Categories
चळवळ

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा अध्यक्ष-उपाध्यक्षांचे पहिले राज्यस्तरीय संमेलन.

मार्च - २०१६

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 26 वर्षे होऊन गेली. शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी त्यांच्या कल्पक कार्यकौशल्यातून आणि चिकाटीतून ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांतून 310 शाखांपर्यंत पोहोचवली. डॉ.दाभोलकरांनी कार्यकर्तेघडवले, माणसं जोडली, अथक प्रयत्नांतून नवनवीन उपक्रमांची जोड देऊन चळवळीला एक नैतिक बळ निर्माण करुन दिले. अशा सर्व शाखांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचे संमेलनाचे आयोजन 21 फेबु्रवारी 2016 रोजी कोल्हापूर येथे करण्यात आले होते. त्याआधी 19 व 20 रोजी राज्य कार्यकारिणीची बैठकही आयोजित करण्यात आली होती.

अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या या पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटनासाठी म.अं.नि.स.चे अध्यक्ष एन.डी.पाटील, माजी कुलगुरू राम ताकवले, म.अं.नि.स.चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, उपाध्यक्ष रवींद्रनाथ टोणगावकर, डॉ.प्रदीप पाटकर, अनिरूद्ध जाधव, उत्कर्षा मल्ल्या इ.मान्यवर उपस्थित होते. सर्वच पाहुण्यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन झाल्यानंतर माधव बावगे(राज्य प्रधान सचिव, अंनिस) यांनी आपल्या प्रास्ताविकात हे संमेलन घडवून आणण्यामागचे प्रयोजन सांगितले.

त्यानंतर म.अं.नि.स.चे उपाध्यक्ष रवींद्र टोणगावकर यांनी लिहिलेले ‘माझी आध्यात्मिक वाटचाल, गुढाकडून वास्तवाकडे’ या पुस्तकाचे प्रकाशन मा.एन.डी.पाटील यांच्या हस्ते झाले. ‘मनोविकास प्रकाशना’चे प्रकाशक अरविंद पाटकर यांनी विज्ञान विचार प्रसारासाठी या पुस्तकाचे महत्व विषद केले. हे पुस्तक सर्व धर्माच्या अध्यात्माचा अभ्यास व प्रत्यक्ष अनुभूतीतून साकार झाल्याचे पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टोणगावकर यांनी सांगितले.

राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी म.अं.नि.स.च्या चतु:सूत्रीचे पुढील दशकातील व्यापक रूपाच्या मांडणीतून भविष्यवेधी कामकाजाची दिशा सांगणारा धावता आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने फसवे विज्ञान, आध्यात्मिक संप्रदायांचे वाढते पेव, जातपंचायतींना मूठमाती व संविधानाला अभिप्रेत असणार्‍या नागरिकत्वाचं भरणपोषण या आणि अशा आव्हानांचा उहापोह केला! डॉ.प्रदीप पाटकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन ते व्यापक विवेकवाद, मानवतावाद या अंगाने विविध पैलू मांडले.

पहिल्या सत्राच्या समारोपावेळी एन.डी.पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले! यामध्ये त्यांनी जगण्या-मरण्याच्या सर्व प्रश्नांच्या मुळाशी विवेकाचा अभाव हेच महत्वाचं कारण आहे. त्यामुळे विवेकाचा आवाज बुलंद करण्याचे अंनिसचे हे काम नितांत गरजेचं आहे, असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी सध्य घडामोडीवर प्रकाश टाकताना देशातील आर्थिक क्षेत्रावर, वाढत्या धार्मिक उन्मादावर व शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रश्नावरही मत व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी केले.

दुसर्‍या सत्रात चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, लेखक आ.ह.साळुंखे यांनी उपस्थित अध्यक्ष-उपाध्यक्षांना व्यवहारातील मुद्दे मांडून चळवळीला पुढील व्यापक दिशा कशी देता येईल यावर विवेचन केले. चळवळीत काम करताना कार्यकर्त्यांची ध्येयभूमिका समोरच्याला वैचारिक पराभूत नव्हे तर वैचारिकरित्या परिवर्तीत करण्याची असावी. या परिवर्तनासाठी विचारांत व व्यवहारात कशा भूमिका घ्यायच्या हे सांगताना त्यांनी गौतम बुद्धांची काही उदाहरणेही दिली. पुढे ते म्हणाले की, अंनिससह सर्व परिवर्तनवादी संघटनांनी सर्व हेवेदावे, द्वेष, मतभेद बाजूला ठेवून किमान काही मुद्द्यांवर कृती कार्यक्रम ठरवून एकत्र आलं पाहिजे.

दुपारच्या जेवणानंतर माजी कुलगुरू राम ताकवले यांनी ‘डिजीटल भारतातील समाज परिवर्तन आणि तंत्रज्ञान’ या विषयावर आपली व्यापक मांडणी केली. यामध्ये त्यांनी तंत्रज्ञानातील बदल आणि समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील बदलांबद्दलचे दुवे स्पष्ट केले. या सत्राचे आभार मिलिंद देशमुख यांनी मानले.

चहापानानंतर तिसर्‍या सत्राची सुरुवात निशांत शिंदे व सहकार्‍यांच्या गाण्यांतून झाली. या सत्रासाठी निवडक जिल्ह्यांचे अध्यक्ष मंचावर उपस्थित होते. यामध्ये शशांक कुलकर्णी (नाशिक), संजय शेंडे (नागपूर), उत्कर्षा मल्ल्या (मुंबई), शामकांत जाधव (ठाणे) यांनी आपापल्या जिल्ह्यांतील कामकाजाचा, अनुभवाचा उहापोह केला. चंदू चव्हाण(पुणे) यांनी उपस्थित शंकांचे निरसन केले. या सत्राचे सूत्रसंचालन प्रशांत पोतदार तर आभार नंदकिशोर तळाशीलकर यांनी मानले.

या म.अं.नि.स.च्या शाखा अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या पहिल्या राज्यस्तरीय संमेलनाला साधारण 200 हून अधिक कार्यकर्त्यांची हजेरी होती.

विनायक होगाडे

मोबा. 9011560460