Categories
प्रासंगिक

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

ऑक्टोबर – २०१५

विचार मारणे ही विकृती आहे

विचारांच्या विरोधात शस्त्र वापरण्याची परंपरा मानवी समाजाला नवी नाही. समाज आपल्या ताब्यात राहिला पाहिजे असे वाटणार्‍या लोकांना केवळ हिंसेचा वापर करणेच माहीत असते, ज्यांच्यामुळे समाज कणाकणाने पुढे जाण्याची शक्यता असते, त्यांना अशा रितीने मृत्यूला सामोरे जावे लागणे का किती पराकोटीचा पराभव आहे, अशी आजची स्थिती आहे. आता आपण आधुनिक समाजात जगतो आहोत. जो समाज विज्ञानाधिष्ठित आहे. यात विचार मारणे ही विकृती आहे. आणि भारतासारख्या देशात विचार स्वातंत्र्याची तरतूद करूनसुद्धा अशी कृत्ये घडतात, हे अपमानास्पद आहे. घटनाकारांनी जात, धर्म आणि श्रद्धा स्वातंत्र्यांचा समावेश घटनेत केला आहे, हे त्यांचे उदात्त उपकार आहेत, असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. हे उदात्त विचार समजण्याच्या लायकीचा समाज आहे, असे मला वाटत नाही. हे उपकार कसे वापरायचे याची धड अक्कलही आपल्या समाजाला नाही. किंबहुना, या उपकारांचा गैरवापर करणे आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक करणे अशी परिस्थिती सध्या समाजात आहे. समाजाला घटनेचे सोयर-सुतक वाटत नाही. आपल्याकडे असणारी घटना दुरूस्तीची तरतूद वापरून त्यातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे तत्व कायम ठेवून बाकी धर्म, जात आणि श्रद्धा स्वातंत्र्य काढून घेण्याची वेळ आली आहे.

राजन खान


थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला!

दोन वर्षांपूर्वी डॉ.नरेंद्र दाभोलकरांसाठी ‘ते’ विठ्ठल रामजी शिंदे पुलावर आले. 16 फेबु्रवारीला ‘ते’ कॉ.गोविंद पानसरेंसाठी कोल्हापुरात आले आणि गेल्या रविवारी तर प्रा.कलबुर्गींच्या घरीदेखील ‘ते’ आले. प्रत्येकवेळी बंदुक घेऊन गाडीवरून आलेले दोन तरूण सत्तरी पार केलेल्या विचार प्रसारकांना मारायला आले, उद्या ते प्रश्न विचारण्याचे धाडस करणार्‍या आपल्यापैकी, कुणासाठीही कुठेही येऊ शकतात. आपल्या स्वत:च्या विचारांवर(खरे सांगायचे तर अविचारांवर) या मारेकरी शक्तींचा इतकाही विश्वास नाही की आपण कोण आहोत, हे समाजासमोर येऊन सांगण्याचे त्यांना जड जात आहे.

या देशात राज्यघटनेचेच राज्य चालावे आणि या देशातील विधायक कृतिशील धर्मचिकित्सेची ज्योत तेवत राहावी म्हणून काम करणार्‍या आणि संघटना बांधणार्‍या नेत्यांवरच नेमके एकापाठोपाठ एकाच पद्धतीने कसे हल्ले होतात? आणि तेदेखील धर्माच्या नावावर अधर्म वाढत असलेल्या कालखंडात? स्वतंत्र विचार आणि धर्मांची चिकित्सा नको असलेल्या, हिंसाचा पुरस्कार करणार्‍या आणि धर्माच्या नावावर राजकारण आणि धार्मिक कट्टरीकरण करणार्‍या संघटित शक्ती कोणत्या, हे ओळखणे इतके अवघड आहे का? या शक्तींना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष बळ देणार्‍या सगळ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की, इसिस आणि तालिबानसारख्याच असणार्‍या या प्रवृत्ती कधी ना कधी आपल्या जन्मदात्यांच्याच मुळावर उठतात, हा इतिहास आहे. राहता राहिला प्रश्न या समाजातील स्वतंत्र विचारांचे आणि धर्मचिकित्सेच्या संस्कृतीचे काय होणार?

डॉ. हमीद दाभोलकर


दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी कोणाला नको आहेत?

डॉ.कलबुर्गी यांच्या वैचारिक कार्याचे स्वरूप लक्षात घेता, त्यांचे डॉ. दाभोलकर आणि कॉ.पानसरे यांच्याशी असलेले वैचारिक नाते स्पष्ट दिसून येते. ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ व ‘धर्मचिकित्सा’ हा या तिन्ही विचारवंतांच्या कृतिशीलतेचा महत्वाचा आधार होता.

वैज्ञानिक, चिकित्सक दृष्टिकोन, विवेकवाद, समतावाद आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही भारताच्या संविधानाने दिलेली तत्वे नव्या पिढीत रूजवू पाहणार्‍यांना हिंसेच्या मार्गाने संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. एकामागोमाग एक ज्येष्ठ विचारवंत आपला जीव गमावताहेत. धर्मचिकित्सा करणार्‍यांना ठार मारण्याची हिंसेची ही परंपरा प्राचीन काळापासून आपल्या तथाकथित सहिष्णू संस्कृतीत आहेच. डॉ.दाभोलकरांच्या खुनानंतर ‘सनातन प्रभात’ या दैनिकाने आनंद व्यक्त केला होता. डॉ.कलबुर्गींच्या हत्येनंतर बजरंग दलाचे सहनिमंत्रक भूवित शेट्टी याने कलबुर्गी यांना आम्ही मारले असून, विवेकवादी विचारवंत व टीकाकार के.एस.भागवत हे आमचे लक्ष्य असतील, असे ट्विट केले व त्यानंतर ते नष्ट केले. तिन्ही विचारवंतांचे मारेकरी आणि त्यांच्यामागील सूत्रधार समाजासमोर आलेच पाहिजेत; त्यासाठी हिंसेविरूद्ध तीव्र जनआंदोलन हाच एक मार्ग आहे.

मेघा पानसरे


कर्त्या सुधारकाची हत्या

कर्नाटकात गिरीश कार्नाड, के. एस. भगवान, बरगुर रामचंद्र, चंद्रशेखर पाटील अशा अनेक पुरोगामी, परिवर्तनवाद्यांची परंपरा आहे. अंधश्रद्धांना विरोध हे एक समान सूत्र या सार्‍यांमध्ये आहे, मग डॉ.कलबुर्गी यांचीच हत्या का झाली? याचे प्रमुख कारण म्हणजे डॉ. कलबुर्गी हे विचार नुसते पुस्तकांतून मांडत नव्हते, तर प्राणपणाने जेथे जेथे संधी मिळेल तेथे तेथे त्यांचा प्रसार व प्रचार करत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या विचारांची जशी सनातन्यांना भीती वाटली, तशीच डॉ. कलबुर्गी यांच्या विचारांचीही वाटली आणि त्यांनी त्यांनाही दाभोलकर, पानसरे यांच्याप्रमाणेच भ्याडपणे गोळ्या घातल्या.

डॉ. कलबुर्गी म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व, अभ्यासाशिवाय बोलायचं नाही आणि संशोधनातून जे हाती लागेल, ते जोरकसपणे मांडल्याशिवाय राहायचं नाही, हा त्यांचा खाक्या, या न्यायाने त्यांनी अगदी तरूणपणी डी. एल. नरसिंहाचार्य यांच्याशी वाद घातला होता. डी. एल. निरसिंहाचार्य हे कर्नाटकात प्रकांड पंडीत म्हणून प्रसिद्ध होते, ‘कर्नाटक कवी चरिते’ हा ग्रंथ त्यांनी तीन खंडात प्रसिद्ध केला. अशा पंडिताच्या ‘शब्दमणी दर्पण’ या निबंधातील अनेक चुका कलबुर्गी यांनी संशोधन करून दाखवून दिल्या व नरसिंहाचार्यांनी त्या मान्यही केल्या. याच पद्धतीने त्यांनी शैव व लिंगायत समाजातील फरक संशोधन करून दाखवून दिला होता आणि तेही त्यांच्या हत्येमागचं एक कारण असू शकतं.

महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा यासाठी ते पाठपुरावा करत होते. अशा तर्‍हेचे कार्य करणार्‍या डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांना ज्या तर्‍हेने मरण आले, तसेच ते कलबुर्गींना यावे, ही महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांची शोकांतिकाच म्हणायला हवी!

अशोक याळगी


पुरोगामित्वावर घाला

इतिहासाच्या प्रत्येक निर्णायक वळणावर एक गोष्ट निदर्शनास येते की, ज्या-ज्यावेळी पुरोगामी विचार जनमानसाची पकड घेऊ लागतात. तेव्हा प्रतिगामी शक्ती अधिक अस्वस्थ होतात आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारतात. पुरोगामी विचार मांडणार्‍या व्यक्तींचा किंवा संबंधित समूहाचा नाश करणे हे त्यांचे उद्दिष्ट बनते. गेल्या तीन वर्षांपासून भारतातही या प्रतिगामी शक्ती पुरोगामी शक्तींच्या वाढत्या प्रभावामुळे चिडून हिंसाचाराचा मार्ग निवडत आहेत. त्याची उदाहरणे वेगवेगळ्या राज्यात दिसून येत आहेत. त्यामुळे हा झगडा किंवा वाद हा एका राज्यापुरता किंवा पंथापुरता मर्यादित नसून त्याची आता व्याप्ती वाढायला लागली आहे. याची दखल दहशतवाद विरोधी पथकाने घेण्याची गरज आहे.

प्रतिगामी शक्ती हा नेहमीच त्यांना शत्रू वाटणार्‍या शक्तीची हत्या करण्याचा मार्ग निवडताना दिसतात. कारण त्यांच्याकडे बर्‍याचदा विवेकपूर्ण विचारांचा अभाव असतो. विवेकशील विचारांकडे नैतिकतेचा आणि मानवतेचा पाया असतो, म्हणूनच असे विचार कधीच नष्ट होत नाहीत. इतिहासाने हे वारंवार अनुभवले आहे. कुठलाही विचार हा दडपता येत नाही. ही गोष्ट संत तुकाराम यांच्यावेळी सिद्ध झाली. त्यांचेही विचार नष्ट करण्याचा लोकांनी प्रयत्न केला. पण ते नष्ट झाले नाहीत. महात्मा फुले यांनाही मारण्यासाठी मारेकरी पाठविले होते. पण तरीही त्यांचा विचार मात्र आजही जिवंत आहे. इतकेच नव्हे तर तो देशभर पसरतो आहे. तेव्हा माणूस वा व्यक्ती मारून विचार मरत नाहीत, तर पुरोगामी विचार हे पसरतच असतात. बुद्धांचे हजारो अनुयायी, बसवण्णा, त्यांचे शरण अनुयायी, चोखोबा, नामदेव, तुकोबा या सार्‍यांच्या बाबतीत काय झाले हे जगाला ठाऊक आहे. पण त्यामुळे त्यांचे विवेकशील मानवतावादी विचार कधीच नष्ट होऊ शकले नाहीत. हे उत्तरोत्तर विस्तारतच राहिले. उलट अशा घटनानंतर या विचारांना अधिक बळ येते, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा आपण माणसाबरोबर त्याच्या विचारांचीसुद्धा हत्या करू शकतो, अशा भ्रमात प्रतिगामी आणि सनातनी लोकांनी राहू नये.

भाई वैद्य