सडक नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, शोषितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कार्यकर्त्या कलावंताने रस्त्यावरती, चौकामध्ये नाटकाच्या माध्यमातून केलेले कलेचे प्रकटीकरण नाटक होय! सामान्य माणसांना भेडसावणार्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सडक नाटक चळवळ आजतागायत करताना आढळते.
जगामध्ये सडक नाटकाची सुरुवात ही 1918 साली रशियन क्रांतीच्या विजयोत्सवाला एक वर्ष पूर्ण झालेल्या निमित्ताने झालेल्या सडक नाटकाने झाली, असे मानले जाते. त्यानिमित्ताने सडकनाट्य चळवळीच्या शंभरीचा घेतलेला धावता आढावा…
मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद, रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्त्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. या तीनही घटकांना एकमेकांपासून वेगळे करून चालणार नाही; किंबहुना हे तीनही घटक परस्परावलंबी आहेत अस म्हटलं तर वावगं ठरू नये. कला-कलावंत आणि समाज या मध्ये मानव हाच केंद्रबिंदू मानलेला आहे. कोणतीही कला; मग ती चित्र, नाट्य, शिल्प, नृत्य, संगीत असो, त्यामध्ये माणूसच केंद्रभागी असतो.
कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाचा विस्मयकारक इतिहास पाहता मानवी विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर, कलेने मानवाला जिवंत राहण्याची प्रेरणा दिली आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला-कलावंत आणि समाज यांचे उन्नयन होताना आढळले आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कलावंतांनी कलेच्या माध्यमातून मानवी मनाची आणि मेंदूची मशागत करण्याच काम केले आहे. जसजशी कला उन्नत होत जाते, प्रगत होत जाते, तसतसे कलावंत आणि समाज देखील प्रगत होत जातात. एकीकडे कला निर्मितीचे पोषक वातावरण, तर दुसरीकडे त्या कलात्मकतेचा अविभाज्य घटक असणारा कलावंत नेहमीच कलेच्या पातळीवर सृजनात्मक विचार करून नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो. चित्र, शिल्प, संगीत, नाट्य, नृत्य या आणि अशा अनेक कलांच्या माध्यमातून वैचारिक घुसळण आणि समाजाचे प्रतिबिंब दाखवण्याचं काम आजतागायत केलं जातंय.
समाजामध्ये आढळणारे वेगवेगळे कलाप्रकार एकीकडे लोकांचे निखळ मनोरंजन करताना दिसतात, तर काही कलाप्रकार लोकांचं प्रबोधन; तसेच जनजागृती करण्याचे काम करतात. आपल्याकडे भारुड, पोवाडे, दशावतार, तमाशा या सार्या लोक कलांच्या माध्यमातून लोकप्रबोधन, जनजागृती करण्याचे काम केले आहे. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी ओळखून सामाजिक प्रश्न लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सामाजिक भान असणार्या कलावंतांनी केले आहे, करत आहेत आणि करत राहतीलही. हे नवनिर्मितीक्षम कलावंत, समाजामध्ये घडणार्या चांगल्या-वाईट गोष्टीचे आकलन करून समाजाच्या प्रगतीच्या, विकासाच्या आड येणार्या गोष्टींचे चित्रण वेगवेगळ्या कलेच्या प्रांतात करत असतात, त्याचबरोबर कलेच्या माध्यमातून वेळोवेळी सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांवर भाष्य करून अभिव्यक्त होत राहतात.
कलावंत ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजाला भेडसावणार्या समस्या, त्या समाजाचे प्रश्न, अस्वस्थता कलावंत त्याच्या मेंदूतील सर्जनशील आणि कल्पक विचारांच्या माध्यमातून कलेद्वारे प्रकटीकरण करत असतो. त्यामुळे कला, कलावंत आणि समाज यांना आपण एकमेकांपासून वेगळे करून चालणार नाही.
अशाच लोकप्रबोधनाच्या सांस्कृतिक चळवळीत स्वतःचं कलात्मक असं स्वतंत्र स्थान आणि वेगळेपण अधोरेखित करणारा कला-प्रकार म्हणजे ‘सडक नाटक’ होय. कोणत्याही कलेचे सादरीकरण तथा प्रात्यक्षिक करत असताना त्याला सैद्धांतिक ज्ञानाचा आधार असेल तर त्या कृतीला महत्त्व प्राप्त होते. सडक नाटककला प्रकाराच्या बाबतीत मात्र थोडं वेगळं म्हणता येईल. कारण सडक नाटकाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा त्याला सडक नाटक म्हणायचं की आणखी काय? याबद्दलची स्पष्टता पाहायला मिळत नाही. सडक नाटकाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा त्याला सैद्धांतिक बाजूसुद्धा असू शकते आणि ती कालपरत्वे विकसित होऊ शकते, याबद्दलचे नेमके भान त्यावेळी आढळून आलेले दिसत नाही. सडक नाटक संकल्पना म्हणून विकसित होण्यापूर्वी सादरीकरणाच्या माध्यमातून ती पुढे आलेली दिसते. सडक नाटकाची सैद्धांतिक बाजू पुढे येण्यापूर्वी सडक नाटकाचे सादरीकरण करून त्याचे प्रात्यक्षिक स्वरूप जगासमोर आलेले दिसते.
सडक नाटकाचा इतिहास
सडक नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, शोषितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कार्यकर्त्या कलावंताने रस्त्यावरती, चौकामध्ये नाटकाच्या माध्यमातून केले जाणारे कलेचे प्रकटीकरण होय! सामान्य माणसांना भेडसावणार्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सडक नाटक चळवळ आजतागायत करताना आढळते. या सडक नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची जी परंपरा आहे, ती खूप मोठी आहे. भारतामध्ये सोंगी भारुड, पारावरचे तमाशे, दशावतार इत्यादी लोकपरंपरांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम केले जाई; परंतु या लोककला सडक नाटक म्हणून जरी मान्य केल्या गेल्या नसतील तरी दोन्हीमधील साम्यस्थळ समजून घेणं गरजेचं आहे. अर्थातच या लोकपरंपरेप्रमाणे लोकप्रबोधन केलं जायचं, त्याचप्रमाणे सडक नाटकाच्या माध्यमातून देखील प्रबोधन केले जायचे. या लोकपरंपरांचे सादरीकरण जिथं जागा उपलब्ध असेल तिथे, मोकळ्या वातावरणात केले जायचे, त्याचप्रमाणे सडक नाटकाचे देखील तसेच आहे; पण असे असले तरी जगामध्ये सडक नाटकाची सुरुवात ही 1918 साली रशियन क्रांतीच्या विजयोत्सवाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मायकोवस्की या नाटककाराच्या ‘मिस्ट्री बुफे’ या नाटकाने झाली. या नाटकामध्ये रशियन क्रांतीमागची भूमिका आणि परिवर्तनाचा विचार या गोष्टीचा समावेश करण्यात आला होता; म्हणजे सामान्य माणसाचे जगण्याचे प्रश्न मांडणं आणि अन्यायाच्या विरोधात नाटकाच्या माध्यमातून आवाज उठवणं हेच सडक नाटकातून केले जाते. रूढ अर्थाने कमानी रंगमंचावरील (Proscenium Theatre) या नाटकाचा प्रयोग रशियाच्या चौकामध्ये रस्त्यावरती करण्यात आला असल्याने जगामध्ये हे मान्य केले जाते की सडक नाटकाची सुरुवात या नाटकाच्या माध्यमातून 1918 साली करण्यात आली. 1968 सालामध्ये फ्रान्समधील सामाजिक, राजकीय वातावरण ढवळून निघत असताना तेथील विद्यार्थी आणि कामगारांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून सडक नाटकाच्या माध्यमातून निषेध करणे सुरू केले होते. 1968 नंतर ब्रिटनमध्येही सडक नाटक चळवळीने जोम धरलेला आढळतो. त्या नंतर 1970 च्या दशकात राजकीय प्रचारासाठी सडक नाटकाचा वापर युगोस्लाव्हियातील राजकीय पक्षाने केलेला आढळतो. भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इप्टा (INDIAN PEOPLE THEATRE ASSOCIATION) च्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवरती नाटक करायला सुरुवात झाली. सडक नाटकाची ही चळवळ भारतामध्ये देखील जोमाने वाढली; अगदी दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत ही चळवळ पाहायला मिळते. दक्षिणेकडे; प्रामुख्याने आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रजा नाट्य मंडळी, कर्नाटकमध्ये ‘समुदाया’ आणि केरळमध्ये ‘केरळ शास्त्र साहित्य परिषद’ या संघटनांच्या माध्यमातून सडक नाटकांचं सादरीकरण, प्रबोधन केलं जायचं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील ‘आव्हान’ नाट्यमंच सारखे काही गट कार्यरत होते. बंगालमध्ये बादल सरकार यांच्या पुढाकाराने आंगण मंच (Third Theatre) म्हणून विकसित होत होतं, तर दिल्लीमध्ये जनम (जन नाट्यमंच) च्या माध्यमातून सडक नाटकं केली जात होती आणि आजतागायत केली जात आहेत. पण आज मात्र देशभरातील सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते.
राष्ट्रीय सडक नाटक दिवस आणि कॉ. सफदर हाश्मी

भारतामध्ये सडक नाटक चळवळीच्या अनुषंगाने ज्या-ज्या कार्यकर्त्या कलावंतांनी योगदान दिले त्यामध्ये सगळ्यांत अग्रणी नाव हे निर्विवादपणे कॉ. सफदर हाश्मी यांचेच असू शकते. याबद्दल कोणाचे दुमत असेल, असे वाटत नाही. कारण सडक नाटक करताना जीवाची तमा न बाळगता हौतात्म्य पत्करणारी व्यक्ती म्हणजे सफदर! आणि म्हणूनच या कॉ. सफदर हाश्मी यांचा जन्मदिवस देशभरामध्ये राष्ट्रीय सडक नाटक दिवस म्हणून साजरा केला जातो. कॉ. सफदर हाश्मी यांचा जन्म 12 एप्रिल 1954 साली झाला. सांस्कृतिक अंगाने लोकप्रबोधन करण्यासाठी जे माध्यम सफदर हाश्मी यांनी निवडले, ते म्हणजे सडक नाटक होय. सडक नाटकासारख्या प्रभावी सांस्कृतिक माध्यमाचा सर्वांत चांगला आणि कल्पक वापर कॉ. सफदर हाश्मी सारख्या कलावंत असणार्या कार्यकर्त्याने अगदी योग्य रीतीने करून सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी केलेला आढळतो. सडक नाटकासारखं दुधारी सांस्कृतिक शस्त्र समजल्या जाणार्या माध्यमाचा वापर मार्क्सवादी असणार्या कॉ. सफदर हाश्मी यांनी समाजामध्ये आढळणार्या वाईट चाली-रीती, प्रथा; तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत विवेकी पद्धतीने केलेला आढळतो. सांस्कृतिक अंगाने समाजप्रबोधन या प्रेरणेने सफदर हाश्मी यांनी 1973 साली ‘जनम’ (जन नाट्यमंच) या सांस्कृतिक संघटनेची स्थापना केली. ‘जनम’ संस्थेच्या माध्यमातून सडक नाटकासारख्या प्रबोधन करणार्या चळवळीला लोकचळवळ, जनचळवळ बनविण्याचं मोठं काम सफदर हाश्मी यांनी केल. खरं तर या ‘जनम’चा खरा जन्म झाला, तो ‘मशीन’ या सडक नाटकाचे सादरीकरण करून.
सफदर हाश्मी यांनी इंग्रजी साहित्यातून एम.ए. केलेले असल्यामुळे त्यांना साहित्याची जाण चांगली होती. ते स्वतः खूप चांगले गायचे. त्याचबरोबर ते कविता लिहायचे, नाटक लिहायचे. अभिनय आणि दिग्दर्शन हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या नाटकांपैकी अत्यंत महत्त्वाची सडक नाटकं म्हणजे, कष्टकरी स्त्रियांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकणारा ‘औरते, गाव-गाव से शहर-शहर तक,’ ‘डीटीसी का धांदली,’ ‘राजा का बाजा.’ त्यांनी केलेल्या या सडक नाटकांची लोकांनी आणि तत्कालीन सरकारनेही दखल घेतली होती. सफदर हश्मींच्या सडक नाटकांना राजसत्ताही घाबरत असे, असं कधी काळी बोललं जायचं. त्यांनी लिहिलेली ‘पढना लिखना सिखो ऐ मेहनत करनेवालो’ सारखी गाणी आजही नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांच्या ओठांवर आहेत. ‘किताबे कुछ कहना चाहती है’ सारख्या कवितांच्या माध्यमातून वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठी त्यांनी कवितांचे लेखन केले. आजही ही कविता अनेक ठिकाणी बोलली जाते.
एकीकडे श्रीमंत-गरीब वाढत जाणारी दरी, दुसरी कडे भांडवलदारांकडून कामगारांचं केलं जाणारं शोषण तर तिसरीकडे सरकारची चुकीची धोरण अशा परिस्थितीमध्ये सडक नाटकाच्या माध्यमातून समाजाला सक्षम असा सांस्कृतिक पर्याय देण्याचे काम कॉ. सफदर हाश्मींनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केलं असं म्हणलं तर वावगं ठरू नये.
कॉ. सफदर हाश्मी यांच्या नाटकांचा केंद्रबिंदू हा कामगार, कष्टकरी, शोषित समाज असायचा. सडक नाटकाच्या माध्यमातून एखाद्या सामाजिक, आर्थिक, राजकीय किंवा सांस्कृतिक समस्येवर भाष्य करत असताना, सडक नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षक आणि नाटक यांच्यातील द्वंद्व कायम ठेवण्याचे कसब सफदर हाश्मी यांच्या नाटकात होत.
सफदर हाश्मी यांनी सुरू केलेल्या ‘जनम’च्या माध्यमातून 80 सडक नाटकांचे आतापर्यंत 8500 च्या वर प्रयोग झालेत. एक जानेवारी 1989 रोजी उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे ‘हल्ला बोल’ नावाच नवीन सडक नाटक करून नव वर्षाचं स्वागत करण्याचा मानस ठेवून नाटक करत असताना मुकेश शर्मा नावाच्या गुंडाने सफदर हाश्मी आणि त्यांच्या गटावरती (जनम) हल्ला केला होता. या अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये सफदर हाश्मी शहीद झाले आणि पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे 4 जानेवारी 1989 रोजी सफदर हाश्मी यांच्या जीवनसाथी कॉ. मोलोयोश्री हाश्मी यांनी ‘हल्ला बोल’ हे सफदर यांचं अपूर्ण राहिलेलं नाटक जिथे सफदर हाश्मी यांच्यावर हल्ला झाला त्याच ठिकाणी केलं. पतीच्या मृत्यूला अवघे दोन दिवस झालेत आणि ही महिला त्याच अर्ध राहिलेलं नाटक पूर्ण करते, या साठी लागणार मानसिक बळ कोठून येतं? तर त्याचं उत्तर आहे, मानवी मेंदू मधील सर्जनशील आणि परिवर्तनाचा विचार! जे सडक नाटकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. या अशा लढवय्या कलावंत कार्यकर्त्याचा जन्मदिवस त्यांनी दिलेल्या सडक नाटकातील योगदानामुळे राष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day) म्हणून सबंध देशभर साजरा केला जातो.
सडक नाटकाची गरज
सडक नाटकाचा इतिहास बघत असतांना पाहिलं की, सडक नाटकाची सुरुवात ही सामान्य लोकांचे प्रश्न कलात्मक मार्गाने मांडण्यासाठी झाली. सामान्य कष्टकरी वर्गाला निखळ मनोरंजन करणारी नाटकं ज्यांचा इथल्या सामान्य, कष्टकरी, राबणार्या लोकांच्या जगण्या-मरण्याशी काही संबंध येत नाही, अशी नाटकं पदरमोड करून बघणं परवडणार नाही. मग अश्या परिस्थिती मध्ये सडक नाटक लोकांना आपलंसं वाटतं. कारण ते रस्त्यावर, चौकात, बस स्थानक, बाजारपेठ, कारखान्याचे गेट, शाळा-महाविद्यालयाचे गेट अशा ठिकाणी केले जाते, ज्याला तिकीट काढून जावे लागत नाही. खरं तर वेगवेगळ्या समस्यांची उकल सडक नाटकांतून होत असताना, ते प्रभावी ठरत असताना सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते. ती मरगळ घालवण्याचे काम परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनीच करणे गरजेचे आहे. 2018 हे सडक नाटक चळवळीचे 100 वे वर्ष आहे. त्यामुळे सडक नाटक चळवळीचा त्यानिमित्ताने मागोवा घेणे देखील गरजेचे आहे.
सडक नाटक हे मनोरंजन करणार्याच्या हातचे गुलाम नाही. तो राबणार्या, कष्टणार्या बहुजन समाजाचा कलात्मक हुंकार आहे, ज्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचे काम केले जाते. परिवर्तनवादी चळवळी; मग त्या कामगारांच्या असोत, धरणग्रस्तांच्या किंवा शेतकर्यांच्या असोत की, विद्यार्थ्यांची, अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ असो, या सार्या चळवळी सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी सडक नाटकाचा वापर करताना आढळतात. या परिवर्तनवादी चळवळी लोकांच्यामध्ये जाऊन प्रश्न मांडण्यासाठी सडक नाटकासारख्या सांस्कृतिक माध्यमाचा चांगल्या पद्धतीने वापर करताना दिसतात. वरपांगी प्रचारकी वाटणारे सडक नाटक थेट लोकांचे प्रश्न मांडत प्रेक्षकांना भिडते. त्यांना आपलंसं करते. कारण तो जनसामान्यांचा कलाप्रकार आहे.
आजही देशामध्ये वाढत जाणारी बेरोजगारी, महागाई, स्त्रियांवर होणारे अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी या आणि अशा कित्येक समस्या आवासून उभ्या आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये किती कलावंत रस्त्यावरती उतरून या संदर्भामध्ये बोलताना दिसतात? मग ही बाब लक्षात घेता सडक नाटक एक प्रभावी माध्यम म्हणून वापरणं गरजेचं आहे.
सडक नाटक कोण करू शकतं?
भारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1942 साली ‘इप्टा’ (INDIAN PEOPLE THEATRE ASSOCIATION) या नाट्यसंस्थेची निर्मिती के. ए. अब्बास, डॉ. भाभा, अनिल डी सिल्वा, अली सरदार जाफरी या कलावंतांनी केली. ‘इप्टा’ या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून कमानी रंगमंच आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी व्हावे आणि नाटक हे सामान्य माणसांच्यासाठीचे अभिव्यक्तीचे माध्यम व्हावे म्हणून नाटक आणि सडक नाटक यांचे सादरीकरण करून प्रबोधन केले जायचे. कामगार, कष्टकरी, शोषित जनता यांचे प्रश्न सडक नाटकातून कलात्मकदृष्ट्या मांडण्यासाठी ज्या विचारसरणीने हे कलावंत प्रेरित झाले होते, ती होती कार्ल मार्क्सची विचारसरणी.
‘इप्टा’च्या निर्मितीनंतर कॉ. अमर शेख, शंभू मित्रा, कैफी आझमी, साहीर लुधियानवी, बलराज साहनी, इस्मत चुगताई, दीना पाठक, चेतन आनंद, हबीब तन्वीर, ए. के. हंगल, उत्पल दत्त, ऋत्विक घटक यांच्यासारखे मातब्बर कवी, लेखक, अभिनेते, दिग्दर्शक जोडले गेले. हे प्रतिथयश कलावंत जर का सोडले, तर अजून बरेच, ज्यांना व्यवस्था परिवर्तनासाठी सडक नाटकाचा वापर करणे गरजेचे वाटत होते, असेही कार्यकर्ते कलावंत ‘इप्टा’चा घटक होते. या अर्थाने सडक नाटकामध्ये काम करणारी व्यक्ती, ज्याची वैचारिक बैठक पक्की आहे अशी, त्याचबरोबर ज्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक समस्यांचं भान आहे, आकलन आहे अशी व्यक्ती सडक नाटक करू शकते. साधारणपणे ज्या व्यक्तीला समाजामध्ये घडणार्या चुकीच्या गोष्टी खटकतात, अशी व्यक्ती सडक नाटकाचा घटक असते.
सडक नाटकामध्ये काम करणारे कलावंत हे बर्याच अंशी कार्यकर्तेच असतात. हे आतापर्यंतच्या सडक नाटकाच्या इतिहासातून समोर आलेलं आढळतं. डाव्या परिवर्तनवादी चळवळी, संघटनांनी हा कलाप्रकार जास्त प्रमाणामध्ये हाताळलेला आढळतो.
सडक नाटकांमध्ये काम करणार्या व्यक्तींच्याबद्दलचा इतिहास बघत असताना हेही लक्षात येतं की, पश्चिम बंगालमध्ये फी वाढीविरोधात विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती उतरून सडक नाटकं केली होती, ज्याची दखल शासनाला आणि इतिहासाला घ्यावी लागली. भांडवलदारांच्या जाचक ठरणार्या गोष्टींविरोधात कामगारांनी रस्त्यावर उतरून सडक नाटकं केलेली आहेत. स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांचं होणारं शोषण, मुलीच्या जन्माचे स्वागत करा, या अनुषंगाने सामान्य स्त्रियांनीदेखील आपल्या हक्कांसाठी सडक नाटकं केली आहेत. या अर्थाने ज्याला आपली हक्काबद्दल जाण आहे, अन्यायाबद्दलची चीड आहे, अशी कोणतीही व्यक्ती सडक नाटक करू शकते.
सडक नाटकाची संहिता
एखादं नाटक करावयाचे झाल्यास त्याला संहिता लागतेच. बर्याच वेळा नाटकाची संहिता ही एकाच लेखकाने लिहिलेली असते. नाटकाची संहिता लिहिणं ही सामूहिक कृती नसते. अगदी अपवादात्मक एखाद्या नाटकाचे दोन लेखक असलेले पाहायला मिळते. परंतु सडक नाटकाच्या संहितेबाबत थोडं निराळेपण पाहायला मिळतं; म्हणजे सडक नाटकाच्या संहितेचं लेखन करत असताना एकच व्यक्ती त्या संहितेचं लेखन करत नसते, तर ज्या विषयावर सडक नाटक करायचं आहे, त्या विषयांच्या अनुषंगाने कार्यकर्त्या कलावंतांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीतून संहितेचा जन्म होतो. सडक नाटक हे प्रवाही असते, त्यामध्ये कालानुरूप, प्रसंगानुरूप गरज पडेल त्यावेळेस बदल करण्याचे अधिकारही सडक नाटकामध्ये काम करणार्या आणि संहिता लेखनासाठी मदत करणार्या व्यक्तींना असतात. ती सडक नाटकाची गरज असते, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
सडक नाटकामध्ये गाण्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो. ही गाणी देखील संहितेसारखीच सामूहिक प्रक्रियेतून जन्मलेली असतात. त्या गाण्यांना चाली लावणं, संगीत देणं हे देखील सडक नाटक करणारे कलावंत कार्यकर्तेच करत असतात.
प्रेक्षक
कोणतीही कला असो, तिचं सादरीकरण करण्यासाठी त्याचा प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवून ती कला सादर केली जाते. परंतु सडक नाटकाच्या प्रेक्षकांच्या बाबतीत थोडं निराळेपण अनुभवायला मिळतं. सडक नाटक बघायला आलेला प्रेक्षक हा संमिश्र असतो. तो खास नाटक बघण्यासाठीच आलेला असतो, असे होताना दिसत नाही (काही अपवाद वगळता). ज्या प्रमाणे कमानी रंगमंचावर केल्या जाणार्या नाटकाचा प्रेक्षकवर्ग ठरलेला असतो, तसा सडक नाटकाचा प्रेक्षक वर्ग ठरलेला नसतो.
ज्या चौकात किंवा रस्त्यावरती सडक नाटक करणार असतो, तिथे सडक नाटक करणार्या कलावंत कार्यकर्त्याखेरीज कोणासही ठाऊक नसतं की इथं सडक नाटक होणार आहे. त्यामुळे सडक नाटकसाठीचा प्रेक्षक हा तत्कालीन कोणीही असू शकतो. उदा. त्या रस्त्यावरील एखादा कष्टकरी, रस्त्याने ये-जा करणारा प्रवासी, त्या चौकात किंवा रस्त्यावर चहा पिण्यासाठी आलेला, काही खरेदी करायला आलेला किंवा कामाला जाताना किंवा येताना जे ‘पाच मिनिटांसाठी बघूयात,’ असं म्हणणारा, रानामध्ये निघालेल्या किंवा रानातून येणारा शेतकरी किंवा शाळा/कॉलेजला जाणारे विद्यार्थी/विद्यार्थिनी, भाजी न्यायला आलेला असा संमिश्र प्रेक्षक. एखाद्या समुदायाला/समाजाला भेडसावणार्या समस्येचा अभ्यास करून ती समस्या नाटकाच्या माध्यमातून मांडत असताना एखाद्या चौकामध्ये किंवा एखादा गजबजलेला रस्ता, जिथे सडक नाटक सुरू केल्यास लोक सहजासहजी गोळा होतील, अशा ठिकाणी सडक नाटक केले जाते. अचानकपणे चौकात लोक गोळा होऊन काय करू लागलेत? हा प्रश्न मनात बाळगून या सार्यापासून अनभिज्ञ असणारा प्रेक्षक कालांतराने सडक नाटकाचा एक भाग बनून जातो.
हा प्रेक्षक खर्या अर्थाने तुमचं ऐकणारा असतो.जिथं दाद द्यायला हवी, तिथं दाद देत असतो.परंतु सडक नाटकामध्ये काम करणार्या कलावंत कार्यकर्त्यांनी प्रेक्षक हसून किंवा टाळी देऊन दाद देतोय म्हणून त्याच्याबरोबर वाहत जायला होतं. अशा परिस्थितीमध्ये कलावंत कार्यकर्त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. ब्रेख्त म्हणतो, त्याप्रमाणे जसं कलावंत कार्यकर्त्यांनी प्रेक्षकाबरोबर वाहत जाऊ नये, तसंच कलावंत कार्यकर्त्यांनी नाटकासोबत प्रेक्षकांना वाहत नेऊ नये, त्यांना भावनिक करू नये. कारण जर का नाटक बघायला आलेला प्रेक्षक भावनिक होऊन नाटकासोबत वाहत गेला, तर तो प्रेक्षक त्याची विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. जे सडक नाटकाचे उद्दिष्ट असत नाही. मुळातच सडक नाटकाच्या माध्यमातून विविध सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न मांडले जातात आणि त्याचबरोबर त्या प्रश्नांवर विचार करायला लावते. नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षक घरी जाताना एखादा विचार घेऊन जाणे गरजेचे असते, तरच आपण केलेल्या नाटकाचा हेतू साध्य झाला असे म्हणता येईल.
प्रेक्षकांच्या बाबतची दुसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे सडक नाटक हे सामान्य जणांचे नाटक असल्यामुळे ते प्रेक्षकांना आपलसं वाटतं. बर्याचवेळा नाटक बघणारा प्रेक्षक नाटकामध्ये समरस होऊन सडक नाटकाचा भाग होऊ पाहतो. अशा वेळी प्रेक्षकांच्या हस्तक्षेपामुळे, कमी-अधिक प्रमाणामध्ये सडक नाटकाचा विषय भरकटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे होऊ न देण्याची काळजी कार्यकर्त्या कलावंताने घेणे गरजेचे असते. तथापि सादरीकरणानंतर मात्र सडक नाटकावर प्रेक्षकांसोबत चर्चा होणे अपेक्षित असते. कारण सडक नाटक हे जेवढे कलावंत कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे ते प्रेक्षकांसाठी महत्त्वाचे असते, हे विसरून नाटकानंतर लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न, शंका (निर्माण झाल्या असल्यास) इत्यादींचे निरसन करण्याचं काम देखील कार्यकर्त्या कलावंतांचंच असतं, ते विसरून चालणार नाही!
झिरो बजट
आजच्या धकाधकीच्या व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या जमान्यामध्ये लोकांना नाटक (कमानी रंगमंचावरील) पाहायला जायला वेळ नाही. काहींना नाटक पाहण्यासाठी लागणारे पैसे नाहीत. अशा परिस्थितीमध्ये नाटक करण्यासाठी पाच-दहा लोक, ज्यांना नाटक करायचं आहे, अशा लोकांना एकत्रित करणं, त्याचं नाटक बसविणं आणि त्याचं सादरीकरण करणं ही अत्यंत कठीण बाब बनली आहे. त्यातूनही जर हे सगळं जुळवून आणलंच तर नाटकासाठी लागणारा पैसा उभा करणं ही तर त्याहूनही अवघड गोष्ट.
याउलट सडक नाटक करण्यासाठी कशालाच आणि कशासाठी ही खर्च लागत नाही. या सार्या पार्श्वभूमीवर सडक नाटक करायला झिरो बजेट लागते. कमानी रंगमंचावरील नाटक साकारत असताना नाटकासाठी लागणारे नेपथ्य (कथानकानुसार) प्रकाशयोजना, वेशभूषा, रंगभूषा; तसेच सुसज्ज ध्वनियंत्रणा असं नाट्यगृह हवे असते. ती त्या नाटकाची गरज असते; परंतु सडक नाटकामध्ये या सार्या गोष्टींना फाटा दिला जातो. सडक नाटकामध्ये काम करणारे कलावंत कार्यकर्ते आपलं शरीर आणि आपला आवाज या दोहोंच्या माध्यमातून सडक नाटक लोकांपर्यंत पोचवतात. रस्त्यावरती नाटक केलं जात असलं, तरी त्यासाठी ध्वनिक्षेपक वापरला जात नाही. सडक नाटकातील कलावंत कार्यकर्त्यांचे आवाज खणखणीत असतात यावरून हे स्पष्ट होतं.
अलीकडे सडक नाटक करणारे काही गट काही गोष्टींचा कथानकानुसार वापर करताना आढळतात उदा. खुर्ची, मोबाईल फोन, वर्तमानपत्र इत्यादी या गोष्टी सहजगत्या कोठेही मिळू शकतात. त्यामुळे त्यालाही पैसे पडत नाहीत. दुसरी बाब म्हणजे सडक नाटक म्हटल्यावर ते सडकेवर, चौकात, शाळा, महविद्यालय, इमारतीच्या मोकळ्या जागेवरती, कारखान्यांच्या गेटसमोर केलं जात असल्यामुळे नाट्यगृहाला लागणारा पैसा इथं लागत नाही. रस्त्यावर नाटक करत असल्यामुळे आपोआप प्रसिद्धी होते आणि प्रसिद्धीसाठी लागणारा पैसाही वाचतो. सडक नाटकामध्ये काम करणारा कलावंत हा कार्यकर्ता असल्यामुळे तो मानधनही घेत नाही. कारण त्याला विचार पटलेला असतो आणि त्याला तो लोकांपर्यंत पोचवायचा असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर हे लक्षात येते की, सडक नाटक हा झिरो बजेट लागणारा कला प्रकार आहे.
लेखक संपर्क ः 9850122713