Categories
परिषद

महाराष्ट्र अंनिसच्या रौप्यवर्षपूर्ती निमित्ताने भारतातील विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद

सप्टेंबर - २०१५

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने, संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती निमित्ताने भारतातील विवेकवाद्यांची राष्ट्रीय परिषद दि. 7 ऑगस्ट 2015 रोजी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारपीठावर उद्घाटक ज्येष्ठ सिने अभिनेते डॉ. श्रीराम लागू, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पुरोगामी नेते तथा समितीचे राज्य अध्यक्ष भाई प्रा. डॉ. एन. डी. पाटील, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांच्यासह डॉ. शैलाताई दाभोलकर, राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य उपाध्यक्ष डॉ. रविंद्रनाथ टोणगावकर, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, सुशिला मुंडे, मिलिंद देशमुख यांची उपस्थिती होती.

उद्घाटन सत्र :

प्रारंभी समाजातील धर्मांधतेच्या कुलुपबंद जोखडात अडकलेल्या व्यक्तीची महाराष्ट्र अंनिसच्या प्रतिकात्मक चावीने, प्रसिद्ध सिनेअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करून परिषदेस शुभेच्छा दिल्या.

अविनाश पाटील (म. अं. नि. स. चे राज्य कार्याध्यक्ष) यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र अंनिसच्या रौप्यवर्ष पूर्तीच्या टप्प्यावर भविष्याचा वेध घेताना काही पायाभूत मुद्यांची चर्चा उपस्थित करण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद केले. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यक्षेत्र हे देवाच्या व धर्माच्या नावावर चालणार्‍या शोषण, फसवणूक, बुवाबाजी यांच्या विरोधात करावयाचे काम आहे. त्यामुळे देव-धर्म नाकारल्याशिवाय त्यावर पूर्णपणे फुली मारल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन शक्य नाही अशी भूमिका भारतीय आणि जागतिक विवेकवाद्यांची राहिली आहे. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका तशी नाही. देव मानण्याचे व धर्म पालनाचे स्वातंत्र्य मान्य करूनही त्याच्या नावाने चालणार्‍या सर्व प्रकारच्या शोषणाच्या विरोधात आपण कार्यरत राहूनदेखील अंधश्रद्धा निर्मूलन शक्य आहे अशी महाराष्ट्र अंनिसची भूमिका राहिली आहे. त्याला 25 वर्षांच्या संघटीत कामावर भारतातील आधुनिक समाजसुधारकांच्या वारशाचे अधिष्ठान आहे आणि त्यामुळे आपण त्यांचाच वारसा पुढे चालविण्याचा दावा करतो तसेच भारतीय संविधानाने देखील भारतीय नागरिकत्वाच्या अधिकारात देव धर्म उपासनेचे व पारलौकिक कल्याणाचे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केले आहे. त्यासोबत त्याला अमर्याद न ठेवता, त्यावर काही मर्यादा व बंधने देखील लादलेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता भारतीय वारशावर आधारित विवेकवादाची भूमिका स्पष्ट करण्याची व कृतिशील करण्याची आवश्यकता जाणवते.

यावेळी बोलताना न्या. पी. बी. सावंत म्हणाले की, माणसाचे अविवेकी वर्तन हे समाजात अनेक समस्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. माणसातील क्रोध, मत्सर आदी दुर्गुणामुळेच परिवर्तनाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. माणसातील उपजत गुण वैशिष्ट्येही त्याच्या अंतापर्यंत कायम स्वरूपात अस्तित्वात असतात. आपली विषम सामाजिक रचना ही, भांडवली व्यवस्थेला पोषक ठरणारी आहे. त्यासाठी विज्ञानवादी व विवेकवादी मूल्यावर आधारलेली शाश्वत पद्धती येथे निर्माण झाली पाहिजे. भारताने लोकशाही समाजवादी रचनेचा गाभा स्वीकारलेला आहे. आणि तो खर्‍या अर्थाने सक्रीय लोकसहभागातूनच गतिमान होत असतो. भारतीय लोकशाही खिळखिळी करणारी व्यवस्था येथे निर्माण होत आहे. सध्याच्या संसदेत 543 खासदारांपैकी 420 कोट्याधीश आहेत. त्यात गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले 120 प्रतिनिधी आहेत. सध्याचे सरकार हे लोकशाहीला व विवेकवादाला पूरक असे निर्णय घेईल याची खात्री वाटत नाही. देशातील केवळ 31 टक्के, मते मिळवून हे सरकार सत्तेवर आलेले आहे. लोकशाही संरचना अधिक भक्कम होण्यासाठी जाती-पातीवर आधारीत राजकारणाचा अंत झाला पाहिजे. तसेच धार्मिक मूलतत्ववाद हा समानतेच्या मूल्यांना तडा देत असल्यामुळे, तो संपुष्टात आला पाहिजे. विवेकाधिष्ठित लोकशाही परिपुष्ट होण्यासाठी समतेची मूल्ये, वैज्ञानिक दृष्टिकोन व प्रागतिक शिक्षण यांची कास धरणे गरजेचे आहे. आज देशासमोर सर्वात मोठा धोका म्हणजे, शिक्षण संस्था या राजकारण्यांच्या व धार्मिक मूलतत्ववाद्यांच्या ताब्यात आहेत. हे आव्हान कसे आणि कोणत्या पद्धतीने पेलावयाचे हाच चळवळीसमोरील एक प्रमुख जटील प्रश्न आहे. विवेकवाद हा धर्मातीत शिक्षण पद्धतीवर तसेच वैश्विक मानवतावादी मूल्यावर परिवर्तित होण्याची गरज आहे. मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचा आणि असुरक्षितता व अनिश्चितता दूर करणार्‍या शास्त्रीय अर्थव्यवस्थेची आवश्यकता आहे. आणि या राष्ट्रीय परिषदेला मानवतावाद हाच माझा संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. दिलीप पाडगावकर (मा. संपादक, टाईम्स ऑफ इंडिया) :- संविधानातील मूल्यांवर पद्धतशीर अ‍ॅटॅक होत आहे. तुम्ही रॅशनॅलिस्ट आहात ना मग धर्माविरूद्ध आहात, मानवतावादी आहात तर मूर्ख आहात. पत्रकारांना प्रश्न विचारणे अवघड होत आहे. संविधानावर हल्ला, मानवतावादी लोकांवर हल्ला यामुळे अल्पसंख्यांकासह इतर समाजावर दबाव येत आहे.

भारतीय म्हणून आपण भारतातील विविधतेला मानतो. संविधानाला मानतो. सध्याचे सरकार शिक्षण व संस्कृतीत बदल करतेय. अशावेळी परिवर्तनवादी चळवळीसमोरचे आव्हान बिकट होईल. यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी. साध्यासोप्या शब्दांत लोकांना सांगावे, संवाद करावा. अहिंसेच्या मार्गावर चळवळ राखावी.

मा. भाई वैद्य :- जमातवादी हे नेहमी मूलतत्ववादी असतात. जमातवाद व दहशतवादाचा सर्वांना धोका आहे. म. गांधी, म. फुले हे समाजसुधारक निरीश्वरवादी नव्हते. तरीही विवेकवादी होते. सर्वांना आवाहन करताना भाई म्हणाले की ही लढाई सर्वांनी मिळून लढू या. राष्ट्रासमोरचे हे आव्हान एकजुटीने पेलू या.

सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी केले. आणि आभार प्रदर्शन प्रा. अरूण बुरांडे यांनी केले. परिषदेच्या प्रवेशद्वारास सदाशिव अमरापूरकर, प्रदर्शनीस डॉ. वसंतराव गोवारीकर तर पुस्तक प्रदर्शनास प्रा. यशवंत सुमंत यांची नावे देण्यात आली होती. या राष्ट्रीय परिषदेसह पुढे सलग दोन दिवस चालणार्‍या राज्य अधिवेशनामध्ये बिहार, कर्नाटक, ओरिसा, गुजरात, मध्यप्रदेश, हरियाना व पंजाब आदी राज्यातील प्रतिनिधींसह, समितीचे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून स्त्री-पुरूष कार्यकर्तेमोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

परिसंवाद भारतातील विवेकवाद्यांचे

कार्य आणि विवेकवाद

या सत्राची सुरवात डॉक्टर दाभोलकरांना अभिवादन करणार्‍या ‘नेऊ पुढे चळवळ’ आणि ‘जिंदगी मौत ना बन जाये, संभालो यारो’ या गीतानी झाली. सुरेख संगीताच्या साथीने इस्लामपूर अंनिसच्या तरूणांनी गायिलेल्या या गीतानी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

प्रास्ताविक अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर नानावटी यांनी केले. या परिसंवादात राम पुनियानी, सूर्यकांत शहा, अरविंद गुप्ता यांनी भाग घेतला. डॉ. नरेंद्र नायक अध्यक्षस्थानी होते.

प्रास्ताविकात प्रभाकर नानावटी यांनी कोणत्याही कृती पूर्वी विचाराचे महत्व अधोरेखित केले. संशयवाद म्हणजे स्केप्टीसिझम हा विवेकाचा पाया आहे. देश शहाण्यांचा नसला तरी चालेल पण तो मूर्खांचा नक्कीच नसावा. विवेक हा अंधारातला मिणमिणता दिवा आहे.

विज्ञानात सत्याचा शोध चालू असतो. विवेक हाही सत्याकडेच नेतो. म्हणून विज्ञान हे विवेकवादीच असते. पण सत्तेला मात्र विवेकाचा तिटकारा असतो. याबद्दल खेद व्यक्त करून नानावटींनी प्रास्ताविकाचा समारोप केला.

धर्मवादाचा विवेकवादाला विरोध असतो राम पुनियानी

परिसंवादातील पहिले वक्ते होते प्रसिद्ध मानवी हक्क चळवळीचे कार्यकर्ते राम पुनियानी.

डॉ. दाभोलकरांचा प्रभाव जनमानसात वाढत होता. सामान्याच्या उत्कर्षासाठी ‘शिवाजी कोण होता?’ या ग्रंथाद्वारे कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन करीत होते. म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आणि सध्या सामान्याचा कैवार घेणार्‍या तिस्ता सेटलवाडचा छळ चालू आहे. धर्मवाद्यांच्या या कारवायांचा समाचार घेऊन राम पुनियानी यांनी धर्मवाद्यांची ही कारस्थाने पुरातन काळापासून चालू आहेत. ज्ञान ही मानवाची निर्मितीआहे, देवाची नाही अशा आशयाचे चार्वाकाचे ग्रंथ या धर्मवाद्यानीच नष्ट केले. विवेकवादाच्या इतिहासात अशा घटनाचे दाखले विपुल आहेत असे पुनियानी म्हणाले.

कट्टर धर्मवादी आणि संतपरंपरा यांची तुलना करताना पुनियानी यांनी संत कसे विवेकवादी होते याचे मार्मिक दाखले दिले.

संत कबीरांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. त्यांनी हिंदु संत आणि मौलवींना फटकारले. गरीबांना न्याय द्या, माणसं जोडा असं त्यांच्या दोह्यातून सांगितले. जे अन्न पैदा करतात ते अन्नाविना, जे कापूस उत्पादन करतात ते कपड्याविना अशा अर्थाचा कबिरांचा दोहा आहे. उलट धर्मवादी मूर्तीपूजा व मूर्ती स्थापनेसाठी रक्तपात घडवून आणतात. परंतु जगाला प्रेम अर्पावे हाच खरा धर्म साने गुरूजींनी सांगितला.

धर्मवादाचे धोके स्पष्ट करताना पुनियानी म्हणाले – धर्मवादाचा विवेकवादाला नेहमीच विरोध होत आलाय. सत्तेत असताना धर्मवाद्यांनी विद्यापीठात ज्योतिष आणि इतर कर्मकांडे आणण्याचा घाट घातला.

म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर्कवाद स्वीकारला तर आर. एस. एस. आणि सावरकर यांनी धर्मवाद स्वीकारला. पंडीत जवारहलाल नेहरू हे विवेकवादाचे पुरस्कर्तेहोते. त्यांनी विद्यापीठे व उद्योगधंदे आणि कारखाने यांना मंदिर मानले तर आर. एस. एस. ने मशिदीखाली मंदिर आहे असा पुकारा केला. पांडुरंग शास्त्री आठवले यांनी विज्ञानाच्या परिभाषेत मनुस्मृती मांडली. धर्माच्या माध्यमातून साईबाबांनी 40,000 कोटीची संपत्ती गोळा केली.

अलिकडे अंधश्रद्धा फसव्या विज्ञानाचे नवे रूप घेऊन शोषण करीत आहे. विवेकवादाने मानवाधिकार आणि गरिबांचे प्रश्न यासाठी लढा उभारावा आणि राजकारणात धुडगुस घालणार्‍या धर्माचा मुकाबला करावा यासाठी विवेकवाद्यांनी जोमाने कार्यरत व्हावे असा मौलिक सल्ला पुनियानी यांनी दिला.

सत्याचा शोध म्हणजेच विवेकवाद सूर्यकांत शहा

दक्षिण गुजरातमधील रहिवासी प्राध्यापक सूर्यकांत शहा हे सत्यान्वेषण मासिकाचे संपादक. दक्षिण गुजरातमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना आणि विकास करण्यात ते अग्रेसर आहेत. सत्याचा शोध म्हणजेच विवेकवाद असे प्रतिपादन करून शहा यांनी विवेकवादाचे संस्थाकरण नको हे स्पष्ट करून आंध्रमधील गोरा आणि केरळमधील बी. प्रेमानंद यांच्या विवेकवादी कार्याची महती सांगितली. प्रेमानंदांनी सायकलवरून भारतभर दौरा करून विवेकवादाचा प्रचार केला. सत्य हाच ईश्वर, ईश्वर सत्य नाही हे गांधीजींचे उद्गार गोरा उद्घृत करीत.

विवेकवादाला मुस्लीम समाजात अल्प प्रतिसाद मिळतो याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

विवेकवादाची पावले प्रगतीकडे पडत आहेत. चार्वाकाच्या मृत्युनंतर धर्मवादाच्या विरोधात मोठ्या प्रतिक्रिया आल्या नाहीत पण दाभोलकरांच्या खुनानंतर धर्मवाद्यांना आव्हान देणारी मोठी जनचळवळ उभी राहते हे आश्वासक आहे याबद्दल सूर्यकांत शहांनी आनंद व्यक्त केला.

मुलांमध्ये विवेकाचे बीज पेरण्याचे काम करतोय अरविंद गुप्ता

अरविंद गुप्ता हे आय. आय. टी. इंजिनिअर. आपल्या मोठ्या पगाराच्या टेल्कोमधील नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बीज पेरण्याचे काम सातत्याने केले. छोट्या-छोट्या टाकाऊ वस्तूपासून विज्ञानाची तत्वे समजावून देणारी खेळणी बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. या विषयावर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेत. आयुकाद्वारे मुलांसाठी खेळण्यातून विज्ञानाची अनेक शिबीरे त्यांनी घेतलीत. अरविंद गुप्ताच्या वेबसाईटवर 4 कोटी मुलं असे प्रयोग पाहतात. विज्ञानाच्या प्रयोगाद्वारे तर्कशक्तीचा विकास होतो. म्हणजेच अशी मुलं भविष्यकाळात प्रश्न उपस्थित करू शकतात. हे विवेकाचेच रोपण आहे. बुद्धांचा प्रत्येक बाबतीत शंका घ्या हाच संदेश होता. अरविंद गुप्ता यांनी यावेळी अनेक प्रयोग दाखवून सर्वांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे प्रात्यक्षिकच दाखविले.

विवेकवादाची चतु:सूत्री नरेंद्र नायक

या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र नायक हे प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी वैज्ञानिक आहेत. कर्नाटकात ते विवेकवादाच्या प्रसाराचे काम करतात. देशपातळीवरील विवेकवादी संघटनेचे ते प्रमुख पदाधिकारी आहेत.

विवेकवादाचे इतर विचारधारेपेक्षा नेमके वेगळेपण काय आहे हे विशद करून नरेंद्र नायक यांनी आपण घटनेतील मार्गदर्शक तत्वानुसार पूर्णत: सेक्युलर असायला हवं. आपली कृती आणि नीती धर्मनिरपेक्ष विचारधारेवर आधारीत हवी हे स्पष्ट करून त्यांनी विवेकवादाची चतु:सूत्री मांडली. ती अशी

1) शिक्षणक्षेत्रात विवेकवादाचे अध्यापन प्रभावीपणे घडून यावे. 2) मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हेशनसारख्या अवैज्ञानिक दाव्यांचा पर्दाफाश करणार्‍या मोहिमा राबवाव्यात. 3) विवेकवादाची तत्वे मनोरंजनाच्या माध्यमातून मांडली तर ती चांगली आठवणीत राहतील. 4) आपले स्वत:चे आचरण विवेकवादांच्या विचाराशी सुसंवादी असावे.

दुपारच्या सत्रात सुरवातीला महाराष्ट्र अंनिसची 25 वर्षांची वाटचाल या विषयाची अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांनी मांडणी केली. डॉक्टर दाभोलकर यांनी प्रबोधन, संघटन आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रम याच्या आधारे चळवळ गतीमान केली. एका व्यक्तीत एवढे नेतृत्व गुण एकवटणे म्हणजे चमत्कारच आहे. व्याख्याने, प्रसारमाध्यमातील मुलाखती, लेखन याद्वारे दाभोलकर आणि त्यांचे सहकारी यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. कार्यकर्त्यांच्या दुखदु:खाशी एकरूप होऊन त्यांनी मोठे संघटन उभारले आणि याद्वारे विज्ञान प्रसार, अंधश्रद्धा व बुवाबाजी विरोधी लढे, विवेक वाहिनी प्रकल्प, जातीअंताची लढाई असे कृतीकार्यक्रम राबविले. सर्व थरात पोचलेली ही चळवळ अधिक जोमाने पुढे चालू राहील याबद्दल खात्री दिली.

समारोप

पौराणिक कथांच्या आधारे इतिहास बदलण्याचे षडयंत्र कॉ. सीताराम येचुरी

राजकीय नेते धार्मिक तसेच ऐतिहासिक घटना मोडून तोडून सांगत आहेत. त्या माध्यमातून पौराणिक कथांच्या अवास्तव दाव्याने भारताचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. 3 हजार वर्षांपासून वास्तववाद व श्रद्धा यांच्यात संघर्ष चालू आहे की, बुद्धीभेद करून राजकारण यशस्वी होऊ शकते हे पक्के राजकारण्यांना माहीत आहे. लोक शहाणे झाले तर आपले मनसुबे यशस्वी होणार नाहीत म्हणून जनतेला शहाणे करणार्‍या डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांचा खून करण्यात आला. ही लढाई केवळ बौद्धिक नाही तर राजकीय स्तरावर येऊन ठेपली आहे. भारतात राज्यकर्त्यांच्या या धार्मिक अवास्तव वादाला वेळीच रोखले नाही तर त्याचे फॅसिझममध्ये रूपांतर होण्याचा धोका आहे.

प्रत्येक नागरिकाला कोणताही धर्म आणि परंपरा पाळण्याचा अधिकार आहे. मात्र ‘माझा देव तुझ्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे, तेव्हा माझ्या देवाचा तू ही स्वीकार केला पाहिजे’ अशा गोष्टी जाणीवपूर्वक बिंबवल्या जातात. या पाठीमागे मोठे राजकीय षडयंत्र आहे. सध्या दोन भारतांची निर्मिती केली जात आहे. काही ठराविक लोकांसाठीच आर्थिक योजना तयार केल्या जात आहेत. त्यामुळे या विघातक शक्तींचा सामना करण्याची गरज आहे.