भारताचे नागरिक म्हणून आपण सर्व भारतीय लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजेच भारताच्या संविधानाला बांधील आहोत. २००७ पासून दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ‘संविधान बांधिलकी महोत्सव’ राबविला जातो.
संविधानाचा स्वीकार करून आपल्या देशाला ६८ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही संविधानाची सर्व मूल्ये जनमानसात पूर्णतः रुजली गेली नाहीत, असे दिसते. संपूर्ण जगामध्ये भारतीय लोकशाहीला वेगळा आणि उच्च असा दर्जा प्राप्त आहे. विविधतेने नटलेल्या या देशाला एकसंध बांधून ठेवणारी शक्ती म्हणजेच भारताचं संविधान! स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ हा भारताच्या भविष्याची रचना करण्याचा समजला गेला, परंतु स्वातंत्र्य मिळवूनही आपल्या नागरिकांत संविधान आणि त्याच्या जागरूकतेबाबत अजूनही उदासीनता दिसून येते. ही उदासीनता कमी व्हावी आणि सर्वसाधारण भाषेद्वारे जनमानसांत संविधानाची मूल्ये, हक्क आणि कर्तव्ये पोचावीत, हा एकमेव उद्देश बाळगून ’संविधान जागर यात्रा’ या नेक कार्यक्रमाची कल्पना उदयास आली.
संविधान सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोचविणे ही साधी भूमिका घेऊन २०१६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंनिसच्या युवा विभागातर्फे आपण मुंबई ते महू आणि नागपूर ते औरंगाबाद मार्गावरून संविधान जागर यात्रेचे आयोजन केले होते. या ११ दिवसांत एकूण १२५ कार्यक्रम सादरीकरण करून या संविधान जागर यात्रेचा समारोप ६ डिसेंबर रोजी अनुक्रमे महू आणि औरंगाबाद येथे करण्यात आला होता.
२०१७ वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातून अशा संविधान जागर यात्रेचे नियोजन करायचे ठरले. यासंदर्भात पूर्वतयारीसाठी सर्व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये अंनिस, राष्ट्र सेवादल, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, मुस्लिम सत्यशोधक मंडळ, विद्रोही सांस्कृतिक चळवळ या संघटनांचे कार्यकर्ते ‘परिवर्तनवादी युवा संघर्ष समिती’ या नावाने एकत्र आले. संविधान जागर यात्रेच्या पूर्वतयारीसाठी इचलकरंजी येथे पार पडलेल्या कार्यशाळेला सर्व संघटनांचे क्रियाशील कार्यकर्ते उत्साही संख्येने उपस्थित होते.
सुनील स्वामी यांनी लिहिलेला संविधानाचा पहिला पोवाडा. त्यापाठोपाठ अंनिस कार्यकर्ता दत्ता घुटुगडे यांच्याकडून तयार झालेल्या ओव्या, कविता आणि सुनील स्वामी सरांचे पेपर प्रेझेंटेशन, राजवैभव शोभा रामचंद्र या कार्यकर्त्याने लिहिलेलं संविधान भारुड अशा सर्व संविधानावरील साहित्य कलाकृतींना एकत्र करण्याचे काम या कार्यशाळेत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या जबाबदारीचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले. नवनाथ मोरे आणि राजवैभव यांनी या कार्यशाळेनंतर एक ’पायलट टूर’ सुद्धा केली.
२६ नोव्हेंबर ’संविधान दिवस’ ते ६ डिसेंबर ’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन’ असा ११ दिवसांचा उपक्रम कालावधी निश्चित झाला.
२६ नोव्हेंबर २०१७ रोजी कोल्हापुरातील सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे जमून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. तिथून पुढे न्यू कॉलेज ते बिंदू चौक अशी ’संविधान रॅली’ काढण्यात आली. यामध्ये न्यू कॉलेजची विवेकवाहिनी, राष्ट्रीय सेवा योजना आणि समाजशास्त्र विभाग; तसेच गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर व महाराष्ट्र हायस्कूलचे वाचन मंडळाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते कॉ. दिलीप पवार, विनायक चव्हाण, धनाजीराव जाधव, अरुण पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार हे उपस्थित होते. त्यांनी सर्व तरुण साथींच्या हाती संविधानाची प्रत देऊन हा जागर पुढे न्यावा, अशा सदिच्छा दिल्या. बिंदू चौकातील महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जगातील पहिल्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून संविधान जागर यात्रेचा पहिला कार्यक्रम अर्थात संविधान पोवाड्याने सुरू करण्यात आला. संघसेन जगतकर, कपिल मुळे आणि संदेश वास्कर यांच्या कल्पना आणि प्रयत्नातून या यात्रेसाठी संविधानाचे आणि लोकशाहीचे दर्शन घडविणारे वाहन पोस्टर्सनी सजविण्यात आले आणि अशा प्रकारे हा ’संविधान जागर रथ’ पुढे मार्गस्थ झाला. ’संविधान जिंदाबाद’, ’लोकशाही जिंदाबाद’, ’समाजवाद जिंदाबाद’, ’धर्मनिरपेक्षता जिंदाबाद’ या सर्व जयघोषाने सर्व परिसर दुमदुमून गेला.
तेथून ही जागर यात्रा पन्हाळा तालुक्याकडे निघाली. २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या ११ दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी एक तालुका याप्रमाणे अनुक्रमे पन्हाळा- शाहूवाडी- गगनबावडाकरवीर- राधानगरी- भुदरगड- आजरा- चंदगड- गडहिंग्लजकागल- हातकणंगले- शिरोळ असा मार्ग नियोजित करण्यात आला. प्रत्येक दिवशी नियोजनानुसार तालुकावार ४ कार्यक्रम ठरले. पण पहिल्याच दिवसापासून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे दररोज ५-६ कार्यक्रमांची वर्णी लागली. प्रत्येक दिवसाचे पहिले दोन कार्यक्रम हे महाविद्यालयीन युवकांसमोर, दुपारनंतरचे कार्यक्रम हे तेथील शाळांमध्ये व रात्रीचे जाहीर कार्यक्रम गावांतील मध्यवर्ती चौकांमध्ये घेण्यात आले.
एकूण नियोजनानुसार या ११ दिवसांच्या कालावधीत ५२ हून अधिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले. ही संविधान जागर यात्रा किमान बारा ते तेरा हजार विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत संविधानाची मूळ भूमिका पोचविण्यात यशस्वी झाली आहे. भारतीय संविधानातील मूलभूत तत्त्व, हक्क आणि कर्तव्ये या बाबी सांस्कृतिक आणि पारंपरिक माध्यमांच्या रूपांत लोकांस समजावून सांगणे हा उद्देश घेऊन ही यात्रा पार पडली. यामधील सांस्कृतिक कार्यक्रमात भारुडातून विनोदी ढंगाने; तर अभंग- ओव्या- पोवाड्यातून कवनाच्या शैलीत, ‘चालता-बोलता संविधान’ हा प्रश्नोत्तराच्या द्वारे; तसेच शॉर्ट फिल्म्स, पोस्टर प्रदर्शन या आधुनिक माध्यमांच्या आधारे प्रभावीपणे संविधान जनमानसात पोचविले गेले. यादरम्यान, सहभागी संघटनांच्या प्रत्येक तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी यात्रेतील जागर साथींची राहणे, खाण्यासंदर्भात पुरेपूर काळजी घेतली. तालुकानिहाय शाळा, महाविद्यालयातील नियोजित कार्यक्रमांत विद्यार्थी आणि युवकवर्गाने संविधान भारुडात सक्रिय सहभाग नोंदवत उत्तमरीत्या प्रतिसाद दिला. कार्यकर्तेही यामुळे उत्साहाने कार्यक्रमपूर्ती करून या उपक्रमाला नव्या उंचीवर नेण्यास सज्ज झाले. पंकज खोत याने वेळोवेळी प्रास्ताविका मांडणे, कार्यक्रमांचे आणि त्यासंदर्भात लागणाऱ्या सर्व संपर्क क्रमांकांच्या नोंदी ठेवणे या कामाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. विनोद मीरा संजय या कार्यकर्त्याने उत्तम आवाज आणि प्रभावी शैलीत अभंग सादर केले. भारुड सादर करण्यास किमान दोन-तीन सादरकर्ते लागतात; परंतु राजवैभवने प्रत्यक्ष प्रेक्षकांच्या सहभागातूनच भारूड सादर करण्याची कला आत्मसात केली आणि ती वृद्धिंगतही केली. सुनील स्वामी, कृष्णा कोरे, स्वाती कोरे, तुषार माने, स्नेहल माने, छकुताई देठे, विभावरी नकाते, विनायक चव्हाण, नवनाथ मोरे, रमेश माणगावे, प्रकाश भोईटे, पांडुरंग करंबळकर (गुरुजी), अॅड. सयाजीराव पाटील अशी कार्यकर्त्यांची उत्तम कार्यशील फौज होती.
या यात्रेदरम्यान ठळक घटनांचा आढावा घेतला तर काही अनुभव अगदी सुखावणारे होते. आंबर्डे गाव, तालुका शाहूवाडी येथे एका शाळेतील अचानक ठरलेल्या कार्यक्रमात आलेला अनुभव जागर साथीसाठी विशेष पर्वणीच होती. संध्याकाळचे ५ वाजून गेले होते आणि शाळेची बेलही झाली होती. तरीही प्रकाश गाताडे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना थांबवून ठेवले आणि कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपला तरी ती मुले उठायचे नाव घेत नव्हती. येथील सादरकर्त्यांच्या उत्साहापेक्षाही ऐकणाऱ्या शाळकरी प्रेक्षकवर्गाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, हे नक्की! याच तालुक्यातील ‘उमेद फाऊंडेशन’च्या सहकार्याने पाल या गावातील ऐनवेळी ठरलेल्या जाहीर कार्यक्रमातही असाच उत्साह बघण्यास मिळाला. मुळात दुर्गम आणि दीड-दोनशे लोकवस्ती असलेलं हे गाव आणि अंधारून आल्यावर सहसा घरातून बाहेर न पडणारे ग्रामस्थ कडाक्याची थंडी असतानाही. तरीही रात्री ९:३० च्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित राहिले आणि चर्चेत सहभागी झाले. हा आमच्यासाठी सुखद धक्का होता.
कोवाड (ता. चंदगड) येथील आश्रमशाळेतील संविधान विषयक चर्चेत उत्साहाने सहभागी झालेल्या मुलांना पाहून तर खात्री झाली की आजूबाजूला अनेक धोके दिसत असतानाही खेड्यापाड्यातून घडणारं भारताचं भविष्य नक्कीच आशादायी आहे. भारताचं उद्याचं भविष्य असलेली ही पिढी हाती पडलेली संविधानाची प्रत अगदी न्याहाळून पाहते, त्यावेळी त्यांची हीच जिज्ञासूवृत्ती पाहून कार्यकर्ते आनंदाने हरखून गेले. कागल तालुक्यातही आलेला अनुभव कार्यकर्त्यांना आणखी ऊर्जा देऊन गेला. अचानक ठरलेल्या कार्यक्रमाला कागल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात गरिबीमुळे कुटुंबापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी पसंती दाखवत स्वतःहून या उपक्रमास योगदान म्हणून पाच, दहा रुपये गोळा करत २८० रुपये देऊ केले. विशेष हे होते की त्यांनी स्वतःची इच्छा, सहभाग आणि जाणीव या देणगीतून दर्शविला. हे मानधन कार्यकर्त्यांना मोठ्या रकमेहून अधिक वाटलं. ही गोष्ट भावनिक करणारी होतीच. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील आसवांनी या भावनिकतेला वाट मोकळी करून दिली.
कागलमधील सिद्धनेर्ली गावातील एका शाळेतील कार्यक्रमावेळी मिळालेला शिक्षकांचा शेरा तर प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कामाचं चीज करणारा ठरला, ‘पूर्वीचे संत त्या-त्या काळातील समृद्ध विचार समाजापर्यंत पोचवून समाजाला सक्षम करण्याचे काम करत आणि आता देशाला गरज संविधानाची आहे. तुम्ही संविधान लोकांना समजावून सांगत आहात, तुम्ही तर आधुनिक संत आहात या समाजाचे!’ अशा प्रकारे स्तुती आणि शाबासकीची थाप पाठीवर पडून प्रत्येक कार्यकर्त्यांचे मूठभर मांस तर नक्की वाढले. आम्ही पुढील कार्यक्रमासाठी गडबडीने निघून पुढे गेल्यावर मुख्याध्यापकांनी फोन करून मागे बोलावून संविधान जागर यात्रेच्या खर्चासाठी मदत म्हणून १०००/- रुपये देऊ केले. यावेळीही रकमेपेक्षा संविधान आणि जागर यात्रेशी जोडून घेण्याची त्यांची तळमळ आम्हास बळ देऊन गेली. इचलकरंजी येथील सरस्वती हायस्कूलमध्ये सर्व साथींना कोल्हापुरी फेटे बांधून आणि पुस्तके देऊन उत्साहात स्वागत केलं गेलं. हा सन्मान संविधानाचा आणि ते पुढं घेऊन जाणाऱ्या संविधान पाईकांचा होता.
अशा सर्व अनुभवांना जागरसाथी संविधान आपल्या शिदोरीत बांधून ठेवत होते. पण याचा समारोपही महत्त्वाचा होता. घटना समितीचे कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सदस्य असलेले देशभक्त डॉ. रत्नापाण्णा कुंभार यांच्या जन्मगावी म्हणजेच निमशिरगाव (ता.शिरोळ) याठिकाणी एका जाहीर कार्यक्रमाने संपन्न झाला. यावेळी सर्व सहभागी संघटनेतील ज्येष्ठ व्यक्ती, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि जागरसाथी उपस्थित होते. या ११ दिवसांतील प्रत्येक कार्यक्रमाची उपलब्धी आणि त्याहीपेक्षा प्रत्यक्ष संविधान या देशातील नागरिकांत घेऊन गेल्याचा आनंद जागरसाथींच्या चेहऱ्यावर झळकत होता. जागरयात्रेचा समारोप यावेळी झाला असला तरी संविधानाची भूमिका सर्वसामान्यांत पोचविण्याचे कार्य अविरत सुरू ठेवण्याचा निर्धार सर्व कार्यशील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
-राजवैभव शोभा रामचंद्र +९१ ८६००८१००४३
शब्दांकन – अनन्या कडले
Categories
संविधान जागर यात्रा झाली… पण संविधान जागर अविरत राहील..!