‘स्त्री–पुरुष तुलना’ हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी सन 1882 मध्ये लिहिले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘स्त्री–पुरुष तुलना’ अथवा ‘स्त्रिया व पुरुष यात साहसी कोण?’ हे स्पष्ट दाखविण्याकरिता हा निबंध ताराबाई शिंदे यांनी रचिला असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ज्या काळात ‘चूल आणि मूल’ हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र मानले जात होते, जगात कुठेच स्त्रीवादी विचारांचा उदय झाला नव्हता; अशा काळात ताराबाई शिंदे यांनी परखड शब्दांत स्त्री–पुरुष नात्यासंबंधी व स्त्रियांच्या शोषणासंबंधी अत्यंत मूलगामी प्रश्न उपस्थित केले आहेत. सन 1882 साली ‘स्त्री–पुरुष तुलना’ या नावाचे पुस्तक लिहावेसे वाटणे, हेच क्रांतिकारक आहे.
साधारणत: 1850 ते 1920 हा ताराबाईंचा काळ. बुलढाणा येथील बापूजी हरी शिंदे हे ताराबाईंचे वडील. बापूजी शिंदे सधन शेतकरी होते. ते बुलढाणा येथील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होता. अशा वातावरणात ताराबाई वाढल्या. बापूजी शिंदे यांनी आपली चार मुले आणि पाचवी मुलगी यांच्यामध्ये भेदभाव केला नाही. मुलांच्या बरोबरीनेच तिला वाढविले. नवनवे शिकण्यास उत्तेजन दिले. ताराबाईंना शिक्षणाची आवड होती. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या. त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते.
ताराबाईंचे वाचन अफाट होते. त्या वर्तमानपत्र वाचत. घडणार्या घटनांचा स्त्री म्हणून अन्वयार्थ लावत असत. रामायण, महाभारतासारखे अभिजात वाङ्मय, पुराणे, आख्यान, काव्ये, समकालीन मराठी साहित्य, संस्कृत ग्रंथ इत्यादींचे उल्लेख त्यांच्या लेखनात सतत येतात. हे सारे केवळ त्यांनी वाचलेले नाही, तर त्यामध्ये मांडलेल्या विचारांबद्दल ताराबाईंची मते ठाम होती. त्यांनी समकालीन साहित्याची जी समीक्षा केली आहे, त्यामध्ये त्यांच्या चिकित्सक दृष्टीचा प्रत्यय येतो.
ताराबाई घोड्यावर बसून स्वत: शेताचा कारभार पाहत. एखाद्या पुरुषाप्रमाणे कोर्टातील कामेही त्या स्वत: करीत. ताराबाईंची मूर्ती ठेंगणी-ठुसकी होती. वाचन करून त्यांच्या डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा लागला होता. म्हातारपणी त्यांच्या हाती सतत काठी असे. आपल्या मोठ्या ऐटीत; पण पायी-पायीच शेतात जात, असे त्यांना पाहणार्या लोकांनी लिहून ठेवले आहे. इतिहास, पुराणे, समकालीन साहित्यही त्यांनी वाचलेले असावे. अवतीभवती असलेल्या स्त्रियांचे जगणे, स्वत:ला आलेले अनुभव यावर त्यांचे चिंतन चालू असे. शोधक बुद्धीने त्यांनी केलेल्या ग्रंथचिकित्सेतून त्याचे प्रत्यंतर येते.
एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांची जी एक प्रतिमा आपल्यासमोर आहे, त्यापेक्षा ताराबाई काळाच्या कितीतरी पुढे होत्या. सर्व सामाजिक संकेत झुगारून देऊन स्त्रीच्या रूढ प्रतिमांना धक्के देत अत्यंत निर्भयपणे त्यांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले आहेत. ज्या काळात उच्चवर्णीय समाजातही लिहिणार्या स्त्रियांचे प्रमाण कमी होते, ज्या लिहीत होत्या, त्यांची वैचारिक झेप फारच कमी होती. कुटुंबकथांच्या पुढे त्यांचे लेखन गेले नव्हते. अशा काळात ताराबाई शिंदे ‘स्त्री आणि पुरुष यात साहसी कोण?’ हे स्पष्ट करून दाखविण्याकरिता निबंध लिहिण्यास सज्ज झाल्या होत्या. या एकाच पुस्तकाने मराठी साहित्यामध्ये त्यांचे नाव अजरामर केले आहे.
“ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टी निर्माण केली, त्यानेच स्त्री-पुरुष निर्माण केले, तरी सर्व प्रकारचे साहस दुर्गुण स्त्रियांचेच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत, तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत, हे अगदी स्पष्ट करून दाखवावे या हेतूने हा लहानसा निबंध माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचला आहे. यात अमुकच जाती किंवा कूळ याकडे माझे मुळीच लक्ष नाही. स्त्री-पुरुषांची तुलना आहे.” (प्रस्तावना 1)
अशा शब्दांत ताराबाईंनी आपल्या लेखनाचे प्रयोजन स्पष्टपणे मांडले आहे. ताराबाईंनी एकूण स्त्रीजातीचा विचार केला आहे.
ज्या काळात स्त्रियांना तोंडातून उच्च स्वरात शब्द उच्चारण्यासही मनाई होती, अशा काळात ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष नात्यासंबंधी, स्त्रियांच्या शोषणासंबंधी मूलगामी प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना आणि पुरुषांना कसे वेगवेगळे नीतिनियम, कायदे आहेत, हे दाखवून दिले आहे. अशी विषमतेची वागणूक तिला देऊन कायम धर्माने, शास्त्राने, रुढीपरंपरांनी, समाजाने तिचे कसकसे शोषण केले आहे, हे वास्तव त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे. या पुस्तकात समाजाला खडबडून जागे करण्याचे सामर्थ्य आहे. मराठी गद्य लेखनाच्या प्रारंभीच्या काळात ताराबाई शिंदे यांची ही वैचारिक झेप मन चकित करते. ताराबाईच्या विचारात इतकी ताकद आहे की, शतकानंतर आजही स्त्री चळवळींना वाट दाखविण्याचे सामर्थ्य या लेखनात आढळते.
विजयालक्ष्मी खटला
‘स्त्री-पुरुष तुलना’ हे क्रांतिकारक लेखन निर्माण होण्यास ताराबाईंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कारणीभूत आहे, तसेच ताराबाईंना हे विचार व्यक्त करण्यास एक तात्कालीक कारणही घडले. त्या काळी देशभर गाजत असलेला ‘विजयालक्ष्मी खटला’ हे ते तात्कालीक कारण होय. या खटल्याचे स्वरूप काय आहे?
सुरत येथील विजयालक्ष्मी नावाच्या चोवीस वर्षांच्या ब्राह्मण विधवेने अनैतिक संबंधातून गरोदर राहिल्यावर समाजभयास्तव भ्रूणहत्या केली. तिच्यावर आरोप ठेवून खटला चालू झाला. तिला फाशीची शिक्षा झाली. पुढे मुंबई हायकोर्टात अपील केल्यावर जन्मठेप व नंतर जन्मठेपेवरून शेवटी पाच वर्षांची शिक्षा झाली. तथापि, यानिमित्ताने एकूणच स्त्रियांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. खटल्याची बातमी, अग्रलेख, अनुकूल-प्रतिकूल मतप्रतिपादन व चर्चा त्या वेळच्या प्रत्येक वृत्तपत्रांतून सुरू होती. या बातम्या वाचून-ऐकून ताराबाई अस्वस्थ झाल्या; परिणामत: अत्यंत प्रक्षोभक शब्दांत त्यांनी स्त्रियांची कैफियत मांडली आहे.
या संबंधातील विषयांची मांडणी ताराबाईंनी केली आहे.
1) विधवांना पुनर्विवाहाला बंदी असल्याने स्त्रियांची कुचंबणा होते आणि लाखो-कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे असह्य दु:ख कसकसे भोगतात व त्यापासून कसकसे अनर्थ होतात, यामागे पुरुषजातीने स्त्रीवर केलेला केवढा तरी अन्याय आहे.
2) विवाहित स्त्रीचे होणारे शोषण हा या पुस्तकातील दुसरा महत्त्वाचा विषय
3) पुरुषांच्या ठिकाणी असणार्या दुर्गुणांची मीमांसा ताराबाईंनी केली आहे.
या तीन विषयांच्या अनुषंगाने तीन पृष्ठांची प्रस्तावना व एकोणपन्नास पृष्ठांचे विवेचन अशी बावन्न पृष्ठांची विषयानुरूप मांडणी ताराबाई करतात.
‘स्त्री–पुरुष तुलना’चे प्रयोजन
एकोणिसाव्या शतकात समाजात स्त्रियांच्या परिस्थितीबाबत विचारमंथन चालू होते. सतीप्रथेबाबत विचार मांडले जात होते. संमतीवय काय असावे, याबाबत चर्चा सुरू होती. विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न मांडला जात हेता. क्वचित एखादा पुनर्विवाह झाला की, उलटसुलट विचार मांडले जात होते. स्त्रियांच्याबाबत उदार विचार करणारे एका बाजूला आणि दुसर्या बाजूला सनातनी मंडळी असा संघर्ष समाजात सुरू होता. अशा वातावरणात ताराबाईंसारखी संवेदनशील, व्यासंगी स्त्री स्त्रियांवरील आरोप ऐकून शांत कशी राहणार? “अलिकडे सर्व वर्तमानपत्रांत गरीब अबलांच्या दुष्कृत्यांविषयी बरेच छापून येते तरी हा महाअनर्थ मिटवून टाकण्यास तुम्ही कोणीच पुढे येत नाही, याचे कारण काय बरे?” असा प्रश्न करून त्या स्वत:च पुढे सरसावल्या.
“रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजींची नित्यनवी उदाहरणे दिसून येत असतानाही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्री जात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून, तळतळून गेले आहे. त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून राहवेना. तुम्ही एकसारखे सगळेच दगाबाज, कपटी आहात. तेव्हा तुम्ही एकमेकांचे झाकून नेता, ते उघड करून दाखविण्याला याच्याहीपेक्षा कडक जर दुसरे शब्द अगर भाषा असती, तर ती देखील मी वाकडी-तिकडी लिहिलीच असती.” (प्रस्तावना पृ. 81) अशा शब्दांत आपल्या लेखनाचे प्रयोजन त्यांनी स्पष्टपणे मांडले आहे.
इतिहास मीमांसा
भारतीय इतिहासात आणि समाजाच्या जडणघडणीत एकोणिसावे शतक महत्त्वाचे आहे. इंग्रजी शिक्षणाने प्रभावित झालेली इथली माणसे लिहू लागली. धर्माच्या निमित्ताने जे-जे वाईट लादले गेले आहे, त्याचा निषेध करू लागली. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, न्या. रानडे, आगरकर, महात्मा फुले इत्यादी नावे सांगता येतील. विधवा विवाहाला परवानगी नसणे, केशवपन, सतीप्रथा, स्त्री-शिक्षणाला बंदी अशा बाबींबद्दल चर्चा सुरू झाली, लेखन केले जाऊ लागले. महात्मा फुले यांनी जातीप्रथा व तिच्या माध्यमातून होणारे शोषण परखडपणे मांडले आहे. समाजाचे जे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक शोषण होते त्याच्या मुळाशी धर्म आहे, हे महात्मा फुले यांनी ठणकावून सांगितले; किंबहुना धर्मातल्या, पोथ्या-पुराणातल्या भाकडकथांच्या आधारेच बहुजन समाजाचे शोषण होत आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले. धर्माच्या आधारे ही केलेली इतिहासमीमांसा हा इतिहासाचा लावलेला अर्थ महत्त्वाचा आहे.
महात्मा फुले यांच्यानंतर बुद्धीच्या आधारे धर्मग्रंथांचा फोलपणा दाखविणारी एक परंपराच महाराष्ट्रात निर्माण झालेली दिसते. धर्माच्या निमित्ताने दडपलेला इतिहास शोधून काढणे आणि शोषणासाठी घुसडलेला चमत्काराचा भाग दूर करणे ही फुले परंपरेतील इतिहासमीमांसेची लक्षणे होत. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या मते, “महात्मा फुले यांच्या विचारांच्या अन्वेषण पद्धतीचा ज्यांच्यावर सर्वाधिक परिणाम झाला आहे, अशा त्या काळातील दोन व्यक्ती, कृष्णराव भालेकर आणि ताराबाई शिंदे. महात्मा फुले आणि भालेकर यांनी शोषितांच्या शोषणाची मीमांसा केली. प्रस्थापित धर्मामुळे शोषण कसे होते, याचे मोठे साद्यंत विवरण महात्मा फुलेंनी केले आहे. धर्मातील खुळचट कल्पनांचा आणि भाकडकथांचा फायदा शेवटी प्रस्थापित कसा घेतात, हे त्यांनी साकल्याने मांडले आहे. ताराबाई शिंदे यांचे लेखन याच पठडीतले आहे. महात्मा फुले यांनी एकूण शोषितांचा विचार केला. ताराबाईंनी मात्र आपले सगळे लेखन स्त्री शोषणावर केंद्रित केले. त्यांच्या मते खर्या धर्माप्रमाणे आज कोणी वागत नाही. शास्त्र-पुराणांप्रमाणे वागत नाही; परंतु पुरुषांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मात्र कायम धर्म पुढे येतो; किंबहुना सामान्यांच्या, दीनदुबळ्यांच्या शोषणासाठी धर्म पुढे येतो. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शोषणासाठी पुरुष धर्म राबवून घेतात. म्हणजे धर्म कुठे असो अगर नसो स्त्रियांच्या बाबतीत मात्र तो उरला आहे.” (ज्योतीपर्व पृ.186)
स्त्री आणि पुरुष जर एकमेकांना पूरक असतील, अपरिहार्य असतील, तरीही स्त्रीवर अन्याय का होतो? हा ताराबाईंचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर त्यांना सापडते ते पुरुषीवर्चस्वामध्ये आणि स्त्रियांच्या अज्ञानामध्ये. स्त्रियांना शिक्षण नाही, बाहेरच्या जगाचे ज्ञान नाही, अनुभव नाही. त्यामुळे त्या अंधश्रद्धाळू बनतात, कोणत्याही भूलथापांना बळी पडतात. अज्ञानासोबतच पुरुषी अहंकार, हाही अधिक घातक आहे.
पुरुषप्रधान समाजव्यवस्था
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत ‘स्त्री’चे शोषण होते, हे मत ताराबाईंनी स्पष्टपणे मांडले आहे. “स्त्रीधर्म म्हणजे काय? निरंतर पतीची आज्ञा पाळणे, त्याचे मर्जीप्रमाणे वागणे, त्याने लाथा मारल्या, शिव्या दिल्या, दुसर्या रांडा ठेविल्या, नवरोजी दारू पिऊन, जुवा खेळून, कफल्लक होऊन, शंख करीत, चोरी करून, कोणाचा प्राण घेऊन, फितूर, चहाडी, खजिना लुटून, लाच खाऊन जरी घरी आले, तरी स्त्रियांनी हे आपले कोणी जसे काही कृष्णमहाराजच गवळ्यांचे दही-दूध चोरून, चंद्रावळीला कलंक लावून आलेत, असे समजून परमात्म्यासारखी त्यांची हसतमुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर राहावे, हा स्त्री-धर्म.” (पृ.83) अशा शब्दांत ताराबाईंनी अत्यंत उपरोधाने तत्कालीन समाजातील स्त्री-धर्म कल्पनेबाबत चिकित्सक विचार व्यक्त केले आहेत. तत्कालीन पुरणाकथांमधून पातिव्रत्य, स्त्रीधर्म, पतीची आज्ञापालन करणे, यात स्त्री-जीवनाचे साफल्य आहे, हे स्त्रियांच्या मनावर बिंबवले जाई. पातिव्रत्याच्या नियमानुसार बायकोने नवर्याला देव मानून राहावे व त्याची सेवा करावी, असे सांगितले आहे. याबाबत ताराबाई विचारतात – “जर बायकोला नवराच देव तर नवर्याची वागणूक देखील देवाप्रमाणे नको का? बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी, तशी नवर्याने देखील त्याजवर देवाप्रमाणे ममता करून त्यांचे सुख-दु:ख जपावे की नाही?” (पृ.85)
तत्कालीन विवाह पद्धती
विवाह ही स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाची घटना; मात्र मुलीचे विवाहाच्यावेळी वधुपित्याचे वर्तन कसे असते, यावर ताराबाईंनी प्रकाशझोत टाकला आहे. त्यावेळी समाजात रूढ असणार्या विवाहाच्या तर्हा त्या सांगतात- “कित्येक बाप आपल्या नक्षत्रासारख्या दहा-अकरा वर्षांच्या मुली ऐंशी-नव्वद वर्षांचे श्रीमंत म्हातार्यास रुपयांची थैली व त्यांचे श्रीमंतीवर नजर ठेवून नवरा मेला तरी चिंता नाही. हिला पैशाला तर काही कमी नाही ना? दोन दिवस खाईल, पिईल, लेईल, नेसेल, एक नवरा नसला, तरी काय चिंता आहे?” असे म्हणून वाघाला जशी बकरी द्यावी, त्याप्रमाणे बेधडक देतात. कोणी सवतीवर मुली देतात, तर कोणाला लेकी फार असल्यामुळे तो आल्या वरास देतो. मग तो कसा का असेना. कोठे नवरा कुरुप, दुर्गणी, हीनवर, अतिशय जाच, मारहाण फार जप्ती, खाण्यापिण्याचेही हाल अशी हालअपेष्टा करणारा असला तरी त्याच्या स्वाधीन कसाबाच्या हाती गायीप्रमाणे कोणी आपल्या मुली सुपूर्द करतात, तर कित्येक श्रीमंत गृहस्थ आपल्या लेकीचे लाडाकरिता व आवडीकरिता एखादे गरिबाचे मुलाबरोबर लग्न करून ते जोडपे जवळच बाळगतात.” (पृ. 109) या तत्कालीन विवाहपद्धतीतील दोष ताराबाईंनी विस्ताराने सांगितले आहेत. “म्हातारा नवरा मेला म्हणजे तरुणपणाचे प्रज्वलित इंगळ पदरात वागवून दिवस कशाप्रकारचे काढायचे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सवतीवर मुली देण्याच्या संदर्भातही ताराबाईंनी नोंदविलेले निरीक्षण अतिशय वास्तव आहे. “दोघी सवतींना समसमान वागविणारे मुळीच असणार नाहीत. एकसारखी प्रीती दोघींवर असणार नाही. कारण प्रीती काही आंबा, जांब नाही म्हणून वाटून घेता येईल. प्रीती ही केवळ दुधाप्रमाणे आहे. दूध एकदा नासले म्हणजे जसे त्याचे फिरून दूध होत नाही, तशी प्रीती ही एकदा फाटली म्हणजे परत कधी जुळत नाही.” (पृ. 110) त्या काळात बालविवाह होत. पातिव्रत्याच्या पारंपरिक कल्पनांमध्येच स्त्रिया जगत होत्या. कुटुंबात तिला दुय्यमच वागणूक मिळे. अशा वेळी ताराबाई प्रीतीभावनेचे अंतरंग उलगडून दाखवत आहेत.
स्त्री–पुरुष नात्यातील असमतोल
स्त्री-पुरुष नात्यांतील असमतोल ताराबाईंनी स्पष्टपणे मांडला आहे. लग्नाचे वेळी पत्नी म्हणून स्वीकारलेली स्त्री पुरुषाला पसंत नसेल, तर त्याला दुसरा विवाह करता येतो; पण स्त्रीला ते स्वातंत्र्य नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. “तुम्हाला जशी वाईट, कुरुप, दुर्गुणी, घाणेरडी, गावंढळ बायको आवडत नाही, तसा बायकोला तरी त्या मासल्याचा नवरा आवडेल का?” (पृ. 112) हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या काळात सुधारक मंडळी स्त्रियांच्या दु:स्थितीविषयी केवळ सहानुभूतीपूर्वक विचार मांडत होते, त्या काळात ताराबाईंसारख्या एका स्त्रीने पुरुषांच्या वर्चस्वालाच आव्हान दिले आहे. पुरुषांचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमी तुच्छतापूर्वक असतो. त्याचाही उपहास त्यांनी केला आहे. पुरुषाला स्त्रीची सोबत नसेल, तर त्याला कोणी किंमत देत नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी मांडली आहे. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक असतील, तर स्त्रीवरच अन्याय का होतात, असा त्यांचा प्रश्न आहे. “अरे, आजन्मपर्यंत बटकीप्रमाणे ताबेदारीत राहून सदासर्वदा नवर्याची मर्जी अतिनाजूक ताटव्याप्रमाणे काट्यासारखी तोलून, घरातील सर्व मनुष्याचे जे नाही ते सर्व बोलणे व कष्ट सोसून सदोदित घाण्याचे बैलासारखे राबून हरिण, सश्यासारखी जनांची, घरच्यांची भीती बाळगून वागत असताही स्त्रियांना एक शब्द बोलण्याची अगर चिमटीभर दाव्याची सत्ता नसावी काय?” (पृ. 103) अशा शब्दांत त्यांनी समाजातील स्त्रियांची परावलंबित अवस्था मांडली आहे. एक व्यक्ती म्हणून त्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्याकडे पाहतात. ‘मी निरंतर मर्हाटमोळ्याचे अटकेतील, गृहबंदीशाळेतील मतिहीन अबला’ असा स्वत:चा उल्लेख करत असतानाच तत्कालीन समाजातील पडदापद्धत, स्त्रियांचे दुय्यम स्थान, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
इंग्रजी राज्य
इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर समाजजीवनातही बदल झाले. अनेक भौतिक सुधारणा झाल्या. आगगाडीसारख्या प्रवासाच्या सोयी उपलब्ध झाल्या. सामान्य माणसाला जगण्यात सुरक्षितता वाटू लागली. सार्वत्रिक शिक्षण, कायद्याचे राज्य, धर्मनिरपेक्ष राज्यकारभार यामुळे अठराव्या शतकातल्या बेबंदशाहीच्या पार्श्वभूमीवर हे राज्य ईश्वरी वरदान वाटल्यास नवल नाही. स्त्रियांच्या बाबत बोलावयाचे झाल्यास सतीसारखी अमानुष चाल बंद केली, विधवा पुर्नविवाहाचा कायदा झाला, स्त्रीशिक्षणाला प्रारंभ झाला. या गोष्टी स्त्रियांच्या दृष्टीने निश्चितच फायद्याच्या ठरल्या.
इंग्रजी अंमल सुरू झाल्यावर समाजजीवनातही काही बदल झाले. पोषाख, राहणीमान इत्यादी सर्वच बाबतीत युरोपियन लोकांच्या अनुकरणाला सुरुवात झाली. “जेथे नेहमी पोथी-पुराण ऐकू यावयाचे, तेथे एस् फेस. ज्या घरात साधारण आपल्या दर्जाला साजेल तसे सामानसुमान म्हणजे गालिचे, लोड, तक्के, पाटपिढे, भांडी आपली तीच, ताटवाट्या, समया, मशाली, तर त्याऐवजी खुर्च्या, कोच, टेबले, भांड्यांऐवजी कप सॉसर, सुर्या, काटे, चमचे, केरोसीन दिवे, कुठे मून, कुठे रीडिंग लँप हे झाले. वाड्याऐवजी ते चौक, वोसल्या जाऊन एकदम बंगल्याची तर्हा (पृ.99) अशा प्रकारेच घरोदारी बदल स्वीकारलेला दिसतो. असे बाज राहणीमानात बदल स्वीकारणारे स्त्रियांच्या बाबतीत मात्र पुरोगामी विचारपद्धती स्वीकारीत नाहीत, याबाबत ताराबाईंनी स्पष्टपणे जाब विचारला आहे. त्या म्हणतात –
“त्यांच्यासारिखे पोषाख करू लागलेत, त्याच्यासारिखे किंवा त्यांच्यापेक्षा जास्ती विद्वान झालात, त्यांचे जे भोजन म्हणजे मांसाहार व मद्य यांचा तर यथेच्छ उपभोग घेत आहात व त्याच्यासारिखे नित्य करण्यास झटत असतानाही त्यांनी धर्मात हात घालू नये म्हणता, आता धर्म तो कोणता राहिला आहे? पाहिजे त्या ठिकाणी आगीच्या गाडीतून, जहाजातून त्याच्यासारिखे म्हणजे अंगात कोट, डोकीत टोपी, पायात विजार, स्टाकिंग बूट, हातात लवेंडर शिंपलेला छोटासा रुमाल, तोंडात चुट्टा धरून अगदी साहेब बनून पाहिजे ते अभक्ष्य असून जी नाही ती अनन्वित कर्मे करून पुन: आम्ही स्वधर्म रक्षक आहोत, असे म्हणण्यास तुम्हास काहीच लाज वाटत नाही काय रे? अरे, ज्या देशात आपले ज्ञातीचे एकही मनुष्य आढळत नाही, त्या देशात आगबोटीत बसून जाता. तेथे त्या लोकांबरोबर मिसळून वर्षेच्या वर्षे त्यांच्या समागमात घालून पुन: इकडे परत आल्यावर पंचगव्य प्रायश्चित घेऊन डौलाने पंक्तीत बसायला तयार.” (पृ. 98)
या विधानामागून ताराबाईंनी पुरुषांच्या वर्तन विसंगतीवर नेमके बोट ठेवले आहे. इंग्रजांचे खाणे-पिणे-पोषाख-प्रवास इत्यादी सोयीच्या गोष्टी स्वीकारता; मग त्यांचे पुरोगामी विचार का स्वीकारत नाही, असा प्रश्न ताराबाईंनी केला आहे. एका बाजूला इंग्रजी राजवटीतील सारे सुखोपभोग, सुधारणा स्वीकारणारे पुराणमतवादी, दुसर्या बाजूला इंग्रजांनी आमच्या धर्मात लुडबूड करू नये, असे म्हणतात. या त्यांच्या दुटप्पी भूमिकेबाबतही ताराबाईंनी आपले मत नोंदविले आहे. ‘इंग्रज सरकारने केले कायदे हे आपल्या धर्मात चंचुप्रवेश आहे,’ अशी तक्रार ‘पुणेवैभव’कारांनी केली होती. याचाही परखड समाचार ताराबाईंनी घेतला आहे.
एका बाजूला इंग्रज सरकार स्त्रियांच्या समस्या दूर करण्यासाठी कायदे करीत असताना दुसर्या बाजूला सनातनी प्रतिगामी मंडळी या सुधारणांना विरोध करीत होती. इंग्रजी सुधारणांचा, इंग्रजी शिक्षणाचा, ज्ञानाचा फायदा घेऊन स्वत:ची प्रगती करणारा परदेशी दौरे करणारा, अधिकाराच्या जागा बळकवणारा पुरुषवर्ग दुसर्या बाजूला हे ज्ञान स्त्रियांपर्यंत पोचू नये, स्त्रियांमधील अज्ञान, अंधश्रद्धा दूर होऊ नये, असा प्रयत्न करीत होता आणि हे प्रयत्न आजही सुरू आहेत. या काळात ताराबाईंनी परखड टीका केली आहे.
सतीप्रथा
स्त्रीच्या दृष्टीने अत्यंत क्रूर, अमानुष प्रथा म्हणजे सती प्रथा होय. राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे सतीबंदी कायदा झाला. सती परंपरेबाबत सार्वजनिक सभेच्या वतीने प्रसिद्ध होणार्या अंकात मतप्रदर्शन केले होते. त्याचा परखड समाचार ताराबाईंनी घेतला आहे. त्या म्हणतात, “मग पुण्यास सार्वजनिक सभा आहे ना. त्यांनी स्त्रियांवर मोठाच उपकार करून त्यांचे जे दर सहा महिन्यांनी की वर्षांनी पुस्तक निघत असते; त्यामध्ये मोठ्या डौलाने लिहिले होते की, ‘सरकार स्त्रियांना सती जाण्याची मोकळीक देईल, तर बरे!’ पण स्त्रिया सती जाऊन तुम्ही त्यांच्या मागे गवर्या वळायला का राहता? तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर का सती जाऊ नये बरे? तुमच्यापेक्षा ती सती गेल्याने फार नुकसान होईल…. तिच्या मागे तिची लहान लहान मुले असतात. त्यांना कोणी सांभाळावे? अरे म्हण आहे, “घोडे फेरता बाप मरावा; पण रहाटाने सूत कातणारी आई मरू नये.” बाप मेला, तर आई पाहिजे तसे दु:ख सोसून मुलांना पोशील; पण तुम्ही आज ती मेली की, उद्या दुसरी करून त्या मुलास देशोधडी करता. करता की नाही?” (पृ. 109)
अशा शब्दांत सतीप्रथेबाबत प्रतिगामी विचार मांडणार्या सार्वजनिक सभेचा, त्यातील सनातनी प्रवृत्तीचा खरपूस समाचार ताराबाईंनी घेतला आहे. नवरा आणि बायको यात आधी कोणी मरावे, याचा काही नियम नाही; पण नवरा मेला, तर बायकोला पांढर्या पायाची ठरविले जाते, या अंधश्रद्धेचाही त्यांनी समाचार घेतला आहे. ताराबाईंच्या लेखनातला जोरकसपणा, स्पष्टवक्तेपणा, जहाल विचार लक्षात येतो. तशीच भाषाही जहाल आहे.
विधवा स्त्रियांची दुर्दशा
विधवा स्त्रियांच्या जीवनातील विदारक दु:खाचे चित्रण ताराबाईंनी रोखठोकपणे केले आहे. विधवांच्या पुनर्विवाहास संमती नसल्यामुळे लाखो व कोट्यवधी स्त्रिया वैधव्याचे दु:ख भोगत असत. स्त्री एकदा विधवा झाली की, तिचे हाल कुत्रे खात नसे. तिच्या ललाटी केवळ हालअपेष्टा व अवहेलना राहते. त्यामुळे ताराबाई लिहितात – “कसे म्हणाल तर पतिराज एकदा स्वर्गवासी झाले म्हणजे या बाईसाहेबांचे हाल कुत्रे खात नाही. त्यांच्या कपाळी मग काय? माथ्यावरील एकदा सर्व कुरळे केसावर नापिताचा हात फिरला म्हणजे तुमचे डोळे थंड झाले. सर्व अलंकार गेले. सुंदरपण गेले. सारांश, तिला सर्व तर्हेने उघडी करून देशोधडी केल्याप्रमाणे नागवून सांदीचे खापर करावयाचे. तिला कोठे लग्नकार्यात, समारंभात जेथे काही सौभाग्यकारक असेल, तेथे जाण्याची बंदी, ती बंदी का? तर तिचा नवरा मेला, ती अभागी, करंट्या कपाळाची, तिचे तोंड पाहू नये. अपशकून होतो.” (पृ. 94)
पतीचा मृत्यू झाल्यावर स्त्रीने अल्पआहार घ्यावा. शरीर कृश करावे, असे सांगितले जाई. या काळात “अरे नवर्याआधी, बायकोने मरावे किंवा नवर्याने बायकोआधी मरावे, याचा तुमच्या बाबादादांनी देवापासून काही दाखला आणला काय रे? मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाचे हाती. तुमचे हाती काय दगड आहे?” (पृ.92) असा प्रश्न त्या करतात. कितीही श्रीमंत, मोठा राजा असला तरी यमदूतापुढे काही चालत नाही. सावित्री नवर्याच्या मृत्यूनंतर यमाच्या मागे सौभाग्यदानाकरिता गेली, हा संदर्भ देऊन ताराबाई पुरुष जातीला प्रश्न करतात – “या स्त्रीजातीत सावित्री तरी आपले पतीचा प्राण परत आणण्याकरिता यम दरबारात जाऊन आली; पण पुरुषांमध्ये कोणी तरी आपले बायकोचे प्राणाकरिता यमराजाचे दरबारात तर नाहीच; पण उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेलेला कोठे ऐकण्यात आला आहे काय?” (पृ. 92)
एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्यापेक्षाही ही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत राहावे, त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून दाढ्या-मिशा भादरून यावत-जन्मापर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे? एक बायको मेली की, तिचे दहावे दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी, असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे, तो दाखवा बरे?” (पृ. 93)
अशा शब्दांत स्त्रीला वेगळा न्याय आणि पुरुषांना वेगळा न्याय कसा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. स्त्रियांना पुनर्विवाहास बंदी आणि पुरुषांना मात्र एकीपासून पाचशे स्त्रिया करण्यास परवानगी याकडे लक्ष वेधले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुष दुसरा विवाह करतात; किंबहुना वय झालेले असतानाही अनेक विवाह करतात आणि त्यातूनच स्त्रियांच्या दु:खाची निर्मिती होते, ही वस्तुस्थिती ताराबाई शिंदे यांनी स्पष्टपणे मांडली आहे. सार्या मानवजातीला एकच न्याय असला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली आहे.
पंचकन्या स्मरे नित्यं
“पंचकन्या म्हणजे अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी यांच्या प्रात:स्मरणाने (उठल्याबरोबर नमस्कार केल्याने) पापांचा नाश होतो, असे मानले जाते. शास्त्रकर्त्यांनी आदर्श पतिव्रता मानलेल्या या पंचकन्यांची परखड चिकित्सा ताराबाईंनी केली आहे. आता द्रौपदी पंचपांडवांची बायको असूनही कर्ण महाराजांचे अंतर्यामी चिंतन करीत होती की नाही? अहिल्या सुरेंद्राच्या आंकारूढ होऊन शिळा पडली; अष्टाधिकार झाले. सत्यवती, कुंती यांनी कुमारदशेतच एकीने श्री वेदव्यास, एकीने कर्ण असे दोन पुत्र प्रसवले तरी पटातच नाव. एकीने पाराशर ऋषीपासून अंगाची दुर्गंधी घालविण्याकरिता ऋषिवचन मान्य केले. एकीने मंगप्रचिती पाहिली. वा रे देव! वा रे ऋषी! एका चडी एक. तेव्हा नाही का, एक गंधर्व विवाह होऊन पुन: शंतनु पंडुराजाबरोबर पाणिग्रहण केले; मग तो नाही का पुनर्विवाह झाला?…”(पृ. 86)
तारा ही वाली वानराची बायको… रामचंद्रजीने वालीला कपटाने मारून ताराचे लग्न सुग्रीवाबरोबर लावून दिले. हा पुनर्विवाह नाही का? सीताबाई रावणाने नेली. रावणासाठी सीतेचे मन वळवणारी मंदोदरीही श्रेष्ठ पतिव्रता म्हणून ओळखली जाते. या बाबत ताराबाईंनी उपहासाने निवेदन केले आहे. पंचकन्यांच्या पातिव्रत्याचे वास्तव रूप स्पष्टपणे मांडले आहे. “या पंचकन्यांतून दोघी-तिघी तर दोषास पात्र असूनही त्यांची तिकडे पहिले वर्गातच योजना केली हे कसे बरे?” हा ताराबाईंचा प्रश्न आहे. सत्यव्रती, कुंती, तारा यांच्या उदाहरणातून पूर्वीच्या काळी पुनर्विवाहाची पद्धत होती, हे दिसून येत नाही का? असेही त्यांनी विचारले आहे.
पुराणग्रंथांचे लेखन करणार्या ऋषि-मुनींबद्दलही त्यांची तक्रार आहे- “तेव्हाचे ऋषीतरी काय? कोणी हरणीचे पोटी झाले ते श्रृंगऋषी, कोणी पाखराचे पोटी झाले ते भारद्वाज, कोणी गाढवीचे पोटी झाले ते गर्धमऋषी, गायीचे पोटी झाले ते वृषभऋषी, तेव्हा त्यांनी आपले पशूप्रमाणे लिहून ठेवले झाले. ते गेले करून; पण निस्तरणे आले स्त्रियांचे कपाळी” (पृ. 88) श्रीधर स्वामींनीही “देवाने केले, त्याला हरकत नाही. मानवाने तसे करू नये” अशी सूचना दिली आहे. त्याबाबतही ताराबाईंनी विचार मांडला आहे. शास्त्रांच्या आधारे, धर्माच्या आधारे विधवा विवाहाला बंदी आहे; पण आजच्या काळात विधवाच्या दु:स्थितीकडे कोणाचेच लक्ष नाही. याबाबत ताराबाई म्हणतात-
“अरे, जे तुम्ही सिंहासारिखे धैर्यवान, भगीरथासारिखे महाप्रयत्नी, जैमिनीसारिखे व्युत्पन्न… तुम्ही महान अजिंक्य शत्रूस जिंकू शकता, वायु, अग्नि यांनाही आपल्या काबूमध्ये आणू शकता तथापि गरीब विधवांच्या कपाळी सौभाग्याचा मळवट भरून सौभाग्यशाली करण्यास तुमच्याने पुढे होववत नाही का?”- या शब्दात सर्व पुरुषजातीलाच विधवांचे दु:ख निवारणासाठी आवाहन केले आहे.
तुम्हाला एखाद्या अतिउत्त समृद्धी असलेल्या राजवाड्यात राजकीय थाटात स्त्रीविरहित स्त्रियांस तरी कसे सुख होईल बरे?… ईश्वराने हा जोडा स्वच्छेनेच नेमिला आहे… हा संसार तुम्ही एकटे चालवाल काय?….. (पृ.8) असा प्रयत्न करतात.
समकालीन साहित्यातील स्त्री चित्रण
एकोणिसाव्या शतकातील ललित वाङ्मयातील स्त्री चित्रणाची ताराबाई शिंदे यांनी समीक्षा केली आहे. या राज्यात विद्येचे प्राबल्य व छापखाने झाल्यामुळे ‘मंजुघोषा,’ ‘मुक्तामाला,’ ‘मनोरमा’ (नाटक) असे बरेच ग्रंथ तयार झाले आहेत; पण ग्रंथकर्त्यांनी आपण जे काही लिहितो, ते घडण्यासारखे किंवा पूर्वी कधी काळी असे घडून आले होते किंवा नाही याचा विचार करूनच मग पुढे ग्रंथ रचावा’ असे त्या स्पष्टपणे म्हणतात. कादंबरीतून वास्तव जीवनाचे चित्रण केले जावे, ही अपेक्षा इथे व्यक्त केली आहे.
“स्त्री चरित्र” या नावाने पुस्तकात स्त्रियांचे साहस एका भाग्यशाली पुरुषाने वर्णिले आहे. या सार्या गोष्टी किती खर्या आहे, याला प्रमाण बारीक विचाराने पाहू गेले असता कोठेच मिळत नाही.” (पृ.120) या गोष्टी अवास्तव, स्वैर आणि पूर्णपणे काल्पनिक असल्याची नोंद त्यांनी केली आहे. ‘मनोरमा’ नाटकाविषयी लिहिताना त्यांनी औचित्य विवेकाचा प्रश्न उपस्थित केला आहे. ‘मंजुघोषा’कार रिसबुडांनी आधाराला घेतलेला भर्तृहरीचा श्लोक आणि त्यांचे विवेचनाचा परखड समाचार ताराबाईंनी घेतला आहे.
आपले लेखन करताना ताराबाईंनी ऐतिहासिक पद्धती अवलंबिली आहे. सत्तातरांची कारणे आणि परिणाम यांचा निर्देश त्या करतात. पुराणे, रामायण, महाभारत इथपासून पंडित कवी श्रीधर, ते समकालीन ललित वाङ्मय येथवरचे आधार त्यांनी त्यांनी आपल्या प्रतिपादनात घेतलेले आहेत.
ज्या काळात स्त्रीवाद व स्त्रीवादी समीक्षा हे शब्द प्रयोग देखील नव्हते. एक ‘नावल व नाटक याविषयी निबंध’ (1879) हे लेखन सोडले, तर वाङमयविचारही सुरू झाला नव्हता. त्या काळात ताराबाईंनी मराठी साहित्यातील पुरुषांनी केलेल्या स्त्री चित्रणाचा चिकित्सक परामर्श घ्यावा, ही घटना समिक्षेच्या इतिहासात महत्त्वाची आहे.” (पृ. 51, 52) अशा शब्दात डॉ. विलास खोले यांनी ताराबाईंच्या समीक्षेविषयी आपला अभिप्राय व्यक्त केला आहे. ताराबाई शिंदे यांची वाङ्मयाची समज अतिशय चांगली होती. तत्कालीन वाङ्मय हे स्त्रियांची बदनामी करणारे वाङ्मय आहे. तसेच एक वाङ्मय म्हणूनही फारसे चांगले नाही, हे त्यांनी ठामपणे नोंदविले आहे. त्यांना पहिली समिक्षिका म्हणता येईल का? असा प्रश्न डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी उपस्थित केला आहे.
ताराबाईंच्या समकालीन कोणी लेखिकेने अशी रोखठोक भूमिका व्यक्त केलेली आढळत नाही. म्हणून पहिल्या समीक्षिका म्हणून ताराबाईंची नोंद घ्यावी लागेल.
पुरुषांच्या दुर्गुणाची मीमांसा
जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत, तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत, हे अगदी स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने ‘स्त्री-पुरुष तुलना’चे लेखन झाले आहे. स्वत: ताराबाईंनीच आपल्या लेखनामागील प्रयोजन सांगितले आहे. ‘मंजुघोषा’ कादंबरीत नारो सदाशिव रिसबूड यांनी भर्तृहरीच्या शृंगारशतक मधील श्लोक उद्धृत केला आहे आणि त्याचा अर्थही लेखकाने सांगितला आहे. ताराबाईंनी पुरुषांच्या दुर्गुणांची मीमांसा करताना हा श्लोक आपित्याचा अर्थ आधाराला घेतला आहे. या श्लोकामध्ये स्त्री मध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे दुर्गुण आहेत, याची एक प्रकारे यादीच केली आहे. स्त्रीवर केलेले हे सारे आरोप खोडून हे सर्व दुर्गुण पुरुषांमध्येच किती मोठ्या प्रमाणात आहेत, हे ताराबाईंनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. सर्व प्रकारचे ‘दुर्गुण साहस’ पुरुषांच्या ठिकाणी असून बदनामी मात्र स्त्रियांचीच होते, याबद्दलची चीड त्यांनी व्यक्त केली आहे. स्त्रियांच्यावर केल्या जाणार्या नऊ आरोपांचे ताराबाईंनी खंडण केले आहे. प्रत्येक आरोपांचे खंडण करून हे सर्व दोष पुरुषांनाच कसे लागू आहेत, हे ताराबाई दाखवून देतात.
“स्त्रियांना पुष्कळ तर्हेचे दोष दिलेले वाचण्यात व रोजच्या वहिवाटीत ऐकू येतात; पण जे दोष स्त्रियांचे अंगी आहेत, तेच पुरुषांत अजिबात नाहीत काय? जशा बायका लबाडी करतात, तसे पुरुष करीत नाहीत काय? चोरी, शिंदळकी, खून, दरोडे, दगाबाजी, सरकारी पैसा लाच खाणे, खर्याचे खोटे, खोट्याचे खरे करणे, यातून एकही अवगुण पुरुषांत नाही काय? (पृ. 103) असा खडा सवाल ताराबाईंनी विचारला आहे.
वास्तविक, पुरुषांच्याही हातून रोज अविचार घडत असता केवळ स्त्रियांनाच दोष देणे ताराबाईंना पटत नाही. त्या पुढे म्हणतात, “तुम्ही शहाणे आहात खरे; पण इकडे कारागृहात जाऊन पाहावे तो पाय ठेवण्यास देखील जागा मिळत नाही, इतके तेथे आपल्या देशबांधवांची दाटी असते. तेथे काय सर्व शहाणे. कोणी खोट्या नोटा केल्या म्हणून, कोणी लाच खाल्ली म्हणून, कोणी कोणाची बायको पळवून नेली, कोणी बंडात सामील, कोणी कोणाला विषप्रयोग केला, कोणी राजद्रोह केला, कोणी खोटी साक्ष दिली, कोणी तोतया राजे बनून लोकांस बुडविले, कोणी खून केले, ही अशी विचारांची मोठी-मोठी कामे केल्यावरून सरकारने तुम्हाला मोठ्या आदराने या सुंदर बंदिशाळेसारख्या रंगमहालात जागा दिली; पण कोणते अविचार स्त्रियांचे हातून घडतात बरे? असे किती कारागृह बायकांनी भरलेत दाखवा? जिथे तुमची दोन-तीन हजार मंडळी तिथे फार झाले, तर शंभर देखील स्त्रिया निघणार नाहीत.” (पृ.106-107)
अशा शब्दांत जे दोष स्त्रियांच्या अंगी आहेत म्हणून म्हटले जाते, तेच दोष किती मोठ्या प्रमाणात पुरुषांच्या अंगी वसतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे. सरकारी नोकरी करणारे पुरुष काम करण्यासाठी पगार मिळत असूनही; शिवाय गोरगरिबांपासून रोख पैसे, वस्तू, अन्य जे मिळेल ते लुबाडण्याचा प्रयत्न करीत असतात.
“तुमचे सर्व दुर्गुण वर्णन करू लागले, तर कागद ठेवायला जागा मिळणार नाही. हे सर्व सृष्टीतले कागदाने भरून जाऊन शाई करता-करता समुद्र आटून जाईल व लेखण्या तासण्याकरता सुतार ठेवावे लागतील” (पृ. 107) असे ताराबाई म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुरुष वर्गाच्या हातून इतके अविचार रोज घडत असतानाही ते स्वत:ला विचार म्हणवितात आणि स्त्रियांना अविचारी म्हणून नावे ठेवतात, याबाबत ताराबाईंनी खेद व्यक्त केला आहे. कोर्ट-कचेर्या, तुरुंग येथे तुमच्या शहाणपणाचा डंका वाजतो आहे, हेही त्यांनी उदाहरणासह स्पष्ट करून दाखविले आहे.
अर्थात, स्त्रिया अगदी निर्दोष आहेत, कधीही अविचार करणार नाहीत, असे नाही. मनुष्य स्वभाव आहे, चूक कोणाच्याही हातून होणारच हे त्यांना मान्य आहे. या बाबत त्या म्हणतात – “स्त्रियांचे हातून मोठा अविचार कोणता तर “परद्वार हेच काय ते मेरूचे शिखर”…. पण तिच्या मनात दुष्ट वासना निर्माण करण्यात आधी पुढे पाऊल कोण टाकतो बरे? स्त्री कितीही निर्लज्ज असली, तरी ती होऊन कधी परपुरुषांचे गळ्यात पडणार नाही;” असा विश्वास ताराबाईंनी व्यक्त केला आहे. स्त्रियांना सर्वजगिक सुख म्हणजे काय? एक तर प्रथम मनासारखा नवरा. अत्यंत प्रीती करणारा. त्याचे तिचे एक चित्र असेल, तर दरिद्री असू द्या… कधीही अपप्रवृत्तीने वागणार नाही. ज्या स्त्रिया दोषाने वागतात, त्यांच्या दोषाला पुरुषच जबाबदार असतात. कारण स्वत: वडीलच आपल्या मुलींना पैसा व संपत्ती पाहून म्हातार्यांच्या हवाली करतात. कारण त्यांना वाटते एक नवरा मेला, तरी निदान तिला खायला-प्यायला तर कमी पडणार नाही ना? ते पाण्याचे पितर तिच्या ऐन तारुण्यात नरकवासी झाले, अशा वेळी ती जर काही दोषपूर्ण वागली, तर तो दोष पुरुष असलेल्या तिच्या बापाचा नाही काय?
काही बाप सवतीवर मुली देतात. “स्त्री काहीही सहन करू शकते; पण आपल्या प्रेमात वाटेकरी सहन करू शकत नाही आणि पुरुष तरी दोघींना एकसारखी वागणूक कशी देऊ शकणार?” अशा वेळी जर का बाईकडून दोेषपूर्ण वागणूक घडली, तर त्याचा दोष कोणाकडे? असा प्रश्न ताराबाई करतात.
राजघराण्यातील स्त्रियांबाबत ही तक्रार केली जाते. याबाबतही ताराबाईंनी विवेचन केले आहे. राजघराण्यातील पुरुष शेकडो बायका करतात. एकीकडे पाहायला त्यांना वर्ष-सहा महिने मिळत नाही. राजघराणे असते, त्यामुळे भौतिक समृद्धी असते. अशा वेळी त्यांचे वर्तन दोषपूर्ण घडले, तर तो दोष कुणाचा? असे अनेक सडेतोड प्रश्न ताराबाई या दोषांचे निराकरण करतात. स्त्रियांच्यावर घेतल्या जाणार्या आरोपांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला आहे. ताराबाईंचे हे विचार परखड आहेत. निर्भीड व सडेतोड आहेत. स्त्रियांचे दोष त्या मोकळेपणाने मान्य करतात. काही दोषांसाठी पुरुषांना त्या जबादार धरतात. कोणत्या परिस्थितीत हे दोषपूर्व वर्तन घडते, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण पुरुष निर्दोष नाहीत, हे त्यांनी सडेतोडपणे दाखवून दिले आहे.
‘स्त्रिया कपटी असतात’ असा आरोप करणार्यांना त्यांनी बजावले आहे. खरे तर शतश: कपट्यांनी पुरुषच व्यापलेले आहेत. कारण कपटकारस्थाने करण्यात पुरुषच नेहमी पुढे असतात. गोसावी, फकीर, हरदास, ब्रह्मचारी, साधू, जटाधारी, जोगी इत्यादी सोंगे घेऊन जगाला फसवित फिरणार्या काय स्त्रिया आहेत? ही सर्व सोंगे पुरुषच घेतात ना?
नवर्याची मर्जी आपणाकडे राहावी यासाठी कित्येक जोशी, बैरागी, कानकाटे, भोंदू लोक स्त्रियांना नादी लावून फसवितात. अज्ञानामुळे, भोळेपणामुळे स्त्रिया त्यांच्या कटकारस्थानास बळी पडतात. त्या मूर्ख, अविचारी, अज्ञानी असल्यामुळे फसविल्या जातात, हेही ताराबाईंनी मान्य केले आहे.
‘स्त्री ही दुर्गुणांचे उत्पत्तीस्थान आहे,’ असाही एक आक्षेप घेतला जातो. यावर प्रतिवाद करताना ताराबाई स्पष्टपणे सांगतात की – “दुर्गुणांची उत्पत्ती खरे तर आधी पुरुषांपासून होते. स्वधर्म सोडून मन मानेल तसे वर्तन करणे, जुवा खेळणे, गांजा ओढणे, रांडा ठेवणे इत्यादी वाईट व घाणेरडी कामे तुम्ही करू लागला. स्त्रिया वाईट वर्तन करतात, याला तरी कारण कोण आहे? सुस्थिर घराच्या बाहेर पडणे कधीच शक्य नाही, अशा त्यांना अस्थिर करून फसवून तुम्हीच घराबाहेर काढता. तिला सर्वस्वी नागवून सोडता, तेव्हा हा निंद्य व्यापार अगदी उघडपणे करण्याशिवाय तिला पर्यायच उरत नाही. दुर्गुणांपासून दुर्गुण उत्पन्न होतो. याचे काही शेतमळे नाहीत. तुम्ही स्वत: अनेक दुर्गुणांनी कडू वृंदावनाचे वेलासारखे लगटलेले असून स्त्रियांवरच ढकलता ही तुमची मोठी कुशलता आहे.’ अशा शब्दांत स्वत: दुर्गुणी असूनही स्त्रियांवरच दुर्गुणाचे आरोप करणार्या पुरुषांना ताराबाई प्रश्न करतात, ‘स्त्रिया कधी रस्त्यात तमाशे पाहत, दारू पिऊन रस्त्याने लोळत, जुवे बाजारात किंवा पाचशे लुटारू बायकांची टोळी ज्यामध्ये एक नाही, तर दोन पुरुष असे पाहिल्यात का?”
भर्तृहरीच्या श्लोकाच्या अनुषंगाने स्त्रियांच्यावर केल्या जाणार्या आरोपांचे खंडण करताना पुरुषांच्या ठायी कोणकोणते गुण असतात, ते ताराबाईंनी सविस्तर सांगितले आहे. पुरुषच स्त्रियांना फशी पाडतात. त्यामुळे स्त्रिया संकटात येतात, त्यांच्या हातून अपराध घडतात. त्या बदनाम होतात. स्त्रीच्या दुर्वर्तनास बर्याच वेळा पुरुषच जबाबदार असतात. टाळी दोहोहातांनी वाजते खरी; पण त्यातून उजव्या हाताचा जोर जरा जास्तच असतो, असे त्यांचे प्रतिपादन आहे.
स्त्रियांचे श्रेष्ठत्व सांगताना त्या म्हणतात – “आता तुम्ही म्हणाल की, स्त्रियांच्या पायी मोठमोठे अनर्थ नाही का झाले? हो झाले व नित्य होतात; पण असे हे अनर्थ दुसरे कशाकरिता न होऊन फक्त स्त्रियाच जर याला कारणीभूत असत्या, तर मग त्या खरोखर दोषी ठरल्या. स्त्रियांचे पायी जीव काय; पण हा सारा जन्म अर्पण करणे, हा तुमचा देहधर्म आहे.”
“अरे, देवासारख्यांनी स्त्रियांची खुशामत केली, तेथे नेहमी कोणत्या झाडाचा पाला? स्त्री एक प्रतिशक्तीच आहे, तिच्यावाचून तुम्हाला शोभा, मोठेपणा, जग हे काहीच नाही. फार कशाला ज्या घरात ती नाही, ते घर केवळ स्मशानासारखे ओसाड दिसते; पण ती जेथे वास करील, ती मोडकी तीन वाशाची झोपडी जरी असली, तरी एक मोठे शोभिवंत घवघवीत मंदिरच दिसेल. याकरिता स्त्रियांना लक्ष्मी म्हणतात. अरे, स्त्रियाच जर नसत्या, तर झाडाची पाने चावीत रातोरात भटकत फिरला असता. मग असे रोज पंचामृत, पुढे आलेच नसते.’ पुरुषांना स्वयंपाकपाणी येत नाही, जे स्त्रियांना सहजगत्या जमते, ते पुरुषांना जमत नाही आणि म्हणूनच पुरुषाचे सारे सुख स्त्रियांवर अवलंबून आहे. स्त्रियाच त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत,” हे त्या ठामपणे सांगतात.
ताराबाईंनी केलेले दोषदिग्दर्शन सत्यस्थितीचे दर्शन घडविणारे आहे. त्याचबरोबर आत्मपरीक्षण उद्युक्त करणारे – अंतर्मुख करायला लावणारेही आहे. त्यांच्या लेखनाचा हेतू अखेर पुरुषांतील दोष दूर व्हावेत, त्यांच्याकडून नीतिमान, विवेकी, सहभावयुक्त, स्नेहपूर्ण आचरण घडावे, कुटुंबात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळावे आणि कुटुंबातील स्त्री-पुरुषांचा नातेसंबंध दोघांनाही सुखावह व उन्नतकारक व्हावे, असा आहे.
“तुम्हाला एक विशाल बुद्धी देऊन त्याने तुम्हाला या सृष्टीतील सर्व प्राणिमात्रांत, पशुपक्ष्यांत श्रेष्ठ केले आहे, तर तुम्ही त्या श्रेष्ठ पदास शोभेल, असे करावे,” अशी समस्त पुरुषवर्गास सूचना करीत असतानाच ताराबाईंना आठवते, यात श्रेष्ठ जे ब्रह्मदेव त्यांना तरी काय बोलाल, ते कुठे साधू आहेत… शंकरांनी तपश्चर्या सोडून भिल्लिणीमागे धाव घेतली. विश्वामित्रांनी तर कुत्र्याचा अवतार घेतला… असे पाहू गेले असता देवातच चंद्र, इंद्र पुष्कळ सापडतील, तेथे मानवाची काय कथा?” (पृ.131)
“याकरिता प्रथम तुम्ही तुमची मने गच्च विवेकाने खांबास बांधून भीष्माचार्याचे व्रत घ्या. तुम्ही सदाचरणाने प्रथम वागा. म्हणजे सर्व सुखच सुख व आनंदच आनंद होऊन या जगात घरोघर निष्कलंक पातिव्रत्याचे निशाण उंच उडून चंद्राला देखील लज्जा आणील की, नाही हे पाहा.” (पृ. 131)
स्त्री आणि पुरुष दोघांनीही सदाचाराने वागवे, विवेकी वागावे, ही इच्छा ताराबाई व्यक्त करतात.
‘स्त्री-पुरुष तुलना’ हे स्त्री-पुरुष सत्तासंबंधातील असमतोलाचे विवरण करणारे एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाचे लेखन आहे. स्त्रियांच्या परवशतेची इतकी आवाहक व चित्रदर्शी मांडणी अन्यत्र आढळत नही. समस्त स्त्री जातीचे दु:ख दूर व्हावे आणि स्त्रियांना समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त व्हावे, या हेतूने हे लेखन केले गेले आहे. स्त्रीचे अधिकार आणि पुरुषांचे अधिकार यामध्ये भेद करणारी जी मूल्यव्यवस्था आहे, या मूल्य व्यवस्थेलाच ताराबाई शिंदे यांनी आव्हान दिले आहे. त्यांनी स्त्री-पुरुष समतेची मागणी केली आहे.
ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाने एकोणिसाव्या शतकातीलच नव्हे, तर विसाव्या शतकातील देखील गद्य लेखनात एक इतिहास घडविला आहे. ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकात प्रथमच एक स्त्री सुसंगतपणे, तर्कशुद्ध रीतीने, परखड शब्दांत स्त्रीच्या अखंडपणे चालू असणार्या शोषणाविषयी पुरुषांना थेट सरळ प्रश्न विचारते. त्यांच्या विचारांचा आविष्कारही क्रांतिकारक स्वरुपाचा आहे.
कमालीचे विवेकनिष्ठ आव्हानात्मक गद्यलेखन किती प्रभावीपणे करता येते, त्याचा नमुना म्हणून ताराबाईंच्या या गद्य लेखनाचा विचार करता येईल. त्यात सगळ्यात महत्त्वाची आहे, ती त्यांची शैली. आपला प्रतिपाद्य विषय अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यांचे निवेदन संवादाच्या रुपाने प्रकट होते. हा संवाद प्रामुख्याने पुरुष वर्गाशी केेलेला असतो. त्या कधी आक्रमक होतात, तर कधी त्यांच्यातल्या माणुसकीला आवाहन करतात.
“अरे, तुमचा मोठेपणा व शौर्य घरातच…”
“अरे, देव देखील दगेबाज, मग तुम्ही असल्याचे नवल काय?”
हा संवाद पुष्कळदा स्वत:शी आणि स्त्रीजातीशीही असतो. उपहास, उपरोध ही या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. उपहास, उपरोधाबरोबर अस्सल मर्हाटमोळ्या बोलीचा वापर सर्वत्र दिसतो; तसेच म्हणींचाही वापर त्या मुक्तहस्ते करतात. ‘झाकली मूठ सव्वालाखाची’, ‘पुराणातली वांगी पुराणात,’ ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास,’ ‘ज्याचे हाती ससा तो पारधी, बाकी सारे गैदी,’ ‘शालजोडीला रकट्याचे ढिगळ’ इत्यादी.
लेखनाच्या ओघात ताराबाईंची लेखणी चिंतनाच्या पातळीवर जाते. ‘प्रीती काही आंबा, जांब नाही, म्हणून वाटून घेता येईल’ इत्यादी.
ताराबाईंचे लेखन क्रांतिकारक स्वरुपाचे आहे. पुरुषांशी संवाद करताना त्यांच्यातल्या माणुसकीला त्या आवाहन करतात.
ज्या काळात सामान्यत: स्त्री-शिक्षण म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींची माहिती स्त्रियांना करून देणे, एवढाच माफक अर्थ अभिप्रेत होता, ज्या काळात स्त्रिया स्वत:वरचा अन्याय सहन करत निमूटपणे जगत होत्या, अशा काळात ताराबाई शिंदे यांनी कुटुंबात, समाजात स्त्रीवर कुठे-कुठे, किती तर्हेनी अमानुष अन्याय होत असतो आणि पुरुषांना मात्र स्वैराचाराचे स्वातंत्र्य असते, याची रोखठोक उदाहरणे देऊन अन्याय करणार्यांना जळजळीत भाषेत जाब विचारला आहे. ताराबाईंनी मांडलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत.
समस्त स्त्रीजातीचे दु:ख दूर व्हावे आणि स्त्रियांना सन्मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त व्हावे, या हेतूने हे लेखन केले गेले आहे. स्त्रियांच्या परवशतेची इतकी आवाहक व चित्रदर्शी मांडणी अन्यत्र आढळत नाही. अर्थात, ताराबाईंचा हा ग्रंथ 1882 साली लिहिलेला आहे. त्यामुळे तत्कालीन समाजाचे संदर्भ आणि तत्कालीन स्त्रीचे प्रश्न त्यातून येणे स्वाभाविकच होते, तसे ते आलेही आहेत. बहुपत्नीकत्व, बाल-जरठ विवाह, विषम विवाह, बालविवाह, केशवपन इत्यादी समस्या आज उरल्या नाहीत. समाजसुधारकांच्या चळवळीमुळे, काळाच्या रेट्यामुळे आणि कायद्यामुळे या समस्या आज उरल्या नाहीत; परंतु स्त्रीकडे पाहण्याची दृष्टी आज बदललेली आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
ताराबाईंच्याच वाटेने जाऊन बोलायचे, तर आज एकविसाव्या शतकात टी.व्ही., मोबाईलमुळे सारे जग जवळ आले आहे. विमानामुळे तासा-दोन तासात आम्ही दुसर्या देशात जाऊन पोचू शकतो. घरी बसल्या-बसल्या अमेरिकेतील मुलांशी बोलू शकतो. त्यांना पाहू शकतो. आज महिला सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे. डॉक्टर, इंजिनिअर, वैमानिक; इतकेच काय अंतराळ प्रवासातही ती सहभागी होऊ शकते आहे. निरनिराळ्या देशांतील अन्न-पदार्थ आज आपल्या जेवणाच्या टेबलावर येतात. आपणही जाऊन देश-परदेश फिरून येऊ शकतो. वैज्ञानिक युगात मानवी जीवन कमालीचे प्रगतिशील झाले आहे. सर्व क्षेत्रांतील नवनव्या सुधारणा-नवनवे बदल आपण स्वीकारलेत. महिलांना शिक्षण घेऊन स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवण्याची ही संधी दिली जाते; पण आपण पूर्णत: मनुवादी विचार सोडले आहे का?
मनू म्हणतो तिचे रक्षण लहानपणी पित्याने, तरुणपणी पतीने आणि म्हातारपणी पुत्राने करावे. तिला स्वातंत्र्य देण्याची गरजच काय?
आज ज्यावेळी आम्ही घरातील मुलीला ‘सातच्या आत घरात’ हा नियम सांगतो, आम्ही सांगू त्याच मुलाशी विवाह कर, अशी धमकी देतो. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणार्या मुला-मुलींवर हल्ले केले जातात. हे सारे मनुवादी वृत्तीतूनच तर होत असते. आजही मुलीला जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य आपण देऊ शकतो का? जात, धर्म, प्रतिष्ठा, उच्च-नीचता या सार्या विचारांची कुंपणे आपल्या मनामध्ये आजही आहेत. आजही वंशाला दिवा पाहिजे म्हणून ‘स्त्रीभ्रूणहत्या’ होत आहेत.
आजही ताराबाईंच्या विचारांची गरज आहे.
– डॉ. छाया पोवार
संपर्क : 9850928612
संदर्भ :
1) विलास खोले (संपादक) ‘ताराबाई शिंदे लिखित स्त्री-पुरुष तुलना’ – प्रतिमा प्रकाशन, पुणे (1997)
2) इंद्रजित भालेराव – महाराष्ट्राचे शिल्पकार, ताराबाई शिंदे – म. रा. सा. सं. मंडळ, मुंबई. (2009)
3) डॉ. नागनाथ कोतापल्ले – जोतिपर्व, स्वरुप प्रकाशन, औरंगाबाद (2000)