Categories
न्याय

सनातन संस्थेने अंनिवाच्या प्रकाशक, संपादक, मुद्रक यांचेवर दाखल केलेल्या खटल्यात अंनिवाचा विजय!

जून – २०११

          सनातन संस्था व अंनिस यांच्यात वैचारिक वाद-प्रतिवाद नेहमीच सुरू असतो. पण विचाराचा प्रतीवाद विचाराने करण्याऐवजी कायद्याचा आधार घेऊन अंनिसवर अनेक खटले सनातनने दाखल केले. आतापर्यंत निकालात निघालेल्या सर्व खटल्याचे निकाल अंनिसच्या बाजूने लागले. अशाच एका खटल्याचा अन्वयार्थ अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी आमच्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. – संपादक

            अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या माहे जुलै 2008 च्या अंकात “संस्कृतीचे मारेकरी” या शिर्षकाखाली संपादकीय लिहिले होते. त्याच अंकात “पाच सनातनी अतिरेक्यांना अटक” ही कव्हरस्टोरी व “सनातन्यांचा बहुमुखी राक्षस” हे विशेष सदर राहुल थोरात यांनी लिहिले होते. त्या अंकाचे कव्हर पेजही सनातन अतिरेक्यांचा पर्दाफाश करणारे सचित्र व बोलके होते. हा अंक सबंध महाराष्ट्रभर पोहचला. तसाच तो गोव्यातही पोचला. विरेंद्र पांडुरंग मराठे या गोव्यातील सनातन संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टीने त्यांच्या फोंड्यातील आश्रमात वाचला आणि अभिजीत नाडकर्णी यांनी पणजीतील आझाद  मैदानाजवळच्या “वर्षा” या बुक स्टॉलवरून विकत घेऊन घरी येऊन वाचला. हे सर्व वाचून सनातनसंस्थेची बदनामी झाली असे त्यांना वाटले आणि मराठे यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी फोंडा(गोवा) या कोर्टात भारतीय दंड विधान कलम 500, 501, 502 प्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक प्रा.प.रा.आर्डे, प्रकाशक राहुल थोरात व मुद्रक आण्णासाहेब कोरे यांचेविरूद्ध दि.22 ऑगस्ट 2008 रोजी फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल केला. त्या खटल्याचा निकाल दि.29/9/2010 रोजी झाला आणि न्यायाधीश डी.व्ही.पाटकर यांनी सर्वांची निर्दोष मुक्तता केली.  आणि त्या अंकात प्रसिद्ध झालेली माहिती खोटी नाही. असा स्पष्ट निर्वाळा न्यायालयाने दिला.

            सनातन संस्था ही ट्रस्ट खालील नोंद झालेली संस्था असून आध्यात्मिक कार्य करतात भारतात व भारताबाहेर त्यांचे अनेक आश्रम असून शेकडो साधक आहेत. गोव्यातील ट्रस्टचे मराठे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. वार्तापत्रातील मजकुरामुळे त्यांची प्रतिमा मलीन झालेली आहे. खोटी व विपर्यस्त कव्हरस्टोरी छापून त्यांनी सनातन संस्थेची जाणून बुजून बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांना कडक शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयात दोन वर्षे काम चालल्यानंतर न्यायाधीशांनी हा दावा फेटाळून लावला.

            गोव्यात, महाराष्ट्रात, देश विदेशात असंख्य साधक असणार्‍या सनातन संस्थेला मात्र नाडकर्णी नावाचा एकच साक्षीदार मिळाला. मराठे आणि नाडकर्णी यांनी जंग जंग पछाडले आणि त्यातून दोन गोष्टी त्यांनी न्यायालयातच स्पष्ट केल्या. पहिली म्हणजे सनातन संस्था ही एकाच ठिकाणी नोंद झालेली नसून तिची नोंदणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. त्यांचे काम एकच आहे मग नोंदी त्यांनी वेगवेगळ्या का केल्यात हे त्यांनाच सांगता आले नाही. त्यामुळे पनवेलच्या आश्रमातील साधकांना अतिरेकी म्हणून अटक केल्यानंतर वास्तविक पनवेलच्या संस्थेने ओरड करावयास पाहिजे होती पण ते गप्प राहिले आणि गोव्यातील संस्थेने ओरड केली. त्याचे कारण मराठे कोर्टाला सांगू शकले नाहीत. या केसमुळे दुसरी महत्वाची बाब सनातन संस्थेने मान्य केली ती म्हणजे “अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र” महाराष्ट व गोव्यातील लाखो लोक वाचतात. इतरांना कायम अनुल्लेखाने मारणारे सनातनवाले हताश होऊन का होईना खरं कबूल करायला लागले हा विज्ञानवादाचा विजय आहे असं म्हटलं पाहिजे.

            छापून आलेल्या घटनांचा/बातम्यांचा व विश्लेषणांचा गोव्यातील सनातन संस्थेशी दुरान्वयानेही संबंध नसल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. त्याचबरोबर छापलेला मजकूर खोटा होता. तो खोटा आहे हे माहीत असताना छापला होता. तो त्यांची बदनामी करण्यासाठी छापला होता. यापैकी एकही बाब त्यांनी शाबीत केली नसलेचा निष्कर्ष न्यायालयाने काढलेला आहे. सदरचे संपादकीय, विशेष व कव्हरस्टोरी यामध्ये वृत्तपत्र चालविण्याचे जे काही नियम, कायदे कानून, परंपरा, संहिता आहेत याचा कुठेही भंग झाल्याचा पुरावा कोर्टासमोर आणण्यास मराठे व नाडकर्णी यांना अपयश आल्याची नोंद न्यायालयाने केलेली आहे. या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या वेगवेगळ्या निकालांचा संदर्भ देत बदनामीचा आरोप शाबीत करण्यासाठी काय काय आवश्यक आहे. याचा उहापोह न्यायालयाने केला आहे.

            फिर्यादीने बदनामीच्या खटल्यात छापून आलेली घटना खोटी असल्याचे शाबीत केले पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे खोटी असल्याचे माहीत असूनही ती छापणे व वितरीत करणे हे शाबीत केले पाहिजे. आणि शेवटी फिर्यादीची बदनामी करण्याच्या हेतूने छापणे, वितरीत करणे हेही शाबीत केले पाहिजे. या तीनपैकी तीनही बाबी शाबीत झाल्या. तर आणि तरच अशा खटल्यात आरोपींना दोषी धरले जावे. असे नमूद करून न्यायाधीशांनी घटना खोटी असल्याचे, खोटी आहे माहीत असूनही छापल्याचे आणि त्यांच्या बदनामीच्या हेतूने छापून वितरीत केल्याचे शाबीत करण्यास फिर्यादींना सपशेल अपयश आल्याचे नमूद करून त्यांची फिर्याद फेटाळून लावून प्रा.प.रा.आर्डे, राहुल थोरात व आण्णासाहेब कोरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

अ‍ॅड. के. डी. शिंदे