कोपीष्ट, रागीट, उग्र दैवत म्हणून शनिकडे पाहिले जाते. त्यात शनि शिंगणापूरचा शनिदेव म्हणजे भलताच कडक. शनिशिंगणापूरमध्ये असलेल्या शनिदेवाच्या अस्तित्वामुळे तिथे चोरी होत नाही, चोरट्याने तिथे चोरी केल्यास त्याला शनिदेव तिथेच शिक्षा करतो. त्यामुळे तिथल्या घरांना दरवाजे नाहीत. शनिदेव स्त्रियांच्या बाबतीतही भलताच तटस्थ, अलिप्त. बाईची सावली देवाला चालत नाही. ग्रामस्थांनी शनिदेवासाठी चौथरा बांधून त्यावर शनिदेवाची मूर्ती बसवली आहे. शनिदेवाच्या मूर्तीला स्पर्श तर सोडाच, पण चौथर्यावरही बायकांनी जाऊ नये अशी ग्रामस्थ व शनिदेव विश्वस्तांचीच… नव्हे शनिदेवाची इच्छा आहे म्हणे. पण घडले विपरीतच. 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका युवतीने शनिच्या चौथर्यावर जाऊन शनिदेवाची पूजा केली, शनिला तेल वाहिले. कुणाला काही कळण्याच्या आत युवती चौथर्यावरून खाली आली व आली तशी निघून गेली. हे चित्र नेमके सी.सी. टी.व्ही. कॅमेर्याने टिपले. गावात चर्चा सुरू झाली. निषेधाचा सूर उमटला. गावकर्यांनी विश्वस्तांना जाब विचारला. मंदिर प्रशासनातले सात कर्मचारी निलंबित करण्यात आले. दुसर्या दिवशी बाईच्या स्पर्शाने अपवित्र झालेला शनिदेवाचा चौथरा व शनिदेव गायीच्या दुधाने अंघोळ घालून पवित्र करण्यात आला. माध्यमांनी या सर्व प्रकरणाची दखल घेत प्रसिद्धी दिली. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडीयातून चर्चा घडवून आणल्या. सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. त्यात आपल्या पुरोगामी(?) महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे (गणपती दूध पितो या तथाकथित चमत्काराला विरोध दर्शविणार्या मा. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या) वडील गेल्यानंतर परंपरा बाजूला सारून वडिलांच्या चितेला मुखाग्नि देणार्या बाईने – “माझ्या लहानपणापासून मला आठवते तसे, शनि चौथर्यावर महिला जात नाहीत, त्यांनी परंपरेचा आदर करावा, परंपरा मोडू नयेत,” असे मत व्यक्त केले.
भारतीय संविधानात सर्वांना समान न्याय, जात धर्म, लिंग या कोणत्याही निकषांच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला ऊणेपणा आणणार्या प्रथांचा त्याग ही सर्व तत्त्वे अधोरेखित केली, तसे भारतीय नागरिकाला अस्वस्थ केले व हमी दिली असताना चौथर्यावर जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार नाकारणे म्हणजे संविधानाने दिलेला उपासनेचा अधिकार नाकारणे, स्त्री-पुरुष समता नाकारून लिंगभेद करणे, स्त्रियांचा आत्मसन्मान दुखावणे व अनिष्ट प्रथा चालू ठेवणेच आहे. हे सर्व चालू ठेवावे, अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे भारतीय संविधानाचा अवमान करणेच नाही का? हे कोणी तुम्ही-आम्ही सामान्य नागरिकाने नाही तर ज्यांच्या खांद्यावर महिला व बालविकासाची धुरा ठेवली आहे, ज्यांनी ही धुरा समर्थपणे पेलेन अशी संविधानाची शपथ घेतली आहे, अशा मंत्र्यांनी अवमान केला आहे.

महिला व बालविकास मंत्र्यांच्या प्रतिक्रियेची दखल घेऊन त्यांना दिनांक 04/12/2015 रोजी अनावृत्त पत्र पाठवून, ‘चूल आणि मूल’ हेच बाईचे कार्यक्षेत्र सांगणारी परंपरा डावलून आपण आमदार का झालात? प्रथा, परंपरा बाजूला ठेवून राज्य घटनेची शपथ घेऊन आपण महिला व बालकल्याण मंत्रालयाचा कारभार का स्वीकारलात? शिक्षण घेतले तर धर्म बुडेल, असं परंपरा सांगत होती. ती मोडून आपण शिक्षण घेतलेच का, अशा प्रश्नांची सरबत्ती करत, वडिलांच्या निधनानंतर मुलाने चितेला अग्नि देण्याची प्रथा मोडीत काढत, आपण ते काम केले. मरणानंतर ‘पाणी पाजायला मुलगा हवा’ हा समज तकलादू ठरवत प्रथा-परंपरेला दिलेल्या धक्क्याने आपण अनेक महिलांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. पण ‘प्रथा-परंपरांचे पालन करून शनिचौथर्यावर न जाणे उचित’ अशा अर्थाचे वक्तव्य करून आपण आम्हास अतिशय वेदना दिल्यात, अशा भावनाही पोहोचवल्या. या पत्रास वृत्तपत्रांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी दिली.
हे सर्व घडत असताना अस्वस्थता वाढत होती. ‘मध्यवर्ती’शी संपर्क साधून अविनाश भाईंशी चर्चा सुरू होती. डॉक्टरांनी दोन हजार सालात केलेल्या शनि शिंगणापूरच्या सत्याग्रहाची सतत आठवत होत होती. पंधरा वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू यांच्या नेतृत्वाखाली स्त्री-पुरुष समतेचा आग्रह धरत ‘लिंगभेदाला नकार देतो, धर्म स्वातंत्र्याचा आदर करतो’ हे ब्रीदवाक्य घेऊन अहमदनगर येथे केलेले धरणे-आंदोलन, शिंगणापूरच्या मार्गावर, जाण्याच्या प्रयत्नात झालेली अटक, त्यानंतर दाखल केलेली याचिका, त्या आंदोलनात ‘अंनिस’मधील आमच्या प्रेरणास्थान असलेल्या शालिनीताई, निशाताई भोसले या तरूणी कॉ. बाबा अरगडे, आता आपल्यात नसलेले कुसळेसर व त्यांचे कुटुंबिय हे सर्व पुन्हा पुन्हा समोर येत होते. अहमदनगर मधल्या महिला संघटनांशी संपर्क सुरू होता. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते व त्यातूनच दिनांक 7 डिसेंबर रोजी कलेक्टर कार्यालयाबाहेर अहमदनगर येथे निषेध प्रदर्शन व धरणे आंदोलन करण्याची कल्पना पुढे आली. संपर्क बैठका सुरू झाल्या, तयारीसाठी केवळ तीन दिवसांचा वेळ मध्ये होता. प्रशासनास कळविणे, कार्यकर्त्यांना संपर्क करणे, फ्लेक्स, बॅनर, फोटो, घोषणा, पेंडॉल, लाऊडस्पीकर, जेवण व आंदोलनासाठीची सर्वच तयारी दोन दिवसांत करायची होती. शहाजींनी महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांना आंदोलनाचे मेसेज पाठविले. स्थानिक कार्यकर्त्यांना कॉ. बाबा रानडे, मी व अन्य कार्यकर्त्यांनी निरोप दिले. अविनाशभाई सतत संपर्कात होते. सुशीलाही सतत फोन करत होती. सविता (शेटे) माहिती घेत होती. अशा तीन दिवसांच्या तयारीत दिनांक 07/12/2015 रोजी अहमदनगर येथे कलेक्टर ऑफिसच्या समोर सकाळी अकरा वाजता केवळ दोन दिवस आधी निरोप मिळूनही महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यातील सुमारे शंभर प्रतिनिधी; त्यात विशेषतः राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, कार्यवाह माधव बावगे सर, सुशीला मुंडे, महिला विभाग प्रमुख प्रा. सविता शेटे, आरती नाईक, डॉ. गोराणे, वंदनाताई शिंदे, डॉ. मच्छिंद्र वाघ उपस्थित होते अहमदनगरमधील 11 स्त्री व समविचारी संघटनांचे 300 प्रतिनिधी हजर होते. निषेध प्रदर्शन व धरणे आंदोलनासाठी टाकलेल्या मंडपाच्या मागच्या बाजूला डॉक्टरांनी दोन हजार सालात केलेल्या सत्याग्रहाचे फोटो, ‘अंनिस’ची भूमिका सांगणारे फ्लेक्स, स्त्री-पुरुष समतेचे घोषवाक्य, पंकजा मुंडेंना पाठवलेल्या पत्राच्या बातम्या व सहभागी संघटनांचे बॅनर लावण्यात आले होते. आंदोलनाला सुरूवात करताना डॉ. दाभोलकरांना अभिवादन करणारे गीत शालिनीताई व सहकार्यांनी गायले. प्रास्ताविक मी केले. त्यानंतर राज्याचे कार्याध्यक्ष अविनाशभाईंनी स्त्री-पुरुष समता व निषेध प्रदर्शन व आंदोलनाची गरज, त्यामागची भूमिका विस्ताराने विषद केली. कॉ. बाबा आरगडेंनी पंधरा वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्याग्रहाच्या आठवणी, प्रसंग, त्यातील अडचणी-यश-अपयश या बाबींचा ऊहापोह केला. निशाताई भोसलेंनीही 2000 सालात झालेले आंदोलन व आजचे आंदोलन यावर भाष्य केले. त्यानंतर दिवसभरात शेकडो लोकांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. बावगेसर, सविता शेटे, रुक्साना मुल्ला, न्यायाधारच्या निर्मला चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

दुपारच्या सत्रात अहमदनगर जिल्ह्याचे ‘अंनिस’चे अध्यक्ष अरूण पाटील कडू हेही आंदोलनात सामील झाले. त्यांनीही शनि शिंगणापूर, तिथली परिस्थिती, धार्मिक दहशतवाद यावर भाष्य केले. समविचारी संघटनांच्या प्रतिनिधींनीही स्त्री-पुरुष भेदभावाचा निषेध करत शनिमूर्ती व चौथरा दुधाने धुण्याच्या कृतीवर हल्लाबोल केला.
दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात साडेतीन वाजता कलेक्टर व त्यांची यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने महिला तहसीलदार बढे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. निवेदनात 1) मूर्ती शुद्धीकरणाचा निषेध 2) पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा निषेध 3) ज्या स्त्रिया मंदिर, चौथरा किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी जाऊन देवाची अगर पूज्य असलेल्या प्रतीकाची पूजा अगर भक्ती करू इच्छित असल्यास मज्जाव करू नये. 4) भारतीय राज्य घटनेच्या विरोधात कृती करणार्या विश्वस्तांवर कार्यवाही व्हावी, अशाप्रकारे निषेध व्यक्त करत मागण्या करण्यात आल्या. त्यानंतरही धरणे आंदोलन व निषेध प्रदर्शन सुरूच होते. सायंकाळी 5 वाजता अविनाशभाईंनी आंदोलनाची पुढील दिशा, करावयाची कामे, पाठपुरावा, उपक्रम याविषयी सविस्तर मांडणी करून ‘हम होंगे कामयाब’ या गीताने समारोप केला. नगर शाखेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रशांत पानसरे, अश्विन बोर्डे, प्रा. अशोक गवांदे यांनीही चांगला सहभाग दिला. दिवसभर आंदोलनात सहभागी होणार्या न्यायाधार व अन्य दहा संघटना, लोकांच्या भेटी, पाठिंबा व विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनीक मीडियाने घेतलेली दखल ही अतिशय उल्लेखनिय बाब आहे. माध्यमांमुळे आंदोलनाची चर्चा महाराष्ट्रभर झाली. आंदोलनाला या संबंधाने अनेक फोन येत होते. कलेक्टर अहमदनगर यांच्याकडून निवेदनाची प्रत सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आली. त्यांनी लेखी उत्तर दिले आहे. परंतु ते अपुरे व संदिग्ध आहे. हा समतेसाठीचा लढा सुरूच आहे, सुरूच राहाणार. पण हे सर्व सुरू असतांना सतत डॉक्टर डोळ्यासमोर येत होते. डॉक्टरांशी माझे मन हितगुज करत होते व पुन्हा पुन्हा सांगत होते, ‘डॉक्टर, पंधरा वर्षांपूर्वी तुम्ही सुरू केलेला लढा आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. पंधरा वर्षांपूर्वीची परिस्थिती फारशी बदलली नसली तरीही आपण निश्चितच एक दिवस यशस्वी होऊ.’
लढेंगे-जितेंगे…!
लेखिका – अॅड. रंजना पगार–गवांदे
संगमनेर, मो. 9850491611