सामान्यांच्या दृष्टिकोनातून धर्मसत्ता व राज्यसत्ता दोन्हीचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे आहे. विशेषतः असंख्य जाती-जमाती-पंथ-धर्मांनी गजबजलेला, प्रचंड कालखंडातून संक्रमित झालेला, अनेक राज्यसत्ता व धर्मसत्ता अनुभवलेला भारतीय समाज लक्षात घेता हे स्पष्टीकरण आवश्यक ठरते. त्यात या दोन्ही सत्ता एकमेकांत इतक्या मिसळून गेलेल्या की, त्यांचे स्वरूप काही वेगळे असू शकते, हा विचार आधुनिक लोकशाहीनंतरच आत्ता कुठे सामोरा आला आहे, असे वाटू लागते.
सत्ता अनेक व्यवस्था करीत-करीत अखेर काय स्वरूप धारण करते? हळूहळू सत्ताधारी स्वत:च्या इच्छा इतरांच्या इच्छा-अनिच्छेचा विचार न करता त्यांच्यावर लादत राहतो. लोकशाही व्यवस्थेत हे होऊ नये, असे अध्याहृत असते; पण मानसिक गुलामगिरीलाच सुख मानणार्या, दैववादी नागरिकांची लोकशाही इतकी निरोगी राहू शकत नाही. सत्ता घरातील असो वा सार्वजनिक जीवनातील; निरंकुश सत्तेचे रूपांतर हुकुमशाहीत होत जाते.
अंकुश हवा असतो, पण तो विवेकाचा. आपल्या लोकशाहीत असा अंकुश संविधानाचा आहे व तो पुरेसा आहे. तो विवेकी राज्यसत्तेला टोचावा लागतही नाही. हा विवेक बोकाळलेल्या नीतिभ्रष्ट, हिंसक धर्मसत्तेचा असेल तर तो लोकशाहीला धोकादायक ठरेल, ही भीती मात्र सर्व सुजाण नागरिकांना निश्चित आहे.
धर्मसत्तेचे आकर्षण जनतेला का असते ? धर्म सत्तेबद्दल लोकांची काय कल्पना आहे ? अशी कल्पना कोणी करून दिली? ती अद्याप का टिकून आहे ?
राज्यसत्तेचे स्वरूप अधिक सहजतेने समजून घेता येते. हा राजा अन् ती प्रजा हे लगेच कळते. राजसत्तेची निर्मिती लोकांनीच केली असल्याने ती धर्मसत्तेच्या तुलनेत सोपी वाटते. राजाची कामे, त्याचे अधिकार, त्याची प्रजेप्रती जबाबदारी, राजसत्तेची मर्यादा व तिचे आधार समजून घेता येतात. त्यात हाच राजा का, अशा वेडगळ प्रश्नांना थारा नसतो. प्रजेच्या मनावर दैनंदिन जीवनाच्या व्यवस्थेपलिकडे राजसत्तेचा अधिक पगडा नसतो. राजावर प्रेम करणे वा मनात त्याचा राग/द्वेष करणे अशक्य नसते. अडचणीत त्याने प्रजेच्या मदतीस धावून येणे अपेक्षित वा सक्तीचे असते.
बर्याच अंशी राजसत्तेचे स्वरूप समजून घेणे सामान्यास सोपे जाते. त्यामुळे विचारी माणसास राजाला मनातल्या मनात तरी प्रश्न विचारण्याची सोय असते. अशी शंका घेणे वा असा प्रश्न मनात विचारणे गुन्हा, पाप ठरत नाही, अनाकलनीय भीती वा न्यूनगंड देत नाही. राजसत्ता वास्तवाकडून भविष्यातील स्वप्नांकडे नेत राहते. विज्ञान ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेत असते. धर्मसत्ता अज्ञानाकडून अधिक अज्ञाताकडे नेट राहते. खरे तर क्लिष्ट वाटावा, असा हा प्रवास चिकित्सा नाकारल्याने सर्वसामान्य जनतेला विशेष मानसिक त्रास देत नाही.
मात्र धर्मसत्तेची व्याप्ती, तिचे अनुयायांच्या मनावरील अधिराज्य, तिच्या मर्यादा समजून घेणे सोपे नसते. समाजातील उतरंड, विषमता, अन्याय सहन होईनासा झाला की, अनेक पंथ, नवे धर्म उदयास आलेले आपण पाहतो. समष्टी जितकी अधिकाधिक गुंतागुंतीची बनत जाते, तितका सामान्य माणूस हवालदिल, अस्वस्थ होत जातो. भौतिकातील समस्यांना दैविक उत्तरे शोधू लागतो. मग तो धार्मिक आधाराकडे, दैविक आश्वासनाकडे धाव घेतो.
धर्म मुळात आपापसातील भेदाभेदांना समजून घेऊन त्यास सर्वांना उमजेल असे नाव देण्याचा प्रयत्न असतो. जन्म मृत्यूची अनिश्चितता, जीवनाचा अर्थ, मृत्यूनंतरच्या अस्तित्व-रहस्याचा शोध असतो, अज्ञाताच्या प्रदेशातील तो एक प्रवास असतो. मात्र विज्ञानासारखा तो सर्वस्पर्शी व विधायक नसतो. माणसातील भेद कमी करण्याऐवजी असे भेदाभेद तो वाढवीत राहतो.
त्यामुळे धर्माची सामान्यांच्या मनावरील सत्ता एक अगम्य, क्लिष्ट, रहस्यमय, गूढ कोडे ठरते. हे स्वरूपच तिला आपोआप राजसत्तेपेक्षा श्रेष्ठत्व बहाल करते. धर्मसत्तेची पारलौकिक सुखाची आश्वासने राजसत्तेच्या भौतिक सुखापेक्षा जास्त मोहक, अर्थपूर्ण, हवीहवीशी, शक्यतेतील व कमी कष्टदायक/सुसह्य वाटतात. वास्तवाच्या कसोटीवर राजसत्तेची आश्वासने उतरत नाहीत, म्हणून ती खोटी असल्याचे लक्षात येऊ शकते. पण धर्मसत्तेची पारलौकिक आश्वासने तपासण्याची कुठलीच सोय नसल्याने (व अशी तपासणी मुळात धर्मद्रोही/देवद्रोही वाटल्याने) ती खोटी असावीत, असे वाटत नाही, तसे वाटून चालत नाही. दृश्यापेक्षा अदृश्य येथे वास्तव वाटते, कारण डोळसपणाला, चिकित्सेला येथे मान्यता नसते.
आयुष्याभोवताली घोटाळणारी निरर्थकता माणसाला धर्मसत्तेचे उत्सुक गुलाम बनविते. ही गुलामी सुखदायी असते, जगण्याचा न्यूनगंड सहन करायला शिकविते, कर्मकांडाद्वारे पापक्षालनाची सोय करून देते. जीवनावर नियंत्रण मिळविल्याचा भ्रम मनाला सुखवितो.
धर्मसत्ता अशाप्रकारे माणसाच्या जाणीव-नेणिवेवर पकड मिळविते. धर्म हा माणसाचा अदृश्य राज्यकर्ता होताच, आता त्याचे स्वरूप अधिक दृश्य स्वरुपात दैनंदिन जीवनात उतरत आहे कारण वास्तव अधिकाधिक अनिश्चित, अस्थिर व धोकादायक होत चालले आहे. माणूस जितका वेगवेगळ्या भेदामध्ये विखंडित होईल तितके त्याच्यावर सत्ता गाजविणे राज्यकर्त्यांना सोपे जाईल हे उघडच आहे.
साधू-संतांचा मनावरील विवेकी प्रभाव वेगळा व आजकालच्या साध्वी-महंत-बाबा-बापू-मातांची अविवेकी धर्मसत्ता भलतीच वेगळी !! धर्मसत्तेकडे तटस्थ न्याय-नीती-विवेकी नजरेने पाहणे न जमल्याने धर्मसत्तेचा अविवेकी अराजक बेकायदेशीर व्यवहार सामान्य माणसांच्या लक्षात येत नाहीत, लक्षात आले तरी मान्य करता येत नाहीत.
सर्वत्र धर्मसत्ता व राजसत्ता एकमेकांच्या आधाराने सत्ता चालवीत असतात. त्यात धर्मसत्तेचे प्रभावी, संमोहनी स्वरूप अधिक फायदेशीर ठरत असल्याने हा स्वत:ला कधीच न टोचणारा (व सर्वसामान्यांना सतत टोचणारा) अंकुश, धर्माचे अधिष्ठान मानणार्या राजसत्तेला हवा असतो. काळ्या राजकारणाला धार्मिक मुलामा सफेदी मारत राहतो. हा अंकुश त्यांच्या स्वार्थी, भ्रष्टाचारी राजकारणाला बाधक ठरणार नसतोच, उलट त्या सर्व अनैतिक, अधार्मिक व्यवहारांना तात्पुरते एक तद्दन खोटे पावित्र्य मिळवून देतो. राजसत्तेचे अपयश पवित्र धार्मिक पदराखाली झाकता येते. धर्माचा अनुनय केला की जनता अपराध माफ करते. राजसत्तेचे व्यवस्थापनातील दोष देव-प्रकोप, नशिबाचा खेळ, अशुभ काळ अशा अनेक शीर्षकाखाली लपविता येतात.
धर्मसत्तेच्या आधाराने, उच्चवर्गीय, उच्च कुलोत्पन्नीय वर्गाला तथाकथित नीच कुलोत्पन्नीय अपवित्र वर्गाच्या संपत्तीवर, त्याच्या जमीन, पाणी, अन्न, व्यवसाय, मानवाधिकार यावर आक्रमण करता येते. हे आक्रमण परमेश्वरी इच्छेनुसार न्यायानुसार असल्याची ग्वाही धर्मसत्ता देत राहते.
असे एकमेकांना वापरणे हजारो वर्षे जगभर चालू आहे. आपण राजा निर्माण केला, त्याला मोठा केला हे पूर्वीचे लोक विसरले, आधुनिक लोकशाहीतील नागरिकही हे विसरून, लोकप्रतिनिधीला राजा समजतात व आपल्या जीवनावरील सर्वाधिकार बहाल करतात. सोयीचे राजकारण म्हणून धर्मसत्तादेखील अशा लोकप्रतिनिधीना विशेष आशीर्वाद वेळोवेळी (विशेषतः निवडणुकीवेळी) देत राहतात. अवैज्ञानिक, असंवैधानिक विचारसरणीला असे धर्मकारण-राजकारण सोयीचे ठरते.
अधर्मालाच धर्माचा आधार वेळोवेळी मिळावा यापेक्षा अधिक विसंगत काय असू शकते?? किंवा असेही म्हणता येईल की, अधर्माला अधर्माचा आधार मिळावा, यात विसंगत असे काय आहे? फक्त अशा आधाराला अंकुश म्हटले का झाले !!