पावणेतीन वर्षांच्या दिरंगाईनंतर सीबीआयने सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीचा साधक असलेल्या डॉ. वीरेंद्र तावडे याला 10 जून 2016 रोजी अटक केली. सीबीआयने पुणे येथील सेशन कोर्टामध्ये सांगितल्याप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी या तिघांच्याही खुनांच्या तपासामध्ये प्रमुख संशयित म्हणून डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक झाली आहे. अटकेआधी काही दिवस डॉ. वीरेंद्र तावडे व सारंग अकोलकर या सनातनच्या साधकांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले होते. या छाप्यांमधून डॉ. वीरेंद्र तावडे व सारंग अकोलकर यांच्यामधील ई-मेलमधून झालेला गोपनीय पत्र्यव्यवहार सीबीआयच्या ताब्यात मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या पत्रव्यवहारानुसार सारंग अकोलकर व डॉ. वीरेंद्र तावडे हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा कट रचणे; तसेच हिंदू राष्ट्राच्या उभारणीसाठी पंधरा हजार लोकांचे सैन्य उभे करणे अशा स्वरुपाच्या दहशतवादी कारवायांविषयी नियोजन करत असल्याचे समोर येत असल्याचा सूत्रांचा दावा आहे. सारंग अकोलकर हा 2009 सालापासून फरार असलेला सनातन संस्थेचा साधक आहे. 2008 साली मडगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सनातन संस्थेचे दोन साधक मलगोंडा पाटील व विजय नाईक मारले गेले होते. एन.आय.ए. कडे या बॉम्बस्फोटाचा तपास गेली सहा वर्षेआहे. या गुन्ह्यामधील चार फरार आरोपी सारंग अकोलकर, प्रवीण निंबकर, रूद्र पाटील व जयप्रकाश हेगडे हे 2009 पासून फरार आहेत. एन.आय.ए. ने या चौघांच्या विरोधात ‘इंटरनॅशनल रेड कॉर्नर नोटीस’ बजावली आहे. देशविघातक दहशतवादी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप या चौघांवरती ठेवण्यात आला आहे. या तपासामध्ये एन.आय.ए. ने टोकाचा गलथानपणा केल्याचे दिसून येते. या गुन्ह्याचा शोध वेळीच लागला असता, तर डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंदराव पानसरे आणि प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा जीव वाचू शकला असता, असे खेदाने म्हणावे वाटते. डॉ. वीरेंद्र तावडे याचा वरील चारही फरार साधकांशी संपर्क असल्याची माहिती पुढे येत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून खुनाच्या गुन्ह्याची पूर्ण उकल होण्यासाठी या चौघांची अटक होणे अत्यंत महत्त्वाची आहे. हिंदू विधिज्ञ समितीचे अॅड. संजीव पुनाळेकर यांनी जाहीररित्या पत्रकार परिषदेमध्ये सारंग अकोलकर व रूद्र पाटील हे त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे. देशविघातक गुन्ह्यांमध्ये सहभागी आरोपी संपर्कात असलेल्या अॅड. पुनाळेकर यांच्यासारख्या वकिलाची चौकशी होणे त्यामुळे अत्यावश्यक ठरते.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस; तसेच शिवसेना व भाजप हे डॉ. वीरेंद्र तावडेची अटक होण्याचे श्रेय स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वास्तव मात्र असे आहे की, महाराष्ट्र अंनिसने लोकशाही, सनदशीर मार्गाने गेली पावणेतीन वर्षेकेलेली निषेध आंदोलने, तपासाचा गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा पाठपुरावा आणि माध्यमांचा दबाव यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे.
अॅड. अभय नेवगी यांच्या पुढाकारामुळे दाभोलकर व पानसरे कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिच्या माध्यमातून न्यायालयीन नियंत्रण तपास यंत्रणांवर यायला मदत झाली. मडगाव बॉम्बस्फोटामधील फरार आरोपी सारंग अकोलकर व डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनातील संशयिताचे रेखाचित्र याच्यामधील लक्षणीय साम्य असल्याचे दीड वर्षापूर्वीच न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते. कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या खुनातील संशयित समीर गायकवाडच्या अटकेनंतर सारंग अकोलकरचा साथीदार असलेल्या रूद्र पाटील याला शोधण्याचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय व एस.आय.टी. ला दिले होते. गेल्या दहा महिन्यांमध्ये उच्च न्यायालयाने वेळोवेळी तपासाविषयी तीव्र शब्दांत असमाधान व्यक्त केलेले आहे. शेवटच्या तारखेला तर आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे किती स्मृतिदिन पाळायचे, मारेकर्यांना कधी पकडले जाणार, जर मारेकरी पकडले गेले नाहीत, तर सीबीआय व राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकार्यांना परेड करायला लावू, असे न्यायालयाने सांगितल्यावर तपासाची चक्रे गतिमान झालेली दिसतात.