Categories
अभिवादन

मुंबई अंनिसच्या कार्यकर्त्या अलकाताई काजरोलकर यांचे निधन

जून – २०१७

अलका गोविंद काजरोलकर या मुंबई महानगर पालिकेच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होत्या. त्यानंतर त्या महापालिकेच्या विभाग अधिकारी (बीट ऑफिसर) पदावर सुद्धा कार्यरत होत्या. आपापली इतर कामे सांभाळत अलकाताई व गोविंद काजरोलकर हे दोघेही सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतलेले जोडपे आहे. रिटायरमेंट नंतर जेव्हा इतर लोक आरामात दिवस घालवण्याचा विचार करतात, तेव्हा या जोडप्याने आता संपूर्ण वेळ सामाजिक कार्यात झोकून देण्याचा संकल्प केला.

आणि या निर्धाराने हे दोघे सुद्धा अनेक सामाजिक चळवळींमध्ये गुंतले गेले. राष्ट्रसेवा दल, साने गुरुजी राष्ट्रीय सेवा स्मारक, कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन, साधना साप्ताहिक या सगळ्यांबरोबर त्यांची नाळ जोडलेली होती. आणि यांच्या अनेक उपक्रमांमध्ये अलकाताई नेहमी काजरोलकर सरांबरोबर सहभागी असायच्या.

महाराष्ट्र अंनिस बरोबर तर अलकताईंचे पारिवारिक नाते होते. महाराष्ट्र अंनिसच्या मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी हे दोघे नेहमीच प्रेरणास्तंभ राहिलेले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील कोणताही मोर्चा, धरणे, आंदोलन असेल किंवा जिल्हा लेव्हल चे शिबिर, प्रशिक्षण किंवा इतर कोणतेही कार्यक्रम असतील तर काजरोलकर दाम्पत्य हे आवर्जून उपस्थित असतात. त्यांचे ‘अंनिस’ला आर्थिक, भावनिक, शारीरिक या सर्वच पातळ्यांवर योगदान राहिलेले आहे. मुंबईत तर अंनिसच्या कार्यक्रमात पुस्तक स्टॉल वर अलकाताईंना पाहण्याची जणू आम्हां कार्यकर्त्यांना सवयच झाली होती. नुकतेच 23 एप्रिलला झालेल्या मुंबई जिल्ह्याच्या प्रेरणा मेळाव्यात अलकाताईंनी स्वतःहून मुंबई जिल्ह्याची स्वयंअध्ययन विभागाची जबाबदारी स्वीकारलेली होती.

गेल्या 25 वर्षांपासून दोघेही वर्षातून 2 वेळा दोघांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करत आले आहेत. तसेच, गेल्या काही दिवसांत त्यांनी देहदान, अवयवदान, नेत्रदान चळवळीमध्ये स्वतःला खूपच वाहून घेतले होते आणि जातील तेथे ते याचा प्रचार करत होते. (वाईट वाटते की, या क्षेत्रात इतके काम करणार्‍या अलकाताईंच्या स्वतःच्या शरीराचे मात्र पोलीस केस आणि इतर अडचणीमुळे देहदान करता आले नाही.)

सर्व कामात दोघांचीही प्रचंड धावपळ आणि दमछाक होत असे. पण तरी अलकाताई नेहमीच तेवढ्याच उत्साहाने गोविंद सरांबरोबर सर्वत्र सहभागी असायच्या. गोविंद सर आणि काजरोलकर ही जोडी पुणे आणि मुंबईचे महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते व सेवा दल आणि इतर समविचारी चळवळीतील कार्यकर्त्यांना इतकी सवयीची झालेली आहे की आता अलकाताईंची उणीव ही फक्त गोविंद सर किंवा त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर आम्हा सर्वच कार्यकर्त्यांना तेवढ्याच तीव्रतेने जाणवत राहणार.

सचिन थिटे, मुंबई