वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानप्रसाराचा अखंड स्रोत
जातव्यवस्था आणि मूर्तीपूजा यांच्या विरोधात असणार्या कुटुंबात यशपाल जन्माला आले. साहजिकच ते भविष्यात विज्ञानवादी न बनते, तरच नवल. पंडित नेहरू, इमर्सन, थोरो, टॉलस्टॉय यांच्या साहित्याने यशपाल यांचे व्यक्तिमत्व समृद्ध झाले.
भौतिक विज्ञानाचे शिक्षण पूर्ण केल्यावर यशपाल यांनी आपल्या क्षेत्रात संशोधन केलेच; पण भारतीय समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा त्यांनी जीवापाड प्रयत्न केले. विज्ञान शिक्षणातील अपुरेपणा जावा, यासाठी त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग केला. ‘टर्निंग पॉईंट’ ही त्यांची दूरदर्शन मालिका गाजली.
सभोवतालचे पर्यावरण, शेती, स्वयंपाकघर, तळी इत्यादींमध्ये विज्ञान कसं भरलं आहे, ते मुलांना दाखवा, असं सांगणारे यशपाल खेड्यापाड्यातील मुलांच्या शिक्षणाचा विचार करणारे होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष; तसेच नियोजन आयोगाचे सल्लागार अशी पदे भूषविणारे यशपाल हे खरे लोकवैज्ञानिक होते.
प्रोफेसर यशपाल यांचा जन्म झांग (सध्या पाकिस्तानमध्ये) येथे 26 नोव्हेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे बालपण क्वेट्टा (बलुचिस्तान) या शहरात गेले. 1935 मधील प्रचंड भूकंपाने त्यांचे क्वेट्टा येथील निवासस्थान जमीनदोस्त झाल्याने पुढील वास्तव्यासाठी पंजाबमधील चिनाब नदीच्या किनार्यावर असलेल्या ‘कोट इसाशाह’ या आजोळच्या गावी गेले. तेथे ओढवलेल्या पुराच्या संकटामुळे ते पुन्हा झांग या मूळ गावी परतले. नंतरच्या कालावधीत वडिलांच्या नोकरीनिमित्ताने बदल्यांमुळे प्रा. यशपाल यांना स्वयंअध्ययनाची सवय लागली. शालेय शिक्षणानंतर 16 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी प्रा. यशपाल मोठ्या मावशीकडे लयालपूर (फैझाबाद, पाकिस्तान) येथे गेले. याच काळात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचे ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ हे पुस्तक; तसेच महात्मा गांधी, टॉलस्टॉय, रस्कीन, इमरर्सन, रवींद्रनाथ टागोर यांची भारावून टाकणारी व विचारप्रवण करणारी ग्रंथसंपदा वाचली होती.
मानवाच्या कल्याणाबाबत वेदांमध्ये लिहिले आहे, उपनिषदे हे वेदांचे सार सांगतात, पुराणातील उल्लेख खोटे आहेत, रामायण, महाभारत व गीतेत काही नैतिक गोष्टींबाबत भाष्य केलेले आहे; परंतु त्याचबरोबर कालांतराने अनाहुत लोकांनी घुसडविलेल्या चमत्कारांनी खच्चून भरलेल्या या कथा आहेत, असे त्यांचे या पौराणिक ग्रंथांबाबत मत होते. त्यांचे कुटुंबीय, जातिव्यवस्था व मूर्तिपूजेच्या विरोधात होते. 1947 मधील फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत अनेक दंगलग्रस्तांना त्यांनी मदत केली. बी.एस्सी. नंतरचे शिक्षण प्रा. डी. एस. कोठारी यांच्या मदतीने पूर्ण केले. एम.एस्सी.(1949) सुरू असताना त्यांना टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च सेंटर, मुंबईकडून मुलाखतीसाठी पत्र आले. तेथील निवडीनंतर विदेशी शास्त्रज्ञ पीटर्स यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संशोधन ‘बलून फ्लाईट’ संदर्भाने सुरू झाले. पुढे पीएच. डी. करण्यासाठी टी.आय.एफ.आर.मधून डेप्युटेशनवर 1954-58 या कालावधीत एम.आय.टी., अमेरिकेमध्ये गेले. पीएच. डी. प्राप्त केल्यानंतर अमेरिकेतच स्थायिक न होता अगदीच तातडीने भारतात परत आले. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांतील निमंत्रणे त्यांनी स्वीकारली नाहीत व टी.आय.एफ.आर., मुंबई येथे पुन्हा संशोधनकार्यात सक्रिय झाले.
1972 पर्यंत टी.आय.एफ.आर. मध्ये संशोधन कार्य केल्यानंतर त्यांनी आंतरिक्ष केंद्र, अहमदाबाद येथील सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपरिमेंट (SITE) या नासा व इस्त्रोच्या सहकार्याने राबविण्यात येणार्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची धुरा सांभाळली. या माध्यमातून उपग्रहाचा शिक्षणासाठी वापर करणे; तसेच हवामानशास्त्र, हवामानाचा अंदाज वर्तविणे इत्यादी महत्त्वपूर्ण क्रांतिकारी संशोधनाला चालना मिळाली.
विज्ञान हे सर्वत्र आहे. सभोवतालचे पर्यावरण व वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. प्रश्न विचारणे, समजून घेणे, स्पष्टीकरण देणे आणि विज्ञानाच्या पद्धतीने उपयोजित करणे या विज्ञानप्रक्रिया समजून घेण्याच्या पायर्या आहेत. फक्त ज्ञानाचा प्रसार करणे नव्हे, तर ज्ञानाची निर्मितीची प्रक्रिया समजून घेण्यावर त्यांचा भर होता. विद्यार्थ्यांना शाळेतील प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत म्हणून सभोवतालचे पर्यावरण, स्वयंपाकघर, शेती, शेतातील तळे, सायकल, झाडांची पाने, फुले, फळे इत्यादींमध्ये असणारे विज्ञान शोधण्याचा पर्याय त्यांनी सुचविला.
विज्ञान संस्थांचे प्रशासकीय कार्य करीत असतानाच 1982 मध्ये नियोजन आयोगाचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांची तत्कालीन सरकारने नेमणूक केली. 1984 मध्ये भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून देखील त्यांनी कार्य केले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली. मूलभूत विज्ञान संशोधन करणार्या प्रयोगशाळांना अभिमत विद्यापीठाचा दर्जा त्यांच्यामुळेच प्राप्त झाला.
देशातील सामाजिक परिस्थिती प्रा. यशपालांना नेहमीच बेचैन करत होती. तळागाळापर्यंत शिक्षण पोचलेले नाही म्हणून अनेक समस्या निर्माण होतात, हे ते जाणून होते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी शिक्षणक्षेत्रात वेगळा प्रयोग करण्याची संकल्पना तत्कालीन सरकारकडे मांडली होती. या संकल्पनेनुसार देशातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठे एक वर्षासाठी बंद करावीत, अशी ती सूचना होय. अर्थात, या एक वर्षाच्या कालावधीत सुट्टी घ्यावयाची नाही, तर सर्वसामान्य लोकांशी भेटणे, त्यांच्या गरजा व अडचणी ओळखणे, त्यावर आधारित नवीन अभ्यासक्रम तयार करणे, दैनंदिनी लिहिणे आणि या सर्वांचा एकत्रित अहवाल बनवून शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडविणे की, ज्यामुळे समाज व शिक्षण यातील दरी कमी होईल. देशात जनता सरकार असताना यावर नियोजन आयोगात चर्चा झाली. अनेक विद्यापीठांनी मात्र विरोध दर्शविला. सर्वपक्षीय सभेमध्ये चर्चा झाली. तत्कालीन विरोधी पक्षनेते राजीव गांधींचा देखील यास पाठिंबा होता. परंतु अचानक त्यांचा मृत्यू झाला. सरकार बदलले आणि यशपालांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद सोडले आणि या आमूलाग्र बदल घडविणार्या कल्पनेचे स्वरूप तेथेच थांबले.
1992 मध्ये ‘भारत ज्ञान-विज्ञान जथा’ चळवळ ही देशातील चारशे जिल्ह्यांतून आणि अंदाजे 60 हजार खेड्या-पाड्यांत पोचली. या माध्यमातून विज्ञानाचा प्रसार करणारी अनेक माणसे जोडली गेली. विज्ञानप्रसार करणार्या अनेक संस्थांचे एक जाळे तयार झाले. नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, नेटवर्क या एन.सी.एस.टी नेटवर्कच्या अध्यक्षपदी प्रा. यशपाल होते.
दूरदर्शनवर प्रसारित होणार्या ‘टर्निंग पॉईंट’ (1992) या कार्यक्रमाच्या माध्यमातून विज्ञानाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे अतिशय समर्पक आणि चपखलपणे देण्यात प्रा. यशपालांचा हातखंडा होता. जुलै 1979 मध्ये ‘स्काय लॅब’ कोसळणार आणि अशी अफवा पसरली होती की, गुजरातमधील खेडा जिल्ह्यात ते कोसळणार. लोकांच्या मनातील भीती घालविण्यासाठी ते सातत्याने ‘नासा’च्या संपर्कात राहिले, स्कायलॅबच्या स्थानाबद्दलची सातत्याने माहिती गोळा केली. प्रत्येक अर्ध्या तासाला रेडिओवरून ही अद्ययावत माहिती लोकांना सांगितली जात होती. लोकांना अधिक समजावे आणि विश्वास बसावा म्हणून त्यांनी दूरदर्शनवरून छायाचित्रांच्या मदतीने स्कायलॅब कशा पद्धतीने स्थान बदलत आहे आणि ते खेडा (गुजरात) परिसरात पडणार नाही, हे लोकांना पटवून देऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली म्हणून तेथील लोक त्यांना ‘स्कायलॅब अंकल’ म्हणून संबोधत होते. याप्रसंगी फक्त त्यांनी लोकांना माहिती दिली नाही, तर सर्व गोष्टी समजतील अशा पद्धतीने सांगितल्या, हे महत्त्वाचे होय.
पहिल्या इन्सॅट उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले नाही. कारण त्याचा अँटेना उघडला नाही. तो कसा उघडता येईल, यासाठी प्रा. यशपालांनी इन्सॅटच्या अँटेनाची प्रतिकृती कॉम्प्युटरच्या कार्ड्सपासून बनविली आणि तो कसा उघडता येईल, याचे स्पष्टीकरण शास्त्रज्ञांना दिले. एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन, समजावून घेऊन, समजावून देऊन ती समस्या सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करीत.
‘टर्निंग पॉईंट’च्या कार्यक्रमादरम्यान दिवसाला किमान 200 पत्रे यायची. प्रत्येक पत्रात अंदाजे तीन प्रश्न असायचे. प्रश्नांचे थेट उत्तर न देता, लोकांना समजावण्यावर त्यांचा भर असे. या कार्यक्रमाद्वारे त्यांना फार आनंद प्राप्त झाला. व्यावसायिक चॅनेल्स आल्यानंतर मात्र दूरदर्शनने हा कार्यक्रम प्रक्षेपित करणे बंद केले. प्रा. यशपालांना त्याचे फार दु:ख वाटले. गिरीश कर्नाड, नसिरुद्दिन शाह यांच्यासारखे चित्रपट क्षेत्रातील कलाकार कार्यक्रमात असल्याने तो कार्यक्रम जास्त काळ चालेल, असे त्यांना वाटत होते. ‘टर्निंग पॉईंट’चे 150 हून अधिक एपिसोड्स प्रक्षेपित झाले.
1995 व 1999 मधील सूर्यग्रहण आणि 2004 मधील मंगळ ग्रहाचे अधिक्रमण या अवकाशातील घटनांचे ‘लाईव्ह’ प्रक्षेपण दूरदर्शनद्वारे करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमासाठी व संचलनासाठी ते स्वत: उपस्थित होते. या खगोल – भौतिकीय घटनांचा सर्वसामान्य लोकांना अनुभव घेता यावा, यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

दूरदर्शनवरील ‘टर्निंग पॉईंट’ बंद झाल्यानंतर काही वेबसाईटवरून त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. त्यांच्या सी.डी. तयार करून प्रदर्शित केल्या. त्याच्यावरील 250 प्रश्नोत्तरांचा समावेश असलेले पुस्तक देखील प्रकाशित झाले. मल्याळम् भाषेतील मनोरमाने देखील त्यांची प्रश्नोत्तरे प्रकाशित केली. या सर्व मार्गाने ते प्रसारमाध्यमांमध्ये अतिशय लोकप्रिय झाले. त्यांची मनोधारणा होती की, मी फक्त शास्त्रज्ञ म्हणून राहिलो, तर संवादी होता येणार नाही आणि संवादी राहायचे असेल, तर सर्वसामान्यांना समजेल, अशाच भाषेत, पद्धतीने उत्तर दिले पाहिजे.
शिक्षणव्यवस्थेतील बदल हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव राहिला आहे. शिक्षणाबाबत त्यांना नेहमीच अभिरुची होती आणि नवनवीन शिकण्याच्या पद्धतींबद्दल ते आग्रही राहत. फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून, सामाजिक प्रश्नांबद्दलचा जिव्हाळा देखील त्यांच्या मनात होता. त्यांना नेहमी वाटे की, आपल्या प्रचलित शिक्षणपद्धतीत काही कमतरता आहे आणि ती उणीव भरून काढणे गरजेचे आहे. त्यांच्या मते शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान देणे नसून ग्रहण करणे, ज्ञानाची बांधणी आणि नवनिर्मिती करणे होय. ज्ञानाच्या विविध शाखांमधील भिंती दूर झाल्या पाहिजेत आणि सर्व शाखांचे ज्ञान एकमेकांना पूरक असल्याने त्याच परस्परपूरक पद्धतीने शिकविले गेले पाहिजे. दैनंदिन जीवनातील अनुभवांचा, निरीक्षणांचा उल्लेख समजण्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी करता येईल. मूलभूत विज्ञानातील शिक्षणक्रमातील अभ्यासक्रम त्याच-त्याच पद्धतीने न शिकविता विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांना समोर ठेवून त्यांना समर्पक उत्तरे शोधावीत व नंतर मूलभूत विज्ञानाच्या संकल्पनेकडे जावे, असे त्यांना वाटत असे; ज्यामुळे विद्यार्थ्यांची विषयातील आवड आणि कल्पनाशक्ती विकसित होऊन मूलभूत संकल्पना समजली जाईल.
टी.आय.एफ.आर. मधील सहकारी प्रा. व्ही. जी. कुलकर्णी यांच्या सहकार्याने त्यांनी मुंबईतील महानगरपालिका शाळांतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ‘विज्ञानशिक्षणा’साठी पाठ्यक्रमाचे लेखन विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रकारे केले. विज्ञान नापास होणारे विद्यार्थी त्यामुळे चांगल्या मार्काने पास होऊ लागले. कृतियुक्त शिक्षणावर देखील त्यांनी अधिक भर दिला. शिक्षण हे नेहमी मार्गदर्शक व मदतनीसाच्या भूमिकेत राहिले पाहिजे; ना की फक्त ज्ञान देणारा, असे त्यांचे शिक्षकांबद्दलचे मत होते.

1992 मध्ये मानव संसाधन मंत्रालयाने शालेय विद्यार्थ्यांवरील ओझे कमी करण्यासाठी नेमलेल्या राष्ट्रीय सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी सरकारला दिलेला अहवाल ‘यशपाल कमिटी अहवाल’ म्हणून 1993 मध्ये प्रसिद्ध झाला. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना केलीच; त्याही पलिकडे त्यांनी असे म्हटले आहे की, ’खूप शिकविले जाते; परंतु फारच थोडे समजले जाते, याचेच ओझे झाले आहे. त्यामुळे दप्तरापेक्षाही मुख्य भार हा ‘न शिकणे व न समजणे’ हा आहे.’ त्याही बाबतीत त्यांनी सुधारणा सुचविल्या. दप्तराचे ओझे कमी करावेच; परंतु त्याचबरोबर न शिकण्याचा आणि न समजण्याचा भार देखील हलका केला जावा, असे त्यांचे मत होते. या अहवालात पुस्तके कशी लिहावीत, यावर देखील प्रकाशझोत टाकला होता. पुस्तकात लिहिलेले आणि वर्गातील वास्तव पूर्णपणे वेगळे असते. पुस्तकातील अवजड संकल्पना, भाषा अतिशय कठीण, सर्वसामान्य विद्यार्थ्याला आकलन न होणारी असते. परीक्षापद्धतीविषयी देखील त्यांनी परखड मतप्रदर्शन केले होते. विद्यार्थी उत्तरपत्रिकेमध्ये लक्षात राहिलेल्या अभ्यासापैकी किती पुनर्लेखन करू शकतो, याचे मूल्यमापन न करता त्याला किती समजलेले आहे, शिकलेल्या संकल्पनेचे उपयोजन कुठे करता येईल, याबाबत विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली पाहिजे, शिक्षक आणि पालक आग्रह धरीत असलेल्या घोकंपट्टीचा काहीही उपयोग नाही, असे त्यांचे प्रांजळ मत होते आणि त्याचमुळे विद्यार्थ्यांना प्रचलित शिक्षणात आणि शिक्षण पद्धतीत कंटाळा येतो; आनंदी वाटत नाही, कटू अनुभव येतात. विद्यार्थीकेंद्री शिक्षण आणि उपक्रमशील, कृतिशील शैक्षणिक पद्धतीबद्दल फक्त बोलून फायदा नाही, तर कृतीत आणण्याची गरज आहे, असे ते वारंवार सांगत. शिक्षणक्रमातील बदलांविषयी आग्रही राहत असताना ते म्हणत, ‘व्यक्ती/विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी सभोवतालची परिस्थिती अभ्यासासाठी पोेषक असली पाहिजे, असे झाले तरच शिक्षण ही घेण्याची किंवा देण्याची गोष्ट राहणार नाही, तर ज्ञानाची नवनिर्मिती करण्याची प्रक्रिया होईल.’ ज्ञानाच्या नवनिर्मितीसाठी विद्यार्थ्याकडे अनुभव असणे गरजेचे आहे. त्याने निरीक्षण केले असले पाहिजे, उपयोजन केले असले पाहिजे. खेळत असताना कोणत्या पद्धतीने प्रयोग केले आहेत, सभोवतालची परिस्थिती आणि जगाचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असेल, तर प्रत्येकासाठी वेगळा अभ्यासक्रम गरजेचा आहे. त्यामुळे सध्याची शिक्षणपद्धती आणि मूल्यमापन पद्धती कालबाह्य ठरते आहे.
माणसाचा जन्मच मुळी निरीक्षण, प्रयोग आणि अनुमान, निष्कर्ष काढण्यासाठी झालेला आहे; परंतु विज्ञानाची ही पद्धत माणूस जसजसा वयाने मोठा होत जातो, त्यावेळी शिक्षणपद्धतीमध्ये मागे पडते. विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नांचे संकलन करून अभ्यासक्रम निर्माण करण्यात यावा.
प्रा. यशपाल हे शास्त्रज्ञ, संशोधन संस्था उभारणारे, व्यवस्थापक, शिक्षणतज्ज्ञ, विज्ञानाचे प्रसारक असे होते. भारतीय शास्त्रज्ञांपैकी असे बहुविविध पद्धतीने कार्यप्रवण असणार्यांपैकी प्रा. यशपाल एक होत. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले. विद्यार्थ्यांशी अथवा ज्येष्ठ/कनिष्ठ शास्त्रज्ञांबरोबर नेहमीच सुसंवाद साधणारे होते. अर्थातच, तरुणांना सातत्याने प्रोत्साहित करण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. ते फक्त एक व्यक्ती नसून एक ‘लोकोत्तर पुरुष’ म्हणून सातत्याने राहिले आहेत. भारत सरकारच्या ‘विज्ञान प्रसार’ संस्थेशी अगदीच स्थापनेपासून संबंधित राहिल्याने विज्ञानप्रसाराचे बहुमोलाचे कार्य त्यांच्या माध्यमातून घडले आहे. जीवनाकडे वळून बघताना ते म्हणतात, ‘शिक्षणाबद्दल मी नक्कीच काहीतरी केले आहे, खूप जास्त नसेल; परंतु विचारपूर्वक आणि आवड निर्माण होईल, असे केले आहे. यामुळे मला प्रचंड बौद्धिक आनंद प्राप्त झाला आहे.’ अशा पद्धतीने विज्ञानशिक्षणाच्या कार्यात स्वत:चा आनंद शोधणारे प्रा. यशपाल होते. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा नागरी पुरस्कार (1976) मध्ये दिला होता. विज्ञानप्रचाराच्या कार्याबद्दलही त्यांना सन 2000 मध्ये विज्ञान प्रचारक पुरस्कार एन.सी.एस.टी.सी. द्वारा मिळाला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मार्कोनी पुरस्कार (1980) ऑस्ट्रेलियाद्वारा त्यांना प्रदान करण्यात आला होता.
प्रो. यशपाल यांच्या निधनाने भारतातील विज्ञान प्रसार करणार्या चळवळीचे मोठे नुकसानच झाले आहे. विज्ञान प्रसाराचे त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
–प्रा. डॉ. सुदेश घोडेराव
लेखक संपर्क : 9422257654