Categories
चिकित्सा

सौंदर्य : मिथक आणि वास्तव

ऑक्टोबर – २०१५

गेली दोन-चार दशके आपल्या देशात सौंदर्य हा एक चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. विशेष करून सौंदर्यासाठीच्या शल्यक्रिया जशा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या किंवा सौंदर्यप्रसाधन किंवा फॅशनवरचा खर्च वाढू लागला तसा हा मुद्दा महत्त्वाचा बनू लागला आणि त्याचा अभ्यासही केला जाऊ लागला. हा मुद्दा आता ’खास’ राहिलेला नाही तर तो आम जनतेचा मुद्दा बनलेला आहे.

सद्गुण, व्यक्तिची ’ओळख’(आयटेंडटिटी), संपत्ती आणि शक्ती याचे निर्देशक म्हणूनसौंदर्याचा उपयोग केला जातो आहे. पारंपरिक सौंदर्याविषयीच्या कल्पना (विशेषतः स्त्रियांविषयीच्या) ह्या आता बदलल्या आहेत असं दिसतं. उदा. सौंदर्याच्या ठराविक/साचेबद्ध कल्पना पुढील प्रमाणे होत्या- दक्षिण अमेरिकेत ठेंगणी-ठुसकी कमनिय बांधा असलेल्या स्त्रीचे कौतुक व्हायचे; अशियात अंडाकृती चेहरा, काळेभोर केस आणि मध्यम उंचीला मान्यता होती; तर आफ्रिकेत आणि भारतात भरपूर (निरोगी) वजन असलेल्या स्त्रीचे कौतुक केले जायचे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच एक सुंदरतेची कल्पना- उंच, गोरी, कमनिय बांध्याची आणि घार्‍या/निळ्या डोळ्यांच्या सौंदर्याने सर्वांच्या मनाचा कब्जा घेतला आहे. तर मग अशा या रुचीपूर्ण विषयाच्या इतिहासामधील मिथक काय आणि वास्तव काय यावर एक नजर टाकू या.

मिथकः सौंदर्य एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.

वास्तवः ज्या महिला सौंदर्य प्रतियोगितेत भाग घेतात, त्यांना ट्रेन करून करून हे सांगितलं जातं की तुमच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसला पाहिजे, यात हे अनुस्युत आहे की तसं तुम्ही दाखवलं तरच तुम्ही ती प्रतियोगिता जिंकाल. जाहिरातीत जेंव्हा हे दाखवतात की अमुक एक क्रिम वापरलं आणि ती गोरी झाली आणि तिला जॉब लागला किंवा तिला प्रमोशन मिळालं किंवा ती शाळेत पहिली आली. आणि दर 15 मिनिटांनंतर टिव्हीवर किंवा इंटरनेटवर दर मिनिटांला जर तुम्हाला हे दाखवलं गेलं की मेकअप लावल्यावर किंवा त्यांच्यात गोरेपणा आल्यावर किंवा लचकत-मुरडत चालल्यामुळे आत्मविश्वासाने महिला सर्व गोष्टींना सामोर्‍या जातात तर सर्वसाधारण मुलीं किंवा महिलांना हेच वाटेल की मेकअप केल्यावर माझ्यातपण आत्मविश्वास निर्माण होईल. हा एक मनोवैज्ञानिक खेळ चालू आहे. दहावेळा आपल्याला खोट्यांच खरं करून सांगितलं गेलं तर ते आपल्याला खरच वाटतं, अशारितीने जाहिरातीत दाखवलं जातं ते आपल्याला खरंच वाटायला लागतं. हा आपल्या भावनांशी खेळ करणं चालू आहे आणि सर्वसामान्यांना विशेष करून महिलांना या चक्रात फसवलं जात आहे.

एका पद्धतीने महिलांचा हा अपमानच आहे, तिने उपयोगात आणलेली बुद्धी किंवा तिने केलेले श्रम या सगळ्याकडे कानाडोळा करण्यासारखे आहे. सर्वसाधारण महिलांमध्ये किती आत्मविश्वास असतो हे तर आपण रोजच्या जीवनात बघतोच. महिला जातीय-धार्मिक दंगे रोखण्याचे प्रयत्न करतात, गटांगळ्या खाणार्‍या मुलीला वाचवणे, मिळकत किती का कमी असेना पण मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे, कठीण समयीसुद्धा हसत-खेळत जीवन घालवणे, घरातील कामांची असो किंवा बाहेरच्या सर्व कामांची असो(वैज्ञानिकांपासून ते कॉम्प्युटरपर्यंत किंवा स्पोर्ट्स पासून ते राजकारणापर्यंत) जबाबदारींने पार पाडणे, हे सारे आत्मविश्वास असल्याशिवाय होऊ शकेल काय?

अर्थात हे देखील वास्तव आहे की काही सामाजिक-सांस्कृतिक कारणांमुळे महिलांचा आत्मविश्वास खच्ची केला जातो किंवा विकसित होऊ दिला जात नाही. म्हणून शिक्षण आणि रोजगार मिळणे, समाजात बरोबरीचा हक्क किंवा निर्णयाचा अधिकार प्राप्त होणे हाच या समस्येवरचा उपाय असेल.

मिथकः त्वचा उजळण्यासाठी, तिचा रंग गोरा व्हावा म्हणून विशेष क्रिम लावणे अत्यंत गरजेचे आहे.

वास्तवः त्वचा किंवा आपल्या शरीरातील सर्व पेशी रोज नव्याने तयार होत असतात, याचा अर्थच आपल्या सर्वांच्या अंगावर रोज नवीन त्वचा निर्माण होत असते. जे लोक शारीरिक मेहनत करतात त्यांच्या त्वचेतून जास्ती घाम येतो आणि या घामाबरोबर शरीरातील विषारीपणा (टॉक्सीसीटी) असतो तो आपल्या शरीराबाहेर फेकला जातो. ही क्रिया चालू असतानाच त्वचेतून नैसर्गिक तेलही बाहेर पडत असते आणि त्वचा मुलायम राहते. म्हणून रोज जे शारीरिक मेहनत करत नाहीत त्यांनी व्यायाम करणे (रोज एक तास पायी चालणे) हे जास्त फायदेशीर आहे. यामुळे केवळ त्वचाच नाही तर पूर्ण शरीरच ताजे तवाने होते.

त्वचेला साबण लावल्यामुळे (कॉस्टिक सोडा) नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा शुष्क होते. साबणाच्या ऐवजी शिकेकाई, रिठा, आवळा, नागरमोथा-गवलाकचेरा(सुगंधी वनस्पती) आणि संत्रा-लिंबू यांची वाळवलेली सालंएकत्र दळून त्याची पावडर करून आंघोळ करताना किंवा न्हाताना त्याचा उपयोग केला तर त्याचा जास्त फायदा होतो. ही पावडर वर्षातून फक्त एकदाच उन्हाळ्यात घरी बनवता येते. आपल्या घरांमध्ये पिढ्यानपिढ्या याचाच वापर होत आला आहे. या उपरही तुम्हाला वाटत असेल की त्वचेला ताजेपणा हवा तर काही लोक हळद आणि दूधाची साय एकत्र करून किंवा लिंबू-पपई अशा काही नैसर्गिक गोष्टी सरळ चेहर्‍यावर लावतात. त्वचेला (कोरडी/तेलकट) तजेलदार करण्यासाठी असे कितीतरी घरगुती उपाय करता येतात. हा सांस्कृतिक वारसा आपण विसरतोय की तो आपण विसरावा म्हणून काही कारस्थान रचलं जातंय?

गोरेपणाच्या प्रश्नाचा विचार करायचा तर- आपल्या त्वचेचा रंग मेलॅनीन नावाच्या एका रंगसूत्रामुळे मिळतो जे आपल्याला आपल्या जन्माच्यावेळी (अनुवंशिक) मिळते. वेगवेगळ्या भूभागातील लोकांचा रंग वेगवेगळा आहे. परंतु गोरा रंग म्हणजे ‘सुंदरता’ असा वांशिक प्रचार जाहिरातींद्वारा युरोप आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी वर्षांनुवर्षे चालू ठेवला आहे. म्हणून आजही आपण हे मानतो की सुंदर व्यक्ती, विशेष करून महिला त्या असतात ज्यांची कातडी गोरी असते. जर एखादी महिला गोरी नसेल तर तिला मेकअप फासून गोरं करून तिला नायिकेच्या रूपात सिनेमांमध्ये दाखवलं जातं. सिनेमाची नायिका साधारण महिलेच्या भूमिकेमध्ये असली तरी तिला सिनेमात गोरंच दाखवलं जातं. आपल्यावर लादला जाणारा हा साम्राज्यवादी मूल्यांचा प्रभाव या क्षेत्रातही दिसून येतो.

मिथकः आपल्या त्वचेची सुरक्षा सन-स्क्रिन लोशन करते.

वास्तवः आजकाल काही लोकांना अल्ट्रा व्हायलेट किरणांमुळे त्रास होतो आहे. पण त्रास होण्याआधीच घाबरून जाऊन बरेचजण विशेष करून स्त्रिया हे वापरतात. पण अल्ट्रा व्हायलेट किरणांनी जो त्रास होतो तो या साधारण लोशनने दूर होत नाही. ज्या लोशनमध्ये टिटॅनियम डाय ऑक्साईड किंवा झिंक ऑक्साईड आहे फक्त तेच लोशन उपयोगी पडत असं काही जणांचं मत आहे. परंतु सन-स्क्रिन लोशन कोणतही असू दे घाम आल्यानंतर थोड्याच वेळात ते निघून जातं आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर त्याचा जास्ती प्रमाणात वापर केलात किंवा परत परत लावलं तर तुमचे शरीर व्हिटॅमिन डी तयार करू शकत नाही. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे तुम्हाला कॅन्सर, डायबीटीस, हृदयाचे विकार किंवा निराशेचा आजार होऊ शकतो. काही अभ्यासांनी हे सुद्धा दाखवून दिले आहे की, त्वचेसाठी वापरायच्या लोशनमुळे त्वचेचा कॅन्सर, अस्थमा असे गंभीर आजार होऊ शकतात.

अल्ट्रा व्हायलेट किरणे जेव्हा कमी प्रमाणात असतात तेव्हा ती व्हिटॅमिन डी तयार करायला मदत करतात. पण जर हिच किरणें जास्त प्रमाणात असतील तर ती हानीकारक असतात जे आजकाल अनुभवाला येतं आहे. विज्ञान हे सांगत की आपल्या वातावरणात क्लोरो फ्युरो कार्बन वाढल्यामुळे ओझोनच्या पडद्यामध्ये एक छिद्र तयार झालं आहे ज्याच्या परिणामी ही हानीकारक अल्ट्रा व्हायलेट किरणें वातावरणात पसरताहेत, विशेष करून उत्तर अंटार्टिकामध्ये त्यांचा प्रभाव जास्त दिसतो. कार-फ्रिज, बॉडी स्प्रे किंवा किटाणूंसाठी फवारायचे स्प्रे किंवा अणु विस्फोट सारखी युद्धसामग्री अशा गोष्टींच्या अती वापरामुळे आपलं वातावरण दूषित होतं आहे. याचा अर्थ या गोष्टीं न वापरणं हीच खरी सुरक्षा आहे आणि त्याआधारे आपण सर्वजण मिळूनच विकासाची योग्य रचना करू. तसं केल नाही तर युवा पिढीमध्ये आजकाल जो त्वचेचा कॅन्सर आणि वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरताहेत ते आणखीन वेगाने वाढतील. आपण पायाभूत गोष्टींवर जर काम केलं नाही आणि नव नव्या रोगांच्या इलाजासाठी आपली संसाधन खर्च केली तर ते ’रोगपेक्षा इलाज भयंकर’ असं होईल.

मिथकः सौंदर्यस्पर्धांमध्ये महिलांच्या केवळ शरीराची नाही तर बुद्धीमत्तेचीही परिक्षा घेतली जाते.

वास्तवः हे समजण्यासाठी आधी थोडे आपण सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासात डोकावू या. या स्पर्धेची सुरूवात 1921मध्ये टुरिझम वाढवण्यासाठी अमेरिकेत(मिस अमेरिका) झाली. याचे प्रायोजक बनण्यासाठी बर्‍याच कंपन्यां पुढे आल्या आणि मग हा सौंदर्याचा ’बाजार’ वाढतच गेला. यामध्ये स्विमिंग सूट उत्पादन करणारी एक कंपनी, पॅसिफिक निटींग मिल पण, सहभागी होती. तिने स्विमिंग सूटमध्ये काढलेले महिलांचे फोटो मागितले. पण त्याला नाकारले गेल्यावर तिने प्रोक्टर अँड गॅम्बल कंपनी बरोबर ‘मिस युनिव्हर्स’ प्रतियोगिता सुरू केली जिचा हळूहळू पूर्ण जगभर प्रसार झाला. या स्पर्धेमध्ये सुरूवातीला फक्त शरीराच्या विविध अंगांसाठी ट्रॉफी मिळत होती- त्वचा-डोळे-केस या सार्‍यांचे रंग, वा चेहर्‍याचे वेगवेगळ्या भागांचे प्रमाण किंवा स्तन-कंबर-पोट-पाय/जांघा-हात या शरीराच्या भिन्न अंगाचे आकार, त्यांची वजनं हेच ट्रॉफीचे निकष मानले गेले आणि म्हणून ओठ-गाल-स्तन-पोट अशा जवळपास सर्व अंगांची सर्जरी केली जायची/जाते. प्रतियोगितेच्या शेवटी महिलांना सर्वाेंसमोर स्विमिंग सूट घालून चालणं हे अनिवार्य होतं अन् आजही आहे. अशा प्रकारे स्त्रीचं क्रयवस्तूकरण केलं जातं, या कारणांनी सुरूवाती पासून याला विरोध होत आला आहे.

याची काही मासलेवाईक उदाहरणं म्हणजे खुद्द प्रतियोगितेत भाग घेतलेल्या महिलाच आहेत. 1966मे आशिया जगतातून पहिली आलेली विश्व सुंदरी भारताची रिटा फारिया होती. विश्व सुंदरी झाल्यानंतर तुम्हाला चोवीस तास प्रायोजक कंपनीच्या पूर्ण निगराणीत रहावं लागतं, एक वर्षासाठी तुम्हाला त्या कंपनीचे अम्बॅसॅडर (नोकर) बनून रहावं लागतं. कंपनीला वाटेल तिथे, तिच्या मर्जी प्रमाणे कपडे घालून किंवा तिला हवी तशी पोज देऊन हव्या त्यावेळी या सुंदरीला जाहिरातीसाठी उभं रहावं लागतं. या बाजारू जगताला फारिया इतकी उबगली की तिने आपला हा किताब पैशांसहित परत केला. येवढंच नाही तर तिने मॉडेल आणि फिल्मी दुनियेकडून आलेल्या प्रस्तावावर देखील लाथ मारली. नंतर डॉक्टरीचे शिक्षण घेतले आणि महिला आंदोलनात काम केले. अशा आणखीन काही महिलांनी देखील आपले किताब परत केले. त्यांनी हे पण सांगितलं की कंपनीच्या प्रमुखांबरोबर झोपल्यावर कोणत्या युवतीला स्पर्धेत पुढे आणलं गेलं वगैरे. म्हणजे इथे हे स्पष्टच आहे की या प्रतियोगितेचा बुद्धीमत्तेशी काही संबंध नाही, युवतींना क्रयवस्तु प्रमाणे वापरून घेणं हाच यांचा खरा उद्देश्य आहे.

म्हणून 1980 मध्ये जेव्हा जागतिक स्तरावर स्त्री मुक्ती आंदोलनकर्त्यांनी याला जेव्हा खूप जोरदार विरोध केला ज्यात पुरूषांचा देखील सहभागी होता तेव्हा कुठे या स्पर्धांमध्ये शेवटच्या भागात स्पर्धकांशी काही व्यक्तिगत प्रश्न घातले गेले आणि या छुटपुट प्रश्नांनाच ते बुद्धीमत्तेचे निकष मानतात. हा सारा दिखावा कंपन्या करतात कारण त्यांना आज देखील या स्पर्धा फक्त शरीर सौंदर्यावर आधारित आहेत, या टीकेपासून स्वतःचा बचाव करायचा आहे.

खरंतर या स्पर्धा आणि रोजच्या जीवनातील जाहिराती यांचा स्त्री-पुरूष दोघांच्या मानसिकतेवर फार विपरीत परिणाम होतो आहे. महिलांना त्यांची उंची किंवा रंग या कारणांमुळे जास्त किंमत दिली जात नाही. काळा किंवा सावळा रंग असेल तर महिला आपला आत्मविश्वास गमावतात. एखाद्या युवतीने मेकअप करायला नकार दिला तर ’आता तुझ्याशी लग्न कोण करेल?’ हे असं सगळं तिला ऐकावं लागतं. महिलांनी रोज काय घालायचं किंवा कसं राहायचं हे सर्व आता कंपन्या ठरवत आहेत.

या कारणांमुळेच या बहुराष्ट्रीय तथा राष्ट्रीय कंपन्यांचा नफा गेले 80-90 वर्षांमध्ये सतत वाढता राहिला आहे. अलिकडील विक्रीचा आकडा पाहिला तरी याचा अंदाज येईल- 2013च्या वर्षभरात संपूर्ण जगामध्ये सौंदर्यप्रसाधनाची विक्री 270 अब्ज डॉलर झाली. 2008मध्ये आर्थिक मंदी असूनही ही विक्री थोडी कमी प्रमाणात (9%) एवढी वाढली!

मिथकः सौंदर्यस्पर्धेतून महिलांना खूप प्राप्ती होते.

वास्तवः हां, सौंदर्यस्पर्धेतून महिलांना खूप प्राप्ती मिळते, परंतु किती महिलांना आणि किती प्राप्ती मिळते, याचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा ज्या गोष्टी पुढे आल्या ते ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मिस युनिव्हर्सचे वर्षभरातील मानधन 50 हजार डॉलर असतं, परंतु त्यातील फक्त 20% रक्कम त्या विश्वसुंदरीला मिळते, बाकीची 80़% रक्कम ही मिस युनिव्हर्स इनकार्पोरेटेड कंपनीला मिळतात जी या स्पर्धेची तयारी करते. या शिवाय वेगवेगळ्या कंपन्यां आपली उत्पादने विश्व सुंदरीला भेट देतात आणि हे उघडच आहे की याचीच जाहिरात करून कंपन्या करोडो-अब्जावधी रूपयांचा नफा कमावतात. मात्र वर जसं सांगितंल गेलं, मिस वर्ल्ड/युनिव्हर्स झालेली महिला वर्षभर फक्त प्रायोजक कंपनींचे काम करू शकते, तसा करारच करून घेतलेला असतो, आणि त्यापासून मिळणारे सारे उत्पन्न कंपन्यांकडे जाते. या स्पर्धेच्या दरम्यान इतर इच्छुक युवतींकडूनही जाहिरातींची वा इतर कामं करून घेण्याची रणनिती ह्या कंपन्या तयार करतात ज्यामुळे कंपनीला जास्तीत जास्त नफा होईल.

आंतराष्ट्रीय-राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर सर्व मिळून अशा स्पर्धा जिंकलेल्या सार्‍या महिला शे-दोनशे असतील. ज्या मानधनाची चर्चा केली ती फक्त आंतराष्ट्रीय पातळवरील आहे, बाकी महिलांना तर फक्त भेटवस्तू मिळतात. इतक्या कमी महिलांचा उपयोग करून कंपन्या जगभरातील करोडो महिलांना आपला माल विकतात. सुरूवातीला कंपन्यांना झालेला नफा बघून त्यांच्या तोंडाला इतकं पाणी सुटलं की त्यांनी ह्या स्पर्धेचा संपूर्ण जगभर प्रसार करण्याचा निर्णय केला. तेव्हा यांना ’काळे-सौंदर्य’ (ब्लॅक-ब्युटी) दिसू लागले कारण यांना तर आपले उत्पादन विकायचे होते ना! जर अशिया-अफ्रिकेत यांचे उत्पादन विकत घ्यायचे तर तिथल्याच महिलांना पुढे आणायला लागेल, असा डावपेच आखला गेला. म्हणूनच जेव्हा सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय दोघींना एकाच वर्षात विश्व सुंदरी बनल्या यात हाच बाजारू विचार त्यामागे होता हे उघड गुपित आहे.

आज देखील आपला विस्तार त्या कसा करतात हे बघून आपल्याला थक्क व्हायला होतं. या कंपन्या आपलं नवं मार्केट पक्कं करण्यासाठी अभ्यास करतात- जगभरातील सर्व देशांच्या लोकसंख्येचे अध्ययन! उदा. येत्या काळात लोकसंख्येत म्हातार्‍या महिला जास्त होणार आहेत का युवती जास्त असणार, का मग युवक याचा विचार करून कंपन्या आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीत कशावर जोर द्यायचा हे ठरवतात. उदा. अमरिकेत जेव्हा म्हातार्‍या महिला लोकसंख्येत जास्त दिसायला लागल्या तेव्हा स्कीन-केअर क्रिममध्ये कंपन्यांनी चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी करणारी क्रिम असा संदेश देणे सुरू केले.

मिथकः सौंदर्याचं महिलांशी जितकं देणंघेणं आहे तितकं पुरूषांशी नाही.

वास्तवः आत्तापर्यंत व्यापाराच्या ज्या गोष्टी आपण केल्या त्यातून पुरूष कसे बरे सुटतील? सौंदर्याचे पुरूषांशी घेणेदेणे नव्हते ही गोष्ट जुनी झाली, सौंदर्याबाबतचा मामला होता म्हणून त्यांनी पहिली जादू महिलांवर केली. जेव्हा स्त्री-पुरूष समानतेचा काळ सुरू झाला त्यावेळी पुरूषांची बाजारपेठ का सोडा?, असा विचार करून 1970च्या दशकानंतर पुरूषांच्या सुंदरतेवर जास्त भर देऊन त्यांच्यावरील जाहिराती देणे सुरू झाले. पुरूषांची आर्थिक ताकद तर जास्त आहे त्यामुळे हे उघडच आहे की ही बाजारपेठ खूप वेगाने वाढते आहे. हे आकडे पाहिले तर याबाबत नक्की काय ते कळेल- असं मानलं जात आहे की 2014 मधील 27 अब्ज डॉलरमध्ये 4 अब्ज डॉलरची वाढ होईल. पुरूषांमध्ये अशियाची बाजारपेठ जास्त वेगाने वाढताना दिसते आहे. कदाचित पुरूष फार लवकरच याबाबतीतही स्त्रियांना मागे टाकतील, काय सांगावं?

मिथकः सौंदर्यस्पर्धेमुळे महिलांना समाजात सन्मान मिळतो, तुमची एक ओळख होते. विश्वसुंदरी बनून तुम्ही सामाजिक काम करू शकता.

वास्तवः सौंदर्यस्पर्धा ही एक लिंगभावात्मक, जाती/वंशमूलक श्रेणीबद्धतेला (रेशियल हायरकी) बढावा देणारी आणि वर्षांनुवर्षे सामाजिक भेदभावाचे हत्यार बनून समोर येत राहिली आहे. सौंदर्याचे निकष कसे ठरत गेले, आणि ते बदलण्यात सौंदर्य स्पर्धांनी किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याचा रुचीपूर्ण इतिहास आपण वर बघितलाच आहे. समाजात मग त्या महिला असो वा पुरूष, उच्चवर्ग-जातीच्या लोकांनाच सन्मान मिळतो हे खरेच आह. मग शरीरिक सौंदर्य विकून करोडो रूपये कमावणार्‍या महिलांना तर सन्मान मिळणारच. फिल्म इंडस्ट्रीशी देखील तर यांचे उघड संगनमत आहे. काही खरंच कलाकार मंडळी जी दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा पुण्यातील फिल्म इंस्टिट्युट मधून बाहेर पडले ते जरा चांगले सिनेमे तयार करत आहेत. परंतु बाकी सारा व्यापार बनला आहे, आणि व्यापारामध्ये ज्याचा पैसा त्याचीच चलती, त्यामुळे एकमेकांना वर उचलण्याचे काम जोमाने चालले नाही तरच नवल!

काही मॉडेल्स् किंवा कलाकार आपला पैसा सामाजिक कामांसाठी ’दान’ म्हणून देतात.

परंतु सामाजिक कार्य ही फार वेगळी गोष्ट आहे. सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून लोकांना त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या बरोबर दोन पावले चालणे, त्यांचे प्रबोधन-त्यांचे शिक्षण करणे किंवा त्यांच्या बरोबर काही मुद्यांवर संघर्ष करण- लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी या सार्‍याची अतिशय गरज आहे. सामाजिक काम तर हे असेल की या कंपन्यांचा फर्दाफाश करणे, कारण ही सौंदर्य प्रसाधने आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. काही सार्वजनिक आरोग्य संस्था या प्रसाधनांच्या किंवा पर्सनल केअर उत्पादनांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. उदाहरणः

सर्वसाधारणपणे उपयोगात आणली जाणारी नेल केअर उत्पादनांमध्ये जे फ्थॅलेट प्लॅस्टिसाईजर असतं हे पुरूष प्रजनन संस्था आणि इतर आरोग्य समस्यांना जन्म देतात.

गोजातिय नाळेसहित पशु अंगांचा आणि मांस-तंतू (tissue) पासून काढलेल्या गोष्टी आणि ’नैतिकतेच्या दृष्टीने’ काढलेली मानवी नाळेचा उपयोग ह्या उत्पादनांमध्ये होतो, ज्याच्या परिणामी एक प्रकारचा मेंदूशी संबंधीत आजार होऊ शकतो (FDA 2007). यावर कॅनडामध्ये बंदी आणली आहे.

अशी आणखीन कितीतरी उदाहरणे सांगता येतील, विज्ञान युगात ही माहिती घेणे हेच आपलं काम असेल. तुम्ही म्हणाल सामाजिक कामाला पैसा लागतो, ते जरी खरं असलं तरी पैसा हेच सर्वस्व असत नाही. चांगल्या कामासाठी सर्वसाधारण लोक पैसा जमा करतात, हा जगभरचा अनुभव आहे. आणि कामात पारदर्शकता असेल तर लोक मदत करायला स्वतःहून तयार होतात, असा आमचा अनुभव आहे. परंतु वैज्ञानिक, सतर्क दृष्टी हवी. ह्या इंटरनेटच्या युगात भरमसाठ माहिती एका क्लिक वर मिळते, या माहितीची वैज्ञानिक दृष्टिकोनातून समीक्षा करून चांगल्या समाजासाठीचा पाया स्वतःच तयार करू या. बचत समुहामध्ये किंवा गाव विकास कमिटीमध्ये, याचे वाचन करता येईल आणि एक शांतीपूर्ण आंदोलन सुरू ठेवता येईल.

विनया मालती हरी

vinayamh@gmail.com