आचार्य शांताराम गरुड एका व्याख्यानात सांगत होते, “गंध, गुलाल-भंडारा, शेंदूर जाणीवपूर्वक कपाळावर लावून न घेणारी महाराष्ट्रात दोनच कपाळे; एक शांताराम गरुड यांचे आणि दुसरे आमच्या एन. डीं. चे; बाकीची स्वत:ला पुरोगामी समजणारी कपाळेसुद्धा गंध पुढे आला रे आला की, ‘कर पुढे कपाळ’, गुलाल-भंडारा, बुक्का, शेंदूर आला की, यांचे कपाळ पुढे.”
महाराष्ट्राचे मंत्री झाल्यावर आपल्या हस्ते साग्रसंगीत भूमिपूजन होता कामा नये, अशी जाहीर भूमिका घेणारे कदाचित प्रा. एन. डी. पाटील एकमेव मंत्री असतील.
ज्यांना डॉ. प्रा. एन. डी. पाटील आपले खरेखुरे ‘कुलपुरुष’ मानतात, त्या महात्मा फुलेंनी निर्णायकपणे सांगितले, ‘सारे अनर्थ एका अविद्येने केले.’ अंधश्रद्धेच्या विषवृक्षाच्या मुळावर त्यांनी घातलेला हा पहिला घाव होता. आज गरज आहे ती या अंधश्रद्धेच्या आधारवृक्षाच्या छायेत दिवसाही रातांधळेपणा कवटाळून बसणार्या आंधळ्याच्या जगात ‘अत:-दीप भव’- ‘स्वत:च स्वत:चा प्रकाश हो’ म्हणणार्या महात्मा गौतम बुद्धाच्या आज्ञेयवादाची, बुद्धिवादी चिकित्सेची आणि विवेकवादी वर्तनाची.
डॉ. एन. डी. पाटील, महात्मा बुद्ध, चार्वाक, संत तुकाराम, महात्मा फुले यांच्याशी नाळ जोडलेले, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत एकरूप झालेले, स्वत:च्या कृतिशील वर्तनातून आणि परखड प्रबोधनातून, या चळवळीला दिशा, वजन, धारदारपणा देत लोकाभिमुख करणारे, बहुजनांची गुलामगिरी तोडण्यासाठी बंडखोरी करणारे, निधड्या काळजाचे नेते आहेत. आपल्या चिंतन, आचरण आणि नि:संदिग्ध धोरणामुळे ते या चळवळीचे आधारस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या सहभागामुळे या चळवळीला बारा हत्तींचे बल प्राप्त झालेले आहे.
कोणत्याही स्वरुपाच्या अंधश्रद्धांना त्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनात स्थान नाही. ना कुठल्या मंदिरात प्रवेश, ना नवस, ना भूमिपूजन, ना कुठले कर्मकांड; पण त्यांच्याबरोबर दौर्यात असणारे कुणी म्हणाले, ‘आम्ही देवदर्शनाला जातो’ तर सांगतील, ‘खुशाल जा; पण देवाच्या विश्वासावर ज्या वहाणा तुम्हाला सोडून जाण्याचे धाडस करता येणार नाही, त्या वहाणा सांभाळण्याचे काम तुम्ही येईपर्यंत मी करतो.’ इमारतीच्या पायाखोदाईच्या वेळी त्यांना भूमिपूजन करायला सांगितले, तर ते नम्रपणाने नकार देत सांगतील, ‘गडी, गवंडी, मजुराशिवाय आणि दगड-विटा, सळई-सिमेंटशिवाय केवळ भूमिपूजनामुळे इमारत उभी राहणार असेल, तर पूजन करणे मी स्वीकारीन. पण हे जर घडणार असेल, तर मी पूजा करण्याचा आग्रह तुम्ही धरू नका.’
लोकाग्रहासाठी, लोकलाजेसाठी आणि लोकानुययासाठी तत्त्वनिष्ठेची तिलांजली देणे, त्यांच्या तत्त्वात बसत नाही. तत्त्वनिष्ठेपायी रोष पत्करण्याचीही त्यांची तयारी असते. कोल्हापूर मतदार संघातून त्यांची विधानसभेवर निवड झालेली होती. आमदार म्हणून त्यांची प्रचंड, जल्लोषी मिरवणूक कोल्हापूर शहरातून वाटचाल करत होती. दिवस होळीचा होता. एका चौकात तोबा गर्दी होती. चौकाच्या मध्यभागी त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करणार्या कार्यकर्त्यांनी होळी रचली होती. उत्साही कार्यकर्त्यांची मागणी होती की, त्यांनी आपल्या शुभहस्ते होळी पेटवावी. ही विनंती त्यांनी नाकारली. काही कार्यकर्ते नाराज, काही संतप्त झाले. या वातावरणात एन. डी. पाटील मोटारीतून खाली उतरले. त्यांनी जनसमुदायाला सांगितले, “मी होळी पेटवणार नाही. कारण ही गोष्ट माझ्या बुद्धीला पटत नाही, माझ्या तत्त्वात बसत नाही आणि जे मला पटत नाही ते मी करणार नाही. यामुळे कार्यकर्ते म्हणून आपण नाराज असाल, तर मी तुमच्यावतीने पहिली घोषणा देतो, ‘एन. डी. पाटील मुर्दाबाद!’ आणि या घोषणा पुढे देत तुम्ही माझा निषेध करू शकता; पण मी होळी पेटवणार नाही.” बुद्धीला न पटणारी अंधश्रद्धा, कृतीने, त्या जल्लोषी, बेभान, प्रचंड जनसमुदायापुढे झुगारण्या, तत्त्वांच्या बांधिलकीचे आणि त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याचे हे सामर्थ्य असामान्यच.
त्यांचा परखडपणा सर्वज्ञात आहे. ते स्पष्ट सांगतात, विज्ञानाच्या संशोधनात पीएच. डी. मिळालेल्यांनी पदवीबद्दल सत्यनारायण घालायचा असेल, तर त्यांनी आपल्या सर्व पदव्या परत कराव्यात. शिक्षणाचा आणि अंधश्रद्धांचा संबंध नाही, हे स्पष्ट करताना ते सांगतात, ‘जेव्हा पदवीधर स्त्रिया सांगतात की, रिकामा पाळणा हलवू नये. कारण बाळाच्या पोटात दुखेल, हे ऐकताना हसावं की रडावं हेच कळत नाही.’ ते असं देखील सांगतात की, ‘मी शुभेच्छा देईन; पण देवाला प्रार्थना करणार नाही. कारण त्याची माझी एवढी घसट नाही.’ नारळ फोडण्याचा सोपस्कार त्यांना अमान्य आहे. खेड्यात कधी देवळात सभा झाली, तरी त्यांनी कधी देवदर्शन घेतलेलं नाही. कधी अंधश्रद्धा निर्मूलनाचं उदाहरण ‘एन्रॉन’ला चपखलपणानं जोडताना त्यांनी सांगितलं, ‘रेबेका मार्कबाईंनी सत्यनारायण घातला, त्यांना सत्यनारायण पावला आणि या सत्यनारायणाच्या कृपेने साधू वाण्याची बुडालेली नाव जशी वर आली, त्याप्रमाणे गोपीनाथ मुंडेंनी अरबी समुद्रात बुडवलेली ‘एन्रॉन’ची भरगच्च नाव वर आली.’
अंधश्रद्धांवर घाव घालताना त्यांची वाणी कचरत नाही. इचलकरंजीच्या अंनिसच्या मेळाव्यात त्यांनी अडाणी; पण सत्यशोधकी, कामेरी गावच्या पुरोगामी शेतकर्याची गोष्ट सांगितली होती. कामेरीच्या चौथी शिकलेल्या कृष्णा पाटलांनी त्यांच्या कृतीने सगळ्या गावच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांनी गावात दवंडी दिली की, उद्या त्यांच्या रानात 330 कोटी देव कामाला येणार आहेत. सगळं गाव चक्रावलं. बघायला या म्हणून निमंत्रण मिळालेलंच होतं. सगळे गावकरी त्याप्रमाणे गेले. या पठ्ठ्याने 10 गायी नांगराला जुंपलेल्या होत्या आणि या 10 गायी नांगर ओढत होत्या. प्रत्येक गायीच्या पोटात 33 कोटी देव म्हणजे 10 गायींच्या पोटातल्या देवांची संख्या 330 कोटी होत होती. तर कृष्णा पाटलांच्या रानात 330 कोटी देव काम करत होते. या गायींच्या शरीरात 330 कोटी देव आहेत, ही देखील अंधश्रद्धाच. बाजारात हिंडणार्या, देवाला सोडलेल्या गायीला मात्र प्रत्येकजण पुढे हाकलत असतो. भाजीवाले, फळवाले, धान्यवाले सगळे हेच करतात. गायीच्या शिंगाला, डोक्याला हात लावून कुणी दर्शन घेत नाही. सगळेच शेपटाला हात लावून नमस्कार करतात. कुणी नमस्कार केला, दर्शन घेतलं हे गायीला कळणं अवघड. काही भाविक तर गायीचं शेपूट आपल्या तोंडावरून फिरवतात.
त्यांनी सांगितलेली दुसरी सत्यशोधकी जलशातली गोष्टही अशीच भ्रमाचा भोपळा फोडणारी. जलसा चालू असतो. संवाद चालू असतो. एक सासू आपल्या सुनेला देवदर्शनासाठी एका मंदिरात घेऊन आलेली असते. दाराशी काळाकभिन्न शस्त्रधारी द्वारपाल उभा असतो. सून घाबरते, सासू धीर देत सांगते, ‘त्याला काय घाबरायचं, दगडाचा तर आहे.’ थोड्या अंतरावर सोंड उभारलेला, सुळे असलेला अजस्त्र हत्ती. पुन्हा सून भांबावली. सासूनं खुलासा केला, ‘दगडाची तर आहे.’ आणखी पुढे गेल्यावर आयाळ पिंजारलेला, जबडा वासलेला सिंह उभा होता. पुन्हा सून घाबरली. सासूनं सांगितलं, ‘दगडाचा तर आहे’. शेवटी त्या देवापर्यंत आल्या, आता तयार झालेल्या सुनेनचं सासूला सांगितलं ‘दगडाचाच तर आहे. त्याला नमस्कार कशासाठी!’ श्रोत्यांतून आवाज आला, ‘अगं सासू, आता बोल की!’
जातिव्यवस्थेवर घाव घालताना कधी ते निषाद-पारधी जातीतील आदिवासी नेमबाज एकलव्याचा अंगठा मागणार्या पक्षपाती द्रोणाचार्याला उपहासाचा हास्यास्पद विषय बनवतील; तर कधी रामराज्यात वेदवाणी उच्चारली त्याचा बादरायणी संबंध ब्राह्मणपुत्राच्या निधनाशी जोडून रामराज्यात शंबुकाला देहांत शासन द्यायला लावणार्या रामराज्याच्या आणि चातुर्वर्ण्याच्या अन्यायाचे वाभाडे काढतील. शंकराचार्यांचे दर्शन घेणार्या इंदिरा गांधी जशा त्यांच्या टीकेचे विषय; तसेच आशीर्वाद म्हणून साधूबाबांचा पाय मस्तकावर धारण करणारं बलराम जाखडही तेवढेच अपराधी. त्यांची न मळलेली वाट संत गाडगे महाराजांची. बुवाबाजीवर घाव घालणार्या या गाडगे महाराजांनी सांगितले होते, ‘सव्वा रुपया दक्षिणा देत घातलेल्या या सत्यनारायणानं जर साधू वाण्याची नाव वर येत असेल, तर कुणीही सत्यनारायण घालावा आणि मुंबईच्या समुद्रात बुडालेल्या रामदास आणि तुकाराम या बोटी वर काढून दाखवाव्यात. मी त्याला 11 लाख रुपये द्यायला तयार आहे.’ हात हवेत फिरवून मुठीतून मंत्र्यासाठी सोन्याची चेन काढून देणार्या सत्य साईबाबांना त्यांचं सांगणं असे की, त्यांनी जपानी बनावटीचं घड्याळ किंवा सोन्याची चेन काढून दाखवण्याचा चिल्लर चमत्कार करण्याऐवजी शेतकर्याला उपयुक्त असणारा ट्रॅक्टर हवेत हात फिरवून काढून दाखवण्याचा चमत्कार करून दाखवावा. समाज त्यांचा ऋणी राहील.’ त्यांची सगळी उदाहरणं ‘सौ सुनारकी एक लुहार की’ पद्धतीची, एक घाव, दोन तुकडे करणारी.
ज्योतिषशास्त्र, बुवा, बाबा, महाराज फोल आहेत. ख्यातनाम ज्योतिर्विद जयंत साळगावकर ज्योतिषविद्येत पोचलेले; तसे सगळे बाबा, बुवा, महाराज पोचलेलेच आणि भक्तांना पोचवणारे. या साळगावकरांनी चांगल्या मुहुर्तावर दैनिक काढले; पण ते बंद पडलेे. बलराम जाखड यांनी देवरावबाबाचे दर्शन घेतले आणि त्यांचे मंत्रिपद गेले. देवदर्शन करून येणारे लोक अपघातात सापडताना, अपंग होताना, मरण पावताना दिसतात. नवसानं जन्माला आलेलं मूल नवस फेडताना निधन पावतं, एवंच अंधश्रद्धा फोल आहेत.
त्यासाठी उपायही सुचवतात, लोकशिक्षणाबरोबर प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अभ्यासक्रमात इहवादी विचार आले पाहिजेत. अभ्यासक्रमात शहीद भगतसिंगांचे ‘मी नास्तिक का आहे?’ यासारखे साहित्य असावे. फाशीच्या कोठडीत देखील त्याला देवाची आठवण झाली नाही.
धर्म ही व्यक्तिगत आणि उंबरठ्याच्या आत मानावयाची गोष्ट आहे. धर्मनिरपेक्ष राष्ट्रच शेवटच्या दीनदुबळ्या माणसाच्या हिताचा विचार करू शकेल. धर्माचा आधार राष्ट्र एकत्र बांधू शकत नाही. धर्माच्या आधारावर पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र नांदू शकत नाहीत. धर्म, रोजीरोटी, निवास, शिक्षण, आरोग्य देऊ शकत नाही. जाति-पंथ-धर्म निरपेक्ष राष्ट्र हीच प्रगत राष्ट्राची मानवतावादी संकल्पना असू शकते. महात्मा फुलेंच्या ‘अखंडा’त ते आपला आदर्श मांडतात. ख्रिस्त, महंमद, मांग, ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी!
अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हावा, यासाठी त्यांची अखंड धडपड होती. आघाडी सरकारने नेमलेल्या 51 कलमी किमान समान कार्यक्रमाच्या समन्वय समितीचे अध्यक्ष असताना अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम त्यातील एक कलम म्हणून अंतर्भाव आणि कायदा करण्याची प्रक्रिया केवळ एन. डी. पाटील यांच्यामुळे घडली, हे देखील निखळ सत्य आहे.
त्यांचीच हाक ऐकायची, तर मळलेल्या वाटेचे गुलाम होऊ नका, केवळ पदवीचा कागद देणार्या शिक्षणापेक्षा आत्मपरीक्षण आणि चिकित्सा करा. चिकित्सा आणि विशेषत: धर्मचिकित्सा ही सर्व अर्थव्यवस्थेवरचा उपाय आहे, हे त्यांचे निर्णायक मत आहे.
या चळवळी करताना सरकारने आणखी एक मधाचे बोट लावले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष असणार्या डॉ. एन. डी. पाटलांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा अध्यादेश काढला. म्हणजे अंनिसचा अध्यक्ष हा राज्यमंत्री.
या आमिषांच्या सापळ्यात डॉ. एन. डी. पाटील सापडणे शक्यच नव्हते. त्यांनी हे आमिष सहजतेने ठोकारून लावले. त्यांच्या दृष्टीने त्यांच्या चळवळीची धार, प्रभावीपणा, एकसंधपणा अधिक मोलाच्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या होत्या. त्यांच्या विरोधामुळे राज्यपालांना ‘अंनिस’च्या अध्यक्षाला राज्यमंत्रिपद देण्याच्या अध्यादेशात दुरुस्ती करावी लागली. परिवर्तनाच्या वाटेवरचा ‘योद्धा संन्यासी’ ही त्यांची प्रतिमा अधिक उजळून निघाली होती.
शनि शिंगणापूरच्या देवळात आजही स्त्रियांना पूजा करू दिली जात नाही. आपल्या राजधानीतील स्त्री-पुरुष समानता या प्रथेने पार पायदळी तुडवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही तिथे जाऊन सपत्नीक पूजा करतात व आपल्या पत्नीला पूजेचा अधिकार माहीत असूनही परंपरेचा अनुनय किती करायचा, हे याचे टोकाचे उदाहरण. अशा या गावात अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने सत्याग्रह केला. त्यात डॉ. श्रीराम लागू, प्रा. पुष्पा भावे या सत्याग्रहींबरोबरच प्रा. एन. डी. पाटील होते. सक्रिय पक्ष कार्यकर्ता असूनही एन. डी. पाटील या आंदोलनात सामील झाले. याचे कारण बहुजनांच्या उत्कर्षाआड येणारी गुलामगिरी त्यांना बोचत होती म्हणूनच आपण सत्याग्रह केल्याने आपल्या पक्षाला मते मिळणार नाहीत, असा क्षूद्र विचार त्यांनी केला नाही. अंनिसच्या चळवळीला एन. डीं. चा आधार वाटतो तो या मुळेच! हे त्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमातील एक कलम.’