Categories
परिसंवाद

धर्मसत्ता, राज्यसत्ता आणि धर्मनिरपेक्षता

वार्षिकांक - २०१६

नुकत्याच एका समारंभात महाराष्ट्राचे सुविद्य मुख्यमंत्री असे म्हणाले की, धर्मसत्तेचे राजसत्तेवर नियंत्रण असले पाहिजे. यापूर्वी पंजाबचे अकाली दलाचे मुख्यमंत्री सुरजितसिंग बर्नाला पण असे म्हणाले होते. पण पंजाबात अकाली दलाची सत्ता शीख धर्मसत्तेतूनच उगम पावते. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या द्वारे त्यांनी ही सत्ता प्राप्त केली आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात अशी परिस्थिती नाही. अगदी मराठेशाहीतसुद्धा राज्यव्यवस्थेने धर्मसत्तेला प्रभावी होऊ दिले नाही. धर्मसत्ता व राजसत्ता यांच्यातील संघर्ष जुना असून धर्मसत्तेवर मात करीतच राज्यव्यवस्थेने समाजावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

जगात ख्रिश्चन, मुसलमान, हिंदू व बौद्ध हे चार महत्त्वाचे धर्म आहेत. यात धर्मसंस्थेची संघटित अशी चर्चच्या रुपाने सत्ता फक्त ख्रिश्चन धर्मात उभी राहिली. बाकी धर्मात अशी संघटना नाही. श्रीलंकेत बौद्ध भिक्खूंनी असे करण्याचा प्रयत्न केला. धर्मसत्तेचा प्रयत्न राजकारणात दखल घेण्याचा, राजकारणावर प्रभाव टाकण्याचा असतो; पण असे आहे की, धर्मसत्तेचा राजकारणावर प्रभाव नसला पाहिजे. धर्म व राजकारण यांच्यात संबंध का असू नये? या प्रश्नाचे उत्तर प्रथम शोधावे लागेल.

1) धर्मसंस्था माणूस व ईश्वर वा पारलौकिक जग यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. हे करत असताना ती स्वत:च्या संस्था व मालमत्ता निर्माण करते. त्यातून तिचे स्वत:चे असे भौतिक हितसंबंध निर्माण होतात. याउलट राजसत्ता ही भौतिक सत्ता असते आणि एक विशिष्ट भूप्रदेशात राहणार्‍या लोकांचे ऐहिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करते. धर्मसत्तेचे क्षेत्र पारलौकिक तर राजसत्तेचे ऐहिक आहे. धर्मसत्ता ज्यावेळी एक सत्ता म्हणून राजसत्तेशी संबंध ठेवू पाहते, त्यावेळी धर्मसत्ता राजसत्तेचा वापर आपली सत्ता वाढविण्यासाठी करीत असते. त्यामुळे अनिष्ट गोष्टी घडतात.

2) धर्मसत्ता राजसत्तेच्या अधिकाराचा वापर करून आपले ऐहिक बळ वाढविण्याचा प्रयत्न करते. त्यातून एक पर्यायी सत्ताकेंद्र बनायचे असते. धर्मसत्ता मुळात असहिष्णू असते व जे लोक त्यांचे विचार मान्य करणारे नसतात, त्यांना पाखंडी घोषित करून कठोर शिक्षा केली जाते.

3) धर्मसत्ता राजसत्तेवर प्रभाव टाकून तिला समाजातील अल्पसंख्याक धर्मगट व विरोधी धर्मगट यांच्या विरुद्ध कायदे करावयास लावून त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहावयास भाग पाडते. समाजात विग्रह निर्माण करते.

4) धर्मसत्ता विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध असते. तिच्या सत्तेला आव्हान देणे वा तिच्या मिथ्या विचारांना आव्हान देणारे कोणतीही मते व विचार तिला नको असतात. ती विवेक व विज्ञान यांच्याविरोधी असते. पृथ्वी गोल आहे, विज्ञानाने सिद्ध केले असले, तरी बायबल जर पृथ्वी सपाट आहे, असे म्हणत असेल, तर आपल्याला बायबलचे मतच मान्य केले पाहिजे, असे तिचे मत असते.

5) इतिहासाचा अनुभव आहे की, धर्मसत्तेच्या प्रभावाखाली वागणारा राज्यकर्ता वर्ण अनेक वेळा धर्मांध बनतो. तो धर्माच्या नावाने नवे संघर्ष निर्माण करतो आणि या संघर्षात लक्षावधी निरपराध माणसांचा बळी गेला आहे. अनेक सत्तालोभी राज्यकर्त्यांनी स्वत:ला ‘गाझी’ वा ‘धर्मयोद्धा’ समजून अनेक निरपराध लोकांच्या हत्या केल्या. युरोपात धर्मसुधारणेच्या चळवळीनंतर ख्रिश्चन धर्मातील प्रोटेस्टंट व कॅथॉलिक पंथांनी एकमेकांच्या हत्या केल्या. आज पाकिस्तानात सुन्नी अतिरेकी शिया मुसलमानांची हत्या करीत आहेत.

धर्मसत्ता व राजसत्ता यांच्यात फारकत असावी, असे आपण वरील पाच कारणांमुळे म्हणतो.

मध्ययुगात युरोपच्या इतिहासात हा संघर्ष निर्माण झाला. ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ख्रिस्त असे म्हणाले होते की, “ज्या गोष्टी राजाला द्यायच्या आहेत, त्या राजाला दे आणि ज्या गोष्टी देवाला द्यायच्या आहेत, त्या देवाला दे.” येशूने या ठिकाणी पारलौकिक व ऐहिक जीवनातील कर्तव्याचे योग्य प्रकारे विभाजन केले होते. पण रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर सेंट ऑगस्टिनने देवाच्या राज्याच्या कल्पना मांडल्या आणि चर्चने आपल्या संस्थात्मक रूप धारण करून आपला प्रभाव वाढवला. पीटर व टरमिट या धर्मगुरूने ख्रिस्ताची जन्मभूमीची पॅलेस्टाईन मुक्तीची हाक दिली आणि त्यानंतर रक्तलांछित अशा क्रूसेड्सला सुरुवात झाली. या ख्रिश्चन व मुस्लिमांच्या धर्मयुद्धात लक्षावधी माणसे मारली गेली. इ.स. 1453 साली मुस्लिम राजाने कॉन्टॅटटिनोपल घेतली आणि या धर्मयुद्धाचा अंत झाला.

या पराभवानंतर युरोपात पुनरुज्जीवनवादाचे व नवजागृतीचे धर्मसुधारणेचे युग सुरू झाले. धर्मश्रद्धेच्या चिकित्सेला व नव्या राज्यांच्या उदयाला सुरुवात झाली. राष्ट्रीय अस्मितेचा व प्रादेशिक भाषाचा उदय झाला. मार्टिन ल्युथरने नव्या धर्मपंथाची स्थापना केली. झॅकियावलीने आपल्या ‘प्रिन्स’ या ग्रंथात नव्या सार्वभौम, स्वायत्त व स्वतंत्र राजव्यवस्थेची मांडणी केली. सरंजामदार व धर्मगुरू यांनी निर्माण केलेले अराजक मोडून काढून नवे एकात्मक कार्यक्षम व विशिष्ट उद्देशाने प्रेरित राज्य निर्माण करणे आवश्यक आहे, असे त्याचे मत होते.

या काळात धर्मश्रद्धेची बुद्धीच्या निकषावर चिकित्सा सुरू झाली. हॉब्ज, डेकार्ट, बेकन, ह्यूम, रूसो या विचारवंतांनी ही चिकित्सा सुरू केली व त्यामुळे जुन्या बुद्धिवादविरोधी विचारांना आव्हान मिळाले. राजाच्या सार्वभौम सत्तेला मान्यता मिळाली. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल यासारख्या स्वतंत्र प्रादेशिक अस्मिता असणारी राज्ये निर्माण झाली. आधुनिक विचारांचा जन्म झाला. विवेकाचा आवाज ऐकू येऊ लागला.

याच काळात सेक्युलॅरिझम वा धर्मनिरपेक्षतावादाचा उदय झाला. ‘सेक्युलर’ या शब्दाचा अर्थ आहे, ‘ऐहिक’ मानवी जीवनातील कला, साहित्य, राजकारण, समाजकारण या क्षेत्रातील पारलौकिक वा धार्मिक विचारांचा प्रभाव कमी करून त्यास ऐहिक अधिष्ठान प्रदान करणे. ऐहिक जीवनातील प्रश्नांच्या संदर्भात त्यांची मांडणी करणे म्हणजे सेक्युलॅरिझम होय. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेचा अर्थ जीवनातील सर्वच क्षेत्रातून धर्माचा पारलौकिकाचा प्रभाव कमी करणे हा असतो. समाजात विज्ञान व विवेक यांची जसजशी वाढ होत जाईल, तसतसा पारलौकिकाचा प्रभाव कमी होईल. ऐहिक जीवनात निर्माण झालेले प्रश्न विज्ञानाचा व विवेकाच्या सहाय्याने सोडवण्यावर माणसाचा भर राहील. माणसाचे कावीळ व सर्पदंशासारखे आजार मंत्राने दूर होत नाहीत, तर शास्त्रांच्या पद्धतीने तयार केलेली औषधे घेतल्यानेच हे आजार दूर होतात.

जीवनातील इतर व्यवहाराप्रमाणेच राजकारणातही धर्मनिरपेक्षतेची गरज आहे. कारण राजकारणात धर्माचा वापर समाजात वैमनस्य निर्माण करतो. कारण धर्मश्रद्धा ही सार्वजनिक जीवनात आचरण्याची गोष्ट नसून ती व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाचा भाग असतो. धर्मश्रद्ध माणूस ईश्वराची पूजा व स्मरण स्वत:च्या आंतरिक समाधानासाठी करत असतो. श्रद्धेचे हे क्षेत्र त्याच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित असते. या क्षेत्रात तो स्वायत्त व स्वतंत्र असतो आणि त्याचे हे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणार्‍यांना मान्य असते.

वादाचा प्रश्न त्यावेळी तयार होतो, ज्यावेळी धर्माचा वापर करून हितसंबंधी गट समाजात संघर्ष निर्माण करतात व त्याद्वारे राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करतात. धर्मसत्तेस व राजसत्तेचा लोभ वाटू लागतो. युरोपमध्ये अनेक धर्मगुरूंनी बळाचा वापर करत अनेकांना ठार मारले. इंक्विझेशनसारखे खटले चालवले, शिक्षा दिल्या. लोकांकडून कर वसूल केले. आपणच राजकीय सत्तेमागचे अधिष्ठान आहोत, असे त्याचे मत होते. हळूहळू राज्यसत्तेने धर्मसत्तेचे जोखड फेकून दिले. या स्वतंत्र वृत्तीच्या राजांनी आपली मते अशी मांडली.

1) एका विशिष्ट भूभागात राहणार्‍या लोकांवर राजाची सत्ता अंतिम असते. इतर सर्व सत्ता राजसत्तेच्या आधीन आहेत. 2) धर्मगुरूंना राजाच्या मान्यतेशिवाय नागरिकास शिक्षा देता येणार नाही. 3) कोणतेही धर्मविषयक कर राजाला लागू नाहीत. 4) राजाला देवाने राज्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. यात धर्मगुरूची भूमिका पोस्टमनची आहे.

प्रबोधनाच्या काळात राज्ये स्वतंत्र व सार्वभौम झाली आणि त्यांनी धर्मसत्तेचे वर्चस्व झुगारून दिले. कारण धर्मसत्तेने राजकारणात लुडबूड करण्याचे कारण नव्हते. कारण त्यास राजकारणाचे स्वरूप माहीत नाही. राजकीय उद्दिष्टे ही ऐहिक असतात. राज्यसत्ता समाजात ऐक्य निर्माण करण्याचा, धर्मनिरपेक्ष नागरिकत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते. धर्मसत्ता त्यात अडथळे निर्माण करते. कारण धर्मसत्ता आपले आर्थिक हितसंबंध जपण्याचा, आपले राजकीय हितसंबंध जपण्याचा प्रयत्न करते. आधुनिक राज्याचा उद्देश राज्यघटना व कायदा यांच्या सहाय्याने नागरिकांचे सार्वजनिक जीवन संवर्धित करण्याचा असतो. युरोपमधील अनेक देशांमध्ये आता धर्मनिरपेक्ष राज्ये निर्माण झाली आहेत. तीन शतकांच्या संघर्षातून हे यश प्राप्त झाले आहे.

धर्माचा व धर्मसत्तेचा प्रभाव अजून इस्लामी व आशियाई देशामध्ये आहे. श्रीलंकेत बौद्ध धर्मगुरूंच्या हस्तक्षेपामुळे व अतिरेकी भूमिकेमुळे वांशिक प्रश्न वाढीला लागले. पाकिस्तानात मुल्ला-मौलवीचा वाढता प्रभाव हिंसक राजकारण व दहशतवाद यांना जन्म देणारा ठरला. धर्मगुरू तेथे सर्व सुधारणांना विरोध करतात. भारतात रामजन्मभूमी आंदोलन किती हिंसक व फूट पाडणारे ठरले, हे आपण पाहिलेच आहे. इस्लामी स्टेट्स या राजवटीचे अत्याचार अत्यंत भयंकर स्वरुपाचे आहेत.

धर्मसत्ता राजकारणात भाग घेते, त्यावेळी तो मुळातच प्रतिगामी व ऐक्य विनाशक असते. राजकारणावर तिचा प्रभाव जसजसा वाढतो, तसतशी राज्याची धोरणे प्रतिगामी व स्त्री हक्कविरोधक बनतात. त्यामुळे समाजात संघर्ष वाढतात. आप-परभाव निर्माण होतो. राजसत्तेला मार्गदर्शन करण्यासाठी आवश्यक असे इतर विशेषज्ञान धर्मसत्तेजवळ नसते. पण राजकारणात ढवळाढवळ करून त्यात आपला प्रभाव धर्मसत्तेला वाढवायचा असतो. या प्रभावाच्या सहाय्याने अधिकाधिक भौतिक साधने प्राप्त करतात येतात. त्यामुळे धर्मसत्ता राजसत्तेस नियंत्रित करू शकत नाही. गेली 35 वर्षे इराणात हा प्रयोग चालू असून त्याचे विघटित परिणाम तेथे झाले आहेत. हे उदाहरण ध्यानात घेता थोडक्यात म्हणजे जगातील सर्वच राज्यांची वाटचाल ही धर्माच्या प्रभावातून मोकळे होण्याची आहे, हे महाराष्ट्राच्या नेतृत्वाने लक्षात घ्यावे.

प्रा. अशोक चौसाळकर