सामान्य जनांविषयीची कळकळ तुकोबा व्यक्त करून गेले. काही वर्षांपूर्वी एक पुस्तक वाचताना एका ग्रीक दंतकथेत वर्णिलेला ‘प्रॉमिथिअस’ नावाचा दिव्य पुरुष भेटला होता. हा ‘प्रॉमिथिअस’ सदैव समाजाच्या विकासाची चिंता करणारा होता. स्वत: वेदना सहन करून समाजाची काळजी वाहणारा होता. दंतकथा असेही म्हणते की, समाजाच्या हितासाठी स्वर्गातील देवांचाही विरोध पत्करून त्याने स्वर्गातून अग्नि आणला आणि तेव्हापासून संस्कृतीचा विकास सुरू झाला. असा अग्नि आणला म्हणून त्याला साखळदंडांनी जेरबंद केले गेले. जेरबंद असलेल्या प्रॉमिथिअसचे गरूड लचके तोडायचे; पण त्या तोडलेल्या लचक्यांचे रात्रीत पुनरुज्जीवन व्हायचे. थोडक्यात काय, तर ‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती’ हा मतितार्थ.
20 ऑगस्ट 2013 ला डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली आणि त्यांच्याबरोबर मला व्यतीत करायला मिळालेला काळ भिजून गेला. माझ्यासारख्या अतिसामान्य आयुष्य जगणार्या अतिसामान्य माणसाच्या आयुष्यातला तो काळ म्हणजे एक सुवर्णकाळ. स्वत:च्याच स्वार्थी कोषात वावरण्याची सवय असणार्या माझ्यासारख्याला डॉ. दाभोलकर एक ‘प्रॉमिथिअस’ वाटून गेले, त्यात नवल ते काय.
एकदा असेच त्यांच्याबरोबर बोलताना त्यांच्यावर सनातन्यांनी घातलेल्या 13-14 केसेसचा विषय निघाला. त्यातील काही केसेस गोवा कोर्टात; तर काही मुंबईच्या कोर्टात दाखल केलेल्या होत्या. याविषयी बोलत असताना, ते सहज बोलून गेले की, काही तांत्रिक बाबींवर मला शिक्षा झाली, तरी आनंदाने भोगेन. हे सांगताना त्यांच्या चेहर्यावर व बोलण्यात भीती, चिंता, निराशा किंवा राग, संताप यापैकी कशाचाही लवलेश नव्हता. मी अनेक वेळा त्यांना ‘साधना’ साप्ताहिकाच्या कार्यालयात भेटण्यास जात असे. ‘साधना’च्या जुन्या जागेत एका लहानशा खोलीत ते बसत असत.
अंधार्या वाटणार्या त्या खोलीत उन्हाळ्यात अक्षरश: घामाच्या धारा लागत. मी एकदा सहज त्यांना म्हटलं की, तुम्ही संपादक आहात, या खोलीसाठी एसी का नाही बसवून घेत? त्यांनी त्यांच्या ‘अनफॅशनेबल’ अशा चष्म्यातून माझ्याकडे रोखून बघितले आणि म्हणाले, ‘तुम्हाला कळतं का, की एक एसी किती शेतीपंपांची वीज खेचतो ते.’
असे एक ना अनेक, किती तरी विचार मनात रुंजी घालत राहतात.
साधारण सात-आठ वर्षांपूर्वी डॉक्टर ‘जादूटोणाविरोधी कायद्या’ची माहिती देण्यासाठी आख्खा महाराष्ट्र पालथा घालत होते. गावोगाव, खेडी, शहरे, तालुके, जिल्हे सगळीकडे पायाला भिंगरी लागल्यासारखे फिरत होते. सारा प्रवास एसटीने नाही, तर रेल्वेच्या दुसर्या वर्गाने. रात्री-अपरात्री अथकपणे प्रवास करत राहिले. लोकांपुढे भूमिका मांडत राहिले. वर्तमानपत्रांतून त्यांंच्या सभा उधळल्याच्या, त्यांना धक्काबुक्की केल्याच्या बातम्या यायच्या. मी त्यांना एकदा म्हटले की, ‘डॉक्टर, कशासाठी एकटे लढत आहात? समाजातले सारे सो कॉल्ड तत्त्वज्ञ, बुद्धिवंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, विद्वान, प्राचार्य, प्राध्यापक, साहित्यिक, कुलगुरू तोंडाला कुलूप लावून बसलेत. कशासाठी एकट्याने लढायचे? ते नेहमीप्रमाणे हसले. म्हणाले, ‘चालायचंच.’ हे म्हणताना त्यांच्या चेहर्यावर इतकीशी पण निराशा नव्हती, राग नव्हता आणि हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला ठळकपणे जाणवत राहिले.
डॉक्टरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर मनापासून प्रेम केले. महाराष्ट्रातल्या शेकडो कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना डॉक्टर नावानिशी ओळखत. नेहमीची, राज्य कार्यकारिणी असो, शिबीर किंवा तत्सम काही कार्यक्रम असो, डॉक्टर नेहमी शेवटी जेवत असत. सर्व कार्यकर्ते, जेवण बनवणारी मंडळी या सर्वांना पुरेसे आहे की नाही, याचा अंदाज घेऊनच मग स्वत:चे ताट घ्यायचे, हे ठरलेले होते.
माझ्यासाठी एक आठवण खूपच हळवी आहे. माझ्या मुलीचे लग्न त्यांच्या हातून व्हावे म्हणून त्यांना विनंती केली. त्यांनी पण आनंदाने हो म्हटलं. 19 डिसेंबरला सकाळी अकरा वाजता सत्यशोधक पद्धतीने लग्न होते. 18 तारखेला डॉक्टर पुण्यात होते. रात्री आठ-नऊ वाजता त्यांचे वडीलबंधू गेल्याचा त्यांना फोन आला. रात्री डॉक्टर सातार्याला रवाना झाले. पहाटेपर्यंत सर्व आटोपून डॉक्टर पुण्याला निघाले. मला वाटत होते की, डॉक्टर आता येणार नाहीत. पण सकाळी डॉक्टर दहाला कार्यालयात हजर होते. कोण मी हा पाखले? ते मला सहज कळवू शकले असते की, नाही येऊ शकत. खूप वर्षे झाली, मी कोणाला नमस्कार करत नाही; पण त्या दिवशी मी व माझी पत्नी त्यांच्या पाया पडलो. त्यांना म्हटलं, ‘डॉक्टर, तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही हो.’ यावर त्यांनी खांद्यावर थोपटले आणि प्रसन्न हसले.
खरंच, त्यांच्या व्यक्तिगत गरजा अगदी मर्यादित होत्या. चार कपडे, साध्या चपला आणि पुस्तके. बस्स. सत्ता, संपत्ती, प्रॉपर्टी, जमीनजुमला, घरदार, चैनीच्या वस्तू, कशाकशाची त्यांना गरज नव्हती. मला नेहमी वाटत राहते की, मी गांधींना बघितले नाही; पण गांधी ‘जगलेला’ माणूस मी बघितला. (शेवटी-शेवटी ते म्हणत असत, मला गांधी पुन्हा समजून घ्यायचे आहेत.)
त्यांच्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, की माझ्या कामाचे मूल्यमापन ते दशकांच्या नव्हे, तर शतकांच्या काळाच्या संदर्भात व्हायला हवे. कारण या प्रवाहाविरुद्ध असलेल्या कामाला अंतच नाही. मला परत गांधीजी आठवतात. एकदा गांधीजींबद्दल डॉ. राम लोहिया म्हणाले होते –
‘गांधीजींचा विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा त्यांची विशिष्ट प्रतिमा मन:पटलावर आकार घेते. एका निश्चित दिशेने वरवर जाणार्या पायर्यांचे एक चित्र मला दिसते. या पायर्यांच्या अखेरीस असलेले शिखर मात्र पूर्ण तयार झालेले नसते. पायर्या सतत वरवर जात असतात. एक व्यक्ती सावधपणे त्या अंतहीन पायर्या चढत आहे आणि आपल्यामागील कोट्यवधी बांधवांना सांगत आहे, एक पायरी चढलात, तरी मला पुरे आहे.
हे असंच चित्र मला डॉक्टरांच्या बाबतीत दिसतं. डॉक्टरांच्या हत्येनंतर एका कवीने त्याच्या कवितेत लिहिले…
दाभोलकर ऊन-पाऊस-वारा पित
ओठी घेऊन समतेचं गीत
प्रत्येकाच्या डोक्यातला अंधार झाडत
मस्तकातले धर्मांध किडे काढत
अंधश्रद्धेची भुते गाडत
अहोरात्र चालत राहिले
काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवाट्यापासून भोंदूंच्या मठापर्यंत
‘एक गाव – एक पाणवठ्या’पासून
‘जातपंचायती’च्या उच्चाटनापर्यंत
दाभोलकर अखंड लढत राहिले…
हा असा एक जगावेगळा माणूस होऊन गेला.
विसाव्या-एकविसाव्या शतकांच्या काही काळावर या जगावेगळ्या माणसाच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत. सध्याच्या इतिहास विद्रुपीकरणाच्या काळात त्या पाऊलखुणा भविष्यकाळाच्या कॅनव्हासवरून कधीच पुसल्या जाऊ नयेत म्हणून या पुस्तकाचा हा खटाटोप.
पुस्तकाचे नाव : पृथ्वीमोलाचा माणूस
संकल्पना : डॉ. राजेंद्र कांकरिया, अरविंद पाखले
प्रकाशक : प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे, डोंबिवली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
फोन : 9930927901
किंमत : 350 रुपये