Categories
अभिवादन

बहिर्‍यांनाही ऐकू जाईल अशा आवाजात त्यांना ऐकवावे लागेल : एन. डी. पाटील

ऑक्टोबर – २०१५

दि.20 ऑगस्ट 2015. ज्या ठिकाणी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची सनातनी शक्तींनी हत्या केली. त्या वि. रा. शिंदे पुलावरून विवेकाचा आवाज निनादला. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी डॉ. दाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे मारेकरी पकडण्यास अयशस्वी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारला इशारा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते.

केवळ कार्यकर्तेच नव्हे तर दाभोलकरांच्या विचाराला पाठबळ देणारे आणि अंनिसला बळ देणारे विचारवंतही येथे जमा झाले होते. त्यात हुसेन दलवाई, निखील वागळे, सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे, अतुल पेठे आदि मीडिया व कलेच्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. अंनिसच्या कलाकारांनी याप्रसंगी, अभिवादनपर आणि स्फूर्तीगीते गायली. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाट्याच्या संहितेचे पुस्तक प्रकाशन झाल्यावर रिंगण नाट्याचा बहारदार प्रयोग झाला.

नियोजनानुसार पुढे हलगी, आणि डफाच्या निनादात आणि घोषणांनी दुमदुमत पुणे शहर फेरीला आरंभ झाला. फेरी वि.रा.शिंदे पूल ते मनोहर मंगल कार्यालयापर्यंत दीड तासात पोहोचली. तीन-तीनच्या गटांनी रांगा करून शिस्तीत चाललेल्या या फेरीची लांबी दीड किलोमीटर होती. अंनिस आणि समविचारी संघटनांचा या फेरीत सहभाग होता.

ठीक 10.50 ला मनोहर मंगल कार्यालयात सभेला सुरवात झाली. विचार पीठावर डॉ. हमीद दाभोलकर, सुभाष वारे, एकनाथ पाटील, सुनिती सूर, मुक्ता मनोहर, अविनाश पाटील, हुसेन दलवाई, डॉ. भालचंद्र कांगो, डॉ. एन. डी. पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

डॉ. हमीद दाभोलकर यांनी तीव्र वेदना आणि खंत उराशी बाळगून पण संयमाने दाभोलकरांच्या खुन्याच्या शोधासाठीचा लढा चालू ठेवला आहे असे सांगून, ज्याच्या विरोधात दाभोलकर लढले ते प्लँचेटसारखे प्रकार करून या तपासाची कुचेष्टाच केली याबद्दल संताप व्यक्त केला. तपास अधिकार्‍यांच्या वारंवार बदल्या, सी.बी.आय.ला अधिकारी न पुरविणे यातून सरकारची, डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाबाबतची अनास्था स्पष्ट केली. डॉक्टरांच्या खुनानंतर अंनिसची चळवळ कशी जोमाने सुरू आहे याचे दाखले देत हमीद यांनी, चळवळीकडे तरूणाई मोठ्या संख्येने आकृष्ट होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

शासन संवेदनाहीनपणे वागत असले तरी जनसामान्याचा मोठा प्रतिसाद अंनिसला मिळत आहे. हे आश्वासक आहे असे सांगून सुभाष वारे यांनी शिवाजी राजाचा विकृत इतिहास मांडणार्‍यांच्या गौरवीकरणाचा निषेध केला. पण आमचे कार्यकर्ते सरकारप्रमाणे संवेदनाशून्य नाहीत हे आपण आज सिद्ध केले आहे. अनेक तरूणांनी व संघटनांनी अंनिसला जोडून घेतलंय. सांस्कृतिक अंगाने विद्रोह पुनरूज्जीवीत होत आहे याबद्दल आनंद व्यक्त करून वारे यांनी ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या’ घोषणेला वास्तवात आणू या असे आवाहन सर्वांना केले.

जनसामान्यासाठी संघर्ष करणार्‍या डॉक्टर आणि कॉम्रेड पानसरे यांना हितसंबंधियांनी संपविले. त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण जमलोय असं जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या प्रतिनिधी सुनिती सू. र. म्हणाल्या. विचार मांडणार्‍यांची हत्या होते हा इतिहास आहे आणि तो दु:खद आहे. पण विचार पुढे जातोच. गांधीजींच्या वाटेवरून दाभोलकरांचा विचार असाच पुढे जाणार आहे.

सभेच्या सुरवातीला अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सभेच्या उद्दिष्टांबद्दल स्पष्टीकरण दिले. समविचारी संघटनांनी एकत्र येऊन विचार व्यक्त करणे. लोकशाहीतील सरकारच्या कल्याणकारी भूमिकेला अदखलपात्र करणार्‍या वास्तवावर चर्चा घडवून आणणे. आपल्या नेत्यांच्या स्मरणवेळी केवळ भावनिक न होता पुढील रणनीतीचा एकत्रित चर्चा करून प्रतिकार्यक्रम ठरविणे. ही ती उद्दिष्ट्ये होत.

महाराष्ट्राच्या सर्व स्तरांतून तरूणाई, महिला, कष्टकरी कामगार आणि विद्यार्थी वाढत्या प्रमाणात एकत्रित येत असल्याचे चित्र दिसले. त्यांना महाराष्ट्र अंनिसला कसे जोडावयाचे? याचा विचार व्हावा. आपल्याला समविचारींना बरोबरच घेऊन पुढे जावे लागेल याचे भान ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. घटनेच्या चौकटीत लढत असून सुद्धा सरकारवर परिणाम होत नाही. याबद्दल खंत व्यक्त करून यावर उपाय काय? याचे उत्तरही त्यांनी दिले. संघटनेचे बळ वाढविणे आणि आपला अजेंडा अधिक कृतीशील करणे याशिवाय अन्य मार्ग नाही.

सामाजिक कार्यकर्ते खासदार हुसेन दलवाई यांनी सरकारी पातळीवर दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाबद्दल काय परिस्थिती आहे? याचा गौप्यस्फोट केला. त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनाचा विषय राज्यसभेत मांडला होता. सरकारमध्ये बसणार्‍यांपैकी ज्या व्यक्ती आणि संस्थांनी दाभोलकरांच्या खुनाची भलावण केली त्यांचा तपास प्रथम चालू ठेवायला हवा होता. पण तसे झालेले नाही. डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या दहशतवादी हल्ला समजून तपास लावायला हवा. असे मत मांडले.

या सत्राचा समारोप डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. डॉ. एन. डी. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सत्ताधारी या नात्याने डॉ. दाभोलकरांच्या तपासास विलंब लावणारे या आधीचे सरकार खर्‍या अर्थाने जबाबदार आहेत. सध्याचे सरकारही पाहिजे त्या गांभिर्याने या प्रश्नाकडे पहात नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून आपण आपल्या जागराला अधिक धार आणणे आवश्यक आहे. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारे दाभोलकर त्यांच्या कर्माने नेले असे कसे म्हटले जाते? अनेक संघटनांच्या वेगवेगळ्या आवाजाऐवजी एक आवाजात सरकारला जाब विचारावा लागेल. राज्यकर्ते बहिरे झाले असतील तर बहिर्‍यांनाही ऐकू जाईल अशा आवाजात त्यांना ऐकवावे लागेल. लढाई शेवटी आम्हीच जिंकणार आहोत. हे करत असताना विवेकाचा धागा पकडूनच आपल्याला पुढे जावे लागेल.

यानंतर नाशिक जिल्हा कायकर्ते गोराणे यांनी सर्वांच्या व्याख्यानांचा परामर्श घेऊन आभार प्रदर्शन केले.

सत्र नं.2

दुपारी 2 वाजता दुसरे सत्र सुरू झाले. विषय होता दाभोलकर-पानसरेंचा खून : माध्यमांची भूमिका

या सत्रामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे म्हणाले, आयुष्याची जेवढी वर्षे उरली आहेत तेवढी हत्यार्‍यांना गजाआड घालण्याकामी मी तुमच्याबरोबर आहे. ज्यानी ज्यानी नवीन विचार समाजाला दिला उदा. गांधीजी, आंबेडकर, दाभोलकर त्यांना त्यांना छळाला व मृत्यूला तोंड द्यावे लागले. त्यांचे खून हा समाजातील ‘फ्रेंडली फॅसिझम’ चा प्रकार आहे. तो छुपा व व्यापक स्वरूपाचा आहे. खरेतर ‘मारेकरी सापडले नाही’ असे म्हणणे चुकीचे आहे. ते शोधले गेले नाहीत, असे म्हणणेच योग्य आहे. दोन्ही सरकारांचे वर्णीय चारित्र्य भिन्न असले तरी त्यांचे वर्गीय चारित्र्य एकच आहे. ते गुन्हेगारांचे प्रतिनिधीत्व करणारे आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील, धर्माध वृत्तीचा खुनामध्ये अंतर्भाव असल्याने त्यांना तपासात आणू धजले नाहीत. त्याचा सेना-भाजप गैरफायदा घेतील अशी त्यांना भीती वाटली. आधीचे सरकार फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेत सत्तेवर आले. आता त्यांना या त्रिमूर्तीचे नावदेखील घेण्याचा अधिकार राहिला नाही. बदमाश लोक विवेकवादाचा गैरफायदा घेतात. माध्यमांच्या कार्यालयांवर हल्ला करणार्‍यांचा ते शोध घेऊ शकले नाहीत. बांगलादेशात 7 ब्लॉगर्सचे लागोपाठ खून झाले. आज भारताचा बांगलादेश होऊ घातला आहे. नथुरामचा वारसा सांगणारे फॅसिस्ट प्रवृत्तीचे लोक शासन व प्रशासनाच्या सर्व खात्यांमधून पसरले आहेत. अगदी पोलीस यंत्रणा, न्यायसंस्थेतील बहुतांश भाग याला अपवाद नाही. सर्व फॅसिस्ट सरकारच्या छत्राखाली जमा झाले आहेत. शांततेच्या मार्गाला आक्षेप नाही पण सगळ्या यंत्रणा खोट्या असतील तर काय करायचे? मिडियाने मदत केली असे सांगितले जाते. ते त्यांचे कर्तव्यच आहे.

यानंतर अ‍ॅड.मनिषा महाजन यांनी आभारप्रदर्शन करून सत्र संपल्याचे जाहीर केले.

सत्र क्र.3 अभिवाचन

दुपारी 3.15 वाजता अभिवाचनाचे सत्र सुरू झाले. यात अतुल पेठे, सोनाली कुलकर्णी, किशोर कदम, जितेंद्र जोशी, नागराज मंजुळे, सौमित्र (किशोर कदम), गिरीश कुलकर्णी, सुखटणकर आदिंनी सहभाग घेतला. पैकी सोनाली कुलकर्णी यांनी आपले स्वत:च लिहिलेले डॉ. दाभोलकरांच्या बरोबर प्रत्यक्ष काम करतांनाचे अनुभव लेखन होते. डॉक्टरांच्या सहवासात ज्यांनी ज्यांनी थोडाका होईना काळ व्यतित केला आहे त्या त्या सर्वांना काळजाची जखम भळभळून वाहू लागल्याचा अनुभव या वाचनाने दिला.

सत्र क्र.4 समारोप

मुक्ता दाभोलकरांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. यामध्ये वक्त्या स्मिता पानसरेंनी बाबाच्या जाण्याने लेकीला काय दु:ख होते हे मुलीला कळू शकते असे बोलून सभेच्या हृदयालाच हात घातला. भिन्नभिन्न क्षमता, गुण, स्वभाव असणार्‍या चळवळीतील कार्यकर्त्यांना एकत्रित बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणून नेतृत्व करणारा माणूस हरवल्याची जाणीव बाबांच्या जाण्यामुळे होते.

डॉ. दाभोलकरांसंबंधी बाबांच्या वक्तव्याची आठवण सांगताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “रेषेच्या दोन्ही बाजूला व्यक्ती उभ्या असतात. वेगवेगळे लढत असतात असे असले तरी डॉ. दाभोलकर आणि मी रेषेच्या एका बाजूला आहोत. आम्ही हातात हात घालून, बळ वाढवून लढणे गरजेचे आहे.” अविनाश पाटलांनी राजकीय भूमिका घ्यावी लागण्याची आवश्यकता आपल्या भाषणात केल्याचे सांगून त्या म्हणाल्या, आपण समाजाला तो कोणाच्या बाजूने उभा आहे हे विचारून प्रबोधन करावे लागेल. आम्ही विवेकवादी असलो तरी मवाळ नाही. आमचा विद्रोह सहनशील मार्गाने जाणारा आहे. आमचे संताप, चीड, निषेध अहिंसक मार्गाने जाणारे आहेत. त्यासाठी आमचा विरोध मात्र अधिक व्यापक, अधिक टोकदार बनवावा लागेल. खरे तर आम्हाला आणि समविचारी संघटनांना आता काय भूमिका घ्यायची हे ठरवण्यासारखे काही राहिले नाही. सर्वांनी रस्त्यावर एकजुटीने येऊन लढा तीव्र करण्याचीच केवळ गरज आहे.

हुतात्मा सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी त्यांना व त्यांच्या बंधुंना आलेल्या शासन दरबारचे चित्तवेधक अनुभव विस्ताराने कथन केले. न्यायालयातही सिस्टीमप्रमाणे न्याय मिळणे अवघड आहे. कारण संबंधित हितसंबंधी न्यायालयाशीही निगडित असतात. आयुष्याची 20-25 वर्षे न्यायालयाच्या पायर्‍या झिजवून देखील न्याय मिळेलच याची गॅरंटी नाही. राजकीय व्यवस्थेने सगळीकडेच भ्रष्टता आणली आहे.

यावर आशावाद व्यक्त करताना सूत्रसंचालक मुक्ताताई म्हणाल्या, “बदल आपल्या संघटित ताकदीतूनच येईल. यापुढील वक्त्या डॉ. शैला दाभोलकर म्हणाल्या, डॉक्टरांना हरपल्याची जखम अद्याप ओली आहे. ती भरून येणे शक्यही नाही. आपण सर्वांनी दोन वर्षांत जी निर्भयता व निती दाखवली ती स्तुत्य आहे.

सत्याकडे जाणारा रस्ता सहनशीलतेतूनच जातो. असे सर्व समविचारी संघटनाही सांगतात. याकरिता शोषित, पीडित वंचितांना त्यांची ताकद देणे आवश्यक आहे. समाजाने लोकशाहीच्या वाटेने जाणे आवश्यक आहे. हे डॉक्टरांनी प्रत्यक्ष आचरणात आणले होते. माणसातली सनातनी वृत्ती राजकीय शक्ती वापरून आपल्याला घातपात करू शकतात. असे ते म्हणाले होते. असे असले तरी माझी वाट निर्भय आहे हे दाखवून देण्यासाठी ते लातूरला एकटे उपोषणाला गेले. जाती व धर्माने आमच्यात भिंती उभ्या केल्या. नागरीक म्हणून मला कसे सुधारता येईल या दृष्टीने विचार करून वागलो तरच आम्ही डॉक्टरांना खर्‍या अर्थाने अभिवादन केले असे होईल.

समारोपाचा समारोप करताना अविनाश पाटील म्हणाले, दाभोलकर-पानसरेंच्या स्मृतीला आज स.7 वाजल्यापासून आता सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्व महाराष्ट्र विवेक-विज्ञानाचा जागर आपापल्या ठिकाणी करून अभिवादन करीत आहे. या स्पंदनांची दखल प्रशासनाने घेणे व आपणही जागृत राहाणे अभिप्रेत आहे. म.अंनिस समाजाला दृष्टिकोन देणारी संघटना आहे. डॉ.दाभोलकरांनी प्रथम पंचवीस वर्षांच्या कालावधीकरिता कृती चतु:सूत्री तयार केली आहे. यातील चवथे सूत्र म्हणून प्रत्येक नागरिकाच्या क्षमतेचा विचार व विकास करण्याचे धोरण आपले राहील.

डॉ. हमीद दाभोलकर सभागृहाला ज्ञात करताना म्हणाले, संघटित आवाजाला प्रतिसाद मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून दिला. पाच पोलीस अधिकार्‍यांच्या नेमणुकीची व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी तपासाकरता केली. तसेच हायकोर्टाने देखील सुनावणीची तारीख दिली आहे. यानंतर राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

यानंतर ‘हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब’ या नेहमीच्या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

वार्तांकन – देवीदास इंगळे