Categories
संपादकीय

विचारांची मशाल धगधगत ठेवूया!

वार्षिकांक - २०१५

सन 2015 तील नोव्हेंबर-डिसेंबरचा जोड विशेषांक प्रसिद्ध करीत असताना समाधान आणि आनंद वाटत असला, तरी एक रूखरूख मनाला लागून राहिली. हा अंक 15 दिवस उशिराने प्रसिद्ध झाला याबद्दल संपादक मंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. आपणा सर्व वाचकांना, सभासदांना, कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना माहीत आहे की, आपल्या मासिकाचे आणि ‘महाराष्ट्र अंनिस’चे संपूर्ण अर्थकारण या विशेषांकातील जाहिरातींवर अवलंबून असते. यावर्षी दिवाळी लवकर आल्याने कार्यकर्त्यांना जाहिरात जमा करण्यासाठी दिवाळीनंतर प्रयत्न करावे लागले. नोव्हेंबर अखेरपर्यंत जाहिरातींचा ओघ सुरू राहिल्याने अंक प्रसिद्ध होण्यास विलंब लागला. आपण सर्वांनी विशेषांकासाठी मोठ्या संख्येने जाहिराती जमा करून इच्छित लक्ष्य पुरे करण्यास कष्ट घेतले, त्याबद्दल ‘महाराष्ट्र अंनिस’ आणि संपादक मंडळ कृतज्ञता व्यक्त करीत आहे.

प्रतिकूल वातावरणात ‘महाराष्ट्र अंनिस’ची सर्व सेना संघर्षमय वाटचाल करीत आहे. अहिष्णुतेचे ढग भारतात आणि जगभर दाटत चाललेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ले होत असताना आशेचा किरण दिसू लागला आहे. कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातील बुजुर्ग, अभिव्यक्तीवरील हल्ल्याच्या विरोधात आवाज उठवू लागलेत. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येनंतर असहिष्णुतेच्या विरोधात रान पेटू लागले आहे. या लढाईत ‘महाराष्ट्र अंनिस’ आपल्या सहकार्यामुळे विचाराची मशाल धगधगत ठेवेल, याची आम्ही ग्वाही देतो.

सातशे पानाच्या अंकातील साहित्य वैचारिक समृद्धतेने परिपूर्ण आहे. आसाममधील डाकीण प्रथेचे विनायक सावळे आणि राहुल थोरात यांनी केलेले रिपोर्टिंग अजूनही या देशात स्त्रिया कशा अन्यायपीडित आहेत, याचे विदारक दर्शन करणारे आहे. मानसोपचार क्षेत्रातील उणिवामुळे मंदिरे आणि दर्ग्यात कसे अंधश्रद्ध उपचार चालतात, याचे दर्शन सैलानीबाबाच्या दर्ग्यावरील लेखातून भयचकित करते. गावोगावच्या बुवाबाबांवर जादूटोणाविरोधी कायद्याने वचक बसू लागलाय; पण उच्चभ्रू मंडळींच्या तथाकथित अध्यात्मिक बुवाबाजीला अजूनही लगाम नाही. राधे माँ या आध्यात्मिक बुवाबाजी करणार्‍या बाईची काळी बाजू मांडणारा लेख वाचकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल.

चित्रपट आणि नाट्यक्षेत्रात विवेकवादाचा आवाज जागता ठेवणारे दिग्दर्शक आणि कलावंत यांचे अनुभव कथन हे या अंकाचे खास वैशिष्ट्य ठरेल. यानी विवेकवाद केवळ कलाकृतीत आणला नाही तर स्वत:च्या जीवनातही विवेकवादी वाटचाल कशी केली या विषयीचे त्यांचे अनुभव कथन प्रेरणादायी आहे. याचबरोबर सुप्रसिद्ध सिने-नाट्य विवेकवादी कलावंत डॉ.श्रीराम लागू यांची मुलाखत हे या अंकाचे वेगळेपण ठरेल.

मूलतत्त्ववाद, इतिहासाची मोडतोड, असहिष्णुता या विषयावर विचारमंथन व्हायलाच हवे. रोमिला थापर, एजाज अहमद, किरण मोघे, राम पुनियानी यांचे या संदर्भातील लेख हे या अंकाचे खास वैशिष्ट्य ठरेल.

‘अंनिस’च्या भविष्यकालीन वाटचालीबाबत ‘महाराष्ट्र अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी वाचकांशी त्यांच्या डायरीद्वारे संवाद साधला आहे. तो वाचकांनी जरूर परिशीलन करावा.

याशिवाय कविता, कथा, कार्यकर्ता परिचय, फसवे विज्ञान आणि ‘बालकुमार’साठीचे साहित्य अशा नेहमीच्या सदरांनी अंक सजला आहे. संपादक मंडळ, व्यवस्थापकीय स्टाफ व आपणा सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे यश संपादन केले आहे. अंकात त्रुटी असल्या तर आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात.