Categories
चळवळ

37 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात अंनिसने केले सलग 5 दिवस प्रबोधन

मार्च - २०१२

विद्या प्रतिष्ठान यांच्या ‘Environmental Forum of India’ संस्थेमार्फत बारामती, जि.पुणे येथे टी.सी.कॉलेजच्या ग्राऊंडवर भरलेल्या 37 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दि.28 जानेवारी ते 1 फेबु्रवारी दरम्यान सलग पाच दिवस ‘चमत्कारामागील विज्ञान’ या मनोरंजनातून प्रबोधनाच्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

            प्रचंड मोठ्या मंडपात भव्य दिव्य स्टेजवर दर अर्ध्या तासाला महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले जवळपास 2 ते अडीच हजार विद्यार्थी समोर बसून या कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. यामध्ये अधांतरी बसवलेला साधू सर्वांचे खास आकर्षण ठरले. तसेच गल्लोगल्ली, गावामधी भोंदूबुवा वाढलं… या गाण्यावर ठेका धरत भोंदू महाराजांना झोपवून हवेत अधांतरी तरंगवायला लावणारे नेवाश्याचे वाघ सर्वांना मंत्रमुग्ध करत होते. प्रत्येक कार्यक्रमाची सुरवात पाण्याने दिवा पेटवून प्रशांत करत असे व प्रास्ताविक करून सातार्‍याचे बाबाच्या वेशातील भगवान रणदिवे व नेवाश्याचे डॉ.मच्छिंद्र वाघ जिवंत कोंबडीला संमोहित करून झोपवत असत, लंगर सोडवून दाखवत, जिभेतून त्रिशूल आरपार करत, तर कधी अंगात येऊन जोरजोरात घुमत आणि अंगावर आसूडही मारून घेऊन 900 खिळ्यांच्या पाटावर झोपत. सर्वच कार्यक्रम 30 ते 35 मिनिटे मंत्रमुग्ध होऊन विद्यार्थी, शिक्षक पहात व शेवटी प्रशांत यामागील विज्ञान व हातचलाखी सर्वांना 5 मिनिटांत समजावून सांगत. असे दिवसातून 8 कार्यक्रम सलगपणे पाच दिवस चालू होते. सर्वच विज्ञान प्रदर्शनात ‘चमत्कारामागील विज्ञान’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय व तुडुंब गर्दी खेचणारा झाला. शेवटी मा.अजित पवार यांच्या पत्नी सौ.सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अंनिसच्या टिमचा ट्रॉफी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

            या संपूर्ण प्रबोधन मोहिमेस सातार्‍याचे प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, नेवाश्याचे डॉ.मच्छिंद्र वाघ, वसिम बागवान, राहुल तुपे, मंदार पलसे, मंगेश शहा, डॉ.राजेंद्र कांकरिया, श्रीराम नलवडे, प्रा.शिंदे एस.एम., गिरीश ढोक, संदीपकुमार जाधव, भरत बबन विठ्ठलदास यांचे सर्वांचे सहकार्य लाभले. तसेच विद्याप्रतिष्ठानचे अ‍ॅड.निलिमा गुजर, सौ.सीमा चव्हाण, शब्बीरभाई यांचे विशेष सहकार्य लाभले.

-प्रशांत पोतदार, सातारा