Categories
अधिवेशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती राज्य अधिवेशन

सप्टेंबर - २०१५

दि. 8 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून जमलेल्या जवळपास हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाची दिमाखदार सुरवात झाली.

उद्घाटन सत्र :

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संपूर्ण आयुष्य विवेकवाद प्रत्यक्ष जगला! – ज्येष्ठ सिनेअभिनेते तथा प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल.

डॉ. नरेंद दाभोलकर यांनी आपले सबंध आयुष्य, केवळ विवेकवाद सांगितला असे नव्हे तर तो प्रत्यक्षपणे स्वआचरणातही जगला! असे गौरवोद्गार ज्येष्ठ सिनेअभिनेते तथा प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी काढले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने राज्य अधिवेशन उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य अनिरूद्ध जाधव हे होते. तर विचारमंचावर राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. रविंद्र टोणगावकर, महादेवराव भुईभार, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, प्रा. सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या भाषणामध्ये डॉ. जब्बार पटेल पुढे म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत आपण पुष्कळ कमावलं आणि पुष्कळ गमावलंही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची वाटचाल ही अत्यंत मृदु व निखळ होती. त्यांनी कुठल्याही देव वा धर्मासंबंधी घालवण्याची भाषा कधीही केली नाही. डॉक्टरांचे हक्कपूर्ण प्रेमळ आदेश व प्रेरणादायी संवादाच्या अनेक आठवणी आजही, अस्वस्थतेने दाटून येतात. अंनिसने सुधारणांच्या आघाड्यावर, येथील सर्वसामान्य माणूस प्रमुख केंद्रबिंदू ठेवला. स्त्री ही अंधश्रद्धेची पहिली बळी आहे. कारण निसर्गाने तिला बहाल केलेल्या अनेक महत्वपूर्ण आनंददायी बाबीही हिरावून त्या प्रतिबंधीत करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षण व ज्ञानासह त्यांना स्वातंत्र्यापासूनही दूर सारण्यात आले. म्हणून तमाम स्त्री घटकांनी या वा अशा चळवळींच्या आघाड्यावर सर्वात पुढे सक्रीयतेने राहणे गरजेचे आहे. येथे जगण्याचा मूलभूत हक्क देणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहिली. त्यामध्ये अंधश्रद्धाला कोठेही मुळीच वाव नाही. म्हणूनच डॉ. आंबेडकर ते डॉ. दाभोलकर अशी परिवर्तनाची एक अखंड साखळी आपल्या राष्ट्र जीवनास प्राप्त झाली आहे असे सांगून, ती येथे नवनव्या आव्हानांचा सामना करण्याचे बळ आपल्याला देते.

प्रारंभी, शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या थेट प्रसारीत एका प्रसिद्ध अंतिम मुलाखतीमधील, प्रत्यक्ष सचित्र संवाद पडद्यावर दाखवून सामूहिक विनम्र स्मरणाने, या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागील 25 वर्षांच्या वाटचालीचा सचित्र आढावा स्वतंत्र तीन भागांमध्ये, समितीच्या प्रधान सचिवांनी निवेदित केला. प्रास्ताविकपर भाषणामध्ये महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील पुढे म्हणाले की, संघटनेच्यावतीने घेण्यात आलेल्या कालच्या राष्ट्रीय परिषदेत सबंध भारत देशातील विवेकवादी मान्यवरांनी, या समितीने आता राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व करावे! अशा अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांच्या आठवणी अत्यंत तीव्रतेने दाटून येतात. त्यांच्या पश्चात 200 वरून 310 पर्यंत संघटनेच्या शाखांनी आपली वाटचाल पोहचवली आहे. दाभोलकरांना कार्यकर्त्यांतील धडपडींच्या प्रेरणांचे सतत अप्रुप होते. समितीचे काम जगाला दिपविण्यासाठी नव्हे तर, स्वत:ला परिपूर्ण व सक्षम बनविण्यासाठी आहे. आता चमत्काराचा थेट दावा करणारा बाबा-बुवा आज या राज्यात शिल्लक नाही. तसेच समितीच्या अनेक उपक्रमांना समाज व शासन मान्यता प्राप्त झाली. शिवाय संविधान बांधिलकी महोत्सवास सर्वत्र प्रचंड वाढता सहभाग लाभला. इतकेच नव्हे तर म. फुले, रा. शाहू व डॉ. आंबेडकर विचारांची आशिया खंडातील महाराष्ट्र अंनिस ही सर्वात मोठी संघटना-जनचळवळ असल्याचे, अनेक विचारवंतांनी आपल्या संशोधन अभ्यासात नोंदले आहे. हे सर्व संचित आता वृद्धिंगत करून, ते तरूणाकडे हस्तांतरीत करावयाचे आहे. आणि आगामी एका वर्षात डॉ. दाभोलकर यांच्या नावे रूपये 25 लाखाचा एक स्वतंत्र कोष उभा करून, संघटनेचे कार्य अधिक जोमाने व उत्साही करण्यासाठीच तो केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी समितीच्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राने प्रसिद्ध केलेल्या, डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन विशेषांकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन समारंभातील पाहुण्यांचा परिचय व सूत्रसंचालन आरती नाईक यांनी केले. तर राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

धर्मचिकित्सेकडून धर्मनिरपेक्षतेकडे उत्तम कांबळे

महाराष्ट्रभरातून जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांचा मेळा पाहून उत्तम कांबळे सर म्हणाले, दाभोलकरांचा खून करणार्‍यांनी सभागृहात येऊन पहावे म्हणजे नरेंद्र दाभोलकर नावाचा माणूस मारून विचार मारता येत नाहीत तर हजारो नवे दाभोलकर तयार होतात. हे त्यांना पाहायला मिळेल.

मानसिक गुलामगिरीतून चाललेल्या अनेक प्रथा आणि शोषण करणार्‍या अनेक परंपरा हे धर्माचं काम असल्याचा दावा मोठ्या आवाजात केला जात आहे. असं सांगून धर्मचिकित्सा करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं. धर्मचिकित्सा कशी करायची हे सांगताना ते म्हणाले, ‘माणसानेच जन्माला घातलेला धर्म ही त्याची मुलभूत गरज आहे हे समजून घेतलं पाहिजे. तरच योग्य चिकित्सा करता येईल. ’ बाबूराव बागलांची ‘वेदाआधी तू होतास’ ही कविता सांगून आपली चळवळ शेवटी माणसांसाठीच आहे. त्यामुळे धर्माचा विचार करताना आधी माणसाचा विचार केला पाहिजे.

माणसांमुळं सामर्थ्यशाली झालेले धर्म पुढे स्वत: सत्ताधीश होतात आणि शोषण करतात. धर्माने ज्या गोष्टी पेरलेल्या होत्या त्याच्या भोवती दलालांचं जाळं बनलं. धर्माला प्रश्न विचारणं गुन्हा आहे. असं ही व्यवस्था मानू लागली. याला विरोध करण्यासाठी धर्माची चिकित्सा केली पाहिजे.

धर्मचिकित्सा तीन पातळ्यांवरील असते.

1) राष्ट्राच्या पातळीवरील 2) समाजाच्या पातळीवरील 3)व्यक्तीच्या पातळीवरील.

धर्म माणसाचा विकास प्रज्ञा, प्रतिभा रोखून धरतो. माणसाला हे सर्व पाहिजे होतं म्हणूनच धर्मनिरपेक्षतेची गरज निर्माण झाली.

राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेनुसार सरकारने राज्य करताना कोणत्याही धर्माचा, देवाचा आधार घेऊ नये. असं सांगून राष्ट्र धर्मनिरपेक्ष नसेल तर राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही असं ते म्हणाले.

समूहाच्या धर्मनिरपेक्षतेविषयी बोलताना ते म्हणाले, ‘व्यक्तीगत जीवनापलिकडे कोणत्याही कर्मकांडाचा सामूहिक कामात अडथळा होता कामा नये. माणसांमध्ये प्रचंड असुरक्षितता आणि एकाकीपणा वाढत चालल्यामुळे नव्या काळात ज्या गोष्टी गळून पडायला पाहिजे होत्या त्या नव्या रूपामध्ये धर्माला चिकटू लागल्या आहेत.

उद्याच्या माणसाला जगवायचं असेल तर व्यक्ती आणि समूहाने धर्मनिरपेक्षतेचा विचार करावाच लागेल असा आग्रह व्यक्त करून मा. उत्तम कांबळे सरांनी आपले विवेचन संपवले.

या सत्राचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सुनील स्वामी, स्वागत विजय परब यांनी केले.

चळवळीची उपयुक्तता व कालसुसंगता

या विषयाची मांडणी करताना प्रा. सुभाष वारे म्हणाले, महाराष्ट्र अंनिसने 1990 ते 2000 च्या दशकात भांडाफोड केलेले बुवा साधे होते. त्यानंतरच्या काळातील बुवा वेगळ्या प्रकारचे होते. मात्र सध्या केवळ दांभिक धर्मकारण सुरू आहे. सर्वांचा जन्म समान असतो, प्रत्येक घटनेमागे कारण असते. हे गौतम बुद्धांनी प्रथमत: कथन केले आहे. पुढे बुद्धांनी असेही सांगितले की, देव आहे की नाही ते शोधायला मला वेळ नाही. पण त्यावाचून माझे काम थांबत नाही. (याला आपण अज्ञेयवाद म्हणतो) मानवी मनातलं दु:ख दूर करण्याचा प्रयत्न आपण करावा. हे काम असेच पुढे चालू ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. निसर्गातील सत्य काय आणि कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न विज्ञानानं केला. माणसाच्या जीवनाचं प्रयोजन काय? हा प्रश्न विज्ञानाचा नसून त्याचे उत्तर विज्ञानाने देणे अपेक्षित नाही. नवीन बाबा-बुवा-माताजी यांचे सरंजामशाही वातावरण सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येत नाही असे नाही. मात्र माणसं कर्मकांडांच्या आहारी गेलेली असतात. भीती आणि अगतिकता त्यांच्यात असते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी दुटप्पी वागू नये. मात्र एकविचार एकनिष्ठतेने जपत 25 वर्षेकाम केलं. त्यामुळे इतर चळवळींना उभारी आणि प्रेरणा मिळाली. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र अंनिसला सलाम केला

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांची दशकपूर्तीच्या भाषणातील आठवण सांगताना साधनाचे कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ म्हणाले की, त्यावेळी डॉक्टर म्हणाले होते की, ‘महाराष्ट्र अंनिसचा द्विदशकपूर्तीचा कार्यक्रम घेण्याची वेळ येऊ नये. ’ मात्र तसं झालं नाही. कारण डॉक्टर असेही म्हणायचे की, हा आपला दशकांचा नव्हे तर शतकांचा लढा आहे. अंनिसची चतु:सूत्री आहे. येथे सर्वांना ज्ञात आहे. त्यातील पहिली तीन सूत्रे बहुतांशी साधली गेली मात्र चौथा भाग जो विवेकाने परिवर्तनवाद्यांशी सांगड घालण्याचा होता तो अजून मोठ्या प्रमाणात साधता आला नाही.

चळवळ नेहमी कालसुसंगत राहिली. मात्र तरीही पुढील रणनीती आखावी लागेल. त्यासाठी ऊर्जा केंद्र संशोधने, संकलन व विश्लेषण वर्गीकरण आवश्यक ठरणार आहे. त्यासाठी साधनांची निवड, साहित्यही उपलब्ध करावे लागेल. सर्वांना सोबत घेऊन पुढे जावे लागेल असेही विनोद शिरसाठ यांनी सांगितले.

कुमार मंडपे म्हणाले की, हल्ली कार्यकर्तेवाचन करीत नाहीत. कार्यकर्तेतयार होत नाहीत. त्यासाठी वैचारिक असं वेगळं वाचन करावं. मागील दोन वर्षांत कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. ताणतणाव होताच. पुढेही राहणार आहे. मात्र त्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे मंडपे सरांनी सांगितले. एका तासाला 15 लोक महाराष्ट्रात आत्महत्या करतात. महाराष्ट्रातील विभागवार टक्केवारीही सरांनी नमूद केली. त्यांना मानसिक आधार देण्याचं काम महाराष्ट्र अंनिसने केल्याचे मंडपे सरांनी नमूद केले. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पांतर्गत शिक्षकांची प्रशिक्षणे नव्या जोमाने सुरू करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपले काम मानसिक बदलाचे असल्याने तो बदल लगेच लक्षात येत नाही. मात्र कार्यकर्त्यांनी लगेच विचलित न होता काम करीत राहावे असे मंडपे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यसरचिटणीस प्रशांत पोतदार, स्वागत प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे तर आभार प्रदर्शन सुरेखा भापकर ह्या कार्यकर्त्यांनी केले.

तरूणाईच्या हाती विवेकाची ज्योत

“अज्ञान, दारिद्र्य यामुळे आपल्या आजूबाजूला अनेक तर्‍हेच्या समस्या आहेत. म्हणून समाजात सर्वांगीण सुधारणा कशा होतील, हे आपल्याला पाहायला हवे. सुधारणांबरोबरच समाजात प्रगल्भताही वाढायला हवी. समाज ज्ञानाधिष्ठित झाला तर योग्य काय, अयोग्य काय, हे प्रत्येकाला कळू शकेल. ” असे मत ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी येथे व्यक्त केले.

प्रा. विलास वाघ म्हणाले, “आपले विचार टिकून राहावेत म्हणून माणसे संपवली जातात. अशाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम थांबणार नाही. ते अधिक जोमाने चालू राहील. असा विश्वास वाटतो. ”

गजानन खातू म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत अधिकाधिक आणि सर्व स्तरांतील स्त्रियांना सहभागी करून घ्यायला हवे. त्यांना कळेल अशा भाषेतून मार्गदर्शन करायला हवे. आपले ‘करिअर’ सांभाळून नवी पिढीही या चळवळीत येऊ पाहत आहे. त्यांनाही योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे.

अभिवादन फेरी :-

दि. 9 ऑगस्ट 2015 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर अभिवादन फेरीची सुरवात सभागृहापासून सकाळी 6 वाजता झाली. या फेरीच्या अग्रमागी गाडीवर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा फोटो असलेला फलक लावला होता. तसेच शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची प्रतिमा अग्रभागी होती. फेरीचे नेतृत्व राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील व सर्व राज्य कार्यकारिणीचे सदस्य यांनी केले.

सभागृहापासून फेरी गुलटेकडी रोड मागे, लक्ष्मीनारायण, मित्रमंडळ चौक, सारसबाग मार्गे, टिळक रोड, सदाशिव पेठ, एच. एस. पी. हाय, बळवंत चौक मार्गे, शनिवार पेठेतून, शेवटी ओंकारेश्वर पूल येथे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्तेजमले. यावेळी मार्गावरून जाताना घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘अमर रहे अमर रहे डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’, ‘फुले शाहू आंबेडकर-आम्ही सारे दाभोलकर’, ‘पोलिसांनी प्लँचेट केले होे-महाराष्ट्राची लाज गेली हो’ इ. घोषणा देण्यात आल्या.

ओंकारेश्वर पुलावर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांपुढे बोलताना मा. अविनाश पाटील म्हणाले – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करण्यासाठी व प्रेरणा घेऊन जाण्यासाठी कार्यकर्तेआले आहेत, तसेच शासन अजूनही डॉ. दाभोलकर व कॉ. पानसरे यांचे हल्लेखोर पकडू न शकल्याबद्दल निषेध व्यक्त केला. यावेळी शाहीर शिंदे यांनी अभिवादन गीत सादर केले, तर इस्लामपूरच्या कलाकारांनी ‘आम्ही प्रकाशबीजे’ हे गीत सादर केले. या फेरीचे संयोजन पुणे शाखा, पिंपरी चिंचवड शाखेने चोख केले.

सकाळच्या परिसंवादावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी भेट दिली. त्यांचेबरोबर त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर होत्या. त्यांचे स्वागत मा. अविनाश पाटील यांनी केले. यावेळी बोलताना डॉ. नारळीकर म्हणाले- समाज वैज्ञानिक कारणांकडे लक्ष देत नाही. अंधश्रद्धा या माणसाच्या अंगावरील कोट आहे, माणसाने तो स्वेच्छेने फेकून दिला पाहिजे. यासाठी त्यांनी उदाहरणही दिले.

हसणारे झाड :- मंगलोर येथील एक नारळाच्या झाडातून लहान मुलाचा हसण्याचा आवाज यायचा. मांत्रिक येऊन शांती करून गेला तरीही झाडातून येणारा आवाज काही बंद झाला नाही. लोक घाबरले. काही दिवसांनंतर नारळ काढणारा, एक नेहमीचा माणूस त्यांचेकडे आला. तो त्याचा मोबाईल कोठे विसरला म्हणून शोधत होता. झाडावर चढल्यानंतर त्या झाडावर त्याचा मोबाईल सापडला, त्या दिवसानंतर मात्र हसण्याचा आवाज कायमचा बंद झाला.

डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे हल्लेखोरांना कधी पकडणार?’ असे पत्र मा. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पाठविले. काही वेळ परिसंवाद ऐकून नारळीकर सर निघाले. अंनिसच्या कार्यकर्त्यांना त्यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली.

महाराष्ट्र अंनिसचे भविष्यवेध लक्ष :

या परिसंवादामध्ये विनायक सावळे, कृष्णा चांदगुडे, डॉ. हमीद दाभोलकर, कुणाल शिरसाठे यांनीभाग घेतला. या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रदीप पाटकर होते. प्रत्येक वक्त्यास वेगवेगळा विषय होता. परिसंवादाचे प्रास्ताविक व ओळख कृष्णात कोरे यांनी केले.

बुवाबाजीचे बदलते आयाम’ या विषयावर बोलताना विनायक सावळे म्हणाले, बुवाबाजी करण्याची पद्धत बदलली, नवीन बदलामुळे जाहीरपणे चमत्कार करणारे बुवा कमी झाले, बुवाबाबांनी आपल्या पद्धती बदलल्या कारण संघटनेचा दबाव व व्यवसायातील शहाणपण, आज अध्यात्म, फसवे विज्ञान, चमत्कार याद्वारे लोकांची फसवणूक सुरू आहे. यावेळी त्यांनी राधे मॉ, आसारामबापू यांची उदाहरणे दिली. तसेच मिड ब्रेन अ‍ॅक्टीव्हिटी प्रस्थ वाढल्याचे सांगितले. या फसव्या विज्ञानाचा वापर करून श्रीमंत, उच्चशिक्षितांची फसवणूक करणारे वाढत आहेत. विज्ञानाचा सर्वात जास्त वापर बुवा, बाबाच करतात, त्यांच्याकडे अद्ययावत प्रचार यंत्रणा आहे. परिणामी अंनिस कामाची गरज वाढते आहे.

जात निर्मूलनसाठी जात पंचायतीला मूठमाती’ या विषयावर बोलताना कृष्णा चांदगुडे म्हणाले, अंनिस व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या उपक्रमामुळे 6 जात पंचायती बरखास्त झाल्या. जात पंचायतीचे भयंकारी स्वरूप त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. जात पंचायतीचे कायदे, विधी अमानुष आहेत. महाराष्ट्र अंनिस पंचावर केसेस दाखल करीत नाही. शासनास महाराष्ट्र अंनिस जात पंचायती मनमानीवर कायदा व्हावा यासाठी डॉफ्ट दिला आहे. जातीचे अग्रदल जात पंचायती आहेत, जात पंचायती बंद करून ही समांतर न्यायव्यवस्था संपवली पाहिजे, व आपली स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे हे सांगितले पाहिजे.

मानसिक आरोग्य व फसवे विज्ञान’ या विषयावर बोलताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, अंनिसचे ‘मानसमित्र’ काम मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात महत्वाचे आहे. भानामतीच्या कित्येक केसेस अंनिसने या द्वारे सोडवल्या. अनेक दर्गे येथील मनोरूग्णाची सोडवणूक अंनिसने केल्याचा उल्लेख त्यांनी केला. डॉ. दाभोलकर यांना गोळी मारली याचा मोठा आघात म्हणजेच हिंसेचा आघात कित्येक लोकांवर झाला. तरीही अंनिस कुटुंबाने एकमेकांसोबत आधार दिला. व्यक्तींबरोबर कुटुंब विवेकी व्हायला हवं असे प्रतिपादन त्यांनी केले.

भारतीय संविधान व नागरिकत्व’ या विषयावर कुणाल शिरसाठे म्हणाले, नागरिकांना अधिकार दिलेले आहेत तसेच मर्यादा दिल्या आहेत, स्वातंत्र्य म्हणजे इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणे नाही, कर्तव्याचा विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संविधान म्हणजे लोकशाही कुटुंबातही रूजली पाहिजे. भारतीय संविधानाचे सांस्कृतिकीकरण करणे आवश्यक आहे, त्यासाठी नाटक, सप्ताह, गाणी या माध्यमातून संविधान सर्वसामान्यात रूजविणे आवश्यक आहे.

अध्यक्षीय समारोपात बोलताना डॉ. प्रदीप पाटकर म्हणाले – राजकीय पातळीवर स्वप्नभंग झाला आहे. चळवळीचे काम कुशलतेने, चिकाटीने केले पाहिजे. धैर्य कोणत्या वेळी, कोणत्या काळी दाखवावे याचे भान ठेवा. गाफीलपणे फिरू नका, समाजात सुरक्षितपणे फिरा. आताची भांडवलशाही संघटीत झाली आहे. माणसे विवेकी झालेली त्यांना चालणार नाही, याचा जबरदस्त फटका आपण घेतला आहे. चळवळीने दूरदर्शनपेक्षा वृत्तपत्रे, व्याख्याने याद्वारेच आपले विचार प्रभावीपणे पोहचवावेत. ‘मानसमित्र’ ही संकल्पना मनात रूजवूया.

बाबा हालकुडे(लातूर) यांनी आभार मानले.

रात्री इस्लामपूर शाखेने हिंदीमधून रिंगणनाटय सादर केले. त्यानंतर चळवळींच्या गाण्याचा आस्वाद सर्वांनी घेतला.

भारतीय विवेकवादीचे व्यापकत्व :

या सत्राचे वक्ते मा. दत्ता देसाई यांनी आपल्या मांडणीमध्ये भारतातच नव्हे तर जगभरामध्ये सुसंवादाने आणि देवाणघेवाणीतून विवेकवाद व्यापक झाल्याची भूमिका मांडली. ‘प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन बाजू अकारण आपल्यामध्ये एक अदृश्य पण मजबूत भिंत उभी करतात. त्यामुळे संवाद थांबतो. यामुळे अनावश्यक संघर्ष निर्माण होतो. ही भिंत दूर केली पाहिजे. त्याऐवजी सुसंवाद वाढवला पाहिजे. ’

‘विज्ञानाचा अविष्कार झाला. त्याचा वापर अविभाज्य झाला. परंतु विज्ञानाबद्दल एक चुकीचा समज निर्माण करण्यात आला. विज्ञान भावना आहे, विवेकहीन आहे, अशी मांडणी करण्यात आली. विज्ञानापासून मूल्ये वेगळी काढण्यात आली. मात्र विज्ञान हे या सर्वांपासून वेगळे नाही. कारण विज्ञान समजून घेतले तर वैज्ञानिक दृष्टिकोन येतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनापासूनच माणूस विवेकी बनतो.

विवेक ही कोणती तयार गोष्ट नाही तर ती सतत घडत जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे माणूस विवेकी घडवण्यासाठी संवादाची आवश्यकता आहे. चार्वाक, बुद्धापासून संतांनी, म. फुले, गांधी आणि आंबेडकरांनी विवेकाचा विचार तथाकथीत अविवेकी माणसाशी संवादाद्वारेच मांडला आहे. स्वत:ला सनातन धार्मिक सांगणारे सर्वच कट्टर धार्मिक नाहीत. त्यातील अनेक लोक आपल्या इतर व्यवहारात विवेकाचा वापर करत असतात. तो विवेक त्यांच्या सर्व व्यवहारात आणण्याचे त्यांना आवाहन केले पाहिजे. माणसाच्या स्वप्नांना विवेकाचा आधार दिला तर नवा भारत घडेल.

यावेळी डॉ. . . साळुंखे म्हणाले की, निसर्गाने मानवास दिलेला मेंदू हा एक अत्यंत अमूल्य ठेवा आहे. आपण त्यामध्ये काय ठेवावे आणि त्याचा कसा वापर करावा अथवा करू द्यावा? हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. विवेकवाद म्हणजे समविभागी। सम्यकरितीने विचार करणारा, संतुलितरितीने समाजात सर्वत्र वाटप करणारा किंवा सम्यक वाटणीने असंतुलन टाळणारा असा याचा अर्थ आहे. चार्वाक तत्वज्ञानात हा शब्द पुढे बराच ठळकपणे मांडला गेला. ते म्हणत की, बौद्धिक स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष आहे. मृत्यूनंतरच्या काल्पनिक सुखाकडे धावण्यापेक्षा ते निकोप व आनंदाने जगण्यासाठी, माणसाने संपत्ती मिळवावी असा वास्तववाद मांडला. चाकोरीबद्ध कर्मकांडी मोक्ष त्यांनी नाकारला आहे. म. बुद्ध यांनी सत्य जाणून कसे घ्यावे व सत्य व्यवहार कसा करावा? या दोन उदाहरणांनी विवेकाचा अर्थ स्पष्ट केला आहे. आणि ते स्पष्ट करताना त्यांनी प्रश्नकर्त्यांचे स्वागत केले असे त्यांनी सांगून, महाराष्ट्र अंनिसचा हा प्रवास जपणे व वाढविणे गरजेचे आहे असेही सांगितले.

डॉ. शैलाताई दाभोलकर म्हणाल्या की, आपण विवेकी या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीचा आधार देतोय. हा विवेकवादी कारवा वाढतच जाणार आहे, याचा मला विश्वास आहे. कारण गेली तीन दिवस अगदी खच्चून भरलेल्या या सभागृहातील, सर्व कार्यकर्ते ही मला अगदी माझीच मुलं वाटतात. कार्यकर्त्यांनी जमेल तेवढा वेळ काढून, निवडक व कसदार असे वाचन करावे, असे आवर्जून त्यांनी सांगितले.

रौप्यवर्षपूर्ती राज्य अधिवेशनाचा समारोप

या समारोप सत्राचे अध्यक्ष मा. अविनाश पाटील, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस हे होते. मा. विद्याताई बाळ(संपादक मिळून सार्‍याजणी) तसेच कॉम्रेड भालचंद्र कांगो(राज्य सरचिटणीस भाकप) प्रमुख वक्ते होते.

समारोप सत्राची सुरवात इस्लामपूर शाखेच्या कार्यकर्त्यांनी वामन दादा कर्डक यांच्या क्रांतीकारी गीताने केली. (या चमुने संपूर्ण कार्यक्रमात संगीत वाद्य व गीताच्या माध्यमातून सतत चैतन्य ठेवण्याचे महत्वपूर्ण काम केले. ) यानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ग्रंथरचना, संविधान प्रास्ताविका व स्मृती चिन्ह भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरवातीस राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी दोन दिवसीय अधिवेशनाचा धावता आढावा घेतला. तसेच महाराष्ट्र अंनिसची 25 वर्षे हा लेखाजोखाही मांडला. सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी कॉम्रेड भालचंद्र कांगो यांचा सविस्तर परिचय करून दिला. आपल्या 20 मिनिटांच्या समारोपीय भाषणात कॉम्रेड कांगो यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करीत प्रतिगाम्यावर चौफेर हल्ले चढविले. तसेच संघटनेला मार्गदर्शन ही केले. ते म्हणाले की, संघटनेमागे कोण आहे तितकेच पुढे कोण आहे हे ही महत्वाचे हे सांगतानाच पुढे असणार्‍यांना गोळ्या खाव्या लागतात व संघर्षांची किंमत चुकवावी लागते हे सांगून डॉ. दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. भिऊ नकोस पाठीशी आहे. किंवा तुम आगे बढो असं चालणार नाही आपण सतत चळवळीच्या सोबत असलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. व्यापक परिवर्तनासंबंधी भूमिका मांडताना ते म्हणाले की, मूल्य व्यवस्थापन परिवर्तनासाठी राजकारण करावेच लागेल. राजकीय भूमिका घेतल्याशिवाय व्यापक परिवर्तनाचा प्रयत्न असफल होईल राजकारणापासून दूर न जाता, राजकारणाकडे विवेकी पद्धतीने पहावे लागेल. स्त्रिया, पाणी, पर्यावरण, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या प्रश्नांकडे सुट्या पद्धतीने न पाहता याचा एकत्रितपणे मेळ घालून अभ्यास करावा लागेल कुठलेही प्रश्न सुटे-सुटे सोडविता येणार नाहीत. या सर्व बाबींना व्यापक राजकारणाचा परिवर्तनाचा भाग बनवावा लागेल. देशात सध्या इतिहासाचे विकृतीकरण सुरू आहे. असुरक्षिततेतून हिंसा वाढते. जगाच्या इतिहासात विवेकवादी स्वातंत्र्याला नेहमीच मोठी किंमत मोजावी लागली आहे. हे नवं सरकार संथ गतीने ‘भारतीय संविधान’ बदलवण्याचा डाव रचत आहे. याकरिता अनेक संस्था ताब्यात घेऊन त्यावर पदाधिकारी म्हणून आपल्याच विचार धारेचे लोक नियुक्त करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. राज्य व्यवस्थेला वैज्ञानिक दृष्टिकोन पोहचविण्याचा हक्क दिला आहे. परंतु घडते मात्र उलटेच आहे.

महाराष्ट्र अंनिसला या बदलत्या पर्यावरणाचा विचार करावा लागेल. उत्तर सापडल्याशिवाय कृती करता येणार नाही. एकत्रितपणे-संघटीतपणे कसं लढायचे हे मी अंनिस चळवळीकडून शिकतोय म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या कार्यक्रमाचे मी कधीही निमंत्रण चुकवत नाही. असा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, अंनिसने संपूर्ण समाजाच्या बदलत्या व्यवहाराचे भान ठेवून आपल्या चळवळीचा व्यवहार करावा, धर्मांध शक्तीचा डाव उघडा पाडूनच कॉम्रेड पानसरे, डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी सापडतील असा आशावाद समारोपात शेवटी व्यक्त केला.

डॉ. शैलाताई दाभोलकर यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, मुलांच्या पालकत्वासोबतच मी सामाजिक पालकत्वही स्वीकारले आहे. कार्यकर्त्यांना कृतीला विवेकाची जोड दिली पाहिजे असे मत व्यक्त केले.

मा. विद्याताई बाळ यांनी सामाजिक चळवळीमध्ये विचार प्रवणतेबरोबरच सृजनशीलता व कलात्मकता असली पाहिजे. महाराष्ट्र अंनिसमध्ये ती आहे. महाराष्ट्र अंनिसने विवेकवाद पुढच्या पिढीपर्यंत पोहचवावा. जगामध्ये सर्वाधिक व्यस्त व्यक्तिलाच कामाकरीता वेळ मिळतो. चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यस्त राहून वाचन, मनन, चिंतन करावे. असे मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र अंनिसच्या कल्पक मंच व्यवस्थेचे कौतुक करीत मंचावर चित्र प्रतिमामध्ये महिला सुधारक व संतांचा समावेश नसल्याबद्दलची खंतही व्यक्त केली.

मा. अविनाश पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात इतर समविचारी संघटना आपल्या संघटनेकडून खूप अपेक्षा बाळगून आहेत हे अधोरेखित केले. शिस्तबद्ध आखीव रेखीव संयोजन, सुंदर सदिच्छा संदेश पुस्तकांची 6 लाखांवर विक्री, तसेच मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून कार्यकर्तेआल्याबद्दल अभिनंदन केले. ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र अंनिसचे काम समाज जीवनाच्या केंद्रस्थानी आले आहे. सामुहिक नेतृत्वाने पुढील लढाई ठामपणे निश्चयाने लढू असा निर्धार त्यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केला.

यावेळी लातूर भोजन व्यवस्थेचे प्रमुख व कामगार तसेच पुणे शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्तेयांचा सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी मांडले. शेवटी “हम होंगे कामयाब” या गीताने कॉम्रेड गोविंद पानसरे सभागृह दुमदुमुन गेले आणि विवेकाचा विचार निर्धाराने पुढे नेण्याचा संकल्प घेऊन कार्यकर्ते, अंनिस कुटुंबीय सभागृहातून बाहेर पडले.

(या अधिवेशनाचे रिपोर्टींग प्रा. किरण सगर, रामकुमार रायवाडीकर, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, सुनिल स्वामी, . रा. आर्डे, राहुल थोरात, टी. आर. गोराणे व फारुख गवंडी यांनी केले आहे. )

क्षणचित्रे

  • परिषदेस प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. 70 पोलीस तीन दिवस होते.
  • पुणे जिल्हयातील कार्यकर्त्यांनी परिषदेचे संयोजन नेटके केले होते.
  • विजय नांगरे इस्लामपूर यांनी सापडलेले 40 हजार रूपये प्रामाणिकपणे संयोजकांना परत दिले.
  • 3 दिवसांच्या या परिषदेमध्ये 6 लाखाची पुस्तक विक्री झाली.