विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ही महाराष्ट्रातील अग्रगण्य शिक्षणसंस्था. ही संस्था महाराष्ट्र अंनिसला नेहमीच विविध स्वरुपात योगदान देते. या संस्थेचे संस्थापक बापूजी साळुंखे यांच्या सुशीलाबाई या पत्नी. विवेकानंद संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन!
दि. 4 सप्टेंबर रोजी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती आहे. त्यांचे जीवन म्हणजे शिक्षणमहर्षी बापूजी आणि संस्थेशी समांतर असे होते. सन 1940 मध्ये सुशीलादेवींचा विवाह ध्येयवेडे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार हे ध्येय उराशी बाळगणार्या बापूजींशी बेळगाव येथील माळावरील मारुती मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने खादीचे हार एकमेकांना घालून, अक्षता न वापरता संपन्न झाला. त्यावेळी बापूजी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात बी. ए. च्या दुसर्या वर्षात शिकत होते. त्यांचे मानसपिता व गुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी त्यांना कर्नाटकातील सोंडूर संस्थानच्या घोरपडे घराण्याचा इतिहास संशोधन करण्यास पाठविले. आपल्या विशुद्ध चारित्र्याने त्यांनी सोंडूरनरेश घोरपडे यांचे मन जिंकले. नरेश यांनी बापूजींना आपल्या राजपुत्रांसाठी राजगुरू म्हणून नियुक्त केले. बापूजी आता चार राजपुत्र व एक राजकन्या यांना संस्कृत, इंग्लिश व गणित शिकवू लागले. याचवेळी नरेश यांनी बापूजींना राहण्यासाठी राजवाड्यातील एक ऐश्वर्यसंपन्न हॉल दिला होता. याचवेळी बापूजींना आपल्या नवविवाहित पत्नी सुशीलादेवींना सोंडूरला बोलावून घेतले. हॉल मोठा होता; पण तेथे एकही संसारोपयोगी वस्तू नव्हती. सुशीलादेवींनी डबे नसल्याने जमिनीवरच धान्याचे व पिठाचे ढीग भरून ठेवले. अशा प्रकारे बापूजींचा संसार शून्यातून सुरू झाला.
1955 ला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था बापूजींनी 5 माध्यमिक विद्यालये, 2 वसतिगृहे आणि मुलींचे ट्रेनिंग कॉलेज अशा 8 संस्कृती केंद्राद्वारे रुपये 63000 बजेट वर सुरू केले. बापूजींच्या मृत्युसमयापर्यंत संस्थेची 373 संस्कृती केंद्रे रुपये 500 कोटी बजेट असणारी संस्था समाजाला अर्पण केली. या सर्व कार्यात संस्थामातेची अंत:करणापासून साथ होती. बापूजींच्या शेवटच्या दुर्दैवी आजारपणात त्यांना आपल्या लहान मुलाप्रमाणे सांभाळून शिक्षणमहर्षी बापूजींची माता झाली. अशा संस्थामातेला अंत:करणापासून वंदन!
– डॉ. शरद साळुंखे, कोल्हापूर