25 ऑगस्ट 2017 ला हरियाणातील पंचकुला येथील सीबीआयच्या न्यायालयात सीबीआयचे खास जज्ज जगदीप सिंग यांनी सिरसा येथील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख ‘गुरुमीत राम रहीम सिंग इन्सान’ याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याच्या व गुन्हेगारी दहशत पसरविल्याच्या प्रकरणात भारतीय पिनल कोड 376 आणि 506 खाली दोषी जाहीर केले आणि 28 ऑगस्टला 20 वर्षांच्या कारावासाची सजा ठोठावली. 25 ऑगस्टला सीबीआय न्यायालयाने गुरमीतला दोषी जाहीर करताक्षणीच पंचकुला, सिरसा आणि हरियाणातील इतर ठिकाणी दंगलीचा आगडोंब उसळला. पंचकुला येथे जमलेल्या डेरा सच्चा सौदाच्या लाखो भक्तांनी; ज्यांना ‘प्रेमी’ म्हटले जाते त्यांनी मोठ्या प्रमाणावर खासगी आणि सार्वजनिक संपत्तीची मोडतोड आणि जाळपोळ सुरु केली. त्यानंतर राज्य पोलीस दल आणि निमलष्करी दलाने केलेल्या कारवाईत काही तासातच 35 डेरा भक्तांचा मृत्यू झाला.
25 ऑगस्टला सीबीआय न्यायालयाने ज्या प्रकरणात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहीम सिंगला सजा ठोठावली, त्या प्रकरणाची सुरुवात 2002 च्या मेमध्ये त्या वेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची त्यावेळची जनरल सेक्रेटरी जगमती संगवान आणि रॅशनॅलिस्ट सोसायटीचे अध्यक्ष राजाराम हंडिया यांना आलेल्या निनावी पत्राने झाली. त्या पत्रात डेर्यात चालू असलेल्या मुलींच्या लैंगिक छळाबद्दल सविस्तर तक्रार करण्यात आली होती. या पत्राच्या आधारे ज्यांनी-ज्यांनी चौकशीची मागणी केली त्यांना-त्यांना धमक्या देण्यात आल्या, हंडिया यांना मारहाण करण्यात आली. पण हेच निनावी पत्र राम चंदर छत्रपती संपादक असलेल्या ‘पुरा सच’ या वर्तमानपत्राने छापले. 24 ऑक्टोबर 2002ला त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. 21 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या खुनाच्या निषेधार्थ संपूर्ण सिरसा शहर रस्त्यावर उतरले. डेरा सच्चा सौद्याच्या विरोधात झालेले ते पहिलेच निदर्शन होते.
त्या नंतर ते पत्र हायकोर्टाकडून सेशन्स कोर्टाकडे गेले. सेशन्स कोर्टाला साक्ष देण्यास कोणीच पुढे येत नसल्याने काहीच माहिती मिळत नसून, मुलींच्या वसतिगृहात डेरा प्रमुखाच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळत नसल्याचा; पण मुलींच्या लैंगिक छळाची शक्यता नाकारता येणार नाही, असा अहवाल आला. प्रकरण सीबीआयकडे उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुपूर्द करण्यात आले. त्या नंतर डिसेंबर 2003 ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती ऑक्टोबर 2004 ला उठली. सीबीआयच्या चौकशीची चक्रे फिरू लागली. डेरा सोडणार्या 24 साध्वीपैकी 18 जणींना शोधण्यात आले. त्यापैकी फक्त दोघी पुढे येण्यास तयार झाल्या. त्यांचे जवाब नोंदवण्यात आले. त्या दोघीपैकी एक गुरुतमीतसिंगच्या ‘गुहे’ वर पहारेकरी म्हणून काम करीत होती. दुसर्या स्त्रीने दिलेला जवाब आणि निनावी पत्रात दिलेले बलात्काराच्या परिस्थितीसंदर्भातील तपशील सारखेच होते. त्यांच्या जवाबातून पुढे आलेल्या गोष्टीतून सीबीआयने डेर्यातील वरिष्ठ अधिकार्यांची तपासणी केली. त्यांची निवेदने, पॉलीग्राफ चाचणी यावरून लैंगिक छळाच्या प्रकरणाना पुष्टी मिळत गेली आणि सप्टेंबर 2008 ला गुरमीतसिंग विरोधात बलात्कार आणि गुन्हेगारी दहशत पसरवण्याचे आरोपपत्र दाखल करण्यात आले व त्यानंतर अखेर 25 ऑगस्ट 2017 ला गुरुमीत राम रहीमवरचे आरोप सिद्ध होऊन त्याची रवानगी पंचकुलाच्या अलिशान डेर्यातून रोहतकच्या तुरुंगात करण्यात आली.
ज्या निनावी पत्राच्या आधारे हे सारे प्रकरण धसास लागले, ते निनावी पत्र हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यातील खानपूर कोलियान या छोट्याशा गावातून आले होते. या गावाचे सात वेळा सरपंच झालेले 100 एकर जमिनीचे मालक असलेले जाट जोगिंदरसिंह हे त्यांच्या पाच मुली आणि मुलगा रणजितसिंह यांच्यासह डेरा सच्चा सौदाचे निस्सीम भक्त होते. ते सर्व डेर्याच्या सेवेत असत. 1992 साली गुरुमीत सिंग जेव्हा त्या भागात आला होता, तेव्हा त्याचा संपर्क कुरुक्षेत्र विद्यापीठातून पदवीधर झालेल्या जोगिंदरसिंह यांच्या मुलीशी आला. त्याने तिला डेर्यात येण्याचे आमंत्रण दिले. ती डेर्यातील वातावरणाने प्रभावित झाली व 1999 पासून डेर्यात साध्वी म्हणून रणजितसिंहसह राहू लागली. रणजितसिंहच्या दोन मुली पण तेथेच शिकायला होत्या. इतर साध्वी तिला विचारत, ‘पिताजींनी (गुरुमीतसिंग) तुला ‘माफी’ दिली काय?’ त्यावेळेस तिला माहीत नव्हते इथं ‘बलात्कारा’चा पर्यायी शब्द ‘माफी’ आहे. याची प्रचिती तिला लवकरच आली. मुख्य फिर्यादीने सीबीआयला सांगितल्यानुसार गुरुमीतसिंगने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. पहिल्या वेळेस तिच्यावर बिंबवले गेले, ‘तुझ्या चुकांमुळे तू अपवित्र झाली आहेस आणि ‘बाबा’ बरोबर लैंगिक अनुभव घेतल्यावर (प्रत्यक्षात बलात्कार) पवित्र होशील. याबद्दल कोणतीही वाच्यता न करण्याबद्दल तिला धमकावले गेले. पुढे तिने फिर्यादीत सांगितले आहे, दुसर्यांदा पुन्हा तिला गुहेत बोलावण्यात आले. या वेळेस तिने विरोध केला व आपण भावाला सर्व सांगू, असे सांगितले, तेव्हा गुरुमीतसिंगने ‘तुझा भाऊ माझा भक्त आहे. तो तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्याने विश्वास ठेवला तर आपण त्याला ठार मारू,’ असे धमकावले. त्यानंतर तिला तिसर्यांदा पुन्हा बोलविण्यात आले. पण यावेळेस तिने आपली सुटका करून घेतली व आपल्या भावाला सर्व सांगितले. त्याने तिच्यावर विश्वास ठेवला आणि आपल्या दोन मुलींसह तो डेर्याबाहेर पडला. रणजितसिंह तर 25 वर्षे डेर्याच्या सेवेत होता. डेर्याची जी 10 वरिष्ठ सभासदांची समिती होती, तिचा तो सभासद होता. त्यानंतर निनावी पत्र प्रसिद्ध झाले, त्याचा संशय रणजितसिंहवर घेतला गेला व त्याला धमक्या येऊ लागल्या. त्या धमक्यांना जुमानत नाही असे पाहून तो शेतावरून घरी येत असताना त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. डेर्याच्या भक्तांना त्याच्या खुनाच्या आरोपाखाली पकडण्यात आले. त्या नंतर आपल्या सासरच्या आणि कुटुंबाच्या नैतिक पाठिंब्याच्या जोरावर त्याची बहीण फिर्याद नोंदवण्यास पुढे आली.
दुसर्या फिर्यादीची कथा अशीच आहे. तिच्या कुटुंबाच्या दोन पिढ्या डेर्याच्या कट्टर पाठीराख्या होत्या. गुरुमीतसिंगने तिचे नाव बदलून दुसरे ठेवले होते. ती डेर्यात राहायला आल्यावर वर्षभरातच तिच्यावर गुरुमीतसिंगने बलात्कार केला होता. तिला नंतर कळले की, तिच्या बहिणीवरही बलात्कार झाला होता आणि दुसर्याच दिवशी तिने आपल्या आईवडिलांसह डेरा सोडला.
भारतात अशा घटना नेहमीच घडतात. कोणत्या तरी आसाराम बापू वगैरे बुवा-बाबाची काळी कृत्ये उघडकीस येतात. त्यांना तुरुंगात वगैरे जावे लागते. पण प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते. कुणाचे आश्रम असतात, आखाडे असतात, मठ असतात तर इथे डेरा आहे. ‘डेरा’…. पंजाबीत डेर्याचा अर्थ आहे विश्रांतीची जागा, एकत्र जमण्याची जागा! या डेर्यांची निर्मिती एका विशिष्ट ऐतिहासिक आवश्यकतेतून झाली आहे. संख्येने अनेक असणारे हे डेरे इथल्या संस्कृतीतील आणि धर्मातील विचार क्षेत्रात वादविवादाची आणि विरोधी दृष्टिकोन व्यक्त करण्याच्या व्यापक परंपरेची आठवण करून देणारे आहेत. इथल्या मुख्य प्रवाहातील धर्माबरोबर तत्त्वज्ञानाच्या पातळीवर असेल किंवा चालीरीती, प्रथा, नियम याबाबत न पटल्यामुळे त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला.
त्याचबरोबर जरी हिंदू धर्मातील सनातनी तत्त्वज्ञानाच्या आणि जातिव्यवस्थेच्या विरोधात गुरू नानकांनी शीख धर्माची स्थापना केली, तरी दलित आणि खालच्या समजल्या जाणार्या जातींना पुस्तकात समता मानणारा हा धर्म व्यवहारात कधीच सामावून घेऊ शकला नाही. शीख धर्म स्वीकारताना त्यांना देण्यात आलेली वचने आणि स्थान याच्या विरोधातच विषमतेचा व्यवहार सतत होत राहिला. पंजाबातील खेड्यापाड्यात दलितांसाठी असलेले वेगळे गुरुद्वारा आणि वेगळ्या स्मशानभूमी याच्या साक्ष आहेतच. जमिनीच्या मालकीची मक्तेदारी जाटांकडे होती. दलित आणि इतर जातीतील लोक त्यांच्याकडे मोलमजुरी करत होते. धर्म जरी बदलला तरी व्यवस्था तीच राहिल्याने हिंदू धर्मात प्रभावशाली असलेल्या जाट जातीचाच प्रभाव साहजिकच शीख धर्मावर राहिला. त्यामुळे दलितांना आणि खालच्या समजल्या जाणार्या जातींना त्या भागातील मुख्य प्रवाहाच्या विरोधात विद्रोह करणारे हे डेरे जवळचे वाटू लागले.
हे डेरे सर्वच प्रकारच्या छटाचे आहेत. निरंकारी, नामधारी यासारखे शीख मर्यादा किंवा शीख धर्मांचे नीतिनियम पाळणारे शीख डेरे आहेत, तर शीख मर्यादा पाळण्याबरोबरच इतर धर्मातील परंपराही पाळणारेही डेरे आहेत. त्यांना बिगरशीख डेरे समजले जाते. पण या दोन्ही प्रकारच्या डेर्यांत मानवी गुरूला स्थान आहे. आणि इथेच शीख धर्मात आणि या डेर्यात फरक आहे. शीख धर्मात मानवी गुरूला स्थान नाही. 10 वे गुरू गोविंद सिंग यांच्यानंतर गुरू ही कल्पना निकालात काढली गेली आणि ‘ग्रंथ साहिबा’ या ग्रंथालाच गुरू संबोधण्यात आले. डेर्यांनी अशा काही परंपरांना छेद दिल्यामुळे शीख धर्मात आणि डेर्यांत तणाव निर्माण झाले आहेत.
हे डेरे हिंदू आणि शीख या प्रस्थापित संघटित धर्माच्या नियंत्रणाबाहेरील स्वतंत्र; पण सर्वसमावेशक आहेत. उदाहरणार्थ, सच्चा सौदाच्या भक्तांना त्यांच्या पूर्वीच्या धर्म, जातीबद्दल काहीच विचारले जात नाही, त्यांना ‘प्रेमी’ म्हटले जाते, आडनाव ‘इन्सान’ लावले जाते. यातून जातीची ओळख पुसली जाते. सगळे देव एकच आहेत असे सांगितले जाते. त्यामुळेच डेरा सच्चा सौदाचा राम रहीम वेगवेगळ्या धर्माच्या देवांच्या रुपात सातत्याने आपल्या भक्तांच्या समोर येत असतो. 2007 मध्ये राम रहीम गुरू गोविन्दसिंगांच्या वेशात आला होता. शिखांना तो धर्मद्रोह वाटला होता. प्रकरण हिंसाचारापर्यंत गेले होते.
या डेर्यातर्फे शाळा, दवाखाने, इस्पितळे, व्यसनमुक्ती केंद्रे, व्यवसाय मार्गदर्शन केंद्रे चालविली जातात. त्याच बरोबर वेश्यांची सामुदायिक लग्ने लावणे, विधवा पुनर्विवाह लावणे या गोष्टीही केल्या जातात. डेरा सच्चा सौदाने स्वत:ला ‘सामाजिक कल्याण’ आणि ‘आध्यात्मिक’ संघटना म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांना करसवलत आणि शासकीय अनुदान मिळते.

या सामाजिक, धार्मिक कामाबरोबरच सच्चा सौदाने प्रचंड आर्थिक साम्राज्यही उभे केले आहे. याची वर्णने प्रसार माध्यमे सध्या मोठ्या चवीने करत आहेत. म्हणजे हे डेरे केवळ आध्यात्मिक समाधान, करमणूक, सामाजिक सर्वसमावेशकता इतक्या पुरतीच मर्यादित नाहीत तर तो एक मोठा रोजगाराचाही स्रोत आहे आणि हेच या डेर्यांच्या लोकप्रियतेचे कारणही आहे.
अशा पार्श्वभूमीवर भक्त साहजिकच त्यांच्या गुरूच्या काळ्या कृत्यांकडे डोळेझाक करत आहेत आणि कोणत्या तरी कारणांमुळे विरोध करणारे विरोधक आपल्या गुरूला अडकवत असल्याचे मानत आहेत. त्यांच्या बर्याच गोष्टी पणाला लागलेल्या असल्याने त्यांना सत्य स्वीकारायला जड जात आहे.
अशा परिस्थितीत कोणता प्रस्थापित राजकीय पक्ष या डेर्याकडे दुर्लक्ष करेल? प्रत्येक राजकीय पक्ष या डेराबाबांच्या पाया पडत, ही प्रचंड व्होट बँक आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करणारच. आत्तापर्यंत काँग्रेसचे यांच्याशी संबंध होते 2012 नंतर सच्चा सौदाने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्याची परतफेड डेर्याच्या सर्व कृत्यांना संरक्षण देत, शासकीय निधीची खिरापत वाटत डेर्याच्या संपत्तीत प्रचंड भर टाकत केली जात आहे.
अनेक अडथळे असूनही दोन महिलांनी दाखवलेल्या प्रचंड धैर्यामुळे या बलात्कारी बाबाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्याबद्दल या दोन्ही महिलांच्या धैर्याला आपण सलाम करूच; पण त्या निमित्ताने राजकारण -धर्मकारण-अर्थकारण यांच्या युतीचे जे भयंकर स्वरूप पुढे आलेले आहे ते आपण कसे तोडणार, हा आज आपल्यासमोरचा खरा प्रश्न आहे.
–राजीव देशपांडे
(29 सप्टेंबर, 2017 च्या ‘फ्रन्टलाईन’ या पाक्षिकातील लेखाच्या आधारे)