद्याच्या नशेत गाडी चालवून अपघात करणे, त्यात इतरांना जखमी करणे, अपघातात स्वत: जखमी होणे अथवा मृत्यू येणे यांचा समावेश होतो. यामुळे समाजाचे मोठ्या प्रमाणात मनुष्यतास खर्च होतात व मोजता येणार नाही, इतक्या मोठ्या रकमेची हानी होते. दारूमुळे होणारे दुष्परिणाम यामध्ये मद्यपिचे पोट दुखणे, जलोदर होणे, पाय सुजणे, रक्ताच्या उलट्या होणे, पचनसंस्थेचे कॅन्सरसारखे विकार होणे याचा समावेश आहे. ‘मी काय कधीही दारू सोडू शकतो’ असे मद्यपि म्हणतात, ते चूक आहे. कारण नुसता दारू सोडण्याचा निर्धार पुरेसा नसतो, तर दारू सोडवण्यासाठी तज्ज्ञांकडून समुपदेशन व उपचार, कुटुंबाचे, आजूबाजूच्या लोकांचे सहकार्य आवश्यक असते. दारू पिणे ही नुसती वाईट सवय नसून तो मेंदूच्या पेशीचा रोग आहे. त्यामुळे इतर कोणत्याही रुग्णाप्रमाणे त्याला प्रेमाने व सहानुभूतीने वागवणे गरजेचे आहे.

दारूप्रमाणेच तंबाखूचे व्यसनसुद्धा अत्यंत जीवघेणे ठरू शकते. महाराष्ट्रात 50 टक्के पुरुष व 16 टक्के स्त्रिया तंबाखूचे व्यसन करतात. दरवर्षी 8 लाख लोक तंबाखू सेवनामुळे देशात दगावतात. त्यामुळे दारू व तत्सम पदार्थ आणि तंबाखूजन्य पदार्थ या व्यसनापासून तरुणाईने वेळीच दूर राहावे आणि समृद्ध देशाच्या निर्मितीला आपण भरघोस योगदान द्यावे, असे आवाहन डॉ. आनंदा कंक यांनी केले. कार्यक्रमास जिजामाता इंग्लिश ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. शेख, प्रा. सुजित चव्हाण, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्रा. भोई, प्रा. कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. जेटीथोर; तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भोरचे अध्यक्ष विवेक पोळ, कार्यवाह अमन मुल्ला उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांकडून “मी तंबाखू-दारूचे व्यसन करणार नाही, इतरांना करू देणार नाही. त्याची जाहिरात करणार नाही,” असे प्रतिज्ञापत्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भरून घेण्यात आले व कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व विद्यार्थ्यांनी तशी सामूहिक प्रतिज्ञा केली.

डॉ. अरुण बुरांडे, भोर