महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समितीचे संस्थापक शंकर कणसे यांचे सुपुत्र किरण कणसे आणि अंकिता पवार यांचा विवाह महात्मा फुले यांनी रूढ केलेल्या सत्यशोधक पद्धतीने दि. 3 सप्टेंबर 2018 रोजी संपन्न झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस माननीय डॉ. हमीद दाभोलकर व शैला दाभोलकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. सातारा जिल्ह्यातील पिंपरी गावचे शंकर कणसे यांच्यावर डॉ. दाभोलकरांच्या विचारांचा प्रभाव आहे.
या लग्नाला येणार्या सर्व पाहुण्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी लिहिलेली पुस्तके भेट देऊन सर्वांचे स्वागत करण्यात आले. या लग्नात घेतला गेलेला भेटीचा कार्यक्रम हा सुद्धा एकमेकांना पुस्तके देऊनच घेण्यात आला. त्यानंतर वधूची ओटी उपस्थित महिलांकडून पुस्तकांनीच भरण्यात आली. त्यामुळे महिलांमधील उत्साह नाविण्यपूर्व दिसून आला.

त्यानंतर मानाचे पुस्तक देण्यासाठी तानाजी घाडगे व घेण्यासाठी नारायण पवार या मान्यवरांना बोलवून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर लिहिलेले ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
त्यानंतर विवाहाचा मुख्य कार्यक्रम पार पाडला. त्यामध्ये अक्षतांऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. मंगलाष्टका महात्मा फुले यांनी रचलेल्या सत्यशोधक पद्धतीच्या म्हणण्यात आल्या. अंतरपाटावर पुस्तकांची, प्रतिकृती काढण्यात आली होती. मुलामुलींच्या मामांच्या हातात पुस्तक व प्रतीकात्मक पेन्सिल देण्यात आली. अशा पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा पार पाडला. या विवाहाप्रसंगी पाहुण्यांनी भेटवस्तू म्हणून दिलेली पुस्तकांची संख्या 1100 वर गेली असून या पुस्तकांचे पिंपरी गावात ग्रंथालय सुरू करण्याचा मानस आहे.
यानंतर धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी. आर. बर्ग, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा मा. सुनीताराजे पवार व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर यांनी मनोगते व्यक्त केली. या सत्यशोधकी विवाहास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते; तसेच ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, लेखक, कृषी क्षेत्रातील अधिकारी व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास समितीचे सर्व सभासद उपस्थित होते. या विवाहाबाबत चर्चा व एक वेगळा आदर्श समाजापुढे निर्माण झाला आहे.