अंधश्रद्धा या विषयाला घेऊन ‘शॉर्टफिल्म फेस्टिवल’ पाठीमागची आयडिया गार्गीची. त्यावेळी प्रथम मला यात ‘थ्रिल’ वाटले. या निमित्ताने तरी लोक अंधश्रद्धेबद्दल काय विचार करतात, हे तरी आपल्याला कळेल, असे वाटले. तारीख जाहीर केल्यानंतर सुरुवातीला एक-दोनच एंट्री आल्या. तसा अंधश्रद्धा हा विषय जुना असला, तरी त्यावर ‘शॉर्टफिल्म’ करणे हा अगदीच अवघड प्रकार. माणूस जगायला लागल्यापासूनच वास्तवाबद्दलचे जे-जे ‘कन्फ्युजन’ त्याने अनुभवले, तसतशा अंधश्रद्धा निर्माण झाल्या. अंधारात घडणार्या गोष्टी, भविष्यात येणारी संकटे याबद्दल लोक तर्कवितर्क करतात. मला वाटत होते, लोक तयार करत असतील फिल्म्स. त्यानंतर मात्र जसजशा एंट्रीज येऊ लागल्या, तसतसे आम्हीच घाबरून गेलो. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे फिल्मसाठी पंधरा मिनिटांची वेळ द्यायला नको होती. कारण जवळजवळ प्रत्येकाने 14.49 किंवा 14.30 अशा मर्यादेइतक्या लांबीच्या फिल्म्स तयार केल्या होत्या. जवळजवळ 80 टक्के फिल्म्स 15 मिनिटे आसपासच्या आहेत, तर काही 16.17 मिनिटांच्या फिल्म्सही आल्या. यात सर्वच फिल्ममेकर्स होते, असे नाही. खूपजण पहिल्यांदाच फिल्म बनवत आहेत, असेही जाणवले. खूप चांगली गोष्ट; पण आमच्यासाठी घातक! त्यांना ग्रेडेशनवेळी सामोरे जाणे आम्हा सर्वांसाठी मोठे दिव्य होते. मला तर रोज रात्री स्वप्नात ‘लिंबू-मिरची’ यायला लागली. विक्रांत व गार्गी या दोघांचे याठिकाणी विशेष कौतुक करावेसे वाटते. मी बर्याचदा मधूनच उठून जायचो. गार्गीने हे काम सर्वांना हाताशी घेऊन निर्धाराने पूर्ण केले. तीन-चार तासांच्या अवधीत विक्रांतच्या टेबलवर पाच-सहा चहाच्या कप-बशांची चवड साठायची. कोर्टाच्या बाबतीत जसे सांगितले जाते की, हजार गुन्हेगार सुटले, तरी चालेल; पण एकाही निरपराध्यांला शासन होता कामा नये. तद्वत एकही फिल्म तपासण्याची राहू नये, याची आम्ही काळजी घेत होतो. सगळ्या फिल्म्स पाहायचो. ‘लिंबू-मिरची’च्या कमीत कमी पंचवीस ते तीस फिल्म्स असतील. ‘अंधश्रद्धा कळणे’ हा विषय कळणेच मुळात मोठा. दाभोलकरांनी विषय घातक, विचित्र म्हणून सांगितलेला. हे वेगळं (सांगणं) आणि अंधश्रद्धेमुळे प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीची कशी वाताहत होते, हे पाहणं वेगळं. आता या फिल्म्स बघितल्यानंतर लोकांना कळायला लागलं अंधश्रद्धा काय आहे ते! तरी मला वाटते की, त्यांची व्याप्ती अजूनही आपल्याला कळलेली नाही. कारण ‘अंधश्रद्धा’ म्हटलं की, गाडीला ‘लिंबू-मिरची’ लावणे, मासिकपाळी वेळी मुलींना बाजूला बसवणं वा ‘अंधश्रद्धा’ म्हटले की, अशा-अशा गोष्टी आहेत. पण अंधश्रद्धेची रुपं इतकी विचित्र आहेत की, मला असं वाटतं की, आपल्या या पहिल्या फेस्टिव्हलमध्ये सर्व संकली नाहीत. खूप गोष्टी आहेत. कुणी कुठली फिल्म करायची, ते अगोदरच ठरवावयास पाहिजे होते. कारण प्रेमावर जशा अनेक कविता होतात; तसेच प्रत्येकजण ‘लिंबू-मिरची’वरच फिल्म बनवत होता. काही फिल्म्स फारच छान आल्या. एक गोष्ट लक्षात आली. एकएक फिल्म तयार करण्यासाठी कमीत कमी शंभर लोक ‘अॅक्टिव्ह’ झालेले पाहावयास मिळाले, तर किमान शंभर ‘पॅसिव्ह’ प्रेक्षक. प्रत्यक्ष काम करणारी पडद्यावरील मंडळी ‘इंटरेस्टिंग’ वाटली. एक ‘पोतराजा’ची फिल्म आहे. त्या फिल्ममध्ये त्या पोतराजाचे केस कापण्याचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात पोतराजाचे केस कापतानाचा प्रसंग चित्रित केलेला नाही. पोतराजाने नकार दिला असेल. केस कापणे सामान्यत: जितके सोपे, तितकेच पोतराजाचे केस कापणे व चित्रित करणे कठीण, तर फिल्म करीत असताना अशा प्रॅक्टिकल अडचणी आल्या असतील. मला बरं वाटलं की, 268 फिल्म्स आल्या. गुणिले शंभर लोक प्रत्येकी ‘इन्व्हॉल्व्हड’ झाले. यामध्ये अनेक लोक ‘फिल्ममेकिंग’मध्ये ‘इंटरेस्टेड’ असतात. त्यांना अंधश्रद्धेशी काही देणं-घेणं नसतं. नागराज, गार्गी आदी मंडळी परीक्षक म्हणून यामध्ये आहेत म्हणूनही काही लोक आले असतील. जाता-जाता तेही समजायला लागले असतील, अंधश्रद्धा म्हणजे काय असते.

हा ‘फेस्टिव्हल’ बनविण्यामागचा हेतू सफल झाल्यासारखे मला वाटते. आपण ‘सक्सेसफुल’ झालो. यातून ‘अंधश्रद्धा’ म्हणजे काय असते, बाधितांना कुठल्या समस्यांना सामोरे जावे लागते, हे सांगायला आपण कसे कमी पडतो, या दृष्टीने कार्यकर्त्यांना देखील हा ‘फेस्टिव्हल’ मार्गदर्शक झाला. हा असा असा ‘डाटा’ आहे. आपल्याजवळ हे-हे म्हणजे ‘अंधश्रद्धा’ हे कळलं आणि अजून खूप कळायचं आहे. या जगात अजून काय घडू शकतं आणि आणखी खूप काही.
खूप ठिकाणांहून फिल्म्स आल्या. पंजाबहून एक फिल्म आली. मुंबईतून, छोट्या खेड्यातून फिल्म्स आल्या. प्रोफेशनल, हौशी, स्टुडंटस्, सॉफ्टवेअर्समधील अशा सगळ्या लोकांकडून फिल्म्स आल्या. 38 फिल्म्स निवडल्या गेल्या. फिल्म्स येत राहिल्या, तशा अगोदरच्या ठरलेल्या तारखा पुढेपुढे ढकलाव्या लागल्या. दहा तारखेला संपवायचे काम तब्बल सहा-सात दिवस पुढे ढकलावे लागले. बक्षीसपात्र फिल्म्सची यादी मात्र नंतर रात्री दोन वाजता तयार झाली.
फिल्म निवडली न गेल्याने अनेकांना दु:ख होणार आहे. निवडलेल्यांना आनंद वाटणार आहे. आमचे एकमेकांमध्ये एकमत होणेही अवघड झाले होते. दोन विषय सारखेच. प्रत्येकाचे मत वेगळे; मग त्यातून नेमकी कुठली ‘सिलेक्ट’ करायची. पण नाराज न होता एक गोष्ट लक्षात घ्या, खूप कमी वेळ उपलब्ध होता आणि रात्री दोन वाजता जगावेगळी ही लिस्ट तयार झाली. हिटलरची डॉक्युमेंटरी पाहताना कुणाचं तरी एक वाक्य होतं, ‘जेव्हा चांगली माणसं निष्क्रिय होतात, तो काळ म्हणजे सैतानाचा उदय असतो!’ तो स्ट्राँग होतो, त्याला बळ मिळत जातं. म्हणून आपण बोललो पाहिजे. पहाटेपर्यंत रात्रभर गोरखा वारंवार काठी आपटत असतो, असे नाही. पण त्याच्या वारंवार काठीच्या आपटण्याने कुणी गुन्हेगार दचकत असतो. काठीच्या आवाजाचा परिणाम होत असतो. हे जागल्याचे काम कुणीतरी करावेच लागते. तेव्हा कुठे गाव शांत झोपू शकतो. अधून-मधून आपण जागे आहोत का, हे देखील चेक केले पाहिजे. वेळ कधी येईल सांगता येत नाही. टेकडीवर पुराच्यावेळी आश्रयास गेलेल्यांना सारखे वरवर सरकावे लागते, पाणी चढेल तसे. पण एकदा ना एकदा वाढत्या पाण्याला सामोरे हे जावेच लागते. त्याशिवाय आपण स्वत:ला वाचवू शकत नाही. येथे फडके-खांडेकरांमध्ये ‘जीवनाची कला की, कलेसाठी जीवन’ हा रंगलेला वाद आठवतो.
सर्वच डॉक्युमेंटरीज् सुंदर झाल्या आहेत. ‘अंनिस’च्या वाहिनींवर सर्व टाकल्या जातील. काहींनी उगीचच खर्च वाढवला आहे. काही गोष्टी चांगल्या जमून आल्या आहेत. पुढच्या वेळेस यापेक्षा चांगले परिणाम मिळतील. विक्रांत, गार्गी, प्रियंका, कुतूब टीमने चांगले काम केले. जितू व अभय सरांचे आभार मानतो. जितूच्या कविता ऐकण्यास मजा वाटते. आज दाखवली जाणारी पहिली फिल्म स्पर्धेबाहेरील आहे. शेवटची चौथी फिल्म छान झाली आहे.
अंधश्रद्धांचा शोध-बोध आणखी घेतला जावा. पुढील वेळेस भारतभरातून चांगला प्रतिसाद मिळेल. उमेश सरांचा मी पूर्वीपासूनचाच फॅन आहे. फिल्म्सचे ड्युरेशन पुढील वेळेस कमी करावे. सर्वांना खूप सदिच्छा. या कृतीमुळे आपल्या विचारांना बळकटी मिळते. त्यामुळे छान वाटते!