Categories
व्यक्तिविशेष

मी डॉ. आंबेडकरांचे देणे लागतो

एप्रिल – २०१६

भांडवलशाही व्यवस्थेमुळे आमच्या जगण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. आमची संवेदनशीलता हरपत चालली आहे. मुख्य म्हणजे मानवी मूल्यांवरील आपला विश्वास डळमळीत होतो आहे. अशा वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांवर, अनुयायांवर एक मोठी जबाबदारी येऊन पडते आणि ती म्हणजे या बाजारात मी असलो तरी विकलो जाणार नाही.

प्रत्येकास एक वारसा असतोच. तो जैविक स्वरुपाचा असतो. म्हणजे माझा कुठेतरी जन्म झालेला असतो. मला आई-वडील असतात. त्याही आधीचे पूर्वज असतात. हे पूर्वज शोधत गेलो तर आदिमानवापर्यंत आपण जाऊन पोचतो. त्या सार्‍या पूर्वजांची आपल्याला नावे माहीत नसतात; पण ते असतातच. असा प्रत्येकाला एक जैविक वारसा असतो.

परंतु त्याबरोबरच आणखी एक वारसा असतो. तो माणूसपणाचा. म्हणजे हजारो वर्षांच्या मानवी प्रवासात आपण माणूस बनत गेलो तो वारसा. हा व्यक्तीला असतो म्हणजे एकूण समाजाला असतो. कारण व्यक्ती त्या-त्या समाजाचा एक भाग असते. अर्थात व्यक्तीची व्यक्ती म्हणून काही वैशिष्ट्ये असू शकतात. नव्हे, असतातच. परंतु आपण समाजाचे भाग आहोत, हा समाज चांगला झाला पाहिजे अशी भावना सर्वसाधारणत: असतेच. ही भावना कमी-अधिक असू शकते. तीव्र संवेदनशीलता असणार्‍या व्यक्तीमध्ये ही भावना अधिक प्रबळ असते. त्यामध्ये स्वार्थ मिसळला की, ती पातळ व्हायला लागते. अशी माणसे थोडी असतात. परंतु ती पुष्कळदा प्रभाव गाजविणारी असू शकतात.

मी जर या भारतीय समाजाचा भाग असेन, तर माझाही हा दुसरा वारसा असणारच आणि तो आहेच. तेव्हा प्रश्न निर्माण होतो की, माझा आणि माझ्या समाजाचा वारसा कोणता आहे? अर्थात, वारसा शोधताना व्यापक समाजभान ही बाब फार फार महत्त्वाची असते. एका धर्मापुरते, एका जातीपुरते, एका गटापुरते जे बोलतात, तो एकूण समाजाचा वारसा होऊ शकत नाही. एकूण समाजाचा वारसा व्यापक मानवतावादी दृष्टिकोनावर अवलंबून असतो; किंबहुना असे म्हणता येईल की, जगामध्ये ज्यांनी-ज्यांनी व्यापक दृष्टिकोन स्वीकारला, तेच लोक पुढील पिढ्यांच्या स्मरणात राहतात. कारण मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच आपण देश-कालाच्या पलिकडे जाऊन सॉक्रेटिसपासून डॉ.आंबेडकरांपर्यंतच्या महामानवांचे स्मरण करतो. त्यांना संस्कृतीच्या जडणघडणीचे श्रेय देतो.

तेव्हा माझा वारसा कोणता? ते मी शोधायला लागलो की, मला माझ्या नजीकच्या भूतकाळातील तीन महामानवांची नावे आठवतात. अर्थात, या तिघांनाही मी पाहिले नाही. अर्थात, पाहण्याची तशी आवश्यकता नसतेच. मोठी माणसे आपल्या आसपास आसमंतात व्यापून राहिलेली असतात. ही तीन नावे म्हणजे म.गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स ही होत. हा माझा वारसा आहे. शिक्षक म्हणून, लेखक म्हणून आणि माणूस म्हणून मी त्यांचे काही देणे लागतो. कारण त्यांच्यामुळे जग एका टप्प्यावर माझ्यापर्यंत येऊन पोचले आहे आणि मला ते अधिक सुंदर करावयाचे आहे. ती माझ्यावर काळाने टाकलेली इतिहासदत्त जबाबदारी आहे आणि ते करण्यासाठी मला या तीन महापुरुषांपेक्षा दुसरा कुणी दिसत नाही. तेव्हा मी त्यांचे देणे लागतो. काय आहे ते देणे? डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे काय देणे लागतो?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रकांड पंडित होते. धर्मशास्त्रापासून मानववंशशास्त्रांपर्यंतच्या सर्व शास्त्रांचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी सगळी हयात पुस्तके मिळविण्यात, वाचण्यात आणि लेखन करण्यात घालविली. त्याबरोबरच प्रत्यक्ष जीवनात असंख्य प्रकारचे संघर्ष करून कार्याचे डोंगर उभे केले. असे कर्तृत्व असणारे महामानव फार थोडे असतात. अपवादात्मक असतात. डॉ.बाबासाहेब अशा अपवादांपैकी एक महामानव होते.

त्यांनी आयुष्यभर धर्माच्या अवगुंठनातील गुलामगिरी म्हणजे जातिव्यवस्थेविरुद्ध कडवी झुंज दिली. अनेक मंदिरांसंबंधी सत्याग्रह त्यांनी केले. पोटभर पाण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. अस्पृश्यतेमागे आणि जातिव्यवस्थेमागे असणार्‍या ‘मनुस्मृती’चे जाहीर दहन केले. शेवटी कायद्याने अस्पृश्यता नष्ट करण्याच्या तरतुदी घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष असताना केल्या. स्वातंत्र्योत्तर भारत माणुसकी या मूल्यावर उभा राहिला पाहिजे, यासाठी त्यांनी केलेले कार्य आणि घटनात्मक तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचा अर्थ असा की, जातिव्यस्थेविरुद्ध लढा हा एकाच वेळी जातींच्या विरुद्ध तर होताच; पण त्याच वेळी तो धर्माविरुद्धही होता. त्यातूनच तर त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.

जात म्हणजे पिढ्यान्पिढ्या गुलामी लादणारी व्यवस्था आहे. तिला धर्ममान्यता आहे आणि समाजातील बहुजनांच्या सर्व प्रकारच्या दु:खाचे मूळ जातीमध्येच आहे, हे डॉ.आंबेडकरांच्या फार लवकर लक्षात आले. इतिहास काळापासूनच्या दु:खाचे मूळ जातच आहे, हेही त्यांच्या अभ्यासातून त्यांना दिसून आले.

जात म्हणजे एक अर्थव्यवस्थाही आहे. कोणाला किती मजुरी मिळावी, हे जातीप्रमाणे ठरलेले होते व दुसरा व्यवसाय करायची परवानगीही नव्हती. पिढ्यान्पिढ्या सांस्कृतिक तसेच आर्थिक शोषण चालूच होते. हे त्यांच्या लक्षात आले आणि ते कार्ल मार्क्सशी संवादी झाले. म.फुले आणि सार्‍या बहुजन मुक्ती परंपरेशी तर ते बांधले गेलेच होते. त्यांनी संघर्ष केला आणि आज लोकशाहीप्रधान, धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत आम्ही उभे आहोत.

असे असले तरी जुना सरंजामी आणि जातीय पिळ संपूर्ण संपलेला आहे, असे मात्र नाही. आजही खेडोपाडी दलितांच्या दिवसाढवळ्या हत्या होतात आणि शहरी माणसे फार शिताफीने जातींचा वापर करतात आणि बहुसंख्य राजकारण आपली इच्छा असो अगर नसो जातींभोवती फिरते आहे. मंत्रालयापासून सर्व जातीची गणितं घातली जातात. मग गुणवत्ता, समता असल्या गोष्टी कधी वार्‍यावर उडून गेल्या, त्याचा पत्ताही लागत नाही. मी जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारस असेल तर माझ्यावर एक जबाबदारी येऊन पडते आणि म्हणजे मी जातिमुक्त होणे. जेव्हा संधी येईल तेव्हा जातीच्या कक्षा भेदून जाणे, हे माझे कर्तव्यच ठरते.

वैयक्तिक जीवनापासून, राजकारणापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ‘जात’ जाणवायला लागते. अगदी शिक्षण आणि साहित्याच्या क्षेत्रातही ही जात आहेच. उघडपणे नाही, पण ती जाणवत राहते. मी जर शिक्षक असेल तर या प्रवृत्तीला विरोध करणार की नाही, हा मुख्य मुद्दा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शिक्षण संस्था उभ्या केल्या, त्या सर्वांसाठी होत्या. कितीतरी सवर्ण विद्यार्थी तेथे शिकून पुढे कर्तबगार म्हणून नावाजले गेले. डॉ.बाबासाहेबांनी कधी विद्यार्थी कोणत्या जातीचा आहे, याची चौकशी केली नाही. विद्यार्थी हा विद्यार्थी असतो, याची पक्की खूणगाठ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मनाशी बांधलेली होती.

विद्यार्थ्यांबद्दल जशी ही भावना त्यांच्या मनात होती, तशीच ती शिक्षकांबद्दलही होती. त्यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयातून अत्यंत ज्ञानी शिक्षकांच्या नेमणुका केल्या. त्यांची जात त्यांनी कधीच पाहिली नाही. या शिक्षकांनी स्वातंत्र्योत्तर भारतातील शिक्षणाची जडणघडण केली. म्हणूनच मिलिंद महाविद्यालयातून दलित साहित्याची चळवळ फोफावली. पुढे ती जगभर पोचली.

शिक्षण हे मानवमुक्तीचे प्रमुख साधन आहे, असे त्यांना वाटायचे आणि ते खरेही आहे. म.फुले असोत की, शाहू महाराज; त्यांनी याच दृष्टीने शिक्षणाच्या चळवळीकडे पाहिले. म्हणूनच त्यांना वाटायचे की, आपल्या महाविद्यालयातून मिलिंदासारखे व्यवस्थेला प्रश्न विचारणारे विद्यार्थी निर्माण व्हावेत. मानवी प्रतिष्ठेची जपणूक करणारे विद्यार्थी निर्माण करणे, हाच तर त्यांच्या शैक्षणिक चळवळीचा हेतू होता.

शिक्षण संस्था असो की, समाजातील कुठलीही चळवळ; ती चालविण्यासाठी पैसा लागत असतो. हे एक कटूसत्य असले तरी वास्तव आहे. पैशांची निकड लक्षात घेऊन आणि कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक लोक पुढे येत असत. असेच एकदा पठ्ठे बापूराव पुढे आले. म्हणाले, ‘बाबासाहेब, आपल्या कार्याला मी मदत करू इच्छितो.’ डॉ.बाबासाहेबांनी त्यांना नकार दिला. कोणाकडून पैसा घ्यायचा, याचा विवेक त्यांंनी कायम सांभाळला. दिलीपकुमारकडूनही त्यांनी पैसे घेतले नाहीत. वाईट मार्गाने मिळविलेला पैसा शिक्षणासारख्या कार्याला नको, ही त्यांची भूमिका होती. आज तर पैसा कमविण्याचे साधन म्हणजे शिक्षण झाले आहे हा भाग वेगळा.

याचा अर्थ असा की, पैसा हवा; पण त्यासाठी चांगल्या मार्गाने मिळविलेला पैसा हवा. म.गांधी साधनशूचिता म्हणत असत, ती हीच आहे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी यांच्याशी संवादी झाले आहेत.

शिक्षणाकडे डॉ.बाबासाहेब फार गंभीरपणे पाहत असत. मानवमुक्तीचे ते साधन आहे, म्हणून तेथे कुठल्याही तडजोडी नकोत. ज्ञानसाधना हीच महत्त्वाची. त्यासाठी त्यांना शैक्षणिक इमानदारी (Academic Honesty) फार फार महत्त्वाची वाटायची. म्हणून शिक्षण जातिमुक्त असावे, विषमता मुक्त असावे, असा त्यांचा आग्रह होता. मी शिक्षण क्षेत्रात असेन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारस असेल तर मी कसे वागायला हवे, हे ठरविणे म्हणजे बाबासाहेबांचे वारस असणे होय. मी डॉ.बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करीत असेन, तर मी त्यांचा वारस होऊ शकणार नाही. मी त्यांच्या विचारांशी प्रामाणिक असणे, हेच माझे बाबासाहेबांना देणे असेल.

साहित्याच्या क्षेत्रातही जात आहेच. शिक्षणाप्रमाणेच साहित्यही मानवी मुक्तीचे साधन आहे, असे त्यांना वाटत असे. विदर्भ साहित्य संघ, नागपूर येथे भाषण करताना त्यांनी साहित्याकडून हीच अपेक्षा व्यक्त केली. आता मी जर लेखक असेन तर मानवी भेदाभेदाचे, जातीचे, शोषणाचे आणि गुलामीचे समर्थन अगदी चुकूनही माझ्या साहित्यातून येता कामा नये. तसे मी करीत असेन तर ती डॉ.बाबासाहेब आंबेडकरांशी प्रतारणा होईल.

साहित्याच्या क्षेत्रात साहित्यनिर्मिती आणि साहित्य व्यवहार अशा दोन गोष्टी असतात. पुष्कळ लेखक असे आहेत की, जे निर्मितीच्या पातळीवर जातिव्यवस्थेचे समर्थन करतात. तसेच साहित्य व्यवहारातही जातीची गणिते चालू असतात. साहित्य परिषदा, पारितोषिक, समीक्षा व्यवहार अशा अनेक ठिकाणी जाती डोकावताना दिसतात. एका विशिष्ट जातीचे लोक एकत्र येऊन गट करताना दिसतात. म्हणजे आपल्या साहित्य व्यवहारातून ते जातींचे समर्थन करीत असतात. आता तर ‘देशीवाद’ नावाचा देशाला मध्ययुगात नेणारा वाद मांडला जातो आहे. त्यात जातिव्यवस्था फार चांगली आहे, ती टिकणे आवश्यक आहे असे मांडले जात आहे. नव्या जगाची सारी मधुर फळे खाणारी ही लेखक मंडळी जातिव्यवस्थेचे निर्लज्ज समर्थन करीत आहेत. अशा अवस्थेत लेखक म्हणून माझी जबाबदारी कोणती? मी माझ्या साहित्यातून विषमतेचे समर्थन होईल, असे लिहिणार नाही, ही माझी प्रतिज्ञा असली पाहिजे. माझ्या साहित्यिक व्यवहारातही जातीचे समर्थन असणार नाही, असे माझे वर्तन असले पाहिजे आणि मुख्य म्हणजे देशीवादासारख्या अत्यंत प्रतिगामी विचारधारा हाणून पाडण्यासाठी मी सिद्ध झाले पाहिजे. मला वाटते, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारस म्हणून मी हेच देणे लागते. नाही तर माझे लेखक असणे व्यर्थ होय!

जात अशी आपल्या देशात सर्वदूर आहे. तिला येथील प्रस्थापित धर्माचे संरक्षण आहे. तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा आपोआपच येथील प्रस्थापित धर्माशी होता, हे उघड आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे धर्म न मानणारे होते, असे नाही. उलट त्यांच्या दृष्टीने धर्म महत्त्वाचा होता. म्हणून तर त्यांनी आपले नाते बौद्ध धम्माशी जोडले. त्यांच्या दृष्टीने धर्म म्हणजे मानवमुक्ती, शोषणमुक्ती. ज्या धर्मात विषमता गृहीत आहे, तो धर्म त्यांना मान्य नव्हता. याचा अर्थ असा की, धर्माचा विचार विवेकाने केला पाहिजे असे त्यांना वाटत होते. किंबहुना, विवेक हाच जीवनाचा आधार असला पाहिजे, ही त्यांची अपेक्षा होती.

मी जर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगत असेन, तर मी विवेकाने वागले पाहिजे, ही गोष्ट उघड आहे. किंबहुना माझे विवेकी असणे हेच माझे बाबासाहेबांचे देणे असेल, असे समाजानेसुद्धा मी विवेकाने वागतो की नाही ते पाहिले पाहिजे.

कुठल्याही प्रकारची विषमता, गुलामगिरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती. आपल्या देशात तर अजूनही स्त्री ही दुय्यमच मानली जाते. एक ती शिकते आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये येऊ पाहते आहे, त्याच वेळी तिचे दुय्यमत्व घोषित करणार्‍या घटनाही सातत्याने घडत आहेत. तिच्या मुक्तीचा ध्यास डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार केले. परंतु हे बिल फेटाळले गेले आणि बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडले. तत्त्वासाठी असे बाहेर पडणारे आज किती मंत्री आहेत? मुळात काही तत्त्वे असतात, ती पाळली पाहिजेत, याची जाणीवच फार लोकांना उरलेली नाही, असेही आज जाणवत आहे. एक विपरीत वास्तव आज आकाराला आले आहे. धर्माचे, परंपरांचे कारण पुढे करून स्त्रीच्या एकूणच गुलामगिरीचे समर्थन सध्या सुरू आहे. प्रत्येक आंबेडकरवाद्याची ही जबाबदारी आहे की, त्याने वा तिने या विपरीत वास्तवाला विरोध केला पाहिजे. तर मुख्य मुद्दा असा की, मी स्त्रीच्या बाबतीत कसा वागतो? स्त्रीचे स्वातंत्र्य मला मान्य आहे की नाही? तिला मी समतेची वागणूक देतो की नाही? हे आणि यासारखे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मग मी शिक्षक असेन, लेखक असेन, अगर जीवनातील कुठल्याही भूमिकेत असेन, मी स्त्रीशी कसा वागतो, हा महत्त्वाचा प्रश्न असेल. किंबहुना हा आणि यासारखे सारेच प्रश्न माझ्या माणूसपणाशी निगडित असतील. माणसाचे माणूसपण उजळून यावे, हीच तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. जो कोणी आपणास डॉ.आंबेडकरांचा वारस समजतो, त्याला सतत आपल्या माणूसपणाच्या सहाणेवरती स्वत:ला घासून घ्यावे लागते. आपले माणूसपण सतत उजळून घ्यावे लागते, ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा एक झंझावात होता. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहा, संघर्ष करा, असा या झंझावाताचा संदेश होता. आता ठामपणे उभे राहायचे, म्हणजे काय करायचे?

आज आपण जागतिकीकरणाच्या काळात आहोत. सर्वत्र माणुसकीशून्य, अनियंत्रित भांडवलशाही बोकाळली आहे. अशा भांडवलशाहीचा एक अलिखित नियम असतो. तो असा की, जगातल्या सार्‍याच गोष्टी बाजारात विक्रीसाठी असतात. माणसेसुद्धा विकत घेता येतात. कोणाची किंमत कमी असेल अगर कोणाची किंमत अधिक असेल. पण त्याची विक्री होऊ शकते. खरेदी होऊ शकते, ही या व्यवस्थेची श्रद्धा असते. मग अशी व्यवस्था जीवनाचे एक एक क्षेत्र काबीज करीत, विकत घेत निघते. मुख्य म्हणजे आज ती प्रसारमाध्यमे आणि शासनव्यवस्था विकत घेत आहे. म्हणजे नियंत्रण करणारी व्यवस्थाही ताब्यात घ्यायची आणि कोणी काही बोलू नये, यासाठी प्रसारमाध्यमेही ताब्यात घ्यायची अशी सध्याच्या भांडवलशाहीची प्रतिज्ञा आहे. आपण सारे आज याच व्यवस्थेत उभे आहोत. या व्यवस्थेमुळे आमच्या जगण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. आमची संवेदनशीलता हरपत चालली आहे. मुख्य म्हणजे मानवी मूल्यांवरील आपला विश्वास डळमळीत होतो आहे. अशा वेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांवर, अनुयायांवर एक मोठी जबाबदारी येऊन पडते आणि ती म्हणजे या बाजारात मी असलो तरी विकलो जाणार नाही, मी अविक्रेय राहीन; भले मला कितीही आपदा आल्या तरी चालतील, मी एकटा राहिलो तरी चालेल; पण मी बाजारातील वस्तू होणार नाही, विकला जाणार नाही, हीच माझी प्रतिज्ञा असेल, असे त्याने म्हटले पाहिजे. आणि अशी प्रतिज्ञा त्याने केली पाहिजे, तरच तो डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा वारस असेल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.गांधी आणि कार्ल मार्क्स आपल्याकडून हेच मागणं मागत आहेत-आपल्या अविक्रेयतेचे!

नागनाथ कोतापल्ले