28 जून 2013 : नाशिक येथे जातपंचायतीच्या दबावापोटी आंतरजातीय विवाह केलेल्या प्रमिला कुंभारकरचा जीव तिच्या बापाने घेतला.
30 जून 2013: सामाजिक संघटनांचा नाशिक येथे भव्य निषेध मोर्चा.
2 जुलै 2013 : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा ‘जातिअंतासाठी हवा वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा लेख दै.‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध.
3 जुलै 2013 : लेख वाचून भटक्या जोशी समाजाच्या बहिष्कृत अण्णा हिंगमिरे यांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव.
4 जुलै 2013 : अण्णा हिंगमिरे यांची पोलिसांत तक्रार दाखल
6 जुलै 2013 : जातपंचायतीच्या मनमानीविरोधात नाशिकमध्ये महाराष्ट्र अंनिसचा मोर्चा.
7 जुलै 2013 : बहिष्कृत व्यक्तींनी महाराष्ट्र अंनिसकडे संपर्क करण्याचे आवाहन दै. ‘सकाळ’चे समूह संपादक उत्तम कांबळे यांनी केले. आवाहनाला प्रचंड प्रतिसाद. राज्यभरातून पीडितांचा टाहो. बहुतांश जातीत जातपंचायतीचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट.
9 जुलै 2013 : डॉ. नरेंद्र दाभोलकर व राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची ’जातपंचायत मूठमाती अभियान’ चालवण्याची घोषणा.
10 जुलै 2013 : पुणे काँग्रेसचे पदाधिकारी व श्रीगौड ब्राह्मण समाजाचे काका धर्मावत यांची तक्रार महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने दाखल. राज्यात आश्चर्य व्यक्त.
11 जुलै 2013 : मुंबई उच्च न्यायालयाने जातपंचायतीमुळे राज्यघटनेसमोर आव्हान असल्याचे म्हटले.
2 ऑगस्ट 2013 : जातपंचायती या घटनाबाह्य, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले.
8 ऑगस्ट 2013 : नाशिक येथे पहिल्या जातपंचायत मूठमाती परिषद मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या उपस्थितीत राज्यभरातून आलेल्या पीडितांनी मांडले दाहक अनुभव.
15 ऑगस्ट 2013 : दुसरी जातपंचायत मूठमाती परिषद लातूर येथे. उत्तम कांबळे, बाळकृष्ण रेणके, ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांच्या उपस्थितीत बहिष्कृतांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद.
20 ऑगस्ट 2013 : डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा निर्घृण खून.
28 ऑगस्ट 2013 : सातारा येथील निर्धार परिषदेचे जातपंचायत मूठमाती अभियान जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प.
8 सप्टेंबर 2013: तिसरी नियोजित जातपंचायत मूठमाती परिषद जळगाव येथे. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्यासह अॅड. असीम सरोदे, अॅड. पल्लवी रेणके यांचे बहिष्कृत कुटुंबियांना मार्गदर्शन.
02 ऑक्टोबर 2013 : जोगेश्वरी येथील वैदू जातपंचायती कडून पत्रकार विलास बढे यांना मारहाण.
17 सप्टेंबर 2013 : मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश – जातपंचायतीविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करा व चार आठवड्यात कारवाईबाबत निर्णय घ्यावा.
30 सप्टेंबर 2013 : राज्य शासनाच्या गृह विभागाकडून एक परिपत्रक जारी. भारतीय दंड विधान संहितेच्या विशिष्ट कलमांचा आधार घेऊन तक्रार दाखल करून घेण्याचे पोलिसांना आदेश.
30 डिसेंबर 2013 : माळेगाव (जि. नांदेड) येथील यात्रेत अनेक जातपंचायतीकडून अनिष्ट प्रथांना मूठमाती देण्याचा निर्णय.
27 मार्च 2014 : भटक्यांची पंढरी असलेल्या मढी (जि. अहमदनगर) येथील यात्रेत महाराष्ट्र अंनिसचे प्रबोधन.
28 एप्रिल 2014: जोगेश्वरी येथील वैदू जातपंचायत बरखास्त करून सामाजिक सुधारणा मंडळात रूपांतर. महिलांना निम्मे प्रतिनिधित्व…महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने झाले परिवर्तन.
28 जुलै 2014 : महाराष्ट्र अंनिस व तरुणांच्या मदतीने अहमदनगर येथील पद्मशाली जातपंचायत बरखास्त.
2 सप्टेंबर 2014: महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने चंद्रपूर येथील आदिवासी गौंड जातपंचायत बरखास्त.
25 डिसेंबर 2014 : महाराष्ट्र अंनिस व मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने सांगली येथील कोल्हाटी डोंबारी जातपंचायत बरखास्त.
3 फेब्रुवारी 2015 : सामाजिक बहिष्कार टाकणार्यांंना त्वरित अटक करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश.
8 फेब्रुवारी 2015 : महाड येथे चौथी जातपंचायत मूठमाती परिषद. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेसमवेत झालेल्या परिषदेत गावकीने वाळीत टाकलेल्या ऐंशी कुटुंबियांना मिळाली लढण्याची हिंमत.
12 फेब्रुवारी 2015 : जातपंचायतविरोधी कायदा तीन महिन्यांत करण्यार असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.
16 फेब्रुवारी 2015 : राज्यातील सर्वोच्च वैदू जातपंचायत बरखास्त… महाराष्ट्र अंनिस व प्रसारमाध्यमांच्या प्रयत्नांना आले यश…महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणांच्या इतिहासात महत्त्वाचे पाऊल
20 मार्च 2015 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून ‘जातपंचायत कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम 2015’ सरकारकडे सादर.
7 नोव्हेंबर 2015 : अहमदनगर येथील स्मशानजोगी जातपंचायत महाराष्ट्र्र अंनिसच्या प्रयत्नाने बरखास्त.
18 नोव्हेंबर 2015 : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम -2015’ हा अधिनियम आपल्या संकेतस्थळावर जारी केला.
2 डिसेंबर 2015 : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या सूचना व हरकती गृह विभागाकडे नोंदवल्या.
14 डिसेंबर 2015 : नागपूर येथे महाराष्ट्र अंनिसकडून जातपंचायतविरोधी कायदा संकल्प परिषदेचे आयोजन. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे बहिष्कृत व्यक्ती व महाराष्ट्र अंनिसची निदर्शने.
15 डिसेंबर 2015 : महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व शिष्टमंडळाची मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याशी कायद्यासंदर्भात चर्चा.
18 जानेवारी 2016 : उंब्रज (जि. सातारा) येथील गोपाळ समाजाची जातपंचायत महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नाने बरखास्त.
25 जानेवारी 2016 : मराठवाड्यातील गोंधळी जातपंचायत बरखास्त.
28 जानेवारी 2016 : सामाजिक न्याय विभागाच्या बार्टी या संस्थेसोबत महाराष्ट्र अंनिसचे कायद्यासाठी कार्यशाळेचे आयोजन. गृह विभागाचा मसुदा व अंनिसचा मसुदा यांचा संयुक्त मसुदा ‘महाराष्ट्र जातपंचायत कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम-2015’ बनवला
10 फेब्रुवारी 2016 : ‘महाराष्ट्र जातपंचायत कार्यवाही प्रतिबंधक अधिनियम-2015’ हा संयुक्त मसुदा गृह विभागाकडे सादर.
01 मार्च 2016 : कायद्याचा मसुदा अधिवेशनात मांडण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी
05 मार्च 2016 : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या सोबत महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची कायदा होणेबाबत चर्चा.
7 मार्च 2016 : विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर व शिवसेनेच्या प्रतोद नीलम गोर्हे यांच्याशी
अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व पदाधिकार्यांशी चर्चा.
11 मार्च 2016 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे यांची चर्चा.
12 मार्च 2016 : विविध कॅबिनेट मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, विरोधी पक्षनेते, सर्व राजकीय पक्षांचे गटनेते यांची भेट.
17 मार्च 2016 : विधानसभेत भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याकडून तारांकित प्रश्न उपस्थित. चालू अधिवेशनात कायद्याचा मसुदा संमत करण्याचे गृह राज्य मंत्री राम शिंदे यांची सभागृहाला माहिती.
19 मार्च 2016 : राज्याची भटके जोशी जातपंचायत बरखास्त. महाराष्ट्र अंनिसचे आणखी एक यश.
20 मार्च 2016 : पुणे येथे जातपंचायतविरोधी कायदा मागणीसाठी पाचवी परिषद. डॉ. बाबा आढाव, कॉ. मुक्ता मनोहर आदींसह समविचारी संघटना प्रमुख व पीडित कुटुंबाची उपस्थिती.
22 मार्च 2016 : विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्यांची भेट घेऊन कायद्याच्या उपयुक्ततेेबद्दल चर्चा.
28 मार्च 2016 : इस्लामपूर (जि. सांगली) येथे महिलेला अमानुष मारहाण करण्यास सांगणारी गोपाळ जातपंचायत बरखास्त.
28 मार्च 2016 : विधान परिषदेत शिवसेना आमदार नीलम गोर्हे यांनी जातपंचायतविरोधी कायद्यासाठी चर्चा घडवून आणली.
30 मार्च 2016 : विधानसभा व विधान परिषदेच्या विविध सदस्यांशी चर्चा.
6 एप्रिल 2016 : मुख्यमंत्री व विविध कॅबिनेट मंत्र्यांची चर्चा. महाराष्ट्र अंनिस सोबत बैठक आयोजित करण्याची मुख्यमंत्र्यांची सचिवांना सूचना.
11 एप्रिल 2016 : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विधानभवनात बैठक. मा. सभापती (विधान परिषद) रामराजे निंबाळकर, ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री एकनाथ खडसे, गृह राज्यमंत्री राम शिंदे, शिवसेनेच्या प्रतोद डॉ. नीलम गोर्हे, प्रधान सचिव रजनीश सेठ, उपसचिव आ. बा. पाटील आणि महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व कृष्णा चांदगुडे आदींची उपस्थित. महाराष्ट्र अंनिसच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून सुधारित मसुदा विधानसभेत दुसर्या दिवशी मांडण्याची तयारी.
13 एप्रिल 2016 : दुपारी 4.35 वाजता ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) 2016’ हे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर.
सायंकाळी 6 वाजता : विधानपरिषदेत विधेयकास एकमताने मंजुरी.
संकलन : कृष्णा चांदगुडे