Categories
प्रासंगिक

हिंसेच्या आजाराला औषध शोधताना

सप्टेंबर - २०१६

या वीस ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला तीन वर्षे पूर्ण झाली. अजून त्यांचे मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार सापडलेले नाहीत. त्यानंतर अवघ्या दीड वर्षांमध्ये त्याच पद्धतीने कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पुढे सहा महिन्यांनी प्रा. कलबुर्गी यांचा खून झाला. त्यांचे देखील मारेकरी अजून सापडलेले नाहीत. एकाच प्रकारचे विचार मांडणारे विचारवंत आणि कार्यकर्ते एकाच पद्धतीने मारले जातात आणि त्यांचे मारेकरी शासन पकडू शकत नाही, हे खूप अस्वस्थ करणारे वास्तव आहे. आम्हा कार्यकर्त्यांना आणि कुटुंबियांना रोज एक तरी अशी व्यक्ती भेटते की, जी म्हणते, ‘आता खूप झाले; आपण हे किती दिवस सहन करायचे? आपण काही तरी ‘आक्रमक’ आणि ‘ठोस’ करायला पाहिजे.’ ‘आक्रमक’ आणि ठोस’ म्हणजे बहुतांश लोकांना हिंसक कृती करणे अभिप्रेत असते. ‘आपल्या जवळच्या व्यक्तीचा खून होतो, तो देखील सामाजिक कामाच्या संदर्भात, त्याचे मारेकरी पकडले जात नाहीत, खूनसत्र थांबत नाही, अशा पार्श्वभूमीवर आपण हिंसेचा मार्ग अवलंबला तर ते योग्यच आहे, अशी यामधील बहुतांश लोकांची भावना असते आणि यंत्रणा जर आपल्याला म्हणावी त्या वेगाने दाद देत नसेल, तर मग काय हरकत आहे हिंसेचा मार्ग वापरायला?’ अशी देखील या लोकांची धारणा असते. केवळ समाजजीवनात छोट्या-मोठ्या प्रश्नांची उत्तरे देखील हिंसेच्या माध्यमातून सोडवण्याकडे आपला समाज म्हणून कल वाढतो आहे की काय, असे वाटावे, अशी परिस्थिती आजूबाजूला अनुभवायला येते. अगदी ट्राफिकमध्ये होणार्‍या भांडणांपासून ते कोपर्डीच्या प्रकरणापर्यंत हिंसेला हिंसेने प्रत्युत्तर देणे, ही बाब आपल्याकडे सहज प्रतिक्रिया होऊ लागली आहे; त्यामधूनच मग या देशात ‘शरियत’ कायदा लागू करा किंवा बलात्कार करणार्‍या व्यक्तीला जाहीर चौकात दगडाने ठेचून मारावे, अशा प्रतिक्रिया समाजमनात मोठ्या प्रमाणात उमटताना दिसतात.

प्रश्न केवळ आपल्या राज्यापुरता किंवा देशापुरता देखील मर्यादित नाही, तर जगभरात सगळीकडे स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंसेचा वापर करण्याची पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाताना दिसते आहे. दर वर्षी जगभरात पंधरा लाख लोक निरनिराळ्या हिंसाचारामुळे मृत्युमुखी पडतात. हिंसाचारातून झालेला एक अकाली मृत्यू त्या व्यक्तीच्या अख्ख्या कुटुंबाचे आयुष्य बदलून टाकतो. हिंसेमुळे आरोग्य, अर्थकारण, मानसिकता, मानवी जीवनाचा स्तर याच्यावर होणारे परिणाम तर आणखी वेगळे आहेत. अशा परिस्थितीत हिंसेला हिंसेने उत्तर देणे म्हणजे या दुष्परिणामांच्यामध्ये आपण भरच घालणे, असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो. हे सगळे असले तरी हिंसेला हिंसेने प्रतिकार करायची मानवी ऊर्मी ही मानवी मनाला आकर्षित करीत राहतेच. या पार्श्वभूमीवर डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या नंतर महाराष्ट्रात एक देखील हिंसक प्रतिक्रिया गेल्या तीन वर्षांमध्ये दिली गेली नाही. गेल्या तीन वर्षांमध्ये जवळच्या व्यक्तीच्या खुनामुळे अनुभवाला आलेली हिंसा आणि त्या अनुषंगाने समाजात दिसणारी हिंसा याविषयी मनात येणारे काही मुद्दे चर्चेसाठी आणि त्याला अनुसरून होणार्‍या कृतीसाठी मांडणे महत्त्वाचे वाटते.

‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’ या ‘महाराष्ट्र अंनिस’ने युवकांच्या साठी सुरू केलेल्या मोहिमेतला एक अनुभव त्या अनुषंगाने सांगितला पाहिजे. ‘हिंसेला नकार आणि मानवतेचा स्वीकार’ ही भूमिका ऐकून एका कार्यक्रमात एका तरुणाने मला चिडून विचारले की, ‘हिंसा करायची नाही, अशी तुमची भूमिका आहे; तर मग नक्षलवादी आणि दहशतवाद्यांना काय प्रेमपत्रे लिहायची का?’ उपस्थित बाकीच्या मुलांनी टाळ्या वाजवल्या. ही आपल्या समाजातील प्रातिनिधिक भावना आणि विचार करण्याची पद्धत असल्याची ती ग्वाही होती. समोरच्या व्यक्तीला गोळ्या घालणे किंवा प्रेमपत्र लिहिणे, याच्यामध्ये असलेल्या असंख्य पर्यायांचा समाज म्हणून आपण का विचार करीत नाही, हा कळीचा प्रश्न आहे. ‘महाराष्ट्र अंनिस’चे उदाहरण द्यायचे, तर आम्ही कायदा हातात घेऊन हिंसा केली नाही, याचा अर्थ आम्ही गप्प राहून अन्याय सहन केला, असे देखील नाही.
लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीतले असंख्य मार्ग आम्ही वापरले आहेत. धरणे, निवेदने, मोर्चेहे तर निषेधाचे नेहमीचे मार्ग तर आहेतच; पण प्रत्येक वीस तारखेला ज्या ‘विठ्ठल रामजी शिंदे पुला’वर डॉ. नरेंद्र दाभोलकरांना गोळ्या घालण्यात आल्या, तेथे जमून निदर्शने करणे, ‘मॉर्निंग वॉक’ला जाताना दाभोलकर आणि पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’चे आयोजन करणे, अशा गोष्टी त्यामध्ये आहेत. ‘रिंगण नाटका’सारख्या कलेच्या माध्यमातून एका बाजूला आपला निषेध व्यक्त करणे आणि दुसर्‍या बाजूला आपल्या वेदनेची अभिव्यक्ती करणे, असे देखील मार्ग आम्ही अवलंबले आहेत.

ज्या विचारांचा प्रसार थांबवा म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला, त्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि संघटन हे देखील या हिंसेला दिलेले एक सकारात्मक उत्तरच आहे. जादूटोणाविरोधी कायदा पारित होऊन त्याअंतर्गत तीनशेच्या आसपास बाबा-बुवांवर झालेली कारवाई ही ‘जातपंचायत आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा’ पारित करण्यासाठीची लढाई ही त्याची दोन ठळक उदाहरणे आहेत. दहशत निर्माण करणे हे बहुतांश हिंसेच्या मागचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते. ते सध्या न होता उलटपक्षी लोकांमधील निर्भयता वाढीला लागली, तर हिंसेचा वापर फोल ठरू शकतो. माध्यमे, न्यायव्यवस्था आणि पोलीस दल या संविधानाने आपल्याला अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या यंत्रणा आहेत. त्यांची मदत घेणे हे देखील या लढाईत खूप महत्त्वाचे आहे. उच्च न्यायालयाची देखरेख चालू झाल्यावर डॉ. दाभोलकरांच्या खुनाच्या तपासाला थोडीफार गती येते आहे, हे त्याचेच फलित आहे. येत्या वीस तारखेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला तीन वर्षेपूर्ण होत असताना तपासातील दिरंगाईविषयी निषेध म्हणून ‘महाराष्ट्र अंनिस’च्या सर्व शाखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळ्या कागदावर लिहिलेली आपली निषेध पत्रे पाठवणार आहेत आणि अशी पत्रे सामान्य नागरिकांनी देखील पाठवावी, असे आवाहन करणार आहे.

दलित समाजावरील शतकानुशतके झालेल्या अन्यायाला हिंसेच्याऐवजी संविधाननिर्मितीने लढा देणार्‍या बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी माझी मरण्याची तयारी आहे; पण कितीही गंभीर कारणासाठी माझी दुसर्‍याला ठार मारण्याची तयारी नाही, असे सांगणार्‍या गांधींचा आपल्याला वारसा आहे . ज्या कालखंडामध्ये परकीय राज्य होते, आपली राज्यघटना अस्तित्वात नव्हती, त्यावेळी देखील आपण अहिंसेने यशस्वी लढा दिला आहे. त्यामुळे स्वकियांच्या मनातील अपप्रवृत्तीविरोधातला आपला लढा हा देखील संविधानाच्या चौकटीतच लढला पाहिजे, असे वाटते. कदाचित वेळ लागेल, कदाचित आपल्याला हयातीत पूर्ण न्याय मिळणार नाही; पण लोकशाही व्यवस्थेमध्ये ही लढाई अटळ आहे. “मी ज्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, त्या क्षेत्रातील लढाई ही काही दशकांची नाही, तर काही शतकांची आहे,” असे डॉ. दाभोलकर म्हणत असत, तशीच ही देखील लढाई शतकांची आहे, याचे आपल्याला सतत भान ठेवावे लागेल.

डॉ. दाभोलकर, हिंसेच्या प्रतिकाराविषयी बोलताना कायम महात्मा गांधींची एक गोष्ट सांगायचे, ती आज परत-परत आठवते आहे. 15 ऑगस्ट 1947 च्या आसपासची गोष्ट आहे. सारा देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत असताना बापू, नोआखली भागात फाळणीमुळे झालेली दंगल शमवण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यावेळी, ज्याचा तरुण मुलगा दंगलीमध्ये मारला गेला, असा हिंदू बाप बापूंकडे येतो आणि त्यांना आत्यंतिक रागाने म्हणतो, ‘माझा तरुण मुलगा माझ्या डोळ्यांसमोर त्यांनी कापला आणि तुम्ही कसली ही अहिंसेची भाषा करता? त्यांच्या समाजाचा एक तरुण मुलगा कापल्याशिवाय काही माझे समाधान होणार नाही.’ त्यावर बापू त्याला म्हणतात, ‘मित्रा तुझे दु:ख मला कळते; पण दुसर्‍या धर्माचा एक मुलगा कापूनदेखील तुझे खरे समाधान होणार नाही. तुला जर खरे समाधान हवे असेल, तर या दंगलीत अनाथ झालेला तुझ्या मुलाच्या वयाचा दुसर्‍या धर्माचा एक मुलगा तू दत्तक घे आणि त्याचा धर्म न बदलता त्याला स्वत:च्या मुलासारखा वाढव, तरच तुला थोडे तरी समाधान मिळेल.’ बापूंचे नाव केवळ स्वच्छता अभियानापुरते वापरण्याच्या आणि हिंसेला सर्वांगाने बढावा मिळत असलेल्या या कालखंडात बापूंवरील दिशादिग्दर्शनासारखे हिंसेच्या आजाराला वेगवेगळ्या प्रकारे उत्तर देण्याचे अनेक मार्ग आपल्याला शोधावे लागतील, तीच खरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची कृतिशील आठवण काढणे होईल, असे वाटते.