डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन (20 ऑगस्ट) हा देशभर ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून पाळण्यात आला. तो ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आहे तरी काय? हे समजावून घेण्यासाठी डॉ. दाभोलकरांचा यावरील ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकातील लेख येथे पुनर्मुद्रित करीत आहोत. मागील अंकात या लेखाचा पूर्वार्ध छापला होता. या अंकात या लेखाचा उत्तरार्ध प्रसिद्ध करीत आहोत.
धार्मिक जीवन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
धार्मिक जीवन व आध्यात्मिक जीवन असा भेद न करता हे विवेचन केले आहे. धर्माचे बाह्य स्वरूप कितीही कर्मकांडात्मक व औपचारिक असले, तरी धर्माचा गाभा आध्यात्मिकता हाच आहे. ‘धर्म या शब्दाने सामान्यपणे हिंदू, ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध, जैन इत्यादी धर्मपंथांचा निर्देश होतो.’ या प्रकारच्या संघटनात्मक धर्मांची तीन प्रमुख अंगे आहेत.
अ) धार्मिक विचार – प्रत्येक धर्माने स्वीकारलेल्या धारणा, श्रद्धा, पवित्र ग्रंथ, धर्म संस्थापक अथवा प्रेषित इत्यादी.
ब) धार्मिक आचार – प्रत्येक धर्माने स्वीकारलेले संस्कार, व्रत, सण, कर्मकांड, देवळे, तीर्थस्थाने इत्यादी.
क) वरील दोन्ही अंगांच्या सहाय्याने प्रत्येक धर्म आपल्या अनुयायांच्या अंतर्मनात एक आमूलाग्र नैतिक परिवर्तन घडवून आणण्याचे आश्वासन देतो.
धर्माच्या या स्थितीला ईश्वरदर्शन, आत्मसाक्षात्कार, मुक्ती, निर्वाण इत्यादी नावे आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणारी व्यक्ती पुढील धारणा स्वीकारते
अ) वैज्ञानिक उपपत्ती या सिद्धांतकल्पना असतात. नवीन पुरावा उपलब्ध झाल्यावर त्यांत परिवर्तन करणे आणि कधी-कधी त्या त्याज्य ठरविणेही आवश्यक असते. मानवी ज्ञान हे कधीच परिपूर्ण वा अंतिम नसते, ते सदैव परिवर्तनीय असते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो.
ब) निरीक्षण आणि प्रयोगाद्वारे, म्हणजेच अनुभवाधिष्ठित प्रगत वैज्ञानिक पद्धतीने समर्थनीय अशी उपपत्ती व धारणा स्वीकारली जाते.
क) वैज्ञानिक उपपत्ती ही काही घटनांच्या आधारे असत्य ठरविता आली पाहिजे. काहीही घडले तरी जी असत्य ठरणार नाही, तिला वैज्ञानिक उपपत्ती म्हणता येणार नाही.
ड) कोणतीही उपपत्ती एखादी व्यक्ती वा ग्रंथ यांच्या प्रामाण्यावर स्वीकारावयाची नाही. त्या उपपत्तीच्या समर्थनार्थ जो अनुभवाधिष्ठित पुरावा असेल, तार्किक कारणे दिली जातील, त्यांच्या आधारे ती स्वीकारावयाची.
ई) वस्तुस्थितीचा व घटनांचा अभ्यास वस्तुनिष्ठपणे, निरपेक्ष आणि तटस्थपणे करायला हवा. मानवी आशा आणि भय, इच्छा आणि पूर्वग्रह हे सर्व सत्यशोधनाच्या आड येऊ देता कामा नयेत.
धार्मिक जीवन व वैज्ञानिक दृष्टिकोन यांतील विरोध खालील प्रकारे मांडता येईल.
अ) वैज्ञानिक उपपत्तीद्वारे मिळालेले ज्ञान तात्पुरते आणि परिवर्तनीय असते; याउलट धार्मिक धारणा अपरिवर्तनीय आणि अंतिम सत्य मानल्या जातात.
ब) वैज्ञानिक सत्य निरीक्षण व प्रयोगाद्वारे एका विशिष्ट पद्धतीने शोधून काढले जाते. त्याचा पाठपुरावा करून जगामध्ये कधीही, कोठेही ते पडताळून पाहता येते. याउलट धार्मिक सत्ये अशा सामान्य अनुभवांच्या आधारे समजत नाहीत व पडताळूनही पाहता येत नाहीत. द्रष्टे, ऋषी अथवा प्रेषित यांना अतींद्रिय आणि तर्कातीत अशा गूढ अनुभवाने साक्षात्कार होऊन ती समजतात.
क) वैज्ञानिक उपपत्ती काही घटनांच्या आधारे असत्य ठरवता येते; परंतु धार्मिक सत्य त्रिकालाबाधित असल्याचे मानले जाते. विश्वातील कोणतीही घटना त्यांना असत्य ठरवू शकत नाही. धार्मिक धारणा बांधिलकीच्या स्वरुपात असतात. ‘ईश्वर एके दिवशी आपल्या कृतकर्माचा निवाडा करणार आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला निरनिराळ्या योनींत जन्म घ्यावे लागणार आहेत. माझ्या जीवनातील मी भोगत असलेली सध्याची दु:खे ही पूर्वजन्मातील मी केलेल्या पापाची शिक्षा आहे. ईश्वराला माझे कल्याण कशात आहे, हे माहीत आहे व म्हणून जे जे घडते, ते ते सर्व माझ्या चांगल्यासाठीच आहे,’ अशा प्रकारच्या श्रद्धा व्यक्ती बाळगते, वैज्ञानिक उपपत्तीपेक्षा या धार्मिक धारणा त्या व्यक्तीपुरत्या अधिक दृढ असतात. अनुभवगम्य पुराव्याच्या आधारे त्या खोट्या ठरविणे वा शाबीत करणे, हे शक्य नसते. कारण श्रद्धा बाळगणार्यांना ते रुचत नाही; उलट स्वत:च्या श्रद्धांवरील तो हल्ला वाटतो.
ड) वैज्ञानिक सत्य कधीही आप्त वाक्याच्या किंवा शब्दप्रामाण्याच्या आधारे स्वीकारले जात नाही. याउलट धार्मिक सत्ये सामान्य माणसाच्या आकलनक्षमतेच्या बाहेर असल्यामुळे ती श्रद्धेने स्वीकारावयाची असतात. अशा प्रकारे धार्मिक सत्यांना पोथीनिष्ठा आणि शब्दप्रामाण्याचे स्वरूप येते.
इ) मानवी आशा-आकांक्षांनी सत्याचे ज्ञान झाकोळू न देणे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा गाभा आहे. याउलट धार्मिक सत्ये मानवी मनाला शाश्वत आधार देणारी, मानवी आशा-आकांक्षाची पूर्ती करणारी असतात, अशी निदान ती धारण करणार्या व्यक्तीची मनोमन भावना असते; म्हणूनच ती मानवी मनाला दिलासा व समाधान देतात. अशा तर्हेने वैज्ञानिक वृत्ती बुद्धिवादी व चिकित्सक, तर धार्मिक वृत्ती भावनिक व श्रद्धाळू असते.
धार्मिक विचारवंतांना आपले युक्तिवाद समाधानकारक वाटतात, तर अधार्मिक विचारवंतांना त्यांचे युक्तिवाद समाधानकारक वाटतात. धार्मिक जीवनाचे समर्थन करणारे तत्त्वज्ञान चैतन्याचे किंवा जाणिवेचे स्वतंत्र अस्तित्व व स्वायत्तता स्वीकारते. जड द्रव्य हे मिथ्यारूप आहे, असे मानते किंवा जड द्रव्य ‘सत्’ असले तरी ते परतंत्र व चैतन्याधीन मानते. परंतु जड द्रव्य हीच अंतिम सद्वस्तू आहे आणि चैतन्य वा जाणीव जड द्रव्याचा परिणाम आहे किंवा जड द्रव्याच्या अधीन आहे, असे मानणारा वैज्ञानिक दृष्टिकोन हे अधर्माचे मूळ आहे, असेच धार्मिक विचारवंत मानतात. धार्मिक धारणांचा स्वीकार व्यक्ती त्या धारणांची तार्किकता किंवा प्रामाण्य किंवा सत्य पडताळून करीत नाही; याउलट व्यक्ती या श्रद्धा स्वीकारते. त्यामुळे त्याला युक्तिवाद समाधानकारक वाटतात. बर्ट्रांड रसेल म्हणतात, ‘लोकांना ईश्वरावर श्रद्धा ठेवण्यास तार्किक युक्तिवाद कारणीभूत ठरत नाहीत. बहुतेक लोक ईश्वर मानतात. कारण त्यांच्या बालपणापासून त्यांना तसे सांगितले गेलेले असते आणि दुसरे कारण म्हणजे त्यांना सुरक्षिततेची इच्छा असते.’ आत्म्याचे अस्तित्व, अमरत्व याविषयीच्या धारणा लहानपणापासून होणारे जबरदस्त संस्कार, मृत्यूची भीती व आपण चिरकाल राहावे, या इच्छेमुळे मनुष्य स्वीकारत असतो. धार्मिक धारणांच्या समर्थनार्थ मांडले जाणारे तार्किक युक्तिवाद वा छद्म वैज्ञानिक स्पष्टीकरण हे धार्मिक धारणांना वस्तुनिष्ठ तार्किक आधार देतात, असे मानणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता उथळपणाचे आणि आत्मवंचना करण्यासारखे आहे. ईश्वराच्या साक्षात्काराने व्यक्तीमध्ये आत्मौपम्य वृत्ती निर्माण होऊन प्रेम आणि करुणा यांचा झरा सुरू होतो. अहंकार विरतो, विषयाकडील ओढ थांबते, एक अपूर्व शांती लाभते. असा अनुभव जगातील श्रेष्ठ धार्मिक व्यक्तींना आला आहे, असे सांगितले जाते. या अनुभवाला नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य आहे आणि या उच्च अनुभूतीला खोटे मानण्याचे कारण नाही; परंतु हा अनुभव प्रत्यक्ष ज्ञानासारखा बोधात्मक आहे. त्याच्या आधारे ईश्वर, आत्मा, अमरत्व या धारणा सिद्ध होतात, हे धार्मिक तत्त्वज्ञांचे मत मानता येत नाही. याचे पहिले कारण असे की, व्यक्तीच्या प्रत्यक्ष ज्ञानाला वस्तुनिष्ठता असते. अनुभव घेणार्या मनात वा इंद्रियात काही बदल न घडवता तो अनुभव घेत असतो. याउलट योगासारख्या साधनाने किंवा औषधी द्रव्याच्या सहाय्याने मानवी मनात बदल करून आलेला अनुभव कितीही आनंददायी आणि परिणामत: चांगला असला, तरी तो वस्तुनिष्ठ नसतो. दुसरे असे की, या अनुभवाचा जो अर्थ, जे स्पष्टीकरण साक्षात्कारी पुरुष, त्यांचे अनुयायी, परंपरा किंवा पंथ करतात, तो त्यांच्यावरील संस्काराचा परिणाम असतो. तो वाच्यार्थाने घ्यायचा नसून केवळ रुपकात्मक अलंकारी असतो, हे ध्यानात घ्यावयास हवे. तिसरे महत्त्वाचे म्हणजे असा अनुभव आल्याची उदाहरणे सर्व धर्मांत आढळतात. म्हणून त्याला वस्तुनिष्ठता व प्रामाण्य मानता येत नाही. साक्षात्कारी पुरुषांत काही अंशांपर्यंत एकवाक्यता असली, तरी त्यापलिकडे तीव्र मतभेदच असतात. या मतभेदांच्या बाबतीत प्रत्येक जण दुसर्याचा अनुभव अविश्वासार्ह आणि खोटा मानतो. अशा मतभेदांच्या बाबतीत कोण खरे आणि कोण खोटे, हे ठरवायला काही निकषच नसतो. अशा निकषांच्या अभावी कोणत्याही एका साक्षात्कारी व्यक्तीचे प्रामाण्य हे अंधश्रद्धेचे व पोथीनिष्ठपणाचे ठरते. जगातील सर्व साक्षात्कारी पुरुषांमध्ये पूर्ण मतैक्य आहे, असे जरी वादासाठी स्वीकारले, तरी त्यावरून हा अनुभव वस्तुनिष्ठ आहे आणि चैतन्ययुक्त पदार्थांचे अस्तित्व सिद्ध करतो, असे सिद्ध होत नाही. हे अनुभव घेणार्यांच्यापुढे सारख्याच समस्या असल्यामुळे, त्यांची मनोभूमिका सारखीच असल्यामुळे ते घेत असलेले अनुभवही सारखेच असतात, एवढेच फार तर सिद्ध होईल.
मानवी जीवनातून धर्माची हकालपट्टी करण्याची भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन करू शकतो; परंतु मनुष्य मात्र विज्ञानाचे उच्चाटन सोडाच; विज्ञानाकडे दुर्लक्षही करू शकत नाही. जडवादी सिद्धांताची आणखी एक जमेची बाजू आहे, ती म्हणजे तत्त्वज्ञान क्षेत्राच्या बाहेरही त्याला दुजोरा मिळत आहे. ‘शॉक ट्रिटमेंट’ सारख्या उपायांनी मानसिक विकृतीवर इलाज केला जातो. विशिष्ट विद्युतयंत्राच्या सहाय्याने मेंदूचा विशिष्ट भाग उद्दीपित करून हव्या असलेल्या भावना प्राण्यात वा मानवात कृत्रिमरित्या उत्पन्न केल्या जातात. या सर्वांवरून मानवाचे मानसिक जीवन मेंदू व मज्जासंस्था यावर अवलंबून आहे व त्याद्वारे नियंत्रित केले जाते, असे सिद्ध होते. म्हणून मेंदू व मज्जासंस्था यांच्याशिवाय जाणीव स्वतंत्रपणे अस्तित्वात असते, हे स्वीकारणे शक्य नाही; शिवाय जाणीव जडद्रव्यावर (मेंदूवर) अवलंबून आहे व त्याचा परिणाम आहे; परंतु जडद्रव्य जाणिवेवर अवलंबून नाही, हा जडवादी सिद्धांत ऐतिहासिकदृष्ट्याही सत्य आहे. विश्वात प्रथम निर्जीव, जड द्रव्य होते. पाणी, हवा, वायू, जमीन, उष्णता होती. त्यातून प्रथम अत्यंत प्राथमिक स्वरुपाची जीवनिर्मिती झाली. त्यानंतर अनुक्रमे जाणीव व शेवटी स्वयंजाणीव निर्माण झाली, हे वैज्ञानिक द़ृष्टिकोनाने सिद्ध झाले आहे. हे नाकारायचे तर उत्क्रांतीपूर्वी ब्रह्मापासून किंवा चैतन्यापासून जड द्रव्यापर्यंत एक अपक्रांती झाल्याचे मानावे लागेल; परंतु याला कोणताही पुरावा नाही.
सत्याविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन हे भान जरूर बाळगतो की, मानवाची जाणीव ही भौतिक परिस्थितीतून आकारत असते. समाजरचना योग्य प्रकारे व अनुकूल परिस्थितीपर्यंत बदलली, तर मानवी जाणिवेत अधिक टिकाऊ स्वरुपाचा व प्रभावी बदल होतो.
21 व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन
19 वे, 20 वे शतक यामध्ये भौतिक ज्ञानाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने अभूतपूर्व विकास झाला. 21 व्या शतकात सामाजिक विज्ञान व मनोविज्ञान या क्षेत्रांत वैज्ञानिक दृष्टिकोन प्रभावी कामगिरी बजावेल, अशी अपेक्षा आहे. 1953 साली पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाचे विज्ञानविषयक धोरण लोकसभेत मांडले. त्यावेळेला वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अनन्यसाधारण महत्त्व सांगत असताना त्यांचे उद्गार आहेत –
“Scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of a free man.”
वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धती आहे, सत्यशोधनाचा मार्ग आहे. जीवनाचे दिशादर्शन वैज्ञानिक दृष्टिकोनानेच होते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते. यापैकी वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचार व कृती करण्याचा मार्ग आहे, याबाबत सविस्तर विवेचन आधी केलेच आहे; परंतु सत्य शोधणे व जीवनाचा मार्ग ठरवणे, यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन परिणामकारक कसा ठरतो, हे समजून घ्यावयास हवे. आजच्या गतिमान समाजात ‘वेळ’ या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हे महत्त्व पैशापेक्षाही अधिक आहे, असे मानले जाते, ते बरोबरच आहे. अशा समाजात आजही मृत व्यक्तीच्या निधनानंतर 10 व्या दिवशी पिंडदानाचा कार्यक्रम होतो. शेकडो लोक त्यासाठी स्वत:च्या घरून स्मशानात येणे व जाणे यासाठी असंख्य तास वाया घालवतात; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे स्मशानात पिंडाला कावळा कधी शिवेल, याची वाट पाहत तासन्तास समुदाय खोळंबून राहतो. आता पिंडाला कावळा शिवणे या रुढीचा तपास घेतला, तर कोणते सत्य आढळते? ते सत्य असे – असे मानण्यात येते की, मृत व्यक्तीचा आत्मा 10 व्या दिवशी पिंडदानाच्या वेळी स्मशानात पिंडाच्या बाजूला येतो. कावळ्याला हा आत्मा दिसतो. एवढेच नव्हे, तर त्या आत्म्यामार्फत मृत व्यक्तीचा चेहरा त्याला दिसतो. त्यावरून आत्मा सुखी आहे की दु:खी आहे, हेही कावळ्याला कळते. आत्मा सुखी असल्यास कावळा पटकन पिंडाला शिवतो; मात्र दु:खी दिसल्यास कावळा पिंडाला स्पर्श करणे टाळतो. त्याद्वारे मृताच्या नातेवाईकांना असा संकेत प्राप्त होतो की, मृत व्यक्तीचा आत्मा काळजीत आहे; दु:खी आहे. नातेवाईक आपल्या समजुतीनुसार त्या दु:खाचे कारण शोधून काढतात. मग त्या कारणाचे निराकरण करणारे संकल्प उच्चारतात. उदा. लग्नाला आलेल्या मुलीचे लग्न करून देऊ, बेकार मुलाला नोकरी लावून देऊ. ही मानवी भाषा आत्म्याला समजते. त्याचा चेहरा आनंदी होतो. तो आनंदी चेहरा कावळ्याला दिसतो. मग कावळा पिंडाला शिवतो. मगच स्मशानात आलेले मृताचे नातेवाईक समाधानाने परत फिरतात. आता या सर्व कथनात सत्यशोधनाचा मागमूसही नाही. पिंडाला कावळा शिवणे याचा साधा संबंध स्मशानातील त्या कावळ्याचे पोट भरलेले आहे की नाही याच्याशी आहे, याची जाणीवही नाही. सत्य मानली गेलेली बाब ही बहुधा धार्मिकदृष्ट्या सत्यच आहे, असे मानलेले असते. स्वाभाविकच त्याबाबतच्या व्यक्तीच्या, समूहाच्या भावना संवेदनशील व तीव्र असतात. म्हणूनच त्या सत्याबाबतचे वास्तव तपासणे टाळले जाते.
वैज्ञानिक दृष्टिकोनाने ही परिस्थिती बदलता यावयास हवी. वैज्ञानिक दृष्टिकोन समाजजीवनाचे मार्ग देखील ठरवतो, हे समजून घेणे अगत्याचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व असे की, तो आकलनाची परिपक्वता निर्माण करतो. या समाजातील अनेक प्रश्न आकलनाच्या परिपक्वतेअभावी निर्माण झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने सामान्य माणसाच्या जीवनात जर आकलनाची परिक्वता वाढवता आली, तर स्वत:च्या जीवनाशी संबंधित निर्णय लोकशाहीत अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकतील. 2020 साली भारत महासत्ता होणार, असे सांगितले जाते. मात्र बहुतेकांना या महासत्तेचे रूप असे वाटते की, भारताचा अवकाशयात्री चंद्रावर पोचलेला असेल. शास्त्रीयदृष्ट्या विकसित मनुष्यबळ तंत्रज्ञानात भारत जगात पहिल्या दोन-चार राष्ट्रांत असेल, तो सर्वांगाने शस्त्रसज्ज असेल. आता दुसरीकडे असा प्रश्न उपस्थित करावयास हवा की, विकास निर्देशांकात जगात भारताचा नंबर 127 वा आहे. हा निर्देशांक साक्षरता, गरोदरपणातील मृत्यू, नवजात अर्भकांचे मृत्यू, पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक सोय इत्यादींच्या आधारे काढला जातो. या दोन्ही बाबींची तुलना आकलनाच्या परिपक्वतेने केली; तर स्वाभाविकच असा प्रश्न उपस्थित होतो की, चंद्रावर पाऊल ठेवण्याएवढे प्रगत तंत्रज्ञान भारताकडे आहे. मग देशातील आया-बहिणी गरोदरपणात मरू नयेत आणि त्यांना नळाने घरी पाणी मिळावे, ही अत्यंत साधी बाब या देशात अजूनही इतकी अवघड का? प्रश्नाचे हे आकलन, प्राधान्यक्रम, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने जर सामान्यांच्या मनात तयार झाले, तर देशापुढचे विकासाचे प्राधान्यक्रमच बदलतात. अनेक सामाजिक प्रश्नांचे असे भान विसाव्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन जनसामान्यांच्यात निर्माण करू शकेल; नव्हे त्याने ते करावे, अशी अपेक्षा आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सर्वाधिक महत्त्वाचे कार्य म्हणजे तो माणसाची जाणीव मुक्त करण्यास मदत करतो आणि ती सदैव मुक्तच राहावी, यासाठी आधार पुरवितो. माणूस असणे याचा अर्थच जाणीव असणे; आणि खरे तर मुक्त जाणीव असणे. परिस्थितीच्या दबावाखालीही व्यक्ती स्वत:ची जाणीव मुक्त करू शकते. हे फक्त माणसाचेच वैशिष्ट्य आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या; म्हणजे तो बंड करून उठेल,’ असे सांगितले आणि राजकीय क्रांतीआधी वैचारिक क्रांतीची आवश्यकता प्रतिपादित केली. राजकीय दडपशाही, आर्थिक पिळवणूक, अनेकविध कारणांनी निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी या सर्वांतून मुक्त होण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाबरोबरच एक मुक्त जाणीव लागते, जी कोणत्याही दबावाखाली येत नाही. ती जाणीव निर्माण करण्यात वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाची कामगिरी बजावतो; म्हणजेच माणसाला सर्वांत मौल्यवान असलेल्या जाणिवेच्या स्वातंत्र्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा गाभा आहे.
या स्वतंत्र जाणिवेचाच एक भाग म्हणजे मन वासनाविकारांपासून मुक्त होणे आणि दया, क्षमा, शांती, करूणा या जाणिवांच्या परिपोेषाने अधिक समृद्ध होणे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा शोध लागण्याआधीच्या शेकडो-हजारो वर्षांपासून माणसाचा हा शोध चालू आहे. ज्यांना आपण सत्पुरुष, संत अथवा महामानव म्हणतो, त्यांनी आपापल्या परीने हा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रदीर्घ वाटचालीत धर्मांनी अथवा पंथांनी त्या मार्गाला आत्मसात करून त्यावर आपली मोहोर उठवली. असे अनेक मार्ग आज सांगितले जातात; मात्र त्यांची परिणामकारकता ही बर्याच प्रमाणात प्रश्नचिन्हांकित आहे. तसेच हा मार्ग चोखाळणे, बहुतेकजण व्यवस्थापरिवर्तनाबाबत ब्र उच्चारत नाहीत. काही हजार वर्षेचालू असलेला हा शोध वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सहाय्याने आधुनिक मानसशास्त्र व मनोविज्ञानशास्त्र 21 व्या शतकात घेतील, अशी अपेक्षा आहे. 21 व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोनाची वाटचाल ही या अर्थाने मानवमुक्तीची वाटचाल ठरू शकेल.
वैज्ञानिक दृष्टिकोनावरील आक्षेप व उत्तरे
विज्ञानाधिष्ठित जीवनपद्धती म्हणजे रोकडेपणा व भावनाशून्यता असा एक समज हेतुपुरस्सर वा अज्ञानाने पसरवला जातो. भावना ही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची एक समृद्ध, आवश्यक बाजू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विरोध आहे, तो सारासार बुद्धी गहाण टाकून भावनेच्या आहारी जाण्याला. प्रिय व्यक्तीचे निधन झाल्यावर खूप दु:ख होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे काही काळ मन सैरभैर होणे, जीवनात पोकळी निर्माण झाली आहे, असे वाटणे, हे देखील मानवी स्वभावाला धरून आहे; परंतु सारासार बुद्धीने विचार करणारा माणूस हे अटळ वास्तव स्वीकारतो व त्यानंतर हळूहळू आपल्या नेहमीच्या कार्याकडे वळतो; परंतु संबंधित व्यक्ती काही महिने अथवा काही वर्षे गेल्यानंतरही जर शोकमग्नच राहिली अथवा ‘प्लँचेट’सारख्या गोष्टींच्या आहारी जाऊन मृत आत्म्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू लागली, तर तो व्यक्तीच्या भावनाप्रधानतेचा नाही, तर विवेकहीनतेचा पुरावा मानावा लागेल. विज्ञानाबद्दल अनेकांच्या मनात आकस असतो. परमेश्वरावर श्रद्धा न ठेवता जीवनातील सर्व समस्यांना सामोरे जाण्याची भाषा काहींना उर्मटपणाची, तर काहींना अडाणीपणाची वाटते. देव या कल्पनेचा आधार ज्यांना हवा वाटतो, त्यांना तो घेण्याचा अधिकार देशाच्या संविधानाने दिला आहे; परंतु अशा कल्पित शक्तीला शरण जाण्यापेक्षा संकटाचे स्वरूप समजावून घेऊन चुका कबूल व दुरुस्त करून संकटाला सामोरे जाणे यातच प्रगल्भता आहे.
माणसाने कितीही शोध लावले, तरी त्याला निसर्गावर विजय मिळवणे शक्य नाही, असे एक प्रतिपादन असते. वैज्ञानिक दृष्टिकोनाची धारणा अशी आहे की, निसर्गामागचे नियम समजून घ्यावेत व त्या आधारे आपले जीवन सुखकर बनवावे. पावसाळ्यात नदी पुराने जीवन उद्ध्वस्त करते, तर उन्हाळ्यात कोरडी पडून तेच करते. अशा नदीवर धरण बांधावे, पूरनियंत्रण करावे, वर्षभर हुकमी पाणी मिळवावे, वीजनिर्मिती करावी, हे सारे माणूस करू शकतो. कारण त्यासाठीचे नियम तो शोधून काढतो. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा हेतू निसर्गाविरुद्ध युद्ध जिंकणे हा नाही, तर निसर्गनियमांचा उपयोग मानवीहिताच्या दृष्टीने करण्यासाठी निसर्गाबरोबर अर्थपूर्ण सहजीवन असा आहे.
विज्ञानामुळे अणुबॉम्ब तयार झाला, लाखो लोकांचा बळी गेला असे सांगून, विज्ञानाने माणूस कोठे सुखी झाला, असा एक युक्तिवाद केला जातो. त्यावेळी एक गोष्ट सोयीस्करपणे विसरली जाते की, माणसाचे जीवन सुखकारक व सुरक्षित करण्यासाठी विज्ञानाने फार मोठे योगदान दिले आहे. सर्व मानवांना पुरून उरेल एवढे धान्य उत्पादन करण्याची किमया केवळ विज्ञानामुळे घडली. मानवजातीला हैराण करणारे अनेक रोग विज्ञानाने हद्दपार केले. एकमेकांशी संपर्क साधण्याच्या शक्यतेत क्रांती घडवून आणली. मनोरंजनाचे अद्भुत खजिने खुले केले. माणसाच्या काही लाख वर्षांच्या इतिहासात ज्यांची कल्पनाही अशक्य होती, त्या शक्यता गेल्या दोन शतकांत मानवी जीवनात केवळ विज्ञानामुळे वास्तवात आल्या. अग्नी अन्न शिजविण्यासाठी वापरावा की, दुसर्याचे घर जाळण्यासाठी, हा निर्णय विवेकशक्तीने घ्यावा लागतो. विवेकशक्ती याचा अर्थ सारासार व डोळस बुद्धी. ही बुद्धी प्राप्त होते वैज्ञानिक दृष्टिकोनाने; मात्र धर्माच्या आधारे ती प्राप्त होते, असे प्रतिपादन केले जाते. ज्यांना तो प्रयत्न करावयाचा आहे, त्यांना ते स्वातंत्र्य आहेच; परंतु विवेकाकडे जाण्याचा सर्वांत खात्रीचा मार्ग वैज्ञानिक दृष्टिकोनातून जातो. या मूल्यधारणेबरोबरच विज्ञानाने माणसाच्या जीवनात केलेल्या क्रांतीची मातब्बरी राहतेच. कारण तिला भरभक्कम व्यावहारिक पाया आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन सर्व प्रश्नांची उत्तरे देत नाही; जसे देव अथवा आत्मा याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन काहीच बोलत नाही, असा आक्षेप घेतला जातो. हा आक्षेप वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, याच्या अज्ञानातून उद्भवला आहे. आत्मा व तत्सम बाबी या मानवी निरीक्षण व प्रयोग यापलिकडच्या आहेत. यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाची याबाबतची भूमिकाही ‘मला माहीत नाही,’ अशी आहे. जे ज्ञान निरीक्षण आणि प्रयोग याला उपलब्ध नाही, ते माणसाला होऊ शकते, यावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विश्वास नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन सामान्यांना पेलणार नाही, त्याला धर्माचा आधार पाहिजे, हा आक्षेपही खरा नाही. जीवनाच्या अनेक बाबतीत निर्णय घेताना जेवढा पुरावा तेवढा विश्वास, या पद्धतीने व्यक्ती वैज्ञानिक दृष्टिकोन वापरतच असते. धर्माची खरी नैतिक शिकवण पेलणे, हे त्यापेक्षा बरेच अवघड आहे. धर्माच्या शिवाय माणसाच्या विवेकातून नीती निर्माण होऊ शकते, असे वैज्ञानिक दृष्टिकोन मानतो. यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, मूल्यधारणा करीत नाही, हे अमान्य करावयास हवे. धर्माचे समर्थक असे प्रतिपादन करतात की, धर्म म्हणजे रुढी, कर्मकांडे, परंपरा नव्हेत; तर धर्म हा धर्माचे तत्त्वज्ञान आणि नैतिकतेवर आधारित आहे. त्यामुळे धर्म नैतिक मूल्यधारणा करतो. वैज्ञानिक दृष्टिकोनालाही केवळ गणितीपणा अभिप्रेत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारणभाव. मूल्यधारणेच्या क्षेत्रात हा कार्यकारणभाव असे सांगतो की, इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपणास आवडत नाही, तसे वर्तन आपणही इतरांशी करू नये आणि इतरांनी आपणाशी जसे वर्तन केलेले आपल्याला आवडते, तसे वर्तन आपणदेखील इतरांशी करावे. वैज्ञानिक दृष्टिकोन विचारांना योग्य दिशा देतो. त्यामुळे आचारांना योग्य दिशा मिळतेच असे नाही; परंतु तशी दिशा मिळवून देण्याची सर्वाधिक शक्यताही वैज्ञानिक दृष्टिकोनातच आहे. कारण वैज्ञानिक दृष्टिकोन हा माणसाच्या बुद्धीवर अवलंबून असतो आणि मूल्यधारणाही माणसाची बुद्धी व सामाजिक स्थिती यातूनच होत असते. सामाजिक स्थितीचे मूल्यधारणेच्या दृष्टीने परीक्षण हेदेखील बुद्धीच्या सहाय्यानेच घडून येते. हा क्रम लक्षात घेतला, तर वैज्ञानिक दृष्टिकोन मूल्यधारणा करत नाही, हा आक्षेप कसा चुकीचा आहे, हे समजून येईल.
वैज्ञानिक दृष्टिकोन मानला की, चुंबकचिकित्सा, रेकी, वास्तुशास्त्र, फलज्योतिष या सर्व बाबी खोट्याच मानाव्या लागतात. तसेच कथित अध्यात्मातील मोक्ष, ब्रह्म, परब्रह्म, स्वर्ग, आत्मा, परमात्मा या बाबी अमान्य कराव्या लागतात.
– डॉ. नरेंद्र दाभोलकर