Categories
प्रासंगिक

वाघजाई देवी यात्रेत अंधश्रद्धा निर्मूलनाचा जिवंत देखावा

जून – २०१७

सातारा जिल्ह्यातील धावडशी हे अत्यंत महत्त्वाचं गाव. दरवर्षी वाघजाईदेवीच्या यात्रेत प्रथेप्रमाणे देवीची पालखी अत्यंत दिमाखदार अशा मिरवणुकीने संपूर्ण गावात रात्री 12 ते सकाळी सहापर्यंत वाजतगाजत फिरवली जाते. यामध्ये अनेक सोंगे विविध ट्रॉली ट्रॅक्टरवर सजवली जातात. या वर्षी याला अत्यंत आगळेवेगळे व सकारात्मक प्रबोधनाचे रूप देण्याचे गावातील नवजवान मित्रमंडळ, नेहरू युवा मंडळ व सिद्धिविनायक ग्रुप या तिन्ही तरुण मंडळातील कार्यकर्त्यांनी ठरवले.

ज्या सातार्‍यातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ संपूर्ण महाराष्ट्र आणि खरे तर जगभर गाजली, त्याचे प्रणेते शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पक नेतृत्वाच्या खडतर अशा अठरा वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्रात लागू झालेला जादूटोणाविरोधी कायदा नेमका काय आहे, याचा चित्ररथ करूनच त्या चित्ररथावरील स्टेजवर जिवंत बहारदार असा चमत्कार सादरीकरणाचा देखावा सादर करण्यात आला. भोंदू मांत्रिकाच्या वेशात भगवान रणदिवे चित्तथरारक चमत्काराचे सादरीकरण करत होते, तर कार्यकर्त्याच्या भूमिकेत प्रशांत पोतदार त्या चमत्कारामागील विज्ञान व हातचलाखी ग्रामस्थांना समजावून सांगत होते.

रात्री बारा ते पहाटे चारपर्यंत रंगलेल्या या मिरवणुकीत जळता कापूर खाणे, जिभेतून त्रिशूळ आर-पार करणे, पाचशे टोकदार खिळ्यांच्या पाटावर झोपणे इत्यादी चित्तथरारक चमत्कार पाहून धावडशीमधील हजारोंच्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. या सादरीकरणाला साथ होती, प्रभावी अशा- ‘चला गड्यांनो पाऊल टाका पुढ रं, उखडून टाकू अंधश्रद्धेची मूळ रं, गल्लोगल्ली गावामंधी, भोंदू बुवा वाढलं,’ अशा बहारदार संगीतमय गीतांची. तरुणाई तर अगदी बेभान होऊन यावर नाचत होती.

जत्रा-यात्रांमध्ये खरे तर अशा प्रकारे पुरोगामी विचारांचा प्रबोधनात्मक देखावा; तोही जिवंत दाखवण्याची सातार्‍यातील ही पहिलीच घटना ठरली. जत्रा-यात्रांमध्ये अशाप्रकारे आगळावेगळा समाजप्रबोधनपर पायंडा पाडणार्‍या तरुण मंडळातील युवकांचे अंनिसच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या चित्ररथाचे कौतुक गावातील अनेक मान्यवर नागरिकांनी केले.

प्रशांत पोतदार, राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस

9421121328