‘तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे. ती उतरविण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येणार आहे. जमणार असेल तर सांग म्हणजे ती तुझ्यावर केलेली करणी दूर करतो’ असे सांगत कोर्टी येथील एकाकडून 24 हजार रुपये उकळून आणखी पैसे न दिल्याने जादूटोणा करण्याची भीती दाखविणार्या वहागाव (ता.कराड) येथील तृतीयपंथीय भोंदूचा अंनिस व तळबीड पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून पर्दाफाश केला. आतिष संभाजी पाटील (वय 40, रा.वहागाव झोपडपट्टी) असे या भोंदूगिरी करणार्या तृतीयपंथीयाचे नाव आहे. तो स्वत:ला ‘गुरूआई’ म्हणून घेत होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरातील अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असल्याने व ट्रॅक्टरवरील चालक उचल दिलेले पैसे घेऊन काम सोडून पळून गेल्याने; तसेच कामधंद्यात सातत्याने अपयश येत असल्याने कोर्टी येथील सुभाष जगन्नाथ यादव (वय 45) हे त्रस्त होते. यावर उपाय म्हणून त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांने त्यांना वहागाव (ता.कराड) येथील झोपडपट्टीत असलेली गुरूआई ही देवऋषी असल्याचे सांगून तिच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे यादव हे दि.2 फेबु्रवारी रोजी वहागाव येथील झोपडपट्टीत राहणार्या गुरूआई उर्फ आतिष पाटील याने यादव यांना ‘तुझ्यावर कोणीतरी करणी केली आहे. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येणार आहे. जमणार असेल तर सांग म्हणजे मी तुझ्यावर केलेली करणी दूर करतो’ असे सांगितले. त्यास यादव यांनी तयारी दर्शविल्यानंतर तृतीयपंथीय पाटील याने ‘पूजेचे साहित्य आणून ठेव मी कोर्टीत घरी येईन’ असे सांगितले. त्यानंतर तृतीयपंथीय आतिष पाटील याने दि.2 ते 6 फेबु्रवारी या दरम्यानच्या कालावधीत ‘तुझी करणी दूर केली आहे’, असे सांगून यादव यांच्याकडून वेळोवेळी एकूण 24 हजार रुपये घेतले. आता ‘तुला फरक पडेल’ असेही भोंदू पाटील याने सांगितले. मात्र 24 हजार रुपये मिळाल्यानंतरही आतिष पाटील हा गप्प बसला नाही. त्याने यादव यांना फोन करून आणखी पैशांची मागणी सुरू केली.
वारंवार पैशांची मागणी केल्यानंतरही यादव हे पैसे देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तृतीयपंथीय पाटील याने यादव यांची भेट घेतली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करत विचित्र हावभाव करून भीती दाखविली. ‘तुला आता माझ्या देवाकडून सोडणार नाही, तुला दाखवते, तुझी करणी तुझ्यावरतीच उलटवते. तुझ्या नाकातोंडातून रक्त बाहेर काढते. तुझ्या मुलाबाळांचा संसार उद्ध्वस्त करते. तुला माझ्यासारखा बनवून टाळ्या वाजवण्यात लावते’ असे म्हणून तृतीयपंथीय पाटील याने यादव यांना त्यांच्यावर अघोरी जादूटोणा करण्याची धमकी दिली. सदरचा प्रकार सुभाष यादव यांनी त्यांच्या मित्रांना सांगितला. त्यानंतर मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार यादव कुटुंबियांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेऊन घडलेली हकिकत सांगितली.
त्यानंतर यादव यांच्यासोबत ‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस प्रशांत पोतदार, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, सातारा जिल्हा कार्याध्यक्ष शंकर कणसे, सातारा जिल्हा सचिव दादासाहेब पवार, तसेच सिताराम चाळके, भगवान रणदिवे, मारुती थोरात, सुनील रणदिवे, शालिनीताई वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळबीड पोलीस ठाण्यात येऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांची भेट घेतली. त्यानंतर सुभाष यादव यांची फिर्याद नोंद करून तळबीड पोलिसांनी ‘अंनिस’ पदाधिकार्यांसमवेत वहागाव येथील झोपडपट्टीत तृतीयपंथीय आतिष पाटील याच्या घरावर छापा घालून त्यास ताब्यात घेतले. आतिष पाटील हा स्वत:ला गुरूआई म्हणवून घेत वहागाव परिसरात जादूटोणा करत लोकांची फसवणूक करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तृतीयपंथीय आतिष पाटील हा वहागाव येथील झोपडपट्टीत राहत असला तरी त्याच्या घरात अलिशान सोयी-सुविधा होत्या. त्याच्या घरात बुवाबाजीचे साहित्यही पोलिसांना आढळून आले. याप्रकरणी तळबीड पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3 सह अनुसूचित 2 व 5 आणि भादंवि कलम 506 अन्वये गुन्हा नोंद केला असून या गुन्ह्यात तृतीयपंथीय भोंदू आतिष पाटील यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास सपोनि विद्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तारळेकर करत आहेत.
-प्रशांत पोतदार
लेखक संपर्क : 9404891072