‘हे असंच चालायचं!’ अशी नकारार्थी मानसिकता व्यक्त करणारी वाक्य आपण आपल्या बोलीभाषेत नेहमी वापरतो. अशाप्रकारच्या वाक्यावर दरमहा लिहिणार आहेत… अनिल चव्हाण.
रस्त्याच्या कडेला एक चहाची गाडी उभी होती. छोटी-छोटी चाके होती म्हणून तिला गाडी म्हणायचे. फिरून व्यवसाय करावा म्हणून परवानगी घेतलेली पण एकाच जागी उभी होती. तिचे रूपांतर आता चारीबाजूंनी मोठ्या खिडक्या असलेल्या टपरीत झाले होते. गाडीच्या आतल्या सपाट पृष्ठभागावर लिहिले होते, ‘हे असंच चालायचं!’ चहा पिणारा प्रत्येकजण ते वाचून मान डोलवायचा!
खरोखर हे ‘असेच चालते’ काय? योगगुरू म्हणवणारे बुवा श्वास घ्यायला आणि सोडायला सांगता-सांगता उद्योगपती बनतात आणि निवडणुकीत धर्मांधांना मते देण्याचे मार्गदर्शन करतात. लोभ आणि मोह सोडा म्हणणारे आध्यात्मिक गुरू दोन-चार हजार कोटींची संपत्ती गोळा करतात, ऐषोरामात राहतात, लहान मुलांचे खून पाडतात, महिलांचे शोषण करतात आणि शेवटी तुरुंगातही जातात.
लोकशाही प्रजासत्ताकाची शपथ घेतलेले मुख्यमंत्री राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश ठेवा म्हणतात आणि हे सांगण्यासाठी गुंडप्रवृत्तीच्या बुवाचे पाय धरतात. देशाचे पंतप्रधान विज्ञान परिषदेला मार्गदर्शन करताना, हत्तीचे डोके माणसाच्या धडाला चिकटविण्याचे शास्त्र प्राचीन भारतात असल्याची अशास्त्रीय विधाने करतात. त्यांचे भक्त काही पुरावे मागत नाहीत. शेवटी ऐकणारी सामान्य जनता हताशपणे म्हणते – “हे असंच चालायचं.”
नोकरीसाठी वणवण फिरूनही बेरोजगार राहिलेले तरुण, महागाईने बेजार झालेले नागरिक, शेतमालाला भाव नाही म्हणून डोक्याला हात लावणारा शेतकरी, काहीच मार्ग सापडत नाही, तेव्हा अगतिक होऊन म्हणतो – “हे असंच चालायचं.”
पण खरंच हे ‘असंच चालतंय’ का? अल्पकालावधी घेतला, तर हे खरेच वाटते. काल महागाई होती, आजही आहे; अन्याय, अत्याचार, खून, मारामार्या आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या बातम्या काल वाचल्या, परवा होत्या आणि आजही वाचायला मिळतात म्हणून वाटते, ‘हे असंच चालायचं.’
पण कालावधी मोठा घेतला. काही पिढ्यांचा, शतकांचा घेतला, तर वरील विधान सत्य नाही, हे लक्षात येते.
ब्रिटिशांचे साम्राज्य जगभर पसरले होते. एका देशात सूर्य मावळला, तरी दुसर्या देशात जिथे कुठे उगवला असेल, तेथेही ब्रिटीशच राज्य करत. म्हणून म्हणत – ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा सूर्य कधीच मावळत नाही आणि मावळणारही नाही.
पण भारतीय देशभक्तांनी प्रचंड साम्राज्याला टक्कर दिली. भगतसिंगांच्यासारखे क्रांतिकारक फाशी गेले, सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेना उभारली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसात्मक सत्याग्रह झाले, लोकांनी लाठ्या खाल्ल्या, गोळ्या झेलल्या; पण ते हरले नाहीत. मुंबईच्या कामगारांनी बंड करणार्या नाविकांसाठी रस्त्यावर बॅरिकेट्स उभी केली आणि शेवटी ब्रिटिशांना हाकलून दिलेच! ब्रिटिशांचे राज्य, दडपशाही, पिळवणूक अशीच चालणार, हे खोटे ठरले.
एकेकाळी साथींच्या रोगात गावेच्या गावे नष्ट होत; पण लुई पाश्चरनी जंतूंचा शोध लावला. रेबीज रोगावर लस शोधली, हळूहळू अनेक आजारांवर लसी शोधण्यात आल्या आणि साथीचे रोग हद्दपार झाले. माणसांनी धरणं बांधली आणि पूर, महापूर, दुष्काळ यामध्येही तगून राहण्याचे मार्ग शोधले.
आठव्या वर्षांच्या आत मुलींची लग्ने होत. स्त्रिया आणि शूद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता; पण महात्मा फुलेंनी शाळा काढली, सावित्रीबाई शिक्षिका बनल्या आणि शेकडो वर्षे‘जे असंच चालत होतं’ ते बदललं! मुली शिकल्या, नोकरी – धंद्यात, राजकारणात, समाजकारणात पुरुषांच्या बरोबरीने पुढे आल्या. म्हणजेच ‘हे असंच चालायचं’ हे खरं नाही. कोणत्याच क्षेत्रात खरं नाही. जग बदलते, प्रयत्न केला, तर लवकर बदलते, इष्ट दिशेने बदलते, बदल हाच जगाचा नियम आहे आणि बदल हा विकासाच्या दिशेने होतो.
एकेकाळी टोळीने राहणारी माणसे राज्य करू लागली. राज्ये-साम्राज्ये निर्माण झाली; पण राजेशाही टिकली नाही. राजेशाही संपवून लोकशाही, म्हणजे आजची भांडवलशाही अवतरली. हा झाला बदल; पण तो विकासाच्याच दिशेने होतो. कितीही प्रयत्न केले, तरी हे चक्र उलटे फिरू शकत नाही.
ब्राह्मणी वर्चस्वाला सुुरूंग लागतोय, बहुजन सत्तेत येताहेत, म्हणून चिडलेल्या सनातन्यांनी महात्मा गांधींचा खून केला; पण समतेचा रथ अडला नाही. डॉ. दाभोलकरांचा खून केला, तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा थांबवता आला नाही; कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी यांचे खून पाडूनही समानतेच्या विचारांना पायबंद घालता आला नाही. तथाकथित ईश्वरी राज्याच्या नावाखाली वर्णवर्चस्व आणि मनुस्मृतीचे राज्य पुन्हा आणण्याचे मनसुबे प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.
लोकशाहीर अण्णा भाऊ म्हणतात – “जग बदल घालुनी घाव, गेले सांगुनी मला भीमराव!”
सर्वांच्या किमान गरजा भागवणारे समतेचे, सुखसमृद्धी आणि आनंदाचे, बंधुभावाचे जग शक्य आहे; त्यासाठी घाव घालण्याची तयारी मात्र हवी.
– अनिल चव्हाण, कोल्हापूर
मोबा. 9764147483