अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे घेण्यात आलेल्या रिंगणनाट्य कार्यशाळेचा समारोप आर. आर. विद्यालयात झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी सामाजिक एकात्मतेवर आधारित नवीन बसस्थानकात ‘सापडलं रे सापडलं’ या नाटकाचे सादरीकरण केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित गीते, घोषवाक्ये सादर केली. या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रा. योगेश कुदळे, अवधूत कांबळे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत अंनिसचे कार्यकर्ते आणि नाट्य व लघुपट दिग्दर्शक अवधूत कांबळे (इस्लामपूर) यांनी ‘जोहॅरी विंडो’ याविषयी माहिती दिली. जो आणि हॅरी हे दोन मानवशास्त्रज्ञ होते. त्यांनी तयार केलेली ही खिडकी म्हणजे आपल्या कार्यशाळेचा आणि जगण्याचा एक भाग आहे, हे त्यांनी विस्तारपूर्वक सांगितले. याशिवाय एकाग्रता, ओढणीच्या सहाय्याने विविध कलाप्रकार कसे दाखवता येतात आणि मानवी गुंतागुंतीची साखळी या विषयावरील बौद्धिक खेळदेखील विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले.
कल्पनाशक्तीला चालना देण्याचे काम
तरुणांमधील कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. यात गाणी कशी सादर करावीत, कुणा एकाच्या कल्पनेतून ही गाणी साकार न होता समूहातून एक-एक वाक्य जोडत नवीन गाणी तयार कशी करता येतात; तसेच शिबिरार्थींनी संविधान, अंधश्रद्धा निर्मूलन, जात व मानसमित्र या विषयांवर घोषवाक्ये तयार केली. शिबिरार्थींंनी ‘संविधान साक्षरता’ व ‘शोध मनाचा’ या विषयांवर तयार केलेल्या ‘सडक नाटका’चे सादरीकरण या वेळी करण्यात आले. शिबिरार्थींनी पथनाट्याच्या माध्यमातून क्रियाशील राहण्याचा संकल्प केला.
यांचा होता सहभाग
कार्यशाळेत जळगावचे पीयुष तोडकर, ओम मिटकरी, दुर्गेश आंबेकर, बुद्धभूषण मोरे, विशाल बाविस्कर, जागृती देशमुख, हर्षदत्त तिडकर, अमित शिरोळे; रावेर येथून राजेश रायमळे, विशाल हिरोळे, विशाखा हिरोळे; भडगावमधून फिरोज शेख, रवींद्र चौधरी, विवेकानंद पाटील सहभागी झाले होते. यासाठी संयोजक डी. एस. कट्यारे यांचे सहकार्य मिळाले.