आक्षेप 1 : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीला परदेशातून ख्रिश्चन मिशनर्यांकडून भारतातील हिंदू धर्मविरोधी कार्यासाठी पैसे मिळतात?
उत्तर – महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीला मिळालेले सर्व ‘फॉरेन फंडिंग’ हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निगराणीखाली असलेल्या FCR अंतर्गत मिळाले आहे. या पैशांचे सर्व ऑडिटेड अकाऊंट हे वेळोवेळी गृह मंत्रालयाला सादर केलेले आहेत. तसेच ते अकाऊंट धर्मादाय कार्यालयात देखील सादर केलेले आहेत.
परदेशातून ‘अंनिस’ला मिळालेले सर्व पैसे हे अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीयन लोकांनी दिलेले आहेत. यामध्ये अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनचा दशकातील सर्वोत्तम कार्यकर्ता या पुरस्काराची मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली होती. याबाबत डिसेंबर 2013 मधील हिवाळी अधिवेशनात तत्कालीन आमदार रामदास कदम यांच्या प्रश्नावर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सविस्तर माहिती व खुलासा महाराष्ट्र विधिमंडळाच्या सभागृहात केलेला आहे. त्यामध्ये कोणतीही बेकायदेशीरता व अनियमितता समोर न आल्याचे देखील सांगितले आहे. त्याउपर याबाबत पुनःपुन्हा तेच-तेच आक्षेप उपस्थित करून महाराष्ट्र्र अंनिसची आणि तिच्याशी संबंधित कार्यकर्त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे धडधडीत खोट्या गोष्टी सांगून बदनामी करण्याच्या प्रयत्नाबद्दल संबंधितांवर अफवा पसरविण्याचा गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
आक्षेप 2 : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती नक्षलवादी संघटना आहे ?
उत्तर – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही लोकशाही, प्रजासत्ताक व्यवस्था मानणारी आणि संवैधानिक, सनदशीर मार्गाने काम करणारी संघटना आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर गेल्या पावणेतीन वर्षांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एकाही हिंसक कृतीचे उदाहरण नाही, यावरून संघटनेचा अहिंसेच्या तत्त्वावरील विश्वास व्यक्त होतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सातत्याने नक्षलवादाला व हिंसेच्या तत्त्वज्ञानाला विरोध केला आहे. ‘नक्षलवादाचे आव्हान’ हे पुस्तक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुढाकाराने ‘साधना प्रकाशन’ या समविचारी संस्थेमार्फत छापण्यात आले आहे. नक्षलवादाच्या मार्गामधील व्यर्थता आणि त्याच्यातील हिंसेला विरोध ही मध्यवर्ती भूमिका या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एकाही पदाधिकार्यावर नक्षलवादी चळवळीत सक्रिय सहभाग घेतल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. ‘हिंदूंनो, नक्षलवादी व्हा’ तसेच हिंदूराष्ट्र स्थापण्यासाठी नक्षलवादी व दहशतवादी होण्याशिवाय पर्याय नाही,’ असे जाहीरपणे लिहिणार्या सनातन संस्थेनी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून अहिंसक मार्गाने कार्यरत असणार्या संघटनेवर नक्षलवादाच्या संबंधाचे आरोप करणे, हे अत्यंत हास्यास्पद असून जाणीवपूर्वक तपासाची दिशाभूल करणारे आहे.
आक्षेप 3 : अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये आर्थिक घोटाळे व अफरातफर आहे ?
उत्तर – महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या न्यासावरती अशा स्वरुपाचा एकही गुन्हा दाखल नाही. केवळ त्रास देण्यासाठी सनातन संस्था व त्यांच्या समविचारी संघटनांनी तक्रारी केलेल्या आहेत. न्यासाचे सर्व ऑडिट रिपोर्ट हे धर्मादाय आयुक्तांनी मंजूर केलेले आहेत. न्यासाच्या कार्यवाहीसाठी आवश्यक बैठकांबद्दल, त्यातील निर्णयांबद्दल आणि इतर संबंधित सर्व नोंदींची पूर्तता वेळोवेळी करण्यात आलेली आहे. त्यामुळे विश्वस्त संस्थेची हेतुपुरस्सर बदनामी करण्याच्या उद्देशाने सनातनी कर्मठ मंडळींकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. खरे तर उलट त्यांच्यावरच न्यासाची बदनामी केल्याबद्दल गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे.
आपला स्नेहांकित,
अविनाश पाटील
राज्य कार्याध्यक्ष, मअंनिस.