Categories
बालविभाग

सगुण्या

वार्षिकांक - २०१६

कालच्या घटनेमुळे मी नेहमीपेक्षा थोडा जास्तच आनंदी होतो. त्या आनंदाच्या धुंदीतच मी सहावीच्या वर्गात प्रवेश केला. वर्गातला गलका माझ्या प्रवेशाने काहीसा कमी झाला.

“गुडमॉर्निंग सर.”

“गुडमॉर्निंग क्लास, अँड काँग्रॅच्युलेशन्स. तुम्ही काल गायकवाड साहेबांच्या समोर जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, त्याचे सर्वांकडून खूप कौतुक होत आहे. तुमच्या वाचन-लेखन, गणित आणि पाठांतर यापेक्षा तुमच्यामध्ये तयार झालेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे साहेबांनी विशेष कौतुक केले.”

“आणि सर ते आपल्या सरबताचं ‘सिक्रेट’ साहेबांना सांगितलात की नाही?” श्रेयस्ने मध्येच उत्सुकतेने प्रश्न केला.

“होय तर! साहेबांना तुम्ही जे सरबत करून दिले होते, ते उतारा टाकलेल्या लिंबाचे होते,” हे सांगितल्यावर ते मोठ्याने हसू लागले; पण त्यांच्यासोबत आलेल्या शिपायाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता.

“बरं, आणखी एक गोष्ट…. झिंगरी समोर ये पाहू.”

“… बालमित्रांनो, या झिंगरीसाठी जोरदार टाळ्या. तिने अंगात येणार्‍या बाईचे सोंग दाखविले होते, त्याला गायकवाड साहेबांनी शंभर रुपयांचे बक्षीसही दिले आहे.”

सर्व मुलांनी टाळ्यांचा गजर केला; पण झिंगरीच्या डोळ्यात मात्र पाणी आले.

“झिंगरी, बाळ काय झालं? तब्येत बरी नाही का?” माझ्या या प्रश्नाने झिंगरी हुंदके देऊन रडू लागली.

सर्वच वर्ग यामुळे स्तब्ध झाला.

झिंगरीच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आधार दिला.

“सर…. सगुण्या….!” असे म्हणून ती पुन्हा रडू लागली.

“झिंगरी शांत हो पाहू. काय झालं ते न घाबरता सांग.”

“सर सगुण्याला बरं नव्हतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. काल संध्याकाळी त्यो तापानं फणफणायला लागला, म्हणून त्याच्या आईनं त्याला परसू मांत्रिकाकडं नेलं. मी त्याच्या आईला सांगत होतो, सगुण्याला डॉक्टरकडं घेऊन जा. पण काकूनं माझं ऐकले नाही…..” झिंगरी पुन्हा ओक्साबोक्सी रडू लागली. झिंगरीला आधार देत मी पुन्हा बोलतं केलं.

“सर, परसू मांत्रिकानं सांगितलं की, सगुण्याच्या अंगात याच्या मेलेल्या बाचं भूत शिरलंय, त्याला काढल्याशिवाय सगुण्याचा ताप निवणार नाही. सगुण्याच्या आईनं परसू मांत्रिकाचं लगेच ऐकलं आणि परसू मागल तसला निवद भुताला द्यायला तयार झाली.”

रात्री सगुण्याला परसूच्या देवळात ठेवून त्याची आई घरला परतली आणि आज सकाळी….. सगुण्या इव्हळत, इव्हळत त्येच्या घराकडं आला. परसू मांत्रिकानं त्याला मारून मारून अर्धमेला केला आहे. दुपारी बारा वाजता सगुण्याची आई निवद घेऊन परसूकडं जाणार आहे. सर, सगुण्याला दवाखान्याला नेलं नाही, तर…….” झिंगरी पुन्हा सगुण्याच्या काळजीनं हुंदके देऊन रडू लागली. तिला आपल्या चुलत भावाच्या जीवाची काळजी लागली होती.

झिंगरीला थोडं पाणी प्यायला देऊन तिला सोबत घेऊन मी सरळ ऑफीस गाठलं. जकाते सरांना झाला प्रकार सांगितला. सरांनीही एकूणच प्रकाराचं गांभीर्य ओळखलं.

“कुंभार सर, आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. झिंगरीला घेऊन आपण सगुण्याच्या घरी जाऊ आणि शक्य असल्यास स्वामी सरांनाही फोन करून बोलवून घ्या.”

मी लगेच स्वामी सरांना फोन लावून घडलेला किस्सा सांगितला. स्वामी सरांना आग्रह करण्याची गरजच निर्माण झाली नाही. त्यांनी स्वत: विनायक काकांना सोबत घेऊन येत असल्याचे सांगितले.

शाळेपासून सगुण्याची वस्ती दोन-अडीच किलोमीटर अंतरावर होती. ‘भंगार गोळा करणार्‍यांची वस्ती’ म्हणूनच लोक या वस्तीला ओळखत होते. सगुण्याचं घर…. घर कसलं…? लाकूड-पत्रे, पोती यांनी उभी केलेली भिंत आणि छप्पर…. नावाचंच घर! दारिद्य्रानं आणि व्यसनानं गांजलेलं सगुण्याचं कुटुंब! सहा महिन्यांपूर्वीच सगुण्याचा वडील दारूच्या धुंदीत आत्महत्या करून मेला, आई दिवसभर भंगार गोळा करायची आणि कसंतरी मायलेकराचं पोट भरायचं. या वस्तीचं अज्ञान आणि अंधश्रद्धेचं ग्रहण कधी सुटलेलं नाही. परसू मांत्रिकासारखी माणसं मात्र या अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या भांडवलावर आपला धंदा जोरात करत आहेत.

सगुण्या….! शिक्षणाची आणि त्यातही मी शिकवणार्‍या विज्ञानाची प्रचंड आवड असणारा माझा विद्यार्थी. विद्यार्थी कसला! त्याच्या प्रश्नांनी आणि चिकित्सक बुद्धीने तो आमच्या शाळेचा ‘न्यूटन’ म्हणूनच ओळखला जातो. त्याच्या डोक्यातील चमक आणि आत्मविश्वास सर्व शिक्षकांच्या कौतुकाचा विषय असतो.

“झिंगरी, हेच काय सगुण्याचं घर?”

जकाते सरांच्या प्रश्नानं माझं विचारचक्र थांबलं.

“सर हे नव्हं, त्या समोरच्या झाडाजवळचं त्याचं घर!”

एवढ्यात मला स्वामी सरांचा फोन आला. मी त्यांना वडाच्या झाडाजवळ यायला सांगितले.

“विनायक काका, नमस्कार. स्वामी सरांच्या सोबत तुम्हीही आलात, ते खूप चांगले झाले. तुम्हीच काही गोष्टी अधिकारवाणीने सांगू शकता.”

आम्ही सर्वजण सगुण्याच्या घराजवळ गेलो. झिंगरी अगोदरच आत पोचली होती. सगुण्या आम्हाला बघून अंथरुणातून उठून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करत होता; पण त्याला आमच्यापर्यंत येण्याचेही बळ उरले नव्हते.

सगुण्याच्या अंगावर काठीचे वळ स्पष्ट दिसत होते. त्याचा चेहराही निस्तेज झाला होता. डोळे तारवटले होते; पण आम्हाला पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी ओघळले. मी त्याच्या अंगाला अलगद हात लावला. त्याचे अंग भाजत होते.

“सर मी शेवटपर्यंत त्या मांत्रिकाचं ऐकलं नाही आणि हार पण मानली नाही. तुझं भुता-खेताचं थोतांड बंद कर, असं मी त्याला निक्षून सांगितलं…. पण सर मला दोरीनं बांधल्यामुळे मला काही करता आलं नाही. माझ्या बोलण्यामुळे तो अधिकच चवताळून मला मारत होता. शेवटी तो दमला आणि सकाळी मला सोडून दिलं…”

एवढ्यात सगुण्याची बाहेर गेलेली आई तेथे आली. “आरं सगुण्या, तुझ्या असल्या गुणानंच तुझ्या अंगातलं तुझ्या बाचं भूत निघंना. परसू-मांत्रिकाला उलटं बोलायपर्यंत तुझी मजल गेली व्हय?”

मला राहवलं नाही. माझ्या डोळ्यातही सगुण्याच्या निर्धारानं आणि त्याच्या आईच्या अज्ञानानं अश्रू जमा झाले.

“ताई, अशा विचारानं पोराचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. सगुण्याचा वडील भूत होऊन कसा येईल? तसं असतं, तर प्रत्येकाचे आई-वडील, नातेवाईक भुतं होऊन आपल्या घरी राहायला आले नसते का? आणि सगुण्याला ताप आलाय. त्याच्यावर परसू मांत्रिक काय इलाज करणार? तुमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन हे लोक तुम्हाला लुटत आहेत. पण यातून सगुण्याचं काय बरं-वाईट….?”

“नको सरांनु, असं काय बोलू नका. सगुण्याच माझा आधार हाय, मला त्याचीच काळजी वाटतीया.”

विनायक काकाही थोडे भावगंभीर झाले.

“हे बघ, तू मला पोरीसारखी आहेस. सगुण्या मला नातवासारखा आहे. त्या अधिकारानं तुला सांगतो. हे मांत्रिकाचं खूळ डोक्यातून काढून टाक. फार तर तुझ्यासमोर हात जोडतो, सगुण्याला आपण दवाखान्याला घेऊन जाऊ या.”

काकांच्या या भावनिक आवाहनाने आणि समजावणीने सगुण्याच्या आईचे अंधश्रद्धेचे आणि अज्ञानाचे अंधारजाळे नष्ट झाले होते. जकातेसरांनी सगुण्याला गाडीवर घेतले. आम्ही सर्वजण दवाखान्याच्या दिशेने निघालो.

सर्वांच्याच मानत आपण सगुण्याला…. छे! छे! आमच्या शाळेच्या न्यूटनला वाचवल्याचे समाधान जाणवत होते.

देवदत्त नारायण कुंभार, कोरोची

मोबा. 9763177955